सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.60/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 26/08/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि. 04/12/2010
सौ.स्मिता नारायण राऊळ
रा.सुर्वे चाळ,
जोग कॉम्प्लेक्सच्या जवळ,
खासकिलवाडा, सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री मायका एंटरप्रायझेस
रा.नरसिंहा सदन, जोशी हाऊस
माजगाव नाला, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग
2) सॅन्सुई ईलेक्ट्रीक प्रा.लि.
करीता मॅनेजिंग डायरेक्टर
रा.1, निलागांगण अपार्टमेंट,
ऑल इंडिया रिपोर्टर कार्यालयासमोर,
धंतोली, नागपूर,
महाराष्ट्र, पिन कोड नं.440 012. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री सचिन सावंत व विधिज्ञ सौ. लिना पेडणेकर.
विरुद्ध पक्ष क्र.1 व 2 तर्फे- गैरहजर.
(मंचाच्या निर्णयाद्वारेश्रीमती उल्का गावकर, सदस्या)
निकालपत्र
(दि.04/12/2010)
1) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 कडून टेलिव्हीजन सेट खरेदी केलेला असून त्यात बिघाड झालेमुळे व त्याची दुरुस्तीबाबत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवा पुरविली नसल्यामुळे, तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 हा SANSUI या कंपनीने बनविलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा विक्रेता तसेच डिलर असून, विरुध्द पक्ष क्र.2 हे SANSUI या कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविणारी कंपनी आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून दि.12/04/2003 रोजी डिलिव्हरी चलन क्र.471 अन्वये विरुध्द पक्ष क्र.2 ने बनविलेला SANSUI यां कंपनीची सी.टी.व्ही.21 इंच थडर मास्टर 21, मॉडल सिरियल क्र.1130302203 या कंपनीची टीव्ही रक्कम रु.15,250/- (रुपये पंधरा हजार दोनशे पन्नास मात्र) देऊन खरेदी केलेला आहे. सदर टिव्हीच्या पिक्चर टयुबची वॉरंटी 7 वर्षे दिलेली आहे. सदरहू टिव्हीमध्ये दि.30/3/2010 रोजी बिघाड झाला, म्हणून तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 चे तक्रार नोंदवहीवर तक्रार नोंदविल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे श्री केतकर यांनी टीव्हीची तपासणी केली असता त्यांनी टिव्हीची पिक्चर टयुब खराब झालेची कल्पना तक्रारदार याला दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे वांरवार संपर्क साधून टिव्हीच्या कागदपत्रांची पूर्तता करुनही विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदाराचा टिव्ही दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारदाराने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार टिव्ही खरेदी केल्याचे बील, डिलिव्हरी चलन व SANSUI कंपनीचे वादग्रस्त टिव्हीचे वॉरंटी कार्ड इ. कागद हजर केलेले आहेत.
2) सदरहू तक्रारीच्या नोटीसा विरुध्द पक्ष यांना बजावण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना अनुक्रमे नि.16 व नि.8 नूसार नोटीस बजावणी करणेत आलेली आहे; परंतु त्यांचेपैकी कोणीही मे. मंचासमोर हजर झालेले नाहीत किंवा लेखी म्हणणे दिलेले नाही. त्यामुळे मे. मंचाने त्यांचे म्हणण्याविना तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश केला. त्याप्रमाणे सदरहू प्रकरण एकतर्फी चालवणेत आले.
3) तक्रारदाराची तक्रार, तक्रारीसोबतचे शपथपत्र, तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे व सविस्तर केलेला युक्तीवाद याचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय/अंशतः |
-कारणमिमांसा-
4) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून दि.12/04/2003 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांनी बनविलेली SANSUI या कंपनीची सी टिव्ही. 21 इंच थंडर मास्टर, मॉडेल सिरियल नं1130302203 या कंपनीचा टिव्ही रक्कम रु.15250/- (रुपये पंधरा हजार दोनशे पन्नास मात्र) एवढया रक्कमेला खरेदी केलेली आहे. सदरहू टिव्हीच्या खरेदीचे डिलिव्हरी चलन तक्रारदाराने नि.3/1 वर हजर केलेले आहे. तसेच या टिव्हीचे बील नि.3/2 वर हजर केलेले आहे व या टिव्हीचे वॉरंटी कार्ड नि.3/3 वर हजर केलेले आहे. सदरहू वॉरंटी कार्डवर या टिव्हीचा मॉडेल क्रमांक नमूद असून सदरहू वॉरंटी कार्ड हे या टिव्हीच्या डिलिव्हरी चलनाचा भाग आहे. तक्रारदार याचा दि.30/3/2010 रोजी टिव्ही नादुरुस्त झाला म्हणून तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 कडे त्यांचे तक्रार नोंदवहीत याबाबत तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार विरुध्द पक्ष क्र.1 चे वतीने श्री केतकर मॅकेनिक यांनी टिव्हीची पाहणी केली असता, त्यांनी टिव्हीची पिक्चर टयुब गेलेबाबत तक्रारदार यांस सांगितले व सदरहू पिक्चर टयुबची वॉरंटी असलेने तक्रारदाराला विनामुल्य पिक्चर टयुब बदलून मिळेल असे सांगीतले व त्याप्रमाणे त्यांनी विरुध्द पक्ष यांच्या कस्टमर केअरशी संपर्क करुन त्यांनी पिक्चर टयुब गेल्याचे कळविले. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे वारंवार संपर्क साधून पिक्चर टयूब बदलून देऊन, टिव्ही दुरुस्त करुन देणेविषयी सांगितले. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पिक्चर टयुबची वॉरंटी मुदत असतांना पिक्चर टयुब बदलून देण्याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट तक्रारदारना उडवाउडवीची उत्तरे दिली व तक्रारदारास वेगवेगळया इसमांचे फोन नंबर देऊन त्यांचेशी संपर्क करण्यास सांगीतले. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदारास दुकानात येण्यास सांगून त्यांना पिक्चर टयुबची वॉरंटी संपली असलेने नवीन टयूब देणार नाही असे तक्रारदारास सांगीतले. प्रत्यक्षात तक्रारदाराचा टिव्ही बिघाड झाला व पिक्चर टयुब खराब झाली तेव्हा पिक्चर टयूबची वॉरंटी होती; परंतू विरुध्द पक्ष यांनी हेतूपुरस्सररित्या पिक्चर टयूब विनामुल्य बदलून न देण्याचे इरादयाने तक्रारदाराचे तक्रारीकडे दूर्लक्ष केलेला दिसतो. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना या तक्रारीची नोटीस पोहचून देखील त्यांनी या कामी हजर व्हायची तसदीही घेतलेली नाही. तक्रारदाराचे टिव्हीचे वॉरंटी कार्डचे अवलोकन करता सदरहू टिव्हीच्या पिक्चर टयूबची 7 वर्षाकरिता वॉरंटी आहे हे स्पष्ट होते असे असूनही वॉरंटी मुदत असून विरुध्द पक्ष यांनी जाणूनबूजून पिक्चर टयूब बदलून दिलेली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला देण्यात येणा-या सेवेत नक्कीच त्रुटी केलेली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
5) मुद्दा क्रमांक 2 - विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी मूदतीत पिक्चर टयूब बदलून दिलेली नाही. तक्रारदाराने नि.3/3 वर हजर केलेल्या वॉरंटी कार्डनुसार टिव्हीच्या पिक्चर टयूबची वॉरंटी ही 7 वर्षाची आहे. या कामी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी हजर होऊन तक्रारदाराचे म्हणणे खोडून काढलेले नाही. नि.3/1 वरील डिलिव्हरी चलन अन्वये तक्रारदारने वि.प.क्र.1 यांना टिव्हिचा मोबदला म्हणून रक्कम रु.15250/- अदा केलेली दिसते. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे नोटीस पोहोचूनही या कामी हजर न झालेने सदरची तक्रार ही विनाआव्हान राहिली. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर होणेस पात्र आहे, असे आमचे मत आहे. त्या दृष्टीकोनातून आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
- अंतिम आदेश –
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास विक्री केलेली SANSUI कंपनीची कलर टिव्ही 21 इंच थंडर मास्टर, टिव्ही मॉडेल क्र.1130302203 टिव्हीची पिक्चर टयूब बदलून नवीन पिक्चर टयूब घालून टिव्ही दूरुस्त करुन दयावा व त्या अनुषंगाने येणा-या इतर दुरुस्त्या कराव्यात.
3) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल रक्कम रु.2,000/- (रुपये दोन हजार मात्र) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.500/- (रक्कम रुपये पाचशे मात्र) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला दयावा.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 04/12/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-