(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र सामनेवाला यांनी अर्जदार यांची बोलेरो कंपनीची ओढून नेलेली जीप कायदेशीर तरतुदींची पुर्तता करुन अर्जदार यांचेकडून थकीत हप्त्याची रक्कम भरुन घेवून अर्जदार यांना परत मिळावी किंवा जीपची किंमत रुपये रु.5,40,000/-सामनेवालाकडून मिळावी, आर्थीक नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- असे एकूण रु.5,55,000/- मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांनी पान क्र.24 लगत लेखी म्हणणे व पान क्र.25 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय. 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय. 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून व्याजासहीत रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवन मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांनी पान क्र.47 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.48 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांना वाहन खरेदीसाठी कर्जाऊ रक्कम दिली होती ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. याउलट अर्जदार व सामनेवाला यांचेमध्ये काही अटीवर दि.01/09/2008 रोजी कर्ज करारनामा करण्यात आलेला आहे ही बाब सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. सामनेवाला यांनी पान क्र.28 लगत लोन अँगीमेंट दाखल केलेले आहे. पान क्र.28 चे लोन अँग्रीमेंट व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदाराने कधीही न चुकता हप्त्याची रक्कम अदा केलेली नाही. थकीत पाच हप्त्याची रक्कम रु.60,000/- व रक्कम रु.75,000/- भरण्याचा मनोदय अर्जदार यांनी केला नव्हता व नाही. दि.01/09/2010 रोजी किंवा कधीही अर्जदार ही सामनेवाला कडे रु.80,000/- घेवून आलेली नव्हती. कर्ज प्रकरण थकीत झाल्यामुळे अर्जदार यांनी स्वतःहून वाहन जमा केलेले आहे. दरमहा रु.12,700/- च्या हप्त्यावर रु.5,40,000/- चे कर्ज दिलेले आहे. वेळोवेळी सुचना देवूनही कर्जप्रकरण नियमीत केलेले नाही. शेवटची संधी देण्याचे हेतुने दि.20/09/2010 रोजी सामनेवाला यांनी अर्जदार यांना नोटीस पाठवली व कर्जप्रकरण नियमीत करावे किंवा लिलाव पध्दतीने वाहनाची विक्री करावी लागेल असे कळवले. दि.30/11/2010 रोजी जास्तीतजास्त बोलीची रक्कम रु.3,90,000/- इतक्या रकमेवर लिलाव करुन वाहन मालकीहक्काने खरेदीदाराचे ताब्यात दिलेले आहे. अद्यापही अर्जदार यांचेकडून रु.1,36,846/- इतकी रक्कम येणे आहे सेवेत कमतरता केलेली नाही” असे म्हटलेले आहे. सामनेवाला यांनी पान क्र.32 लगत दि.20/09/2010 रोजीची नोटीस व पान क्र.33 लगत रजि.ए.डी. ची पोहोच पावती दाखल केलेली आहे. परंतु ही पोहोच पावती व त्यावरील सही अर्जदार यांनी नाकारलेली आहे. या पोहोच पावतीवरील सही अर्जदार यांचीच आहे व पान क्र.32 ची नोटीस अर्जदार यांना मिळालेली आहे. हे स्पष्टपणे शाबीत करण्याकरीता सामनेवाला यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. पान क्र.33 चे पोहोच पावतीवरील तारीख व सही यामध्ये खाडाखोड आहे व बदल आहेत असे दिसून येत आहे. अर्जदार यांची मुळ तक्रार अर्जावरील सही तसेच वकिलपत्रावरील सही याची तुलना पान क्र.33 चे पोहोच पावतीवरील सही बरोबर केली असता पान क्र.33 चे पोहोच पावतीवरील सहीमध्ये फरक आहे असे दिसून येत आहे. पान क्र.33 ची पोहोच पावतीवरील सही अर्जदार यांचीच आहे हे शाबीत करण्याकरीता सामनेवाला यांनी मंचाकडे कसलाही प्रकारे अर्ज दिलेला नाही. वाहन ताब्यात घेतल्यानंतर त्याचा जाहीर लिलाव करण्यापुर्वी अर्जदार यांना सामनेवाला यांनी नोटीस दिलेली होती व जाहीर लिलावाची नोटीस वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द केलेली होती हे स्पष्टपणे शाबित करण्याकरीता सामनेवाला यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. याउलट “जाहीर लिलावाची प्रक्रिया केलेलीच नाही केवळ अन्य लोकांचेकडून निवीदा मागवून व वाहनाचे व्हॅल्युएशन करुन वाहनाची विक्री केलेली आहे.” ही बाब सामनेवाला यांनी युक्तीवादाचे वेळी मान्य केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 9 मध्येच “तारीख 20/09/2010 रोजी रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून कर्ज प्रकरण नियमीत करावे अथवा लिलाव पध्दतीने तक्रारदाराचे वाहनाची विक्री करावी लागले याबाबत नोटीस पाठवली.” असा उल्लेख केलेंला आहे. याचा विचार होता वाहनाची विक्री लिलाव पध्दतीनेच करावी लागते ही बाब सामनेवाला यांना मान्य होती व माहिती होती हे स्पष्ट होत आहे. वाहनाची विक्री लिलावाची प्रक्रिया पुर्ण करुन केलेली आहे हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणतेही योग्य ते कागदपत्रे दाखल केलेले नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचे ताब्यातील वाहन चुकीच्या व अयोग्य पध्दतीने स्वतःचे ताब्यात घेवून अर्जदार यांना कोणतीही संधी न देता चुकीच्या पध्दतीने व जाहीर लिलाव प्रक्रिया पुर्ण न करता वाहनाची विक्री केलेली आहे हे स्पष्ट झालेले आहे. अर्जदार यांना वाहन विक्री करण्यापुर्वी सामनेवाला यांनी नोटीस दिलेली नाही. तसेच वाहनाची विक्री प्रक्रीयेमध्ये किंवा जाहीर लिलावामध्ये भाग घेण्याची संधी सामनेवाला यांनी अर्जदार यांना दिलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. थकीत हप्ते भरुन घेवून जीप ताब्यात मिळावी किंवा जीपची किंमत रु.5,40,000/- मिळावेत अशी मागणी अर्जदार यांनी केली आहे. परंतु वादातील जीप सामनेवाला यांनी विक्री केलेली असून नवीन खरेदीदाराचे ताब्यात दिलेली आहे हे सामनेवाला यांचे कथनावरुन स्पष्ट झालेले आहे. यामुळे जीप परत मिळावी ही अर्जदार यांची मागणी मान्य करता येत नाही. अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे कर्जाऊ रकमेपोटी पान क्र.56 ते 73 लगतचे पावत्याप्रमाणे रक्कम रु.2,58,743/- व पान क्र.52 चे सामनेवाला यांचे स्टेटमेंटनुसार डाऊन पेमेंटची रक्कम रु.65,428/- अशी एकूण रक्कम रु.3,24,171/- इतकी रक्कम जमा केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, यामुळे सामनेवाला यांचेकडून अर्जदार हे वरील रक्कम रु.3,24,171/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचे चुकीच्या कृत्यामुळे अर्जदार यांना जीपचा वापर करता आलेला नाही तसेच अर्जदार यांची रु.3,24,171/- इतकी रक्कम सामनेवाला यांचेकडे गुंतून राहीलेली आहे. या कारणामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक त्रास सहन कराला लागलेला आहे. याचा विचार होता पान क्र.28 चे कराराची ता.01/09/2008 पासून आर्थीक नुकसान भरपाई पोटी अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मंजूर रक्कम रु.3,24,171/- या रकमेवर संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून जीप परत मिळावी किंवा जीपची किंमत मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे. 1) 4(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 204. सिटी बँक एन ए विरुध्द प्रदीप कुमार पत्री व इतर 2) 3(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 88. मॅग्मा लिझींग लि. विरुध्द प्रसन्न मोहपात्रा 3) 2(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 101. आय. सी. आय. सी. आय. बँक लि. विरुध्द खिरोद कुमार बेहरा 4) 2(2011) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 280. टाटा इंजिनीयरींग अँण्ड लोकोमोटीव्ह कं.लि. विरुध्द नाथु अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसाचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रक्कम द्यावी. अ) रक्कम रु.3,24,171/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवर दि.01/09/2008 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे. ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/-द्यावेत. क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत. |