जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 165/2009. तक्रार दाखल दिनांक : 29/03/2009. तक्रार आदेश दिनांक :08/04/2011. श्री. अरुण अंकूश अवताडे, वय सज्ञान, रा. विरवडे (बु.), ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द महिंद्रा अन्ड महिंद्रा फायनान्शीयल सर्व्हीसेस लि., ताज प्लाझा, मुरारजी पेठ, सोलापूर, (नोटीस व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.व्ही. नागणे विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एस.डी. शिंदे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.25/1/2005 रोजी रु.1,50,000/- कर्ज घेऊन व मार्जीन मनी रु.40,000/- चा भरणा करुन महिंद्रा चॅम्पीयन वाहन क्र.एम.एच.13/6760 खरेदी केले आहे. कर्जाचा व्याज दर द.सा.द.शे. 8 टक्के होता. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये करारनामा होऊन त्यांच्या को-या व इंग्रजी भाषेतील कागदपत्रांवर स्वाक्ष-या घेण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारदार यांच्याकडून पुढील तारखेचे धनादेश घेण्यात आलेले आहेत. तक्रारदार यांनी कर्ज हप्त्यांपोटी विरुध्द पक्ष यांच्याकडे एकूण रु.2,05,000/- चा भरणा केला आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांना कराराची प्रत व लेखा विवरणपत्र मागणी करुनही दिले नाही. विरुध्द पक्ष यांनी त्यांना कोणतीही लेखी सूचना न देता वाहन जप्त केले आणि रु.60,000/- रकमेची विक्री केल्याचे त्यांना समजले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन कर्जाचा बेकाक खाते उतारा मिळण्यासह मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अग्रीमेंट नं. बी-78802, दि.25/1/2005 अन्वये तक्रारदार यांनी रु.1,50,000/- वित्तसहाय्य घेतले आहे. प्रतिमहा रु.4,375/- प्रमाणे 48 हप्त्यांमध्ये त्याची परतफेड करावयाची होती. परंतु सुरुवातीपासून देय तारखेस तक्रारदार यांनी परतफेड केली नाही. माहे ऑगस्ट 2007 मध्ये तक्रारदार यांच्याकडून रु.33,670/- देय होते. त्याबाबत नोटीस पाठवूनही तक्रारदार यांनी रकमेचा भरणा करण्याची इच्छा दर्शविली नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या संमतीने वाहनाचा ताबा घेतला. दि.13/9/2007 रोजी तक्रारदार यांना नोटीस पाठविली आणि रकमेचा भरणा करुन वाहनाचा ताबा घेण्याविषयी कळविले. तक्रारदार यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाहनाचे मुल्यांकन करुन व तक्रारदार यांची प्रतिक्षा करुन दि.11/2/2008 रोजी वाहनाची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली. वाहनाची विक्री करुनही त्यांना रु.1,12,288/- चे नुकसान झाले असून त्याची नोटीस तक्रारदार यांना पाठविली आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून महिंद्रा चॅम्पीयन वाहन खरेदी करण्यासाठी अग्रीमेंट नं. बी-78802, दि.25/1/2005 अन्वये तक्रारदार यांनी रु.1,50,000/- वित्तसहाय्य घेतल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी कर्जाची रक्कम परतफेड केलेली असतानाही वाहन जप्त करुन विक्री केल्याची व कर्जाचे विवरणपत्र दिले नसल्याची त्यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार नोटीस पाठवूनही तक्रारदार यांनी थकीत रकमेचा भरणा केला नाही आणि तक्रारदार यांच्या संमतीने वाहनाचा ताबा घेऊन व तक्रारदार यांची प्रतिक्षा करुन दि.11/2/2008 रोजी वाहनाची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली आहे. 5. तक्रारदार यांनी कराराप्रमाणे देय हप्त्यांचा विरुध्द पक्ष यांच्याकडे वेळेमध्ये भरणा केल्याचे निदर्शनास येत नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी वाहन ताब्यात घेतल्यानंतर त्याची विक्री करण्यापूर्वी थकीत रकमेचा भरणा करुन वाहन सोडवून घेण्याबाबत पाठविलेली नोटीस तक्रारदार यांनी स्वीकारलेली नाही. तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक नोटीस घेण्यास नकार दिलेला असल्यामुळे त्यांना कर्ज वसुलीच्या वस्तुस्थितीची माहिती होती, या अनुमानास आम्ही येत आहोत. 6. वाहनाची विक्री करण्यापूर्वी तक्रारदार यांना उचित संधी देण्याचा प्रयत्न विरुध्द पक्ष यांनी केलेला आहे. तक्रारदार यांच्याकडून थकीत राहिलेले कर्ज वसुली करण्यासाठी त्यांनी वाहनाची विक्री केल्याचे त्यांचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरत नाही. त्या अनुषंगाने तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/5411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |