जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 416/2009. तक्रार दाखल दिनांक : 14/08/2009. तक्रार आदेश दिनांक : 07/04/2011. श्री. दादासाहेब रंगनाथ खुळे, वय 45 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. पाटखळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनान्शीयल सर्व्हीसेस लि., 101 व 201, सर्व्हे नं.710, स्नेहगंगा, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे. (नोटीस सोलापूर कार्यालयावर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.जी. शहा विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एम.आर. जगताप आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.30/9/2006 रोजी रु.5,50,000/- वित्तसहाय्य घेऊन ट्रॅक्टर क्र.एम.एच.13/ ए.जे.0341 खरेदी केला आहे. प्रत्येकी रु.1,76,000/- अशा चार हप्त्यांद्वारे दोन वर्षामध्ये कर्जाची परतफेड करण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी दोन वर्षांमध्ये फायनान्स चार्जेस व दंड रकमेसह एकूण रु.7,09,000/- चा भरणा केलेला आहे. कर्जाची संपूर्णत: परतफेड झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना वाहनाचे मूळ आर.सी. बूक परत देणे आवश्यक होते. परंतु ते देण्यास विरुध्द पक्ष टाळाटाळ करीत आहेत. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांनी त्यांना रु.65,000/- येणे असल्याची नोटीस पाठवून जोपर्यंत त्या रकमेचा भरणा होत नाही, तोपर्यंत कागदपत्रे परत दिली जाणार नसल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन वाहनाचे मूळ आर.सी. व टी.सी. बूक व इतर सर्व कागदपत्रे मिळावेत आणि त्रास व आर्थिक नुकसानीपोटी रु.40,000/- मिळण्यासह तक्रार खर्चापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी करार क्र.512539, दि.15/10/2006 अन्वये रु.5,50,000/- कर्ज घेतले असून प्रत्येकी रु.1,76,000/- प्रमाणे चार हप्त्यांद्वारे दोन वर्षात त्याची परतफेड करावयाची आहे. तक्रारदार यांनी कराराप्रमाणे हप्त्यांची ठरलेल्या नमूद तारखेस परतफेड केलेली नाही. तक्रारदार यांनी नमूद तारखेस हप्त्यांची परतफेड न केल्यास अतिरिक्त फायनान्स चार्जेस वसूल करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याकरिता रु.47,525/- अतिरिक्त फायनान्स चार्जेस तक्रारदार यांच्याकडून येणे आहेत. तसेच तक्रारदार यांनी दिलेले धनादेश अनादरीत झाले आहेत. तसेच हप्त्यांची परतफेड वेळेमध्ये न केल्यामुळे वाहन जप्तीचे चार्जेस रु.6,000/- येणे आहेत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी करार क्र.512539, दि.15/10/2006 अन्वये रु.5,50,000/- कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. त्या कर्जाची प्रत्येकी रु.1,76,000/- प्रमाणे चार हप्त्यांद्वारे दोन वर्षात परतफेड करावयाची होती, याविषयी विवाद नाही. कर्ज परतफेडीपोटी तक्रारदार यांनी रु.7,09,000/- चा भरणा केल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी संपूर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी रु.65,000/- रक्कम येणे असल्याचे कळवून त्यांना वाहनाचे मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी कराराप्रमाणे हप्त्यांची ठरलेल्या नमूद तारखेस परतफेड केलेली नसल्यामुळे अतिरिक्त फायनान्स चार्जेस वसूल करण्याचा त्यांना अधिकार असल्याचे नमूद केले आहे. 6. तक्रारदार किंवा विरुध्द पक्ष यांनी त्यांच्यामध्ये झालेला कर्जविषयक करार क्र.512539 रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी कर्जाची रक्कम रु.7,09,000/- ची परतफेड केलेली आहे. तक्रारदार यांनी सहामाही रु.1,76,000/- हप्त्याप्रमाणे चार हप्त्यामध्ये परतफेड करण्याऐवजी त्यापेक्षा जास्त हप्त्यांद्वारे एकूण रु.7,04,000/- रकमेचा भरणा केल्याचे रेकॉर्डवर दाखल कर्ज विवरणपत्रावरुन निदर्शनास येते. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी रु.47,525/- अतिरिक्त फायनान्स चार्जेस तक्रारदार यांच्याकडून येणे असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांच्या कर्ज लेखा विवरणपत्रामध्ये रु.47,525/- येणे असल्याचे नमूद आहे. निर्विवादपणे तक्रारदार यांनी हप्त्यांची रक्कम रु.1,76,000/- प्रमाणे जमा केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी आकारणी केलेले चार्जेस अनुचित ठरत नाही. सबब, तक्रारदार यांनी सदर चार्जेस भरणा केल्यास वाहनाची मूळ कागदपत्रे परत मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 7 शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे अतिरिक्त फायनान्स चार्जेस रु.47,525/- भरणा केल्यास विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना ट्रॅक्टर क्र.एम.एच.13/ ए.जे.0341 चे मूळ आर.सी. टी.सी. बूक व इतर तारण कागदपत्रे रक्कम प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/5411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |