रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रारक्रमांक ४/२०१४
तक्रार दाखल दि. ३०/०१/२०१४
तक्रार निकाली दि. १२/०२/२०१५
श्री. सुरेश जिवाजी विलणकर,
रा. मु.पो. वाडगांव, ता. अलिबाग, जि. रायगड. ...... तक्रारदार.
विरुध्द
महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिस लि.,
मोनालिसा कॉम्प्लेक्स, कोकणे हॉस्पीटल समोर,
नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड. ..... सामनेवाले
समक्ष -मा. श्री. उमेश वि. जावळीकर अध्यक्ष.
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती- तक्रारदारतर्फे वकील –ॲड. एम. जी. चव्हाण
सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या वाहनाची आर.टी.ओ. नोंदणीची मूळ कागदपत्रे व कर्ज पूर्णपणे अदा केल्याबाबतचे ना हरकतपत्र न देऊन व सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांनी सामनेवालेकडून दि. १६/०७/१० रोजी रक्कम रु. ४,००,०००/- अर्थसहाय्य घेऊन बोलेरो जीप क्र. एम.एच.०६/एजी ७४६५ आर.टी.ओ. पेण यांचेकडे नोंदविले आहे. सदर वाहनासाठी सामनेवाले यांनी अर्थसहाय्य केल्यामुळे वाहनाच्या नोंदणीची मूळ कागदपत्रे सामनेवालेकडे सुरक्षित ठेवण्यात आली होती. तक्रारदार सामनेवालेंकडे कर्जाची परतफेड नियमितपणे करीत होते. दि. ०१/०७/१३ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारांना थकबाकी रक्कम रु. ४४,०५८/- मागणीबाबतची नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त होताच तक्रारदारांनी दि. ०८/०७/१३ रोजी दंडासह रक्कम रु. ५३,६२५/- सामनेवाले यांना अदा केले.
३ तक्रारदारांना पैशाची गरज असल्याने व सामनेवालेकडील वाहन कर्जाची संपूर्ण रक्कम तक्रारदारांनी दि. ०८/०७/१३ रोजी सामनेवालेकडे परतफेड केल्याने तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वाहनाच्या नोंदणीची मूळ कागदपत्रे तसेच सामनेवाले यांचेकडे कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे ना हरकतपत्र देण्याची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी सदर कागदपत्रे देण्यास कोणतेही कारण न देता नकार दिल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
४. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले यांना मंचाने लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. परंतु मंचाची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले मंचासमक्ष हजर न झाल्याने व त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द दि. १६/१०/१४ रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
५. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, तक्रारदारांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारांचे संपूर्ण वाहन कर्ज रक्कम फेड होऊनही
वाहन नोंदणीची मूळ कागदपत्रे व कर्ज संपूर्ण अदा झाल्याबाबतचे ना
हरकतपत्र न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर
केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
६. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांना तक्रारदारांकडून दि. ०८/०७/१३ रोजी थकित कर्ज रकमेपोटी एकत्रित रक्कम रु. ५३,६२५/- प्राप्त होऊनही व संपूर्ण कर्ज परतफेड झाल्यानंतरही वाहन नोंदणीची मूळ कागदपत्रे व कर्ज संपूर्णपणे अदा झाल्याबाबतचे ना हरकतपत्र सामनेवाले यांनी तक्रारदारांना न दिल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर कागदपत्रे न देण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण मंचासमोर दाखल केलेले नाही. तक्रारदारांना आर्थिक गरज असल्याने सदर वाहन विक्री करावयाचे असल्याने सामनेवालेकडील कागदपत्रे प्राप्त होईपर्यंत सदर वाहन विक्रीबाबतची कोणतेही कायदेशीर कार्यवाही तक्रारदार करु शकत नाहीत ही बाबही कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते.
तक्रारदार यांनी संपूर्ण कर्जाची रक्कम अदा केल्यानंतर सामनेवाले यांनी वाहनासंबंधीची मूळ कागदपत्रे कोणतेही न्यायोचित प्रयोजन नसताना स्वत:कडे ठेवून तक्रारदारांना कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
७. मुद्दा क्रमांक २ - सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या वाहनासंबंधीची मूळ कागदपत्रे व कर्ज रक्कम संपूर्ण अदा केल्याबाबतचे ना हरकतपत्र न दिल्याने तक्रारदार आर्थिक गरज असनूही त्यांचे वाहन विकू शकले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांची आर्थिक अडचण दूर होऊ शकली नाही ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सामनेवाले यांना तक्रारदारांकडून दि. ०८/०७/१३ रोजी थकित कर्ज रकमेपोटी एकत्रित रक्कम रु. ५३,६२५/- प्राप्त होऊनही व संपूर्ण कर्ज परतफेड झाल्यानंतरही वाहन नोंदणीची मूळ कागदपत्रे व कर्ज संपूर्ण फेड झाल्याबाबतचे ना हरकतपत्र सामनेवाले यांनी तक्रारदारांना न दिल्याने तक्रारदारांना त्यांचे वाहन विकता न आल्याने झालेल्या आर्थिक नुकसानास केवळ सामनेवाले हेच जबाबदार आहेत ही बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
८. उपरोक्त निष्कर्षांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
१. तक्रार क्र. ४/२०१४ अंशत: मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले यांनी तक्रारदार यांस कराराप्रमाणे संपूर्ण कर्ज रक्कम अदा केल्यानंतरही तक्रारदारांचे वाहन बोलेरो जीप क्र. एम.एच.०६/एजी ७४६५ या वाहनाची आर.टी.ओ. कडील नोंदणीची मूळ कागदपत्रे व कर्जरक्कम संपूर्ण अदा केल्याबाबतचे ना हरकतपत्र न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे तक्रारदारांचे वाहन बोलेरो जीप क्र. एम.एच.०६/एजी ७४६५ या वाहनाची आर.टी.ओ. कडील नोंदणीची मूळ कागदपत्रे व कर्जरक्कम संपूर्ण फेड झाल्याबाबतचे ना हरकतपत्र या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत द्यावेत.
४. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक त्रास व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्कम रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावेत.
५. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड - अलिबाग.
दिनांक – १२/०२/२०१५.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.