निकाल
(घोषित दि. 13.04.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार ही मौजे कुंभारझरी ता.जाफ्राबाद जि.जालना येथील रहिवाशी आहे. तिला कुंभारझरी येथे गट क्रमांक 234 मध्ये 1 हेक्टर 80 आर जमीन आहे. तिने स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा जाफ्राबाद यांच्याकडे ऑक्टोबर 2015 च्या दरम्यान कृषी कर्ज मिळविण्याकरता अर्ज केला. सामनेवाला यांनी तो मंजूर केला व 7,00,000/- रुपयाचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले. सदरील कर्ज तक्रारदार हिला शेतीच्या विकासाकरता तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि फळबाग लागवडीकरता आवश्यक होते. तक्रारदार हिने सामनेवाला याने सुचविल्याप्रमाणे कर्ज प्रकरणाला आवश्यक असलेले कागदपत्र तयार केले, त्याकामी तक्रारदार हिला रु.30,000/- खर्च आला. तक्रारदार हिच्या जमिनीचे गहाण खत करवून घेतले. त्याप्रमाणे सदर शेतजमिनीचे महसुल रेकॉर्डला कर्ज रक्कम रु.7,00,000/-चा बोजा टाकण्यात आला. दि.23.03.2016 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे इतर बॅंकेचे नो डयुज सर्टिफिकेट दाखल केले. कर्जाची रक्कम अदा करण्याकरता तक्रारदार हिच्याकडून सामनेवाला यांनी रक्कम रु.50,000/- देण्याची तोंडी मागणी केली. तक्रारदार ही सामान्य शेतकरी असून सर्वसाधारण कुटूंबातील असल्यामुळे ती सामनेवाला यांची मागणी पूर्ण करु शकली नाही. वरील कारणास्तव सामनेवाला यांनी मंजूर झालेले 7,00,000/- रुपयाचे कर्ज देण्यास टाळाटाळ केली व शेवटी नकार दिला. कर्जाची रक्कम आज ना उद्या मिळेल या आशेने तक्रारदार हिने इतर मार्गाने तिची गरज भागवून घेतली व शेतीची कामे पूर्ण केली. त्याकरता तिला रु.50,000/- आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सामनेवाला यांनी तक्रारदार हिचे मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम न दिल्यामुळे तिला मानसिक त्रास झाला. तक्रारदार हिला मंजूर झालेले कर्ज देण्यात आले नाही. परंतू तिच्या शेतीच्या 7/12 वर मात्र कर्जाच्या बोजांची नोंद आहे. संबंधित तलाठी यांनी सदर बोजा कमी करावा म्हणून सामनेवाला यांनी आदेश देणे आवश्यक आहे, तसे पत्र दिल्यानंतर तक्रारदार हिचे नावे असलेल्या कर्जाच्या बोजांची नोंद कमी होईल. त्यानंतर सामनेवाला यांनी गहाण खत रदद करण्याकरता नोडयुज सर्टिफिकेट देऊन गहाण खत रदद् करुन द्यावे अशी तक्रारदाराची मागणी आहे. वरील कारणास्तव तक्रारदार हिने सामनेवाला यांचेकडून एकूणरु.1,30,000/- तसेच अर्जाचा खर्च म्हणूनरु.5,000/- मागितले आहेत.
तक्रारदार हिने तक्रार अर्जासोबत इतर बॅंकेकडून मिळालेल्या नो डयुज प्रमाणपत्रांच्या नक्कला दाखल केल्या. तसेच तक्रारदार हिचेकडून करुन घेतलेल्या मॉर्टगेज दि.15.03.2016 ची नक्कल दाखल आहे. तक्रारदार हिचे शेतजमिनीचे 7/12 च्या हक्कात 7,00,000/- रुपयाच्या कर्जाच्या बोजांची नोंद घेतली गेली त्या उता-याची नक्कल दाखल आहे.
तक्रारदार हिने पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले. सामनेवाला यांना ग्राहक मंचाची नोटीस मिळाली. पंरतू सामनेवाला ग्राहक मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे सामनेवाला यांच्याविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
सामनेवाला यांनी ग्राहक मंचाच्या नोटीसच्या रजिस्टर पोस्टाच्या पोच पावतीवर सही केली, ती पावती ग्राहक मंचात दाखल आहे.
सामनेवाला विरुध्दचे प्रकरण एकतर्फा झाल्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे जसे आहे तसे स्विकारण्यास आम्हास कोणतीही अडचण नाही. 7/12 च्या उता-यावरील नोंद, गहाण खताची नक्कल व सामनेवाला यांनी सब रजिस्ट्रारला गहाण खताचे बाबत पाठविलेले पत्र याचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, तक्रारदार हिने सामनेवाला बॅंक यांचेकडून रु.7,00,000/- कर्ज घेण्याकरता स्वतःच्या शेतजमिनीचे गहाण खत करुन दिले. सदर गहाण खतानुसार तक्रारदार हिच्या शेतजमीनीचा 7/12 वर रु.7,00,000/- च्या बोजांचीही नोंद झाली. सामनेवाला यांनी सदर कर्जाच्या रकमेचे वितरण तक्रारदार हिला करण्याकरता बेकायदेशीरपणे रक्कम रु.50,000/-ची मागणी केली. तक्रारदार सदर मागणी पूरी करण्यास असमर्थ होती त्यामुळे तिने इतर मार्गानी तिला आवश्यक असलेल्या पैशाची जमवाजमव करुन शेतीची विकास कामे करुन घेतली. तिने कर्जाची रक्कम सामनेवाला यांच्याकडून उचललेचीच नव्हती. त्यामुळे तिचे शेतजमिनीच्या 7/12 वरील रु.7,00,000/- कर्जाच्या बोजांची नोंद रदद करणे आवश्यक होते, परंतू सामनेवाला तिला सहकार्य करणार नाही अशी तक्रारदार हिला खात्री होती. त्यामुळे तिने ग्राहक मंचाकडे दाद मागितली व सामनेवाला यांना सांगून तसे पत्र तलाठयास देऊन तिच्या 7/12 वरील कर्जाच्या बोजांची नोंद रदद करुन मिळावी अशी मागणी केली. तसेच सामनेवाला यांचे हक्कात कर्ज मिळविण्याकरता केलेले गहाण खत रदद करुन मिळण्याची मागणी केलेली आहे. आमच्या मताने तक्रारदार हिला मंजूर झालेले कर्ज न देऊन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हा तक्रार अर्ज मंजूर करवून घेण्यास पात्र आहे. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला यांनी संबंधित तलाठी व सब रजिस्ट्रार यांना पत्र पाठवून
तक्रारदार हिचे शेतजमिनीवरील बॅंक कर्जाच्या बोजांची नोंद रदद करवून
द्यावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार हिचे नावे नो डयुज सर्टिफिकेट देऊन
तक्रारदाराने बॅंकेच्या हक्कात रु.7,00,000/- कर्जाकरीता जे गहाण खत
करुन दिले ते कायदेशीररितीने रदद करवून द्यावे.
4) सामनेवाला यांनी तक्रारदार हिला झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबददल
नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.10,000/- द्यावेत.
5) सामनेवाला यांनी या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी तक्रारदार हिला रक्कम
रु.5,000/- द्यावेत.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना