(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदारास सामनेवाला यांचेकडून महिंद्रा ट्रॅक्टर 445 डी.आय.अर्जून रजि.नं.एमएच 15 बी डब्ल्यु 6608 हा परत मिळावा अथवा रक्कम रु.5,00,000/- वसूल होवून मिळावी, प्रत्यक्ष रक्कम हातात मिळेपावेतो द.सा.द.शे.19%व्याज मिळावे, अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा, नुकसान भरपाई व्यतिरीक्त रु.1,00,000/- मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.14 लगत लेखी म्हणणे व पान क्र.15 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.39 लगत व सामनेवाला यांनी युक्तीवाद केलेला नाही.
सामनेवाला यांनी अर्जदार यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्जाऊ रक्कम दिली होती ही बाब सामनेवाला यांनी लेखी म्हणणे कलम 5 व 6 मध्ये मान्य केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी पान क्र.24 लगत कर्ज करारनामाची प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, पान क्र.24 चा कर्ज करारनामा याचा विचार होता अर्जदार हे मयत शोभा गायकवाड यांचे वारस असल्याने सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “कर्जाऊ रकमेची नियमीत परतफेड करण्याची जबाबदारी कै.शोभा गायकवाड यांची होती.कै.शोभा गायकवाड यांनी कोणतेही संयुक्तीक कारण नसतांना सामनेवाला यांचे कर्ज प्रकरण थकवले आहे. त्याबाबत सामनेवाला यांनी वेळोवेळी समज दिली तरी देखील त्यांनी कर्जाऊ रक्कम व दंड रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. सरतेशेवटी तक्रारदार यांनी स्वतः ता.23/01/2011 रोजी दुपारी 1.30 चे सुमारास त्यांचे वाहन ट्रॅक्टर थकीत कर्जापोटी सामनेवाला यांचेकडे जमा केले. त्याबाबत सामनेवाला यांनी इन्व्हेंटरी शिट देखील तयार केलेले आहे. त्यानंतर देखील अर्जदार यांना वेळोवेळी सुचना देवूनही कर्जाऊ रकमेचा भरणा केला नाही म्हणून ता.24/01/2011 रोजी कर्जदार यांचे नावे नोटीस पाठवून थकीत रकमेची मागणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही शेवटी दि.05/02/2011 रोजी सदर ट्रक्टरचा इतर वाहनांसह जाहीर नोटीस देवून लिलाव करण्याचा निर्णय घेतला व ता.12/02/2011 रोजी जास्तीतजास्त बोली आलेली रक्कम रु.3,00,000/- ऐवजी सदर वाहनाचा लिलाव केला. सदर लिलावातून आलेली रक्कम वसूल जाता कै.शोभा गायकवाड यांचे कर्ज खात्यात आज रोजी रक्कम रु.67,958/- बाकी निघते. सेवेत कमतरता केलेली नाही” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.17 लगत दि.25/01/2011 रोजीचे वाहन जमा केल्याचे पत्र, पान क्र.18 लगत जाहीर लिलाव नोटीस, पान क्र.19 लगत पोहोच पावती, पान क्र.20 लगत इन्व्हेंटरी शिट, पान क्र.21 लगत वाहनाचा व्हॅल्युएशन रिपोर्ट दाखल केलेले आहेत.
अर्जदार यांनी ता.23/01/2011 रोजी त्यांचे वाहन ट्रॅक्टर हे थकीत कर्जापोटी सामनेवाला यांचेकडे जमा केले आहे असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. याबाबत सामनेवाला यांनी पान क्र.17 लगत वाहन जमा केल्याचे पत्र दाखल केलेले आहे. सदर पत्र पहाता या पत्रापमाणे “सदर थकीत रकमेपोटी तुम्ही आमचेकडे तुमचे वाहन क्र.एम.एच.15 बी डब्ल्यु 6608 हे जमा केलेले आहे” या संदर्भाचा विषय नमूद केलेला आहे. त्याबाबत सामनेवाला यांनी पान क्र.17 लगतचे इन्व्हेंटरी शिट तयार केलेले आहे. यावरुन अर्जदार यांनी त्यांचे वाहन हे कर्ज प्रकरण थकलेले असल्याने स्वतःहून त्यांचे वाहन सामनेवाला यांचेकडे जमा केल्याचे दिसत आहे. त्यानंतर सामनेवाले यांनी वेळोवेळी सुचना देवूनही अर्जदार यांनी थकीत कर्जाऊ रकमेचा भरणा केलेला नाही, म्हणून पान क्र.17 वर दाखल केलेल्या ता.25/01/2011 रोजीची नोटीस नुसार अर्जदार यांचे नावे नोटीस पाठवून थकीत रकमेची सामनेवाला यांनी मागणी केलेली आहे. तरीदेखील अर्जदार यांनी थकीत कर्जाचा भरणा केलेला दिसत नाही.त्यानंतर सामनेवाला यांनी पान क्र.18 लगत दाखल केलेली दि.05/02/2011 रोजीची अर्जदार यांना लिलाव नोटीस पाठवलेली आहे. परंतु त्याप्रमाणे अर्जदार यांनी थकीत कर्जाची पुर्तता न केल्याने सामनवाले यांनी दि.12/02/2011 रोजी सदर ट्रॅक्टरचा इतर वाहनांसह जाहीर लिलावाच्या नोटीसनुसार (ऑक्शन नोटीस) लिलाव केलेला आहे. यावरुनच सामनेवाला यांनी अर्जदार यांचे वाहन ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यानंतर अर्जदार यांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस देवून संधी दिलेली आहे व त्यानंतर सदर ट्रॅक्टरचा लिलाव सुध्दा जाहीर नोटीस (Auction Notice) देवूनच केलेला आहे ही बाब पान क्र.17 व पान क्र.18 वरुन स्पष्ट झालेली आहे. याउलट अर्जदार यांनी ट्रॅक्टरची विक्री लिलावाची प्रक्रिया ही अयोग्य पध्दतीने केलेली आहे ही बाब दर्शवण्याकरीता कोणतेही योग्य तो पुरावा किंवा कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. यावरुन असे दिसते की केवळ अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडे थकीत बाकी रकमेचा भरणा करु लागू नये या कारणाकरीता सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला दिसत आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचे वाहन योग्य पध्दतीनेच ताब्यात घेवून अर्जदार यांना योग्य ती संधी देवून जाहीर लिलाव प्रक्रिया पुर्ण करुन ट्रॅक्टरची विक्री केलेली आहे हे स्पष्ट झालेले आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
|
[HON'ABLE MR. R.S.Pailwan] |
PRESIDENT |
|
[HON'ABLE MRS. V.V.Dani] |
MEMBER |