( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 09, डिसेंबर 2010 ) तक्रारदार श्री बंडु मन्साराम सोनवाने, रा.खुमारी, जबलपुर रोड, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, खुमारी, पो. खुमारी, ता.रामटेक, जि. नागपूर यांनी तक्रार विरुध्दपक्ष क्रं. 1 महिन्द्रा अण्ड महिन्द्रा फायनान्सीअल सर्व्हीसेस लि. 2 रा माळा, साधना हाऊस, महिन्द्रा टॉवर्सच्या मागे, 570, पी.बी.मार्ग, वरळी, महाराष्ट्र, मुंबई शहर, मुंबई 400018, व विरुध्द पक्ष क्रं.2 महिन्द्रा अण्ड महिन्द्रा फायनान्सीअल सर्व्हीसेस लि. नारंग टॉवर्स, 1 ला माळा, पालम रोड, ट्रॉफीक पोलीस कार्यालय, सिव्हील लाईनच्या समोर नागपूर-1. यांचे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल करुन विरुध्द पक्षाने 10 ते 12 गुंड प्रवृत्तीचे लोकांना पाठवुन तक्रारदाराचे ट्रॅक्टर उचलुन नेले त्यामुळे तक्रारदाराला मनस्तापापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मंचाला विनंती केली. तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे 1. तक्रारदाराने वर्षे 2008 साली विरुध्द पक्षाकडुन खालील विवरणातील, पंजाब ट्रॅक्टर लि., वाहन क्रमांक एमएच-40-ए- 5804, टाईप ऑफ बॉडी – ओपन, मॅन्यफॅक्चरिंग जुन-2007, नंबर आफ सिलेंडर- 3, चेसीस नंबर –क्युएसटीडी-40610009060, इंजिन नंबर -43.1022/एसकेबी 0557, फ्युल- डिझेल, अश्व शक्ती- 48 अश्व शक्ती, स्वराज 744, आसन क्षमता एक, वजन- 1930 किलो. असे ट्रॅक्टर स्वयंरोजगाराकरिता विकत घेण्यासाठी अर्थसहाय्य घेतले. विरुध्द पक्षानी रुपये 3,66,000/- एवढी रक्कम तक्रारदारांना कर्ज मंजूर केले. त्यावर तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाने त्यांचेकडुन 10 कोरे धनादेश, कोरे पेपर व को-या प्रोफार्मावर तक्रारदारासमक्ष श्री चद्रभान ताराचंद धोटे हजर असतांना स्वाक्ष-या घेतल्या. 2. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाकडुन अर्थसहाय्यापोटी घेतलेल्या रक्कमेची परत फेडीचा पहीला हप्ता दिनांक 5.1.2008 रोजी, दुसरा हप्ता दि.5.7.2008 आणि तिसरा हप्ता दि.5.1.2009 रोजी थकीत झाला आणि तक्रारदाराने या तिन्ही वेळेस कर्जाची परतफेड रोख रक्कम देऊन केल्यामुळे विरुध्द पक्षाने त्याबद्दल घेतलेले धनादेश तक्रारदाराला परत केले. 3. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे जुलै-2009 मध्ये त्यांनी घेतलेल्या ट्रॅक्टरमधे बिघाड आल्यामुळे आणि त्याचे दुरुस्तीकरिता त्यांना रुपये 50,000/-एवढा रक्कमेचा खर्च आल्यामुळे तक्रारदार जुलै- 2009 चा हप्ता भरु शकले नाही. 4. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारदाराला हप्ता भरण्यासाठी नोटीसद्वारे कळविण्यास हवे होते. परंतु तसे न केल्यामुळे ही त्यांचे सेवेतील त्रुटी ठरते. 5. तक्रारदाराने दिनांक 2.2.2010 रोजी विरुध्द पक्षाला वकीला मार्फत नोटीस दिली.त्यास विरुध्द पक्षाने दिनांक 8.2.2010 रोजी उत्तर पाठविले. 6. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे फक्त चवथ्यावर्गापर्यत शिक्षण झालेले आहे आणि त्यांला इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे विरुध्द पक्षांने केलेला पत्र व्यवहार अमान्य आहे. 7. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने तक्रारदारास नोटीस न देता 5.12.2009 रोजी तक्रारदाराचा ट्रॅक्टर जोरजबरदस्तीने उचलुन नेला आणि दिनांक 6.12.2009 रोजी तक्रारदाराचा ट्रॅक्टर विकुन टाकला. त्यामुळे तक्रारदाराला नुकसान व मनस्ताप झाला त्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने ट्रॅक्टर उचलुन नेल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी रुपये 1,00,000/- , विरुध्द पक्ष क्रं. 2 कडे नगदी जमा केलेले रुपये 2,16,600/- चे नुकसानीपोटी व सदर रककमेवर 18टक्के दराने व्याज मिळावे इत्यादी मागण्या केल्या. 8. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीसोबत एकुण 18 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात गैरअर्जदार यांचेकडे रक्कम भरल्याच्या पावत्या, शाळेचे प्रमाणपत्र, धनादेशाची झेरॉक्स, रजिस्ट्रेशनचे पेपर, विम्याची प्रत,एस्टिमेट,सर्टिफिकेट ऑफ कव्हर,गैरअर्जदार क्रं.1 चे प्रत, डिलीव्हरी मेमो,वकीलाची नोटीस, पावत्या, गैरअर्जदार क्रं.1 चे उत्तर, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. 9. तक्रार दाखल झाल्यावर मंचाद्वारे विरुध्द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुनही विरुध्द पक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दिनांक 06.04.2010 रोजी दाखल केला. 10. विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात तक्रारदारास अर्थसहाय्य दिल्याची बाब मान्य केली आहे परंतु तक्रारदाराचे इतर विधाने नाकबुल केली आहेत. 11. विरुध्द पक्षाने त्यांचे अधिकचे उत्तरात नमुद केले आहे की, उभयपक्षात अर्थसहाय्य देण्याबाबत दिनांक 3.7.2009 रोजी करार झाला होता आणि त्याप्रमाणे करारातील अटी अनुसार कोणताही वाद उपस्थित झाल्यास त्यास आरबिट्रेशन क्लॉज असल्यामुळे या मंचाला अधिकारक्षेत्र नाही. विरुध्द पक्षाने पुढे हे ही नमुद केले आहे की, उभयपक्षात दिनांक 3.7.2007 रोजी अर्थसहाय्य करण्याकरिता करार करण्यात आला होता आणि त्याअनुषंगाने कर्जाचे परतफेडी बद्दलचे परिशिष्ठ (schedule) सुध्दा तक्रारदाराला देण्यात आले होते. त्याप्रमाणे रुपये 6,14,200/- ची परतफेड 10 सहामाही हप्त्यामध्ये करावयाची होती व त्यानुसार त्या पध्दतीमध्ये हप्ते पाडण्यात आले होते त्यामध्ये 1 ते 4 हप्ते हे रुपये 72,100/- चे होते. तसेच 5 ते 8 हप्ते रुपये 58,650/- चे होते. आणि शेवटचे 9 व 10 हप्ते रुपये 45,600/- चे असे ठरले होते. परंतु तक्रारदाराने ठरलेल्या तारखेवर कधीही कर्जाची परतफेड केली नाही आणि त्यामुळे कराराच्या अटी अनुसार तक्रारदाराला लेट पेमेंट चार्जेस 3 टक्के विरुध्द पक्षातर्फे लावण्यात आले. 12. जुलै-2009 चा हप्ता थकीत झाला आणि पाचवा हप्ता जानेवारी 2010 ला थकीत होईल आणि त्याबद्दलची कर्जाची परतफेड करण्याकरिता असमर्थ असल्याची तक्रारदार याला जाणीव होती त्यामुळे तक्रारदाराने दिनांक 5.12.2009 रोजी सदर ट्रॅक्टर विरुध्द पक्षाकडे सरेण्डर केला आणि लिहुन दिले की, “ मी स्वतः ट्रॅक्टर जमा केला आहे. गाडीचे थकीत हप्ते भरुन ट्रॅक्टर घेवून जाणार ” अशा प्रकारे स्वहस्ताक्षरात पत्रावर लिहुन दिले. 13. विरुध्द पक्षाने तक्रारदाराला शेवटची नोटीस दिनांक 8.12.2009 रोजी पाठविली व त्यात सदर ट्रॅक्टर परत घेऊन जावयास म्हणटले होते. परंतु ही नोटीस “ Not Claimed ”, घेण्यास नकार या शे-यासह दिनांक 14.12.2009 ला परत आली. विरुध्द पक्षाने दिनांक 8.2.1010 रोजीचे उत्तराद्वारे सदर ट्रॅक्टर हा विकलेला आहे आणि त्याची रक्कम 14.1.2010 ला प्राप्त झाली आहे असे तक्रारदाराला सांगीतले आणि राहीलेली रक्कम तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे जमा करावी असे सुध्दा सुचीत केले. 14. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराचा ट्रॅक्टर कायदेशिर मार्गाने विकण्यात आला आणि त्याकरिता विरुध्द पक्षास रुपये 2,75,000/- एवढी रक्कम मिळाली आणि तक्रारदाराकडे रुपये 1,12,310/- रुपये थकीत होते. विरुध्द पक्षाने ज्यावेळेस ट्रॅक्टर विकले त्यावेळेला तक्रारदाराकडे एकुण रुपये 3,87,310/- एवढी रक्कम थकीत होती आणि या कर्जाची वसुली होऊ नये म्हणुन तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे. 15. गैरअर्जदाराने त्याचे उत्तरासोबत एकुण 7 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात कर्ज करारनामा, स्टेटमेंन्ट ऑफ अकाऊंन्ट, समरी डिटेल्स, पो.स्टे.माहिती, सरेंन्डर लेटर, रोख पावती, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. 16. दिनांक 30.11.2010 रोजी मंचाने उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकला व रेकॉर्डवरील कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे. //-//-//- निरिक्षणे व निष्कर्ष -//-//-// 17. तक्रारदाराने स्वयंरोजगारसाठी ट्रॅक्टर विकत घेण्याकरिता विरुध्द पक्षाकडुन अर्थसहाय्य घेतले होते ते दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे वादातीत आहे. तक्रारदाराने कर्जाची परतफेड म्हणुन 3 हप्ते विरुध्द पक्षाकडे भरले. त्याबद्दल विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात काहीही नमुद केले नाही. परंतु तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावत्यांवरुन तक्रारदार यांनी दिनांक 30.1.2008 रोजी रुपये 72,100, दिनांक 18.8.2008 रोजी रुपये 72,100-/, आणि दिनांक 28.1.2009 रोजी रुपये 67,000/-हया प्रकारे एकुण 2,11,200/- एवढी रक्कम भरली आहे असे आढळुन येते. 18. विरुध्द पक्षाने 10-12 गुंडप्रवृत्तीचे लोकांना तक्रारदाराकडे पाठवुन जोरजबदरस्तीने ट्रॅक्टर उचलुन नेल्याबद्दल कोणताही पुरावा नाही. त्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे पुराव्या अभावी मान्य करता येणार नाही. परंतु उभयपक्षात झालेल्या करारातील अट क्रं.12 अनुसार विरुध्द पक्षाने तक्रारदाराला नोटीस दिली नाही आणि ट्रॅक्टर उचलुन घेऊन गेले ही उभयपक्षात झालेल्या कराराचा भंग आहे व ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी ठरते. असे मंचाचे मत आहे. सबब आदेश. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रार अंशतः मंजूर. 2. विरुध्द पक्षाने तक्रारदारास रुपये 2,11,200/- जमा केलेली रक्कम परत करावी. सदर रक्कमेवर जमा केल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे 9 टक्के दराने सरळ व्याज रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द्यावे. 3. विरुध्द पक्षाने मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 500/- (रुपये पाचशे फक्त) तक्रारदारास दयावे. सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. (जयश्री यंगल) ( विजयसिंह ना. राणे ) सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |