जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 07/05/2010. तक्रार आदेश दिनांक : 28/04/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 231/2010. श्री. राजकुमार दिगंबर गायकवाड, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2010. श्री. दत्तात्रय शिवाजी दळवे, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. यावली, पो. मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2010. श्री. विकास राजकुमार गायकवाड, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. ब्लॉक नं.64, दमाणी नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 234/2010. श्री. कामराज अभिमान गुंड, वय सज्ञान, व्यवसाय : शेती, रा. खंडोबाची वाडी, पो. मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनान्स सर्व्हीसेस लि., ताज प्लाझा, मुरारजी पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.व्ही. नागणे विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एम.आर. जगताप आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत चारही तक्रारीतील विषय, स्वरुप व विरुध्द पक्ष इ. मध्ये साम्य असल्यामुळे त्यांचा एकत्रित निर्णय देण्यात येत आहे. 2. प्रस्तुत तक्रारींमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वाहन खरेदी करण्यासाठी अनुक्रमे रु.1,25,000/-, रु.3,40,000/-, रु.3,40,000/- व रु.3,40,000/- कर्ज घेतलेले आहे. कर्ज देताना विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या को-या कागदपत्रांवर स्वाक्ष-या घेतल्या असून करार व इतर कागदपत्रे त्यांना दिलेली नाहीत. तक्रारदार यांनी ठरवून दिल्याप्रमाणे कर्ज हप्ते व्याज व मुद्दलासह भरणा केले आहेत. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे नाहरकत पत्राची मागणी केली असता त्यांच्याकडून जास्त रकमेची मागणी करण्यात येत आहे. सबब, तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारींद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून नाहरकत पत्र मिळावे आणि त्यांचे वाहन जप्त करण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातील करारानुसार प्रस्तुत तक्रार मंचाचे कार्यकक्षेत येत नाही. तक्रारदार यांनी करारातील संपूर्ण अटी मान्य व कबूल करुन कर्ज घेतलेले आहे. तक्रारदार यांनी करार तारखेपासून तिसाव्या दिवशी व ठरलेल्या मुदतीमध्ये रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे त्यांना लेट फायनान्स चार्जेस आकारण्याचा त्यांना अधिकार आहे. तक्रारदार यांच्याकडून त्यांना लेट फायनान्स चार्जेस वसूल होणे आवश्यक आहेत. शेवटी त्यांनी तक्रार नामंजूर करण्याची विनंती केली आहे. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांनी कर्जाचे संपूर्ण हप्ते परतफेड केल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांना कर्जाची संपूर्ण परतफेड करुनही नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याची त्यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्याकडून लेट फायनान्स चार्जेस येणे बाकी आहेत. 6. तक्रारदार यांनी संपूर्ण कर्ज हप्ते परतफेड केलेले आहेत. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर कर्जाचे लेखा विवरणपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये ‘ए.एफ.सी.’ या बाबीखाली रक्कम देय असल्याचे नमूद आहे. वास्तविक पाहता, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना करारातील कोणत्या अटीप्रमाणे सदर चार्जेस आकारणी केले आहेत ? हे स्पष्ट केलेले नाही. सदर चार्जेस वसुलीचा अधिकार असल्याचे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे असल्यास त्यांना तो अधिकार असल्याचे सिध्द करणे आवश्यक होते. ‘ए.एफ.सी.’ चार्जेस देण्याचे तक्रारदार यांच्यावर बंधन असल्याचे कागदोपत्री सिध्द न झाल्यामुळे सदर चार्जेस भरण्याची तक्रारदार यांच्यावर सक्ती करणे अनुचित ठरते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत असून तक्रारदार हे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना संपूर्ण कर्ज परतफेड झाल्याबद्दल नाहरकत प्रमाणपत्र या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावे. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/28411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |