जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
ग्राहक तक्रार क्रमांक – ५३/२०११
तक्रार दाखल दिनांक – १८/०३/२०११
तक्रार निकाली दिनांक – २२/०५/२०१४
ओम क्रिटीकल केअर सेंटर,धुळे तक्रारदार
तर्फे-चेअरमन श्री.डॉ.मनिष सुरजमल जाखेटे
उ.व.४४, तिरुपती हौसिंग सोसायटी,
अग्रवालनगर,धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी - सामनेवाले
नोटीसीची बजावणी- कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,
साक्रीरोड, धुळे,ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.वाय.एल.जाधव)
निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी वीज बिलात दाखविलेली थकबाकी रद्द होऊन मिळावी, तक्रार अर्ज ६२/२००२ च्या निकालाप्रमाणे वीज बिलातील वजावट करुन मिळावी या मागणीसाठी, तक्रारदार यांनी या मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, धुळे महापालिका हद्दीतील सर्व्हे नंबर ४६१ पैकी फायनल प्लॉट क्र.१०४/४ ही मिळकत रघुनाथ भगवान चौधरी व अलका सुभाष चौधरी यांच्या मालकीची आहे. ही मिळकत भाड्याने घेऊन तेथे तक्रारदार ओम क्रिटीकल सेंटर नावाची वैद्यकिय सेवा चालवितात. या मिळकतीच्या तळ मजल्यावर वीज मिटर असून त्याचा ग्राहक क्रमांक ०८००१०४१४५१६ असा आहे. तक्रारदार हे त्या मिटरचा वापर करीत आहेत. २००० सालापासून तक्रारदार हेच सदर मिटरवरील वीज वापराचे बिल भरत आहेत. दि.१७-०१-२००२ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम रु.१,०२,६७५/- ताबडतोब भरा, न भरल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाईल असा इशारा दिला. तक्रारदार यांनी ती रक्कम भरली. त्यानंतर ग्राहक मंचामध्ये ६२/२००२ ही तक्रार दाखल केली. त्याचा निकाल २२-१२-२००३ रोजी झाला आहे. या निकालाविरुध्द सामनेवाले यांनी मा.राज्य आयोग, यांच्याकडे अपील केले होते. ते अपील दि.२४-०१-२००५ रोजी फेटाळण्यात आले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे रु.१,५२,६७५/- ही रक्कम भरली होती. ती रक्कम पुढील बिलातून वळती करण्याचे आदेश मंचाने दि.२२-१२-२००३ रोजी दिले होते. त्याच बरोबर ग्राहक मंचाने सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रोखीने रु.१,०००/- व त्यावरील व्याज देण्याचे आदेश दिले होते. मात्र सामनेवाले यांनी तेही तक्रारदार यांना दिलेले नाही. सामनेवाले यांनी दि.०१-१२-२००८ रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून ऑक्टोबर २००६ च्या बिलातून रु.१,५३,८२०-२५ वजा केले असल्याचे कळविले. मात्र ऑक्टोबर २००६ पर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदाराचे बिल अनाधिकाराने थकविले व त्यावर अवास्तव व्याज दाखविले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दि.१०-०२-२०११ रोजी दिलेल्या बिलात रु.८२,११७.९३ पैसे इतकी थकबाकी दाखविली आहे. ती थकबाकी रद्द होऊन मिळावी, सामनेवाले यांच्याकडून रु.१,५२,६७५/- या रकमेची वजावट करुन नव्याने बिल अदा करुन मिळावे, तक्रारदार यांचे मिटर खराब असल्याचे निष्पन्न झाले असल्याने मार्च २००६ ते नोव्हेंबर २००६ या कालावधीतील बिले रद्द करुन मिळावीत. रु.१,५२,६७५/- या रकमेवर दि.०९-०६-२००३ ते ऑक्टोबर २००६ या कालावधीतील २४ टक्के प्रमाणे व्याज मिळावे. मानसिक त्रासापोटी रु.१,००,०००/- मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीसोबत सामनेवाले यांना दि.०८-०३-२०११ व दि.०७-०३-२०११ रोजी दिलेली नोटिस, सामनेवाले यांना बिलापोटी दिलेला धनादेश परत केला ते पत्र, दि.१०-०२-२०११ या तारखेचे वीज बिल, जिल्हा ग्राहक मंचाच्या ६२/२००२ या तक्रारीच्या निकालाची प्रत, राज्य आयोगाकडील अपिलाच्या निकालाची प्रत, मिटर तपासणीपोटी भरलेल्या बिलाची पावती, सामनेवाले यांनी मिटर तपासणीसाठी दिलेल्या पत्राची प्रत, सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.१८-०८-२००६ रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत, तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी दि.२९-०९-२००६ रोजी पाठविलेले पत्र, सामनेवाले यांनी दि.२७-१०-२००६ रोजी पाठविलेले पत्र, जिल्हाधिका-यांकडे दि.१७-११-२००८ रोजी केलेली तक्रार, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.१७-११-२००८ रोजी पाठविलेले पत्र, सामनेवाले यांनी दि.०१-१२-२००८, दि.२०-०५-२०९, दि.१२-०६-२००९ व दि.२१-०१-२०१० रोजी पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी दि.०५-१२-२००९ रोजी पाठविलेले पत्र आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले यांनी हजर होऊन आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांचे मोठे रुग्णालय आहे. त्याचा व्यवसाय हा हेतू आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. तक्रारीतील कथन संदिग्ध आहे. त्यातून नेमक्या काय त्रुटी झाल्या किंवा सेवेत काय कसूर केला हे स्पष्ट होत नाही. तक्रारीतील कथनाप्रमाणे जुलै व ऑगस्ट २००६ च्या बिलाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरुन तक्रार, कथन, आरोप व त्या अनुषंगाने केलेली मागणी मुदतबाह्य आहे. रु.