तक्रारदार :वकील श्रीमती.अनिता मराठे यांचे मार्फत हजर.
सामनेवाले :वकील श्री.शषांक थत्ते हजर.
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. तक्रारादार हे पती पत्नी आहेत. तर सा.वाले हे पर्यटन स्थळावर सेवा सुवीधा पुरवीणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे सभासदत्व दिनांक 4.6.2006 रोजी स्विकारले व दिनांक 4.6.2006 ते 12.10.2009 यास दरम्यान तक्रारदारांनी सा.वाले यांना एकत्रीतपणे रु. 2,21,721/- अदा केले. या रक्कमेच्या मोबदल्या बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या वेग वेगळया पर्यटन केंद्रावर निवासाची व्यवस्था करण्याचे कबुल केले हाते.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदारांनी ऑक्टोबर,2009 मध्ये सा.वाले यांच्या पर्यटन केंद्रावर आरक्षण करुन देण्याची विनंती केली. परंतु तक्रारदारांची ही विनंती सा.वाले यांनी स्विकारली नाही व आरक्षण उपलब्ध नाही असे तक्रारदारांना कळविले. या उलट गैर सभासद म्हणून मागणी केली असता आरक्षण उपलब्ध आहे असे कळविण्यात आले. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांकडून रु.2 लाखापेक्षा जास्त रक्कम स्विकारुन देखील तक्रारदारांना पर्यटनाचे संदर्भात सा.वाले यांचे केंद्रावर आरक्षण उपलब्ध करुन देत नव्हते व या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुवीधा पुरविण्यात कसुर केली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडील सभासदत्व रद्द करुन जमा केलेली रक्कम परत मागण्याचे ठरविले. व त्याप्रमाणे सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केला. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांना जमा केलेली रक्कम परत करण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 13.4.2010 रोजी सदरील तक्रार प्रस्तुत मंचाकडे दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना पर्यटन केंद्रावरील आरक्षणाचे संदर्भात सेवा सुवीधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे व सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.2,21,721/- 18 टक्के व्याजाने परत करावेत अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदार सा.वाले यांचे सभासद आहेत व तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे तक्रारीत नमुद केलेली रक्कम सभासदत्वापोटी जमा केलेली आहे ही बाब मान्य केली. तथापी सा.वाले यांनी असे कथन केले की, सभासदत्व नियमाप्रमाणे तक्रारदारांना सा.वाले यांचे केंद्रामध्ये जागा उपलब्ध असेल तरच आरक्षण मिळू शकते अन्यथा आरक्षण उपलब्ध करुन दिले जात नाही. या प्रकारच्या विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट केंद्रामध्ये अग्रहक्काने आरक्षण मिळू शकत नाही असे सा.वाले यांनी कथन केले. त्याच प्रमाणे सभासद नियमाप्रमाणे तक्रारदार सभासदत्वाची रक्कम परत मिळण्यास पात्र नाहीत असेही कथन सा.वाले यांनी केले.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. त्याच प्रमाणे न्याय निर्णयाच्या प्रती हजर केल्या.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना पर्यटन केंद्रावरील आरक्षणाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? |
नाही. |
2 |
तक्रारदार सभासदत्व शुल्काचा परतावा सा.वाले यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत काय ? |
नाही. |
3 |
अंतीम आदेश ? |
तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांचा तक्रारीचा परिच्छेद क्र.12 असे दर्शवीतो की, तक्रारदार यांना वर्ष 2006 ते वर्ष 2009 या दरम्यान सा.वाले यांनी पर्यटन केंद्रावर आरक्षण उपलब्ध करुन दिले नाही. त्या परिच्छेदातील तक्रारदारांचे कथन अतीशय मोघम तसेच विस्कळीत स्वरुपाचे आहे. वर्ष 2006 ते 2009 चे दरम्यान तक्रारदारांना किती वेळेस व कुठल्या पर्यटन केंद्रावर व कोणत्या तारखांना सा.वाले यांचेकडे आरक्षण मागीतले होते याचा तपशिल तक्रारदारांनी तक्रारीत तसेच पुराव्याचे शपथपत्रात नमुद केलेला नाही. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदार आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्र.13 मध्ये असे कथन करतात की, जुलै,2007 मध्ये तक्रारदार क्र.1 यांना जुळे अपत्य झाले व त्यानंतर तक्रारीच्या परिच्छेद क्र.14 मध्ये तक्रारदार असे कथन करतात की, ऑक्टोबर, 2009 मध्ये मुले मोठी झाल्यानंतर तक्रारदारांनी पर्यटन केंद्रावरील आरक्षणाचा लाभ घेण्याचे ठरविले. या प्रकारे तक्रारीच्या कलम 12 मधील तक्रारदारांचे कथन हयास तक्रारीचे कलम 13 व 14 मधील कथनास छेद देतात. हया तिन्ही कलमांचे एकत्र वाचन केले असतांना असे दिसून येते की, वर्ष 2006 ते 2009 मध्ये तक्रारदार स्वतः वैयक्तिक व कौटुंबीक अडचणीमुळे पर्यटन केंद्रावरील आरक्षणाचा लाभ घेऊ शकले नाहीत.
7. तक्रारदारांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र.15 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी दिनांक 12.10.2009 रोजी सा.वाले यांचेकडे ई-मेल संदेश पाठविला व सा.वाले यांच्या पर्यटन केंद्रामध्ये दिनांक 5.12.2009 ते 19.12.2009 या कालावधीत आरक्षण मागीतले. तक्रारदारांनी त्या ई-मेल संदेशाची प्रत नीशाणी 9 येथे हजर केलेली आहे. त्यास सा.वाले यांनी उत्तर दिले. व त्यांचे केंद्रामध्ये आरक्षण उपलब्ध नाही. परंतु गोवा जस्मीन या हॉटेलमध्ये आरक्षण करण्यात येईल असे कळविले. ते तक्रारदारांनी स्विकारले नाही. व त्याच दिवशी म्हणजे दिनांक 12.10.2009 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांना ई-मेल संदेश पाठविला व सा.वाले यांचे पर्यटन केंद्र भेरस्ता येथे आरक्षण कधी उपलब्ध आहे अशी माहीती मागविली. त्यास सा.वाले यांनी दिनांक 13.12.2009 चे ई-मेल संदेशाव्दारे उत्तर दिले त्याची प्रत तक्रारदारांनी स्वतःच नशाणी 12 येथे हजर केलेली आहे. त्यावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी पुन्हा गोवा जस्मीन हॉटेलमध्ये दिनांक 7.12.2009 ते 13.12.2009 या दरम्यान आरक्षण उपलब्द असेल असे कळविले. तक्रारदारांनी तो देकार स्विकारला नाही. या प्रकारे आरक्षण मिळण्याचे केवळ दोन प्रयत्न असफल झाल्याने तक्रारदारांनी असा निष्कर्ष काढला की, सा.वाले हे त्यांचे पर्यटन केंद्रामध्ये तक्रारदारांना आरक्षण देण्यास राजी नाहीत अथवा टाळाटाळ करतात. वस्तुतः तक्रारदारांचे सभासद अर्जामध्ये असे नमुद करण्यात आलेले आहे की, पर्यटन केंद्रावरील आरक्षण उपलब्धतेनुसार देण्यात येईल व त्यामध्ये अग्रहक्क असणार नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांना नियमावली पाठविली त्याची प्रत तक्रारदारांनी नीशाणी 6 वर हजर केलेली आहे. त्यातील कलम 3.6 मध्ये ही बाब स्पच्छपणे नमुद करण्यात आलेली आहे. तसेच नियमावलीचे कलम 3.14 मध्ये असेही नमुद आहे की, सा.वाले यांचे केंद्रात आरक्षण उपलब्ध नसेल तर अन्य ठिकाणी आरक्षण उपलब्ध करुन दिले जाईल. व त्याचे भाडे सा.वाले देय करेल. या प्रकारे उपलब्ध पुराव्यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना पर्यटन केंद्रामध्ये आरक्षण उपलब्ध करुन दिले नाही व सेवा सुवीधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
8. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कथन आहे की, त्रयस्त व्यक्तीने गैर सभासद म्हणून आरक्षणा बाबत विचारणा केली असतांना सा.वाले यांचेकडून आरक्षण उपलब्ध करुन दिले जाईल असे लगेचच कळविण्यात आले या प्रकारे सा.वाले हे सभासदांना आरक्षण देण्यास टाळतात. इतर गैर सभासद व्यक्तीस मात्र तत्परतेने आरक्षण उपलब्ध करुन देतात असेही आरोप तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचे परिच्छेद क्र.14 मध्ये केलेले आहे. या संबंधात तक्रारदारांनी नीशाणी 13 येथे ई-मेल संदेशाची जी देवाण घेवाण झाली त्याची प्रत हजर केलेली आहे. सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना जो ई-मेल प्राप्त झाला त्याची प्रत पृष्ट क्र.58 वर आहे. त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना आरक्षण केंद्राचे दर कळविले होते. तसेच आरक्षण पध्दत कळविली होती. परंतु विशिष्ट ठिकाणी आरक्षण उपलब्ध आहे असे त्या ई-मेल संदेशामध्ये नव्हते. तसा स्पष्ट उल्लेख ई-मेल संदेशामध्ये आहे. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना वेळेबद्दल व दराबद्दल माहिती पुरविली असेल तर त्यात काही गैर आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
9. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे ही कथन केले आहे की, सा.वाले यांचेकडे असलेल्या एकूण खोल्यांची संख्या व सभासदांचा आकार बघता सा.वाले हे अतीशय कमी जागा उपलब्ध असतांना भरमसाठ आश्वासन देऊन सभासदांकडून वर्गणी वसुल करतात व हया प्रकारे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करतात असाही आरोप केला आहे. त्या बद्दलची माहिती तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीव्दारे सा.वाले यांचेकडून मागीतली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये या बद्दल निश्चीत स्वरुपाची माहिती व आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्या बद्दल निष्कर्ष नोंदवणे शक्य होणार नाही.
10. तक्रारदारांचा असाही आरोप आहे की, तक्रारदार हे सा.वाले यांचेकडे जून 2006 मध्ये सभासद झाले असतांना सा.वाले यांनी मात्र नियमावलीची प्रत तक्रारदारांना जुलै ,2007 मध्ये म्हणजे तक्रारदारांकडून रु.30,000/- + रु.1,62,755/- स्विकारल्यानंतर पाठविली व या प्रकारे महत्वाची माहिती सभासद होण्यापूर्वी नियोजित सदस्यास उपलब्ध करुन दिली नाही व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये ही बाब मान्य केली आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडे नियमावलीची प्रत जुलै,2006 मध्ये पाठविली. म्हणजे थोडक्यात तक्रारदार सभासद झाल्यानंतर त्यांना सभासद नियमावली पुरविण्यात आली. सा.वाले असेही कथन करतात की, सभासद अर्ज तक्रारीच्या नीशाणी 2 यामध्ये महत्वाची तरतुद नमुद आहे असे सा.वाले यांनी कथन केले. परंतु महत्वाची तरतुद त्यातही नियमावलीचे कलम 6 मध्ये नमुद असलेला 10 दिवसाचा अवधीमध्ये सभासदत्व रद्द करुन घेण्याची सुवीधा ही सभासदत्व अर्जामध्ये नमुद नाही. या प्रकारे सा.वाले असे म्हणू शकत नाहीत की, तक्रारदारांना सर्व माहिती पुरविण्यात आलेही होती व तक्रारदारांनी सर्व माहिती समजाऊन घेऊन प्रस्ताव स्विकारला. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (r ) प्रमाणे सेवा सुवीधा पुरवीणा-याने ग्राहकास सुवीधांची /योजनांची संपूर्ण माहीती दिली नाहीतर ती अनुचित व्यापारी प्रथा ठरते. या मुद्याबाबत तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य आहे. परंतु तक्रारदारांची या मुद्यावरील तक्रार मुदतबाहय ठरते. कारण तक्रारदारांना माहिती पत्रक व नियमावली जुलै,2006 मध्ये प्राप्त झाली. तर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 13.4.2010 रोजी दाखल केली. म्हणजे तथाकथीत अनुचित व्यापारी प्रथेची घटना घडल्यापासून 2 वर्षानंतर तक्रारदारांनी तक्रार दाखल केली. या प्रकारे या मुद्याचे संदर्भात तक्रार मुदबाहय आहे.
11. तक्रारदारांनी आपल्या युक्तीवादासोबत काही न्याय नीर्णय दाखल केलेले आहेत. परंतु त्यातील बरेच न्याय नीर्णय हे स्थावर मालमत्तेच्या संदर्भात देखील ग्राहक संरक्षण कायदा लागू होऊ शकतो या स्वरुपाचा अभिप्राय असलेले आहेत. या बद्दल वाद होऊ शकत नाही. कारण पर्यटन स्थळावर सेवा सुवीधा पुरविण्याचे संबंधात स्थावर मालमत्ता हा वीषय चर्चेला येऊ शकत नाही. सबब त्या संपूर्ण न्यायनीर्णयांची चर्चा करण्याची गरज आहे असे प्रस्तुत मंचास वाटत नाही.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 230/2010 रद्द करण्यात येतात.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.