अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव
तक्रार क्रमांक 1370/2010 तक्रार दाखल तारीखः- 02/11/2010
तक्रार निकाल तारीखः- 28/10/2014
नि. 15
कंवलकुमार गयानचंद केसवाणी, तक्रारदार
उ.व. सज्ञान, धंदाः शेती व व्यापार (अॅड. मंगल र.कुलकर्णी)
रा. सिंधी कॉलनी, पाचोरा,ता. पाचोरा, जि.जळगांव.
विरुध्द
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्शियल सर्विसेस. सामनेवाला
नोंदणीकृत कार्यालय – महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लि. गेटवे (अॅड.के.जे.ढाके)
बिल्डींग, अपोलो बंदर, मुंबई – 400001 व इतर 3
नि का ल प त्र
(निकालपत्र श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्षा यांनी पारीत केले)
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 (यापुढे ग्रा.सं.कायदा ) च्या कलम 12 अन्वये, प्रस्तृत तक्रार दाखल केलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, त्यांनी सामनेवाला वित्त सहायय कंपनीकडुन दि. 15/01/2002 रोजी रु. 2,20,000/- इतक्या रक्कमेचे कर्ज ट्रॅक्टर खरेदी करता घेतले होते. त्यांनी डिसेंबर 2003 मध्येच संपुर्ण कर्जाची परतफेड केली तरी देखील सामनेवाला यांनी त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही व ट्रॅक्टरचे मुळ नोंदणी कागदपत्र दिले नाही. तक्रारदार दि. 14/01/2009 रोजी सामनेवाला यांच्या कार्यालयात गेला व त्यांनी खाते उता-याची नोंद घेतली त्यावरुन डिसेंबर 2003 मध्येच त्याची थकबाकी शुन्य झाल्याचे दिसते त्यानंतर सामनेवाला यांनी खोटया नोंदी केल्या आहे.
03. तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 3 यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली असता सामनेवाला क्र. 3 यांनी त्याचेकडे रु. 35,000/- रक्कमेची बेकायदेशीर मागणी केली व त्या शिवाय नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही असे सांगितले अखेरीस तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि. 26/04/2010 रोजी वकीलांमार्फत कायदेशीर नोटीसही पाठविली तरी देखील सामनेवालांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही व नोंदणीचे मुळ कागदपत्र देखील दिले नाही म्हणुन तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांनी नाहरकत प्रमाणपत्र व ट्रॅक्टरचे मुळ नोंदणी कागदपत्र मिळावे व रु. 5,000/- इतकी रक्कम मानसिकत्रासाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मंचाकडे केलेली आहे.
04. सामनेवाला क्र. 1 मंचासमोर हजर होवूनही त्यांनी लेखी जबाब दिला नाही म्हणुन आमच्या पुर्वाधिकारी मंचाने नि. 14 वर नो से आदेश पारीत केले. त्याचप्रमाणे सामनेवाला क्र. 2 ते 4 नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
05. तक्रारदार दि. 26/09/11 पासून सातत्याने मंचासमोर गैरहजर आहेत त्यांनी कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही म्हणून प्रस्तुत तक्रार उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर निकाली करण्यात येत आहे.
06. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाच्या
सेवेत काही त्रृटी केली ही गोष्ट तक्रारदार यांनी
सिध्द केली आहे काय ? नाही
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
07. तक्रारदारांच्या कथनानुसार त्यांनी डिसेंबर 2003 मध्येच संपुर्ण कर्जाची परतफेड केलेली होती. असे असतांना तक्रारदारांनी सन 2010 मध्ये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार म्हणतात की, त्यांनी सन एप्रिल2010 मध्ये सामनेवाला यांना नोटीस पाठविली व त्यामुळे दि.02/11/2010 रोजी दाखल केलेली ही तक्रार मुदतीत आहे. पंरतु केवळ कायदेशीर नोटीस पाठवून तक्रार दाखल करण्याची मुदत वाढवता येत नाही असे मत वरिष्ठ न्यायालयांनी अनेक न्यायनिर्णयात व्यक्त केले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी डिसेंबर 2003 मध्ये संपुर्ण कर्जाची परतफेड केली व तरीदेखील त्यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नाही म्हणजे तक्रारीस कारण सन 2003 मध्येच घडले होते. त्यानंतर सन 2009 पर्यंत म्हणजे 06 वर्ष तक्रारदारांनी कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. म्हणुन सन 2010 मध्ये दाखल केलेली तक्रारदारांची तक्रार मुदतबाहय आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे व मुदा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
08. तक्रारदारांनी फक्त त्यांचा खातेउतारा (छायांकीत प्रत) दाखल केलेला आहे. पंरतु कराराची प्रत अथवा इतर कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. युक्तीवादासाठी वारंवार संधी देवूनही तक्रारदार अथवा त्यांचे वकील मंचासमोर सातत्याने गैरहजर आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत सामनेवाला यांनी खोटया नाटया नोंदी केल्या व त्यांच्याकडे रु. 35,000/- एवढया रक्कमेची बेकायदेशीर मागणी केली असे म्हटले आहे. वरील गोष्ट सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा तक्रारदारांनी मंचात दाखल केला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार त्यांनी संपुर्ण रक्कमेची कर्ज फेड करुनही सामनेवाला यांनी त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले नाही ही गोष्ट सिध्द करु शकलेले नाहीत असे मंचाला वाटते त्यामुळे मंच मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 बाबतः
09. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार सामनेवाल्यांनी त्यांना दयावयाच्या सेवेत काही त्रृटी केली आहे ही बाबत पुराव्यानीशी सिध्द करु शकलेले नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
आ दे श
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक - 28/10/2014
(श्रीमती. कविता जगपती) (श्रीमती. नीलिमा संत)
सदस्या अध्यक्षा