Dated the 20 Oct 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार वर नमुद पत्यावर रहात असुन व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. सामनेवाले यांच्या सभासदांना पर्यटनाच्या विविध योजनांव्दारे पर्यटन सुविधा पुरविण्याचे काम करणारी कंपनी आहे.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या प्रतिनीधींनी केलेल्या सामनेवाले यांच्या व्यवसायाबाबतचे वर्णन ऐकून सामनेवाले यांच्या पर्यटन योजनेचा सभासद होण्याचे ठरवले, सदर योजनेनुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रोख रकमेव्दारे व दोन धनादेशांव्दारे एकूण रक्कम रु.3,28,074/- अदा केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सदर योजनेबाबत सामनेवाले यांना सदर रक्कम अदा केल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.13.03.2010 रोजी एक फॉर्म देऊन त्यामधील रेखांकित (Dotted Lines) भागावर तक्रारदार यांना स्वाक्षरी करण्यास सांगितले असता तक्रारदार यांनी तो वाचून पाहिला, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यापुर्वी सामनेवाले यांच्या प्रतिनीधींनी दिलेल्या फॉर्मच्या प्रतीवरील अटी शर्ती व ता.13.03.2010 रोजी तक्रारदार यांना स्वाक्षरीसाठी दिलेल्या फॉर्मवरील अटी शर्ती पुर्णपणे वेगळया असल्याचे तक्रारदार यांना आढळले. तक्रारदार यांना त्या सोयिस्कर नसल्याने व सामनेवाले यांनी त्यापुर्वी वेगळया अटी शर्ती तक्रारदाराकडून सदर रक्कम रु.3,28,074/- स्विकारण्यापुर्वी दिल्या असल्याने, तक्रारदार यांची फसवणूक केली असे नमुद करुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे या सदर योजनेबाबतचे सभासदत्व स्विकारण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी त्याबाबत ता.26.03.2010 रोजी सामनेवाले यांना फॅक्सव्दारे व पत्राव्दारे कळविले, व सदर योजनेचे सभासद होण्यासाठी भरलेली सभासद फी परत मागितली. परंतु सामनेवाले यांचेशी याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करुन व पाठपुरावा करुनही सामनेवाले यांनी सदर स्किमच्या Member’s review for confirmation of understanding मधील क्लॉज नंबर-6.1 नुसार तक्रारदार यांना त्यांची सभासद फी परत न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाले विरुध्द दाखल करुन तक्रारीच्या प्रार्थना कलम-21 मध्ये नमुद केल्यानुसार सामनेवाले यांचेकडून मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना सुनावणीची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले यांनी हजर होऊन कैफीयत दाखल न केल्याने सामनेवाले यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश पारित करण्यात आले. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र दाखल केले, व लेखी युक्तीवादाबाबत पुरसिस दाखल केल्यावर प्रकरण अंतिम आदेशासाठी नेमण्यात आले.
4. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तक्रारीच्या निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदर स्किमचे सभासदत्व
रद्द करण्याबाबत विहीत मुदतीत कळवूनही सामनेवाले यांनी
तक्रारदार यांचे पैसे परत न केल्याने तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण
सेवा दिली आहे का ?...........................................................................होय.
2.तक्रारीत काय आदेश ?..............................................तक्रार अंतशः मंजुर करण्यात येते.
5.कारण मिमांसा
अ. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या पर्यटनाबाबतच्या योजनेनुसार सामनेवाले यांचे सभासद होण्यासाठी तक्रारदार यांना रोख रकमेव्दारे रक्कम रु.34,534/- दिले, व ता.12.03.2010 रोजीच्या दोन धनादेशाव्दारे रक्कम रु.2,40,000/- व रक्कम रु.53,540/- दिली. सदर दोन्ही धनादेश तक्रारदार यांच्या खात्यातुन ता.19.03.2010 रोजी वठल्याचे दिसुन येतात. सदर रक्कम सामनेवाले यांना ता.20.03.2010 रोजी प्राप्त झाली. तक्रारदार यांनी सदर रक्कम वठल्याचे सिध्द करण्यासाठी त्यांच्या बँकेचा खातेउतारा तक्रारीत सादर केला आहे. (निशाणी- पान क्रमांक-10 व 11) सामनेवाले यांनी त्याबाबत दिलेली पोच ता.06.04.2010 अभिलेखात पान क्रमांक-12 वर उपलब्ध आहे. सामनेवाले यांचे प्रतिनीधीने तक्रारदार यांना नमुद केलेल्या व तक्रारदार यांना ता.13.03.2010 रोजी भरण्यासाठी दिलेल्या फॉर्ममधील अटी शर्ती वेगळया असल्याने सदर रक्कम रु.3,28,074/- सामनेवाले यांना भरण्यापुर्वी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सदर योजनेचे सभासदत्व स्विकारण्याचे नाकारले. त्याबाबत तक्रारदार यांनी ता.26.03.2010 रोजी सामनेवाले यांना फॅक्स व्दारे कळविले, तो सामनेवाले यांना त्याचदिवशी प्राप्त झाला. तक्रारदार यांचे सभासदत्व (Confirm) नक्की करण्यापुर्वी व तक्रारदाराकडून सामनेवाले यांचेकडे सभासद शुल्क बाबतची (डाऊन पेमेंट) ची रक्कम प्राप्त झाल्यापासुन 10 दिवसांच्या आंत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदर स्किमबाबतचे तक्रारदार यांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी व सभासद फी परत देण्याबाबत स्किमच्या अट क्रमांक-6.1 नुसार कळवूनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या सभासदत्वासाठी स्विकारलेली रक्कम परत दिली नाही. तक्रारदार यांनी त्याबाबत सामनेवाले यांचेशी केलेला पत्रव्यवहार अभिलेखात उपलब्ध आहे. सामनेवाले यांना तक्रारदार यांनी कायदेशीर नोटीस दिली. सामनेवाले यांच्या सर्वेसर्वा असलेल्या डायरेक्टर श्री.अनिल महिंद्रा यांना त्याबाबत पत्रे लिहिली, तरी देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांचे सभासदत्वाबाबत स्विकारलेली रक्कम परत दिली नाही, तसेच तक्रारदार यांचेकडून वर नमुद रक्कम स्विकारल्यावर तक्रारदार यांना दिलेल्या फॉर्मवरील अटी वेगळया दिल्या व तक्रारदाराकडून रक्कम स्विकारण्यापुर्वी स्किमबाबत वेगळया अटी दिल्या. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, व तक्रारदाराची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदारप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते.
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सदर पर्यटन स्किमबाबतच्या अटी शर्तींबाबतची कागदपत्रे सादर केली आहेत. सदर कागदपत्रांच्या अट क्रमांक-6.1 नुसार सामनेवाले यांना डाऊन पेमेंट बाबतची रक्कम प्राप्त झाल्यापासुन 10 दिवसांत सामनेवाले यांना तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सभासदांनी, सामनेवाले यांचे सभासदत्व घेण्याचे नाकारुन स्किमचे पैसे परत मागितल्यास सामनेवाले ते तक्रारदार यांना परत देतील असा उल्लेख दिसुन येतो. सामनेवाले यांना तक्रारदाराकडून 20.03.2010 रोजी सदर संपुर्ण रक्कम रु.3,28,074/- प्राप्त झाली असुन तक्रारदार यांनी सदर रक्कम सामनेवाले यांना प्राप्त झाल्यापासुन 10 दिवसात म्हणजे ता.26.03.2010 रोजी फॅक्स व्दारे ताबडतोब सामनेवाले यांना, तक्रारदार यांनी त्यांचे सभासदत्व रद्द करण्याविषयी व सभासद शुल्क सामनेवाले यांनी तक्रारदार यांना परत देण्याविषयी कळविले आहे. म्हणजेच सामनेवाले यांच्या अट क्रमांक-6.1 नुसार असल्याने तक्रारदार यांनी विहीत मुदतीत सामनेवाले यांना सदर रक्कम रु.3,28,074/- परत करण्यास कळविले आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अदयाप सदर रक्कम परत केली नसल्याने तक्रारदार सामनेवाले यांचेकडून सदर रक्कम 6 टक्के व्याजासह ता.26.03.2010 पासुन प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत परत मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची वर नमुद रक्कम तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे त्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करुन व पाठपुरावा करुनही तक्रारदार यांना परत न केल्याने सन-2010 पासुन तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याबाबत तक्रारदार सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.5,000/- व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-121/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.3,28,074/- (अक्षरी रुपये तीन लाख अठ्ठावीस
हजार चौ-हयात्तर) यावर ता.26.03.2010 पासुन सदर संपुर्ण रक्कम अदा करेपर्यंत
दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याज देऊन व्याजासह होणारी एकूण रक्कम तक्रारदार यांना
परत करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच
हजार) तसेच न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) दयावेत.
5. वरील आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत करावे.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.20.10.2016
जरवा/