निकालपत्र :- (दि.22/11/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला यांनी करारपत्राप्रमाणे निवासी सदनिकेचा ताबा न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्तयावर कायम रहिवाशी आहेत. यातील सामनेवाला हे तक्रारीत नमुद पत्त्यावर माई कन्स्ट्रक्शन या नांवे बिल्डींग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. सामनेवाला यांनी कोल्हापूर महानगरपालीका हद्दीतील बी वॉर्ड, येथील सि.स.नं. 1783/अ व 1783/ब ही मिळकत विकसीत केली असून सदर मिळकतीवर बांधणेत आलेल्या ‘’नाळे टॉवर्स’’ या बहूमजली इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं.एस-1, यासी क्षेत्र 860.00 चौ.फु. याच्या चतुसिमा –पुर्वेस-सरकारी रस्ता, पश्चिमेस-जिना, दक्षिणेस-1783/क ची मिळकत, उत्तरेस-बजापराव माने तालीम या वर्णनाची मिळकत सामनेवाला हे तक्रारदार यांना कायम खुष खरेदी देणेचे दि.25/08/2005 रोजी संचकारपत्र लिहून देऊन निश्चित केले होते व आहे. ब) सदर संचकारपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे सदर नमुद मिळकत सामनेवाला यांनी तक्रारदारास एकूण रक्कम रु.6,25,000/- ला कायम खरेदी देणेची आहे. तक्रारदार यांनी संचकारपत्र लिहून दिले त्या दिवशी म्हणजे दि.25/08/05 रोजी सामनेवाला यांना रोखीने रक्कम रु.1,00,000/- सदर मिळकतीची संचकार रक्कम म्हणून अदा केली आहे. सदर संचकारपत्र लिहून दिले तारखेपासून तीन महिनेचे आत खरेदीपत्र पुर्ण करुन देणेचे ठरले होते व आहे. क) सामनेवाला यांनी दि.25/08/2005 रोजीचे संचकारपत्राप्रमाणे खरेदीपत्र पूर्ण करुन सदर मिळकतीचा ताबा तक्रारदार यांना देणेचा होता. तथापि, तक्रारदार यांनी मुदतीत उर्वरित रक्कम घेऊन सामनेवाला यांचेशी संपर्क साधला असता सामनेवाला यांनी बांधकाम पूर्ण झाले नसलेने कोल्हापूर महानगरपालीकेकडून परिपूर्ती प्रमाणपत्र घेतलेले नाही आणि त्यामुळे खरेदीपत्र पूर्ण करुन देता येणार नाही असे तक्रारदारांना सांगितले. दरम्यानचे कालावधीमध्ये सामनेवाला यांनी सदर मिळकतीचे बांधकाम पूर्णपणे थांबवले. इमारतीचे बांधकाम का थांबवणेत आले आहे अशी विचारणा तक्रारदार यांनी सामनेवालांकडे केली असता सामनेवाला यांनी आर्थिक अडचणीमुळे बांधकाम थांबले असलेचे तक्रारदार यांना सांगितले आणि आणखी रक्कमेची मागणी तक्रारदार यांचेकडे केली. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे बोलण्यावर विश्वास ठेवून दि.05/0/2006 रोजी सामनेवाला यांना रोखीने रकक्म रु.75,000/- अदा केले. त्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाला यांचेशी संपर्क साधुन खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत विनंती केली असता सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेबाबत कोल्हापूर महानगरपालीकेकडून परिपूर्ती प्रमाणपत्र मिळाले नसलेने खरेदीपत्र पूर्ण करुन देणे अडचणीचे आहे व थोडयाच दिवसात परिपूर्ती प्रमाणपत्र प्राप्त करुन खरेदीपत्र पूर्ण करुन देत असलेचे सांगितले. पंरतु सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण करुन दिले नाही किंवा संचकारापोटी घेतलेली रक्कम रु.1,75,000/- तक्रारदार यांना परत केली नाही. ड) तक्रारदार यांना खात्रीलायकरित्या समजले आहे की सामनेवाला यांनी सदर मिळकतीचे खरेदीपोटी तक्रारदारांकडून रक्कम रु.1,75,000/- स्विकारली असतानाही तक्रारदारांना फसवून सदर मिळकत त्रयस्थ इसमांना विक्री तबदिली केली आहे. सामनेवाला यांचे सदरचे कृत्य हे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांमार्फत सामनेवाला यांना दि.10/06/2010 रोजी नोटीस पाठवून संचकाराची रक्कम व्याजासह मागणी केली. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना मागणी रक्कम दिली नाही. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला यांना सदर मिळकतीचे संचकारपोटी दिलेली रक्कम रु.1,75,000/- त्यावर द.सा.द.शे;18 टक्के व्याजाने होणारी रक्कम रु.1,52,250/-, वकील फी, टायपिंग, झेरॉक्स व कोर्ट खर्च रु.8,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-, सामनेवाला यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविणेचा आलेला खर्च रु.1,000/- असे एकूण रक्कम रु.3,41,250/- व्याजासह देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत दि.25/08/05रोजीचे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेले संचकारपत्र, वकील नोटीस, पोष्टाची पावती व पोहोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा, चुकीचा असून मे. कोर्टाची दिशाभूल करुन सहानुभूती मिळविणेसाठी दाखल केलेला आहे. तक्रारदाराने तक्रारीत दाखविलेले कारण चुकीचे असलेने त्यास कोणत्याही प्रकारे दाद मागता येणार नाही. तक्रारदाराने केले कथनाप्रमाणे सामनेवालांनी दि.25/08/2005रोजी संचकारपत्र लिहून दिलेले आहे. सदर संचकारपत्राचे आधारे पुढील तीन महिन्याच्या आत म्हणजेच दि.25/11/2005चे आत वादातील सदर मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण करणेचे होते. त्यानुसार तक्रारीचा मुदतीचा कालावधी दि.24/11/2007 रोजी संपतो. त्यामुळे कथीत तक्रार दाखल करणेस 2 वर्षे 8 महिने इतका विलंब झालेला आहे. त्याबाबत तक्रारदाराने दाखल केलेल्या विलंब माफीच्या अर्जात सदर विलंब चुकीचा निदर्शीत करुन मे.मंचाची दिशाभूल करु पहात आहेत. त्याचप्रमाणे दि.05/09/2006 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांना रक्कम रु.75,000/- अदा केलेले आहेत व तदनंतर मुदतीची गणना करुन तक्रार अर्जास कारण दाखवलेले आहे ते न्याय व वाजवी नाही. तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार अर्ज कलम 1 ते 10 मधील मजकूर हा पूर्णपणे खोटया कथनावर आधारित असून त्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. कलम 11 मधील मागणी पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने केलेली आहे. सबब प्रस्तुतचा अर्ज मे. मंचात चालणेस पात्र नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदारांचे कलम 24 अ प्रमाणे अर्जास दिलेल्या म्हणणेस बाधा न आणता सामनेवालांचे म्हणणे पुढीलप्रमाणे- मुळातच प्रस्तुतचा तक्रार अर्ज हा तथाकथीत करारपत्राचा कथीत भंग या मुद्दयावर आधारीत आहे. त्यामुळे सदरचा वाद हा दिवाणी स्वरुपाचा असलेने तो दिवाणी न्यायालयात चालणेस पात्र असून मे. मंचातून प्रस्तुतचा तक्रार अर्ज काढून टाकणेस पात्र आहे. सामनेवाला व तक्रारदार यांचेमध्ये ग्राहक हे नाते प्रस्थापित होत नाही. सामनेवालांनी तक्रारदारांकडे कोणत्याही पैशाची मागणी केलेली नाही.कलम 5 ते 9 मधील मजकूर अमान्य आहे. सदरचे तक्रारीत स्पेसीफीक रिलीफ अॅक्टची बाधा येते. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालवणेचा अधिकार प्रस्तुत मंचास येत नाही. तसेच तक्रारदाराने केलेली विनंती चुकीची व बेकायदेशीर आहे. सामनेवालांनी खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस नकार दिलेला नव्हता. तक्रारदारानेच खरेदीपत्र पूर्ण करुन घेणेस टाळाटाळ केलेने सामनेवालाने सदर वादातील मिळकत ति-हाईत इसमास विकणे भाग पाडले. सन-2008 मध्ये सदर मिळकतीची ति-हाईत इसमास विक्री केलेली आहे. सन-2005 ते 2008 पर्यंत तक्रारदाराने सामनेवालांने वारंवार मागणी करुनही खरेदीपत्र पूर्ण करुन घेणेस टाळाटाळ केलेने सामनेवालांनी प्रचंड आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले त्याची जबाबदारी पूर्णपणे तक्रारदारावर आहे. सदरची वस्तुस्थिती लपवून ठेवून केवळ कोर्ट फी चुकविणेचे दुष्ट हेतुने दिवाणी न्यायालयात दावा दाखल न करता मे. मंचात दावा दाखल केलेला आहे. सबब तक्रारदाराने रक्कम रु.1,75,000/- ची व्याजासहीत केलेली मागणी चुकीची असलेने सामनेवालांनी ती नाकारलेली आहे. वादाकरिता सामनेवालाने तक्रारदाराची रक्कम स्विकारली आणि असे ग्रहीत धरले तरी तक्रारदाराचे गैर कृत्यामुळे सामनेवालांना प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराने केलेली पैशाची मागणी चुकीची आहे. सामनेवालांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही. (05) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे शपथपत्रासह दाखल केलेले आहे व अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांचा युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) प्रस्तुतची तक्रार दाखल करणेसाठी झालेला विलंब माफ करता येईल का? --- होय. 2) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने तक्रारीसोबत दिलेल्या विलंब माफीच्या अर्जावर दि.17/07/2010 रोजी या मंचाने अंतिम चौकशीच्या वेळी सदरचा मुद्दा विचारात घेतला जाईल असा आदेश केला होता. त्याप्रमाणे सदर मुद्दयावर उभय पक्षांचे वकीलांचे युक्तीवाद ऐकले. प्रस्तुतची तक्रार दाखल करणेस शेवटचे वादाचे कारण दि.05/09/2006 रोजी घडलेले आहे. सदर दिवशी रक्कम रु.75,000/- ची रोखीची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. प्रस्तुतची तक्रार ही दि.17/07/2010 रोजी दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रार ही दि.05/09/2008 पर्यंत दाखल करावयास हवी होती. सदर तक्रार दाखल करणेस 1 वर्ष 10 महिन्याचा विलंब झालेला आहे. सदर विलंबाचे कारण यातील तक्रारदार क्र.1 यांना माहे मे-06 मध्ये मेंदू ज्वराचा रोग जडला होता व आहे. त्याबाबत दि.03/05/2006 ते 08/06/2006 या कालावधीमध्ये डॉ.कुर्ली यांचे गुरुकृपा हॉस्पिटल, रंकाळा स्टॅन्ड, कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते; तदनंतर त्यांना 18 महिने बेडरेस्ट घेणेचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते घराबाहेर पडू शकले नाहीत. तक्रारदार असाध्य रोगाने ग्रस्त असलेने त्यांना सातत्याने औषधोपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना मुदतीत तक्रार दाखल करता आलेली नाही. त्यानंतर त्यांनी सन-07 पासून मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेणेस सुरुवात केलेली आहे. तसेच तक्रारदाराचे आई कॅन्सरग्रस्त होत्या व त्यांचीही सेवा तक्रारदार करत होते. त्यांचे आईचा दि.02/09/2008 रोजी वयाच्या 68 व्या वर्षी मृत्यू झालेला आहे. तसेच तक्रारदारांचे वडील यांना जानेवारी-09 मध्ये लकवा मारला. वडीलांचे वय त्यावेळी 81 वर्षे होते. त्यामुळे तक्रारदारांना सात्यताने त्यांची देखभाल करणेची आवश्यकता होती. सदर परिस्थिती तक्रारदाराचे हाताबाहेरील आहे. दरम्यानचे काळात तक्रारदाराचे आई व वडील या दोघांचाही मृत्यू झालेला आहे. तसेच सामनेवाला यांनी कधीही तक्रारदार यांचेखरेदीपत्र रद्द झालेचे कळवलेले नाही. वरील वस्तुस्थिती तक्रारदाराने शपथेसह कथन केलेली आहे. याचा विचार करता अशा परिस्थितीत नैसर्गिक न्यायतत्व इक्वीटीचा विचार करता प्रस्तुत तक्रार दाखल करणेस 1 वर्ष 10 महिनेचा झालेला विलंबाचा कालावधी हा माफ करणेयोग्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराने त्यांचे अर्जात कथन केलेप्रमाणे दि.25/08/2005 रोजी संचकारपत्र केले होते व त्यानुसार सदर दिवशी रक्कम रु.1,00,000/- स्विकारलेचे मान्य केलेले आहे. तसेच दि.05/09/2006 रोजी रक्कम रु.75,000/- स्विकारलेचे मान्य केलेले आहे. सदर रक्कमेच्या रोखीच्या पावत्या तसेच संचकारपत्र प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. यावरुन सामनेवालांनी विकसीत केलेल्या मिळकतीमध्ये फ्लॅट बुकींग पोटी रक्कम रु.1,00,000/- संचकारपोटी व तदनंतर रक्कम रु.75,000/-रोखीत अदा केलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. दाखल संचकारपत्रानुसार कोल्हापूर महानगरपालीका हद्दीतील बी वॉर्ड, येथील सि.स.नं. 1783/अ व 1783/ब ही मिळकत विकसीत केली असून सदर मिळकतीवर बांधणेत आलेल्या ‘’नाळे टॉवर्स’’ या बहूमजली इमारतीमधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं.एस-1, यासी क्षेत्र 860.00चौ.फु. याच्या चतुसिमा –पुर्वेस-सरकारी रस्ता, पश्चिमेस-जिना, दक्षिणेस-1783/क ची मिळकत, उत्तरेस-बजापराव माने तालीम या वर्णनाची मिळकत देणेची होती व त्यापोटी रक्कम रु.6,25,000/- किंमत निश्चित करणेत आलेली होती. सदर संचकारपत्रानुसार तीन महिन्याच्या आत खरेदीपत्र पूर्ण करणेचे आहे. तसेच खरेदीचा खर्च तक्रारदाराने करणेचा आहे असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. तसेच तीन महिन्यात खरेदीपत्र लिहून देणा-यांनी पूर्ण करुन न दिलेस जरुर त्या न्यायालयात खरेदीपत्र दावा करुन पूर्ण करुन घेणेचा अधिकार तक्रारदारास दिलेला आहे. तसेच संचकारपत्रासोबत प्लॅन व स्पेसिफिकेशनही दिलेले आहेत. सामनेवालांनी युक्तीवादाच्या वेळेस प्रस्तुत संचकारपत्रावर तक्रारदार क्र.2 यांची सही नसलेचे निदर्शनास आणून दिले आहे. सबब नमुद संचकारपत्रास कायदेशीर दृष्टया कोणताही अर्थ रहात नाही असे प्रतिपादन केले आहे. याचा विचार करता सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये मात्र सदरची बाब नमुद केलेली नाही. तसेच सदर संचकारपत्रास अनुसरुन रक्कम रु.1,75,000/- स्विकारलेचे त्यांनी मान्य केलेले आहे. सबब सामनेवालांच्या या कथनास इस्टॉपलचा बाध येतो. अशा संचकारापोटी रक्कम स्विकारुन वाद मिळकतीचे मुदतीत खरेदीपत्र करुन न देता सदरची तक्रार दाखल झालेनंतर असा मुद्दा उपस्थित करणे हे सामनेवालांचे वर्तन वादातीत आहे.सबब सामनेवालांचा हा आक्षेप हे मंच ग्राहय धरु शकत नाही. सामनेवालांनी आपल्या म्हणणेमध्ये तक्रारदाराने कलम 5 मध्ये नमुद केलेले कथन नाकारलेले आहे. तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही सदर इमारतीचे बांधकामाचे परिपूर्ती प्रमाणपत्र न मिळालेने सदर खरेदीपत्र अपूर्ण राहिलेले आहे व तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास संचकाराव्दारे दिलेली मिळकत सामनेवालांनी त्रयस्त इसमास तबदील केलेचे कळले. सामनेवालांनी आपल्या म्हणणेमध्ये प्रस्तुतची मिळकत त्रयस्त इसमास विक्री केलेचे मान्य केलेले आहे; मात्र याचा दोष सामनेवालांनी तक्रारदारावर ठेवलेला आहे. सदर व्यवहार झालेपासून ते प्रस्तुतची तक्रार दाखल होईपर्यंत सामनेवालांनी तक्रारदारास कधीही संचकाराप्रमाणे नमुद व्यवहारापोटी ठरलेली किंमत वेळेत अदा न करुन खरेदीपत्र करुन घेतले नाही. त्यामुळे प्रस्तुतचे संचकारपत्र रद्द होत आहे अथवा सदरचा व्यवहार रद्द होत असलेबाबत तक्रारदारास लेखी कळवलेचे अथवा नोटीस दिलेचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत संचकारपत्र रद्द न करता त्रयस्त इसमास सामनेवालांनी नमुद फ्लॅटची विक्री केलेली आहे. तसेच खरेदीपत्र पूर्ण करुन देणेसाठी परिपूर्ती पत्र, भोगवटा प्रमाणपत्र याची आवश्यकता असते. संचकारपत्राप्रमाणे दि.25/08/2005 पासून ते तीन महिन्याच्या कालावधीपर्यंत सामनेवालांनी सदरचे बांधकाम पूर्ण केले. परिपूर्ती प्रमाणपत्र घेतलेले आहे व खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस ते तयार असतानाही तक्रारदाराने संचकाराप्रमाणे ठरलेली उर्वरित रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे सदरचे खरेदीपत्र पूर्ण करता आले नाही. याबाबतचा कोणताही वस्तुस्थितीजन्य व कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सबब सामनेवालांचे नुसत्या कथनावर हे मंच विश्वास ठेवू शकत नाही. तसेच संचकापत्र केलेली तारीख 25/08/2005 पासून तीन महिन्याच्या आता म्हणजेच दि.25/11/2005 पर्यंत तक्रारदाराने संचकारपत्राप्रमाणे ठरलेली फ्लॅटची रक्कम रु.6,25,,000/- तक्राररदाराने पूर्णत: अदा केली नसेल तर सामनेवाला सदरचे संचकारपत्र रद्द करु शकले असते मात्र तसे न करता त्यांनी दि.05/09/2006 रोजी नमुद व्यवहारापोटी रक्कम रु.75,000/- स्विकारुन पुढील व्यवहारास सामनेवालांनी मान्यता दिलेली आहे. सबब याचा दोष तक्रारदारावर ठेवता येणार नाही. ही वस्तुस्थिती असतानाही सामनेवालांनी संचकारपत्र रद्द न करता नमुद व्यवहारापोटी रक्कम रु.1,75,000/- स्विकारुनही त्रयस्त इसमास फ्लॅटची विक्री केलेली आहे. तसेच सदर रक्कम तक्रारदारास सामनेवालांनी परत केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारास दि.10/06/2010 रोजी वकील नोटीस देऊन सदरची रक्कमेची मागणी करुनही सामनेवालांनी अदा केलेली नाही. सामनेवालांनी तक्रारदाराची शुध्द फसवणूक केलेचे निदर्शनास आलेले आहे. सबब सामनेवालांच्या सेवेतील ही गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- सामनेवाला यांनी सदर नमुद मिळकत त्रयस्त इसमास विकून सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे. तसेच तक्रारदाराची संचकारपोटी घेतलेली रक्कम परत न केलेने तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. त्यापोटी तक्रारदार रक्कम मिळणेस पात्र आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाला यांना संचकारापोटी दिलेली रक्कम रु.1,75,000/- व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवालांनी तक्रारदाराकडून तक्रारीत नमुद मिळकतीच्या खरेदीपोटी घेतलेली रक्क्म रु.1,75,000/- त्वरीत अदा करावी. सदर रक्कमेवर दि.05/09/2006 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज अदा करावे. 4) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |