, मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
प्रशासकिय इमारत, तिसरा मजला, चेतना कॉलेजजवळ, बांद्रा-पूर्व, मुंबई -400051.
तक्रार क्रं.ग्रातनिमं/मुंउजि 480/2015
तक्रार दाखल दिनांक 09/06/2016
आदेश दिनांकः- 21/07/2018
श्रीमती मनीषा मनोहर बाणावलीकर,
रा. 7 / 4, सहजीवन सीएचएस,
बर्वेनगर, घाटकोपर (वेस्ट), मुंबई – 400084. ....... तक्रारदार
विरुध्द
1. महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे,
चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर,
ऑटोमोटीव्ह सेक्टर, महिंद्रा टॉवर्स,
तिसरा मजला, आकुर्ली रोड,
कांदिवली (ईस्ट), मुंबई – 400101.
2. महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे,
ऑटोमोटीव्ह सेक्टर, महिंद्रा टॉवर्स,
तिसरा मजला, आकुर्ली रोड,
कांदिवली (ईस्ट), मुंबई – 400101.
3. संचालक,
महिंद्रा अँड महिंद्रा,
ऑटोमोटीव्ह सेक्टर, महिंद्रा टॉवर्स,
तिसरा मजला, आकुर्ली रोड,
कांदिवली (ईस्ट), मुंबई – 400101
4. दि जनरल मॅनेजर,
महिंद्रा अँड महिंद्रा,
ऑटोमोटीव्ह सेक्टर, महिंद्रा टॉवर्स,
तिसरा मजला, आकुर्ली रोड,
कांदिवली (ईस्ट), मुंबई – 400101.
5. इन्फीनिटी ऑटोलिंक्स,
तळमजला, जसवंती लँडमार्क,
एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (वेस्ट),
मुंबई – 400079.
6. संचालक,
इन्फीनिटी ऑटोलिंक्स,
तळमजला, जसवंती लँडमार्क,
एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (वेस्ट),
मुंबई – 400079. ..... सामनेवाले क्र. 1 ते 6
मंचः- मा. श्री. एम. वाय. मानकर, अध्यक्ष,
मा. श्री. एस. व्ही. कलाल, सदस्य,
तक्रारदारांतर्फे वकील श्री अमित पै
सामनेवाले क्र. 1 ते 4 विना लेखी कैफियत
सामनेवाले क्र. 5 व 6 एकतर्फा.
(युक्तीवादाचे वेळेस )
आदेश - मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
- न्यायनिर्णय -
(दि. 21/07/2018 रोजी घोषीत)
1. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांनी उत्पादित केलेले वाहन झायलो विकत घेतले. परंतु वाहनामध्ये लगेचच दोष आढळून आला. ते दोष दूर करण्याकरीता तक्रारदारांना सामनेवाले व त्यांच्या अधिकृत सेवा केंद्राकडे वारंवार जावे लागले. परंतु दोष दूर झाला नाही. सबब, तक्रारदारांनी नुकसानभरपाई करीता ही तक्रार दाखल केली. सामनेवाले क्र. 1, 2, 3 व 4 यांना मंचाची नोटीस दि 20/06/2016 रोजी प्राप्त झाल्याचे पोस्टाच्या ट्रॅक रिपोर्टवरून दिसून येते. त्यांचे तर्फे त्यांचे वकील मंचासमक्ष दि 23/08/16 रोजी उपस्थित झाले व लेखी कैफियत सादर करणेकामी मुदतीची विनंती केली. सामनेवाले क्र. 1 ते 4 हे विहीत मुदतीत मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत व विहीत मुदत संपल्यानंतर या मंचास मुदतवाढ देण्याचा अधिकार नाही. सबब, त्यांचे विरुध्द दि 23/08/16 रोजी प्रकरण विना लेखी कैफियत चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्र. 5 व 6 यांना नोटीस दि 17/06/16 रोजी नोटीस प्राप्त झाली परंतु ते मंचात उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्र. 5 हे सामनेवाले क्र. 1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत.
2. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले मोटर वाहन धनादेश अदा करुन दि 05/01/2014 रोजी विकत घेतले. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले क्र. 1 यांच्या वाहनांचा विभाग आहे. सामनेवाले क्र. 3 व 4 हे त्यांचे पदाधिकारी आहेत. सामनेवाले क्र. 6 हे सामनेवाले क्र. 5 यांचे संचालक आहेत. तक्रारदारांनी वाहनाचा दि 05/01/2014 रोजी ताबा घेतल्यानंतर त्यामध्ये दोष असल्याचे आढळून आले. कार जॅक ठेवण्याचे जागेवर व मधल्या कॅप्टन सीटमध्ये हादरे जाणवत होते व हे दोन्ही दोष उत्पादीत दोष होते. तक्रारदारांनी ही बाब सामनेवाले यांचे सेवा सल्लागार श्री. योगेश यांना कळविले. त्यांनी ते वाहन सामनेवाले क्र. 5 यांचेकडे घेऊन जाण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे दि 06/01/2014 रोजी तक्रारदारांनी ते वाहन सामनेवाले क्र. 5 कडे नेले. तेथील तंत्रज्ञ यांनी मत व्यक्त केल्याप्रमाणे वाहनातील दोष हे उत्पादीत दोष आहेत. कॅप्टन सीट हे मेटल हूकद्वारे वाहनाच्या तळाशी जोडल्यामुळे सीटला बसत आहेत. तसेच कार जॅक बाबत सुध्दा उत्पादीत दोष असल्याचे सांगितले. तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी रबर टेप इन्सुलेशन लावले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी ते वाहन सामनेवाले यांच्याकडे खूपदा नेले. वाहनाची टेस्ट राईड घेण्यात आली व ही चाचणी चार ते पाच वेळा घेण्यात आली व प्रत्येकवेळी 25 कि. मी. अंदाजे वाहन चालविण्यात आले व शेवटी दोष असलेली कॅप्टन सीट वाहनातून दि 21/01/2014 रोजी काढून टाकण्यात आली. दि. 21/01/14 ते दि 01/03/14 पर्यंत तक्रारदार मधल्या कॅप्टन सीट शिवाय वाहन चालवित होते. सदोष असलेली कॅप्टन सीट दि 01/03/2014 रोजी बदलण्यात आली. दि. 01/03/2014 रोजी तक्रारदारांनी व तंत्रज्ञांनी सह टेस्ट ड्राईव्ह घेतली असता मधल्या दोन्ही दरवाज्यांमधून वाहनाचा वेग प्रति तास 30 कि. मी. झाल्यावर एअर कटींग साऊंड येत असल्याचे जाणवले. नवीन कॅप्टन सीट लावल्यावर सुध्दा कर्कश आवाज येत होता. तक्रारदार दि. 08/03/2014 रोजी सामनेवाले क्र. 5 यांचेकडे पूर्वनियोजित नेमणूक घेऊन गेले व दोन तंत्रज्ञांसह वाहन अंदाजे साठ कि. मी. चालविण्यात आले. त्यानंतर वाहनामध्ये थोडा फेरबदल करण्यात आला जेणेकरुन एअर कटींग आवाज येणार नाही. त्यानंतर तक्रारदारांना टेस्ट ड्राईव्ह घेण्याबाबत सांगण्यात आले व खात्री करण्यास सांगीतले. तक्रारदारांनी त्याच दिवशी टेस्ट ड्राईव्ह घेतली असता एअर कटींग आवाज येत होता. तक्रारदार यांना दि. 12/03/14 रोजी पुन्हा बोलविण्यात आले. पुण्यावरुन तंत्रज्ञ येऊन गाडीचे निरिक्षण करणार होता. परंतु तो दोष दूर झाला नाही. दि. 21/03/2014 रोजी तक्रारदार यांना बिडींग बदलण्याबाबत सांगण्यात आले. तक्रारदारांना त्याकरीता सामनेवाले यांचेकडे ब-याचदा जावे लागले. शेवटी दि 10/04/2014 रोजी बीडींग बदलण्यात आले व त्याच दिवशी 70 कि. मी. ची टेस्ट ड्राईव्ह घेण्यात आली. परंतु दोष दूर झाला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले याना दि 10/04/14 रोजी ई – मेलद्वारे कळविले की ते दि 03/05/14 रेाजी सहकुटुंब दक्षिण भारतात जाणार आहेत व त्यांचा अंदाजे 5000 किमीचा प्रवास अपेक्षित आहे तेव्हा एअर कटींग आवाजाचा दोष दि. 03/05/14 किंवा त्यापूर्वी दूर करण्यात यावा. दि. 14/04/14 रोजी तक्रारदार व सामनेवाले क्र. 5 यांचे व्यवस्थापक श्री बॉस्को व इतर तंत्रज्ञांसह जॉंईंट ट्रायल घेण्यात आली व त्यांच्या दि. 14/04/14 रोजीच्या पत्रामध्ये एअर कटींग आवाजाबाबत मान्य करण्यात आले. मधल्या कॅप्टन सीटबाबत पुन्हा तोच दोष आढळून आला तसे तक्रारदारांनी दि 26/04/14 रोजी सामनेवाले यांना कळविले. तक्रारदार दि. 09/05/14 रोजी सामनेवाले क्र. 5 कडे पुन्हा गेले. दि 14/05/2014 रोजी बाहेरील दरवाज्यामध्ये थोडा फेरफार करण्यात आला. परंतु तो दोष संपूर्ण दूर झाला नाही.
