(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 29 जानेवारी 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हिने गैरअर्जदाराकडून मौजा लांझेडा येथील सर्व्हे नं. 35/2 ले-आऊट मधील प्लॉट नं.6 व 7 मिळून ज्याचा प्लॉट नं.7 नमूद करुन 3400 चौ.फु. रुपये 13,60,000/- मध्ये विकत घेण्याचा सौदा केला. त्याबाबत गैरअर्जदाराने दि.11.1.2004 रोजी अर्जदाराकउून 20,000/- बयाणादाखल घेतले व उर्वरीत रक्कम करारनाम्यानुसार दि.3.2.2014 पर्यंत 2,80,000/- देण्याचे व उर्वरीत रक्कम नोंदणी प्रसंगी देवून दि.1.4.2014 पर्यंत विक्री करुन देण्याचे ठरले. दि.2.2.2014 रोजी प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी व मोजमाप केले असता, प्लॉटचे क्षेञफळ व हद्दी बदलवून त्यामध्ये बदल केल्याचे दिसून आले. ले-आऊट प्रमाणे मोक्यावर हद्दी दिसून न आल्याने गैरअर्जदार फसवणूक करीत आहे. गैरअर्जदाराने दाखविलेले ले-आऊट अकृषक झालेले नाहीत. म्हणून अर्जदाराने दि.22.2.2004 रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठवून बयाणा रक्कम 20,000/- रुपये 18 टक्के व्याजासह परत देण्याची विनंती केली. गैरअर्जदाराने अर्जदाराचे नोटीसला उत्तर दिले नाही व मुदतीतमध्ये बयाणा रक्कम परत केली नाही. त्यामुळे, गैरअर्जदाराने करारनाम्यातील बयाणा रक्कम रुपये 20,000/- दि.11.1.2014 पासून 18 टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश व्हावा. तसेच, अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 3,000/- व कार्यवाहीचा खर्च, नोटीस खर्च, वकील इत्यादीकरीता रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 5 दस्ताऐवज, नि.क्र.12 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.25 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.24 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.25 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले आहे की, गैरअर्जदाराने मौजा लांझेडा येथील सर्व्हे नं.35/2 मध्ये वडीलोपार्जीत कृषक जमीनीचे एकूण 23 भूखंड पाडून विक्रीस काढले होते. या भुखंडापैकी गैरअर्जदाराने काही भुखंड विकले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदारासोबत भेटून कृषक भुखंड खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. अर्जदार ही प्रत्यक्ष मोक्यावर येवून गैरअर्जदाराचे मालकीचे सर्व्हे नं.35/2 मधील भुखंडाची पाहणी करुन भुखंड क्र.7 व 8 चा एकच भुखंड करुन द्यावा असे गैरअर्जदारास सांगीतले. त्याप्रमाणे गैरअर्जदाराने दोन्ही भुखंडाच्या क्षेञफळाची बेरीज करुन सदर भुखंड 3400 चौ.फुट. होत असल्याचे अर्जदारास सांगीतले. गैरअर्जदाराने अर्जदारास प्रत्यक्ष मोक्यावर भुखंडाची मोजणी दि.11.1.2014 रोजी कराराचे दिवशी करुन दिली. सदर भुखंड रुपये 400/- चौ.फुट या दाराने ठरविण्यात येवून एकूण किंमत रुपये 13,60,000/- होत असल्याचे अर्जदारास सांगीतले. अर्जदाराने दि.11.1.2014 रोजी करारनामा लिहून रुपये 20,000/- बयाणा दाखल व दि.3.2.2014 रोजी रुपये 2,80,000/- गैरअर्जदाराचे देण्याचे व विक्रीची मुदत दि.1.4.2014 पर्यंत करण्याचे ठरले. गैरअर्जदाराने सर्व्हे नं.35/2 यामध्ये 23 भुखंड पाडले होते. परंतु, अर्जदाराने भुखंड 7 व 8 चा एकच मोठा भुखंड खरेदी केल्याने गैरअर्जदारास बनविलेला ले-आऊटचा सुधारीत ले-आऊट करावा लागला होता. अर्जदार ही सदर भुखंड खरेदी करतेवेळी दलालामार्फत गैरअर्जदाराला भेटली त्यामुळे गैरअर्जदारासोबत करार केल्याबरोबर दलालास गैरअर्जदारानी भुखंड किंमतीच्या 1 टक्का म्हणजे रुपये 13,600/- नगदी दलालास दिले. गैरअर्जदार हा अर्जदारास सदर भुखंड उर्वरीत रक्कम घेवून विक्री करुन देण्यास तयार असल्याने अर्जदाराचे नोटीसला उत्तर दिले नाही. सदर वाद हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने सदर वाद विद्यमान मंचास निकाली काढण्याचा अधिकार नाही. अर्जदाराची तक्रार पूर्णपणे खोटी व बनावटी असल्याने अमान्य आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
4. अर्जदाराने नि.क्र.28 नुसार शपथपञ, नि.क्र.32 नुसार 4 दस्ताऐवज व नि.क्र.34 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.33 नुसार शपथपञ, नि.क्र. 35 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) अर्जदार व गैरअर्जदारामध्ये प्लॉट संबंधी झालेला व्यवहार : नाही.
वाणिज्य स्वरुपाचा आहे काय ?
3) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतम सेवा दिली आहे काय ? : होय.
4) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदार हिने गैरअर्जदाराकडून मौजा लांझेडा येथील सर्व्हे नं. 35/2 ले-आऊट मधील प्लॉट नं.6 व 7 मिळून ज्याचा प्लॉट नं.7 नमूद करुन 3400 चौ.फु. रुपये 13,60,000/- मध्ये विकत घेण्याचा सौदा केला. त्याबाबत गैरअर्जदाराने दि.11.1.2004 रोजी अर्जदाराकउून 20,000/- बयाणादाखल घेतले व उर्वरीत रक्कम करारनाम्यानुसार दि.3.2.2014 पर्यंत 2,80,000/- देण्याचे व उर्वरीत रक्कम नोंदणी प्रसंगी देवून दि.1.4.2014 पर्यंत विक्री करुन देण्याचे ठरले, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. गैरअर्जदार यांनी त्याचे लेखी उत्तरात असे कबूल केले आहे की, त्यांनी मौजा लांजेडा येथील सर्व्हे नं.35/2 या वडीलोपार्जीत कृषक जमीनीचे ले-आऊट पाडून विक्रीस काढले होते. सदर सर्व्हे नं.35/2 मध्ये एकूण 23 भुखंड पाडले होते, या भुखंडापैकी गैरअर्जदाराने काही भुखंड विकलेले आहेत, यावरुन असे सिध्द होते आहे की, गैरअर्जदाराने सदर भुखंड विक्री करण्याचा व्यवसाय केले होते व सदर भुखंडापैकी एक भुखंड खरेदी विक्रीकरीता अर्जदार व गैरअर्जदारामध्ये व्यवहार झाला होता. सबब, गैरअर्जदाराचे असे म्हणणे की, अर्जदारामध्ये झालेला भुखंड खरेदी-विक्री व्यवहार वाणीज्य स्वरुपाचा होता हे ग्राह्य धरण्यासारखे नाही. कारण अर्जदाराने सदर भुखंड स्वतःचे वापराकरीता गैरअर्जदाराकडून खरेदी करण्याचा करार केला होता. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. गैरअर्जदाराचे त्याचे लेखी बयाणात नि.क्र.25 वर ही बाब कबूल केली आहे की, दि.1.4.2014 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास सदर प्लॉटची विक्री करुन द्यायची होती. तसेच गैरअर्जदाराने लेखी जबाब दाखल करेपर्यंत सदर प्लॉटचे विक्रीबाबत कोणत्याही प्रयत्न दर्शवीली नाही. अर्जदाराने दाखल नि.क्र.2 वर दस्त क्र.अ-3 ते अ-5 वर दाखल नोटीसाची प्रत व पोचपावतीची पडताळणी करतांना असे दिसते की, अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर प्लॉटचे व्यवहाराबाबत नोटीस पाठविले होते व त्या नोटीसाची गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही, तसेच गैरअर्जदाराने सदर नोटीस मिळाल्यानंतर अर्जदाराला नोटीसाचे उत्तर सुध्दा दिले नाही व याबाबत कोणताही खुलासा त्यांचे जबाबात दिसत नाही किंवा दर्शवीत नाही. म्हणून मंचाचे मताप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराला सदर प्लॉटाची विक्री करण्यास टाळाटाळ केलेली आहे असे सिध्द होत आहे. सबब, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविली असून मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रुपये 20,000/- कराराचा दि.11.1.2014 पासून 8 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदाराला द्यावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 3,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/1/2015