१,५२,६७५/- या बिलाचा परतावा तक्रारदार यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्याकडून ही रक्कम व्याजासह घेतलेली नव्हती. त्यामुळे त्यांना व्याज परत करण्याचा प्रश्न येत नाही. तक्रारदार यांनी बिलाचा नियमित भरणा केलेला नाही. बिलाची थकबाकी झाल्यास संगणकाद्वारेच त्या रकमेवर प्रचलित व्याज नावे पडत असते. तक्रार कलम १३ (ब) मधील मागणी अयोग्य आहे. सामनेवाले कंपनीने रक्कम दिली असल्याने ती पुन्हा देण्याचा प्रश्न येत नाही. कलम १३ (क) ची मागणी २००६ मधील असल्याने ती मुदतबाह्य आहे. त्यामुळे ती रद्द करावी, तसेच कलम (ड) मधील मागणी अव्यवहार्य, बेकायदेशीर आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
(५) सामनेवाले यांनी खुलाशासोबत तक्रारदार यांचा जानेवारी २००६ पासूनचा खाते उतारा दाखल केला आहे.
(६) तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले यांचा खुलासा व त्यासोबत दाखल केलेला खाते उतारा पाहता आणि तक्रारदार व सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकला असता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : नाही |
(ब) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार हे ज्या मिळकतीमध्ये रुग्णालय चालवितात ती मिळकत रघुनाथ भगवान चौधरी व अलका सुभाष चौधरी यांच्या मालकीची आहे. या मिळकतीवर तिरुपती हौसिंग सोसायटी नावाची इमारत उभी आहे. याच इमारतीत तक्रारदार यांचे ओम क्रिटीकल केअर सेंटर या नावाने रुग्णालय आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत ज्या वीज मिटरचा उल्लेख केला आहे ते वीज मिटर क्रमांक ९०-००१६०१४५ हे चेअरमन, तिरुपती हौसिंग सोसायटी यांच्या नांवे आहे. त्याचा ग्राहक क्रमांक ०८००१०४१४५१६ असा आहे. यावरुन चेअरमन, तिरुपती हौसिंग सोसायटी हे सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याचे दिसते. तक्रारदार हे वरील मिटरचा उपभोग घेत आहेत. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ड) (दोन) याचा आधार घेत आहेत. वरील कलमात ग्राहक याचा अर्थ स्पष्ट केला आहे, तो खालील प्रमाणे.
कलम २ (ड) (दोन)
ज्याने प्रदान करण्यात आले आहे किंवा प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे किंवा अंशत: प्रदान करण्यात आले आहे किंवा अंशत: देण्याचे वचन देण्यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीनुसार कोणतीही सेवा [भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते] अशी कोणतीही व्यक्ती असा असून जेव्हा अशी सेवा प्रथमनिर्दिष्ट व्यक्तीच्या संमतीने उपलब्ध झाली असेल अशा बाबतीत त्यात देण्यात आलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशत: दिलेल्या किंवा अंशत: देण्याचे वचन दिलेल्या प्रतिफलासाठी किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीसाठी अशी सेवा [भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते अशा] व्यक्तीखेरीज अशा सेवेच्या कोणत्याही लाभधा-याच्या समावेश असेल.
[परंतू, अशी सेवा व्यापारी कारणाकरीता घेतली असेल अशा कोणत्याही व्यक्तीचा यात समावेश होत नाही.]
वरील कलमातील स्पष्टीकरणाचा विचार केला तर, तक्रारदार हे तिरुपती हौसिंग सोसायटीच्या नावे असलेल्या वीज मिटरचा वापर करीत असले तरी, ज्या कारणासाठी ते उपभोग घेत आहेत ते कारण व्यावसायीक या सदरात मोडते. तक्रारदार हे वरील मिळकतीत रुग्णालयाचा व्यवसाय चालवितात. त्यामुळे त्यांना वरील कलम लागू होत नाही असे मंचाचे मत बनले आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” ठरत नाहीत हे स्पष्ट आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – मुद्दा क्र. ‘‘अ’’ मधील विवेचन आणि ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ड) (दोन) याचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” होत नाहीत हे स्पष्ट आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी नुसार केवळ ग्राहक या निकषात बसणा-या तक्रारदारांनाच ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागण्याचा आणि न्याय मिळवून घेण्याचा अधिकार आहे. सदर तक्रारीत तक्रारदार हे ग्राहक ठरत नसल्याने त्यांना या मंचात न्याय मागण्याचा आणि त्यांच्या तक्रारीवर कोणताही निर्णय देण्याचा या मंचाला अधिकार नाही, असे आमचे मत बनले आहे. याच कारणावरुन तक्रारदार यांच्या सदर तक्रारीवर कोणताही निर्णय देता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(२) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दिनांक : २२-०५-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.