3. तक्रारदार दि 18/05/14 रोजी दक्षिण भारताच्या सहलीवर गेले व वाहन 4950 कि. मी. चालल्यानंतर दि 20/05/2014 रोजी बँगलोर येथील सामनेवाले यांचे अधिकृत सेवा केंद्रामध्ये वाहनाची सर्व्हीसिंग करण्यात आली व दि. 21/05/14 रोजी एअर कटींगचा आवाज पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात ऐकू येऊ लागला. तक्रारदार त्यांचे जावई, मुलगी, नातू वय अंदाजे तीन वर्षे असलेले वाहनात प्रवास करीत होते. एअर कटींगच्या आवाजामुळे सर्वांना डोकेदुखी व असह्य त्रास होत होता. हा त्रास त्यांना 600 कि.मी. सहन करावा लागला. तक्रारदारांनी ही बाब सामनेवाले यांना कळविली. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना जवळपास 2600 किमीच्या प्रवासात हा त्रास सहन करावा लागला व हा सर्व त्रास वाहनामध्ये असलेल्या उत्पादीत दोषामुळे झाला. सामनेवाले क्र. 5 यांचे व्यवस्थापक श्री दीपक यांनी तक्रारदारांना कळविले की, बाहेरील खिडकीच्या काचांबाबत त्यांनी साहित्याची मागणी केली आहे व ती आल्यानंतर वाहनामध्ये बसविण्यात येईल. ही बाब तक्रारदार यांना दि. 26/05/2014 रोजी ई – मेलद्वारे कळविण्यात आली. तक्रारदार दि. 29/05/14 रोजी मुंबईला परतले. सामनेवाले यांच्या सोयीप्रमाणे वाहन सामनेवाले क्र. 5 कडे दि 31/05/14 रोजी नेण्यात आले. परंतु तक्रारदार यांना सोमवारी येण्याबाबत सांगण्यात आले. शेवटी दि 11/06/2014 रोजी बिडींग बदलण्यात आले व टेस्ट ड्राईव्ह घेण्यात आली. तक्रारदारांनी दि 16/06/14 रोजी सामनेवाले यांचे प्रमुख तंत्रज्ञ श्री खर्चे यांना ई – मेल पाठवून आवाजाबाबत दोष दूर झाला नाही असे कळविले. दि. 18/06/14 रोजी सामनेवाले यांचे तंज्ञत्र श्री मयूर चव्हाण, श्री योगेश सावंत व श्री विजय शिंदे यांच्यासह जॉईंट ट्रायल घेण्यात आली व त्या तिनही इसमांनी एअर कटींग आवाज वाढल्याबाबत मान्य केले. श्री. खर्चे यांनी दि. 19/06/2014 रोजी पत्र पाठवून विसलिंग एअर कटींग आवाज असल्याबाबत मान्य केले. तक्रारदारांनी दि. 23/06/2015 रोजी सामनेवाले यांचेकडे वाहन दिले व ते त्यांच्याकडे दि 30/06/2015 पर्यंत होते. दि 28/06/15 रोजी तक्रारदार यांना प्रथमतः वाहनामध्ये एअर कटींग आवाज येत असल्याचे कळविले. तक्रारदारांनी जेव्हा ते वाहन दि 30/06/2015 रोजी घरी आणले तेव्हा एक छोटा तुकडा बिडींगमध्ये बसवून तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुन्हा अंदाजे 16 दिवसांनी डाव्या कडील मधल्या दरवाजाचा काच काम करीत नव्हता. तक्रारदार यांना त्यांच्या झायलो मोटर वाहनाच्या दुरुस्तीकरीता सामनेवाले यांचेकडे दि. 30/06/2014 पर्यंत सुमारे सहा महिन्याचे अवधीमध्ये 25 पेक्षा जास्त वेळा जावे लागले. तक्रारदार सामनेवाले यांचेकडे वारंवार जाऊन सुध्दा तात्पुरता उपाय करण्यात येत होता व त्यामुळे त्या पूर्णपणे कंटाळून गेल्या होत्या. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये भरपूर पत्र व्यवहार झालेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि 22/12/2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करुन नुकसानभरपाई करीता विविध मागण्या केल्या आहेत. तक्रारदार यांनी दि. 07/10/2017 रोजी त्यांनी परिच्छेद क्र. 34 मधील मागणी अ व क सोडून देत असल्याबाबत निवेदन केले व त्याबाबत पुरसिस सादर केली. त्यामुळे या तक्रारीमध्ये त्या दोन मागण्यां बाबत विचार करण्यात येत नाही. तक्रारदारांनी तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे सादर केली. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद सादर केला. तक्रारदार यांचेतर्फे त्यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सामनेवाले क्र. 1 ते 4 हे तोंडी युक्तीवादाचे वेळेस गैरहजर होते.
4. उपरोक्त बाबींवरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी मोबदल्याची रक्कम अदा करुन सामनेवाले यांचेकडून नवीन मोटर वाहन खरेदी केले. परंतु त्यामध्ये लगेचच दोष आढळून आले. वाहनातील एक आसन पूर्णपणे बदलावे लागले. तसेच एअर कटींगचा आवाज येत होता त्याबाबत वारंवार प्रयत्न करण्यात आले. काही केलेले उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे होते व अकुशल पध्दतीने केल्याचे दिसून येत होते. एअर कटींगचा दोष सहन करत तक्रारदार यांना दक्षिण भारताचा अंदाजे 2600 कि.मी. प्रवास सहकुटुंब करावा लागला. आमच्या मते, वाहनामध्ये जर एअर कटींगचा दोष असेल तर त्याचा विपरीत परिणाम वाहनातील वातानुकुलीत वातावरणावर व वातानुकुलन यंत्रावर निश्चितपणे होणे स्वाभाविक आहे. वरील बाबींवरुन याबाबत कोणतीही शंका रहात नाही की नवीन खरेदी केलेल्या वाहनामध्ये दोष होता व त्याबाबत योग्य व चांगल्या प्रकारे सेवा देण्यात आली नाही. तक्रारदार यांना वारंवार सामनेवाले यांचेकडे जावे लागले. त्यांच्या वेळेचा व श्रमाचा अपव्यय झाला. नवीन वाहन खरेदी करताना मोठा उत्साह व आनंद असतो. परंतु तक्रारदार यांचा आनंद व उत्साह नाहीसा झाला. उलटपक्षी त्यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला. तक्रारदार यांचा पुरावा अबाधीत आहे व तो मान्य करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही.
5. उपरोक्त चर्चेनुसार व निकषानुसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
6. या मंचाचा कार्यभार व प्रशासकीय कारण विचारात घेता ही तक्रार याआधी निकाली काढता आली नाही.
7 सबब, खालील आदेश
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार क्र 480/2015 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले क्र. 1 यांनी उत्पादीत केलेल्या वाहनामध्ये दोष होता व सामनेवाले क्र. 1 ते 6 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात कसूर केला असे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले क्र. 1 ते 6 यांनी वैयक्तीक किंवा संयुक्तरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासाकरीता रु. 4,00,000/- (रु. चार लाख मात्र) व तक्रारीच्या खर्चाकरीता रु. 30,000/- (रु. तीस हजार मात्र) दि. 31/08/2018 पर्यंत अदा करावेत. तसे न केल्यास उपरोक्त रकमांवर दि. 01/09/2018 पासून अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 10% व्याज लागू राहील.
4) तक्रारीतील परिच्छेद क्र. 34 मधील मागणी क्र. अ व क बाबत कोणताही आदेश पारीत करण्यात येत नाही.
5) तक्रारीचे अतिरिक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.
6) आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात.
(एस. व्ही. कलाल) ( एम. वाय. मानकर )
सदस्य अध्यक्ष
ठिकाणः बांद्रा (पू.) मुंबई.
दिनांकः 21/07/2018.
जीएमपी/-