तक्रारदार : वकील श्री.एम.ए.शुक्ला हजर. सामनेवाले : वकीलामार्फत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले हे पर्यटन व्यवसायामध्ये पर्यटन स्थळावर त्यांच्या सभासदांना सुट्टी मध्ये राहण्याची व्यवस्था करणारी कंपनी आहे. तक्रारदार हे सा.वाले कंपनीचे सभासद आहेत. तक्रारदारांच्या सभासदत्वाचा प्रकार “ RED TYPE MEMBERSHIP” असा होता. तक्रारदारांनी सा.वाले यांचे प्रतिनिधीचे माहितीवर विश्वास ठेवून सा.वाले यांचेकडे वेळो वेळी रु.1,78,809/- जमा केले. त्याबद्दल सा.वाले यांनी तकारदारांना विविध पर्यटन स्थळाचे ठिकाणी तक्रारदारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची होती. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांनी गोवा येथे राहण्याची व्यवस्था करावी अशी विनंती सा.वाले यांना केली. परंतु सा.वाले यांनी त्याबद्दल तक्रारदारांना काहीही कळविले नाही. तक्रारदारांनी त्याबद्दल विनंती करुनही दिनांक 30.9.2007 पूर्वी सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना कुठलीही सूचना प्राप्त झाली नाही. या प्रमाणे तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे पर्यटनस्थळी राहण्याची व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. तसेच 2007 मध्ये गोवा येथील समुद्री किनारी राहण्याची तक्रारदारांची व्यवस्था केली नाही. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व तक्रारदारांकडून दरम्यान सभासदत्वाचे पैसे वसुल केले. तक्रारदारांनी सा.वाले यांना वकीलांमार्फत दिनांक 8.5.2008 रोजी नोटीस दिली. परंतु सा.वाले यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले नाही. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून मुळ जमा केलेली रक्कम रु.1,78,809/- 18 टक्के व्याजासह वसुल करुन मिळावी अशी दाद मागीतली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली, व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी सर्व अटी व शर्ती समजावून घेवून करारनामा केलेला आहे. व सुरुवातीला रु.37,425/- तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा केले. व त्यानंतर रु.17,673/- प्रत्येक महिन्यात या प्रमाणे 12 मासीक हप्त्यात बाकीचे शुल्क वसुल करण्यात आले. सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आक्षेपास नकार दिला. सा.वाले यांनी असेही कथन केलेले आहे की, तक्रारदारांना चार विमानाची तिकिटे दिनांक 3.2.2007 पाठविण्यात आली होती. तक्रारदारांकडून मासीक हप्ते बँकेच्या खात्यामधून वसुल झाले, व 7 व 8 वा हप्ता तक्रारदारांनी रोखीने भरला. या प्रमाणे सभासद शुल्क तक्रारदारांकडून वसुल झाले. परंतु तक्रारदारांना विशिष्ट दिवशी विशिष्ट समुद्र किनारी मुक्कामाची सोय होईल अशी सुविधा देण्यात आली नव्हती. तर उपलब्ध असेल तरच ती सुविधा देण्यात येईल असे कळविण्यात आले होते. या प्रमाणे तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनास सा.वाले यांनी नकार दिला. 4. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीस उत्तर दाखल केले. 5. दोन्ही बाजुंनी पुरावा शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. तक्रारदार व सा.वाले यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. 6. प्रस्तुतचे मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र, यांचे वाचन केले व त्यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना गोवा येथील समुद्र किनारी विशिष्ट मुदतीत राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही व करारप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार मुळची रक्कम 18 टक्के व्याजासह सा.वाले यांचेकडून वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.3 मध्ये असे कथन केले आहे की, सा.वाले यांचे व्यवस्थापक श्री.कौशल मेहता यांनी तक्रारदारांना सा.वाले यांचेकडून मिळणा-या सोई सवलतीचे भडक चित्र रंगविले व त्यावर विसंबून तक्रारदारांनी सा.वाले यांचे सभासदत्व स्विकारले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत परिच्छेद क्र.5 मध्ये असे नमुद केले आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना समुद्र किनारी किंवा पर्यटनस्थळी राहण्याची मोफत सुविधा पुरविण्यात येईल त्या व्यतिरिक्त विमानाची चार तिकिटे पाठविण्यात येतील असे आश्वासन दिले होते. तक्रारदार आपल्या तक्रारीत हे मान्य करतात की, ते स्वतः व्यावसाईक असून त्यांनी सा.वाले यांना असे सांगीतले होते की, संपूर्ण चौकशी केल्यानंतर सभासद शुल्क व वर्गणी अदा करण्यात येईल. तक्रारदारांनी आपले सभासद शुल्क व वर्गणी बँकेच्या खात्यामधून जमा केले. ज्याकामी तक्रारदारांनी बँकेला सूचना दिल्या होत्या. व दोन हप्ते रोखीने भरले होते. तक्रारदारांनी सभासद शुल्क तसेच वर्गणी एक रक्कमी अथवा रोखीने भरले नाहीत. तर मासीक हप्त्याचे स्वरुपात तक्रारदारांच्या बँक खात्यामधून सा.वाले यांना पाठविण्यात आले. सा.वाले यांच्या कैफीयतीतील तपशिलामधून असे दिसून येते की, 8 ते 10 मासीक हप्त्यामध्ये सा.वाले यांना प्राप्त झाले. दरम्यान तक्रारदारांनी कधीही त्याबद्दल तक्रार केलेली नाही. यावरुन सा.वाले यांचे प्रतिनिधी श्री.कौशल मेहता यांनी तक्रारदारांची फसवणूक केली किंवा दिशाभूल केली या तक्रारदारांच्या कथनात तथ्य नाही असे दिसून येते. 8. तक्रारदार हे सा.वाले यांचे सभासद झाल्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 15.9.2007 रोजी सा.वाले यांना एक पत्र दिले. व त्यामध्ये तक्रारदारांना गोवा पर्यटन ठिकाणी मुक्कामाची सुविधा उपलब्ध करुन देणेकामी सा.वाले यांचेकडून योग्य उत्तर न मिळाल्याने तक्रारदारांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे अशी विनंती केली. तक्रारदारांनी त्या पत्रामध्ये असे नमुद केलेले आहे की, जुलै,2007, ऑगस्ट,2007, व 18 ते 25 सप्टेंबर, 2007 या दरम्यान गोवा येथे मुक्काम करणेकामी त्यांना विनंती केली होती. परंतु सा.वाले यांचेकडून त्याबद्दल कुठलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. 9. या संदर्भात सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.15 मध्ये असे कथन केले आहे की, पर्यटनस्थळी निवासस्थानाची व्यवस्था ही निवासस्थान उपलब्धतेवर अवलंबून असते. व निवासस्थान उपलब्ध नसेल तर सा.वाले तशी सुविधा देवू शकत नाहीत. सा.वाले यांनी तक्रारदारांना काय सुविधा दिली होती. याचा खुलासा सा.वाले यांनी आपले कैफीयतीचे परिच्छेद क्र.13 मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सा.वाले असे म्हणतात की, चार विमानाची तिकिटे तसेच सा.वाले यांची पर्यटनस्थळी निवासस्थानात विशिष्ट मोसमात 7,8 दिवस राहण्याची सुविधा या प्रकारच्या सुविधा होत्या. त्या बद्दलचा खुलासा सभासदत्वाचा अर्ज निशाणी अ यामध्ये देखील दिलेला आहे. त्यावरुन असे दिसते की, तो अर्ज तक्रारदारांनी 16.12.2006 रोजी दिला. व त्यानंतर मासीक हप्त्यामध्ये सभासद शुल्क भरले. तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे ऑगस्ट, सप्टेंबर, 2007 मध्ये तक्रारदारांनी गोवा पर्यटनस्थळी निवासाची सुविधा करण्यात यावी अशी सा.वाले यांना विनंती केली होती. परंतु सा.वाले यांचेकडून त्याबद्दल सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे निराश होऊन तक्रारदारांनी आपले सभासदत्व रद्द करण्याचे ठरविले. 10. या संदर्भात सा.वाले यांनी असे स्पष्ट कथन केले आहे की, विशिष्ट मुदतीत विशिष्ट पर्यटनस्थळी जागा उपलब्ध असेल तरच सभासदांचे विनंतीस सकारात्मक उत्तर देण्यात येते. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये तक्रारदारांनी ज्या तारखांना सा.वाले यांचेकडे गोवा पर्यटनस्थळी राहण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती केली होती, त्या तारखांना सा.वाले यांचेकडे ती सोय उपलब्ध नसल्याने सहाजीकच सा.वाले यांनी तक्रारदारांना होकार दिला नाही व तक्रारदारांची विनंती प्रलंबीत राहीली. केवळ या घटणेवरुन किंवा एकाच उदाहरणावरुन सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर करुन तक्रारांची फसवणूक केली किंवा सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी तसेच दरवर्षी सा.वाले यांना पर्यटनस्थळी निवासाची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती केली होती व सा.वाले यांनी ती विनंती मान्य केली नाही अशी घटणा प्रस्तुतचे प्रकरणामध्ये घडलेली नसून केवळ एका मोसमामध्ये म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, 2007 चे दरम्यान तक्रारदारांच्या विनंती प्रमाणे गोवा येथे पर्यटनस्थळी सा.वाले तक्रारदारांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन देवू शकले नाही. या प्रकारच्या एकाच घटणेवरुन किंवा एकाच प्रसंगावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. 11. या व्यतिरिक्त तक्रारदार व सा.वाले यांच्यामध्ये जो सभासदत्वाचा करारनामा झाला त्याचे कलम 6 प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा केलेली वर्गणी परत मिळाली नव्हती या बाबीचा उल्लेख सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये केलेला आहे. 12. तक्रारदारांचे वकीलांनी आपल्या युक्तीवादाचे दरम्यान मध्य मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंच, परेल मुंबई यांनी श्री.राजीव खरे विरुध्द क्लब महिंद्रा हॉलीडेज वर्ल्ड (प्रस्तुतचे सा.वाले.) या प्रकरणात दिलेल्या निकालाची प्रत हजर केलेली आहे. परंतु त्या प्रकरणामध्ये सा.वाले गैर हजर राहीले होते व त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा सुनावणी करण्यात आले होते. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये सा.वाले हजर होऊन त्यांनी आपला कैफीयत दाखल केलेली आहे. व तक्रारदारांच्या कथनावर नकार दिलेला आहे. सबब मध्य मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंच, परेल मुंबई यांचा निवाडा प्रस्तुतचे प्रकरणास लागू होणार नाही. 13. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 596/2008 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |