न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे मूळचे उडतारे, ता.वाई येथील रहिवासी असून सध्या ते कुवेत येथे काम करीत आहे. जाबदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी मौजे करंजे तर्फ सातारा येथील सि.स.नं.383/ब, प्लॉट नं.88 या मिळकतीवर निर्मल सुदाम हाईट्स नावाची इमारत उभी केली आहे. सदर इमारतीतील दुकान गाळा क्र. एलजी-1 व जी-1 व जी-3 हे तीन दुकान गाळे खरेदी करण्याबाबत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा झाली. सदर गाळयांची एकूण किंमत रु.81,00,000/- इतकी ठरली. जाबदार यांनी तक्रारदार यांना देवू केलेल्या एलजी-1 व जी-1 या दुकान गाळयांचे व्यवहार एकंदरीत रक्कम रु.25,00,000/- देवून पूर्ण करण्याचे ठरले व दुकान गाळा क्र. जी-3 या गाळयाची रक्कम रु.26,00,000/- पैकी रक्कम रु.6,00,000/- एवढी रक्कम नोंदणीकृत साठेखत करतेवेळी द्यायची व उर्वरीत रक्कम रु.20,00,000/- ही तदनंतर 18 महिन्यांचे आत देवून व्यवहार पूर्ण करायचा असे उभयतांमध्ये ठरले. दुकान गाळा खरेदी करण्यास कोणतीही अडचण आल्यास अॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परत करुन व्यवहार संपुष्टात आणावयाचा असेदेखील उभयतांमध्ये ठरले. त्याप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.25,00,000/- एवढी रक्कम चेकद्वारे स्वीकारली व दि. 25/8/2021 रोजी उभयतांमध्ये परस्पर समजुतीचा करारनामा झाला. सदर करारनाम्यानुसार जाबदार यांनी तक्रारदार यांना तिनही गाळयांचा कब्जा दिला. तदनंतर दि. 31/08/2021 रोजी दुकान गाळा नं. जी-1 या गाळयाचे नोटरी साठेखत जाबदार यांनी तक्रारदार यांना लिहून दिले. सदर साठेखत करारनाम्यानुसार रक्कम रु.5,00,000/- ही उर्वरीत मोबदल्याची रक्कम तक्रारदार यांनी जाबदार यांना एका महिन्याचे आत देण्याची होती व गाळयाचे खरेदीपत्र करुन घेण्याचे होते. सदरची रक्कम देवून खरेदीपत्र करणेस तक्रारदार यांची नेहमीच तयारी होती व आहे. समजुतीचा करारानामा व सदरचे साठेखत करारनामा यातील अटी व शर्तीनुसार यदाकदाचित व्यवहार तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाला तर किंवा एका महिन्याच्या आत वैयक्तिक अडचणीमुळे खरेदीपत्र झाले नाही तर विसारापोटी घेतलेली रक्कम रु. 25,00,000/- परत देण्याची जबाबदारी जाबदार यांनी स्वीकारली होती. तथापि जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून उर्वरीत रक्कम स्वीकारुन देखील खरेदीपत्र करुन दिलेले नाही व अन्य लोकांकडे दुकान गाळयांबाबत संपर्क करणेचा प्रयत्न केल्यामुळे तक्रारदार यांनी जाहीर नोटीस देवून वर नमूद दुकानगाळयाबाबत व्यवहार जाबदार यांचेबरोबर कोणीही करु नये असे प्रसिध्द केले. तथापि तदनंतर तक्रारदार यांनी ठेवलेल्या भाडेकरुस जाबदार यांनी त्रास देणेस सुरुवात केली. म्हणून तक्रारदार यांनी दि. 30/12/2022 रोजी शाहुपूरी पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तदनंतर जाबदार यांनी अन्य व्यक्तीशी संधान बांधून तक्रारदार यांना देऊ केलेल्या गाळयाचा व्यवहार अन्य दुस-या व्यक्तीबरोबर करण्याची कार्यवाही सुरु केली. म्हणून तक्रारदार यांनी समजुतीच्या करारानाम्यानुसार व साठेखतानुसार तक्रारदार यांनी देऊ केलेली विसारादाखलची रक्कम परत देवून व्यवहार संपवावा अशी विनंती जाबदार यांना केली असता त्यांनी तसे करण्यास नकार दिला. जाबदार यांनी ठरले कराराप्रमाणे एका महिन्याचे आत व्यवहार पूर्ण केलेला नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना देवू केलेल्या गाळयांवर कर्ज घेतले असून त्याचा बोजा सदर गाळयांवर ठेवलेला आहे. सदरचे इमारतीमधील बांधलेले दुकान गाळे हे देखील बेकायदेशीर बांधलेले असून त्याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नाही. उपलब्ध असलेल्या एफएसआय याचेशिवाय जादा एफएसआय वापरुन बेकायदेशीर दुकान गाळे काढलेले आहेत. निर्मल सुदाम हाईट्स ही इमारत ज्या जागेवर उभी आहे ती जिल्हा परिषद कॉलनीतील मिळकत सि.स.नं. 383/ब यामधील प्लॉट नं.88 ही मिळकत सध्या सातारा नगरपालिकेच्या हद्दीत हद्दवाढीमध्ये गेलेली असून आता प्लॅन मंजूर होत नाही याबाबतही तक्रारदारांना समजून आले आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी सेवा देणेत त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून जी-1 या दुकान गाळयाचे विसारापोटी दिलेली रक्कम रु.25,00,000/- परत मिळावी, सदर रक्कम मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांना गाळयाचा कब्जा देणेचा आदेश व्हावा, सदर तक्रारीचा निकाल होईतोपर्यंत सदरचे गाळयाचे हस्तांतरण त्रयस्थ इसमास करु नये, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रु.1,00,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या समजुतीच्या करारनाम्याची प्रत, तसेच साठेखत करारानाम्याची प्रत, तक्रारदाराचे मुखत्यार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या समजुतीच्या करारनाम्याची प्रत, कुलमुखत्यारपत्राची प्रत, तक्रारदार यांनी जाबदार यांचेविरुध्द दाखल केलेल्या अदखलपात्र गुन्हयाची नक्कल, तक्रारदारांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस जाबदार यांना मिळूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचा युक्तिवाद यांचे अवलोकन करुन खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदारने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून रक्कम रु.25,00,000/- परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार यांचे कथनानुसार, जाबदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी मौजे करंजे तर्फ सातारा येथील सि.स.नं.383/ब, प्लॉट नं.88 या मिळकतीवर निर्मल सुदाम हाईट्स नावाची इमारत उभी केली आहे. सदर इमारतीतील दुकान गाळा क्र. एलजी-1 व जी-1 व जी-3 हे तीन दुकान गाळे खरेदी करण्याबाबत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये चर्चा झाली. सदर गाळयांची एकूण किंमत रु.81,00,000/- इतकी ठरली. जाबदार यांनी तक्रारदार यांना देवू केलेल्या एलजी-1 व जी-1 या दुकान गाळयांचे व्यवहार एकंदरीत रक्कम रु.25,00,000/- देवून पूर्ण करण्याचे ठरले व दुकान गाळा क्र. जी-3 या गाळयाची रक्कम रु.26,00,000/- पैकी रक्कम रु.6,00,000/- एवढी रक्कम नोंदणीकृत साठेखत करतेवेळी द्यायची व उर्वरीत रक्कम रु.20,00,000/- ही तदनंतर 18 महिन्यांचे आत देवून व्यवहार पूर्ण करायचा असे उभयतांमध्ये ठरले. दुकान गाळा खरेदी करण्यास कोणतीही अडचण आल्यास अॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम परत करुन व्यवहार संपुष्टात आणावयाचा असेदेखील उभयतांमध्ये ठरले. त्याप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.25,00,000/- एवढी रक्कम चेकद्वारे स्वीकारली व दि. 25/8/2021 रोजी उभयतांमध्ये परस्पर समजुतीचा करारनामा झाला. सदर करारनाम्यानुसार जाबदार यांनी तक्रारदार यांना तिनही गाळयांचा कब्जा दिला. तदनंतर दि. 31/08/2021 रोजी दुकान गाळा नं. जी-1 या गाळयाचे नोटरी साठेखत जाबदार यांनी तक्रारदार यांना लिहून दिले. सदर साठेखत करारनाम्यानुसार रक्कम रु.5,00,000/- ही उर्वरीत मोबदल्याची रक्कम तक्रारदार यांनी जाबदार यांना एका महिन्याचे आत देण्याची होती व गाळयाचे खरेदीपत्र करुन घेण्याचे होते असे तक्रारदाराचे कथन आहे. सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी उभय पक्षांमध्ये झालेला समजुतीचा करारनामा व साठेखत दाखल केले आहे. सदर साठेखतामध्ये तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.25,00,000/- अदा केलेबाबत व ती रक्कम जाबदार यांना मिळालेबाबत नमूद आहे. जाबदार यांनी याकामी सदरची बाब हजर होवून नाकारलेली नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, वर नमूद साठेखत करारनाम्यानुसार रक्कम रु.5,00,000/- ही उर्वरीत मोबदल्याची रक्कम तक्रारदार यांनी जाबदार यांना एका महिन्याचे आत देण्याची होती व गाळयाचे खरेदीपत्र करुन घेण्याचे होते. सदरची रक्कम देवून खरेदीपत्र करणेस तक्रारदार यांची नेहमीच तयारी होती व आहे. समजुतीचा करारानामा व सदरचे साठेखत करारनामा यातील अटी व शर्तीनुसार यदाकदाचित व्यवहार तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाला तर किंवा एका महिन्याच्या आत वैयक्तिक अडचणीमुळे खरेदीपत्र झाले नाही तर विसारापोटी घेतलेली रक्कम रु. 25,00,000/- परत देण्याची जबाबदारी जाबदार यांनी स्वीकारली होती. तथापि जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून उर्वरीत रक्कम स्वीकारुन देखील खरेदीपत्र करुन दिलेले नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. याकामी तक्रारदारांनी दाखल केलेल्या साठेखताचे अवलोकन केले असता त्यातील अट क्र.4 मध्ये जर व्यवहार रद्द झाला तर जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.25,00,000/- तात्काळ परत करण्याची आहे असे नमूद आहे. परंतु तक्रारदाराचे कथनानुसार जाबदार यांनी सदरची रक्कम परत केलेली नाही. तक्रारदारांनी याकामी जाबदार यांना वकीलामार्फत नोटीस पाठवूनही जाबदार यांनी रक्कम परत केलेली नाही. सदर नोटीसची प्रत तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहे. तक्रारदाराची सदरची कथने जाबदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाही. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी आपले तक्रारअर्जातील कथनांचे शाबीतीसाठी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराचे शपथेवरील कथनांचा विचार करता तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, जाबदार यांनी तक्रारदार यांना दुकान गाळयाचे खरेदीपोटी विसार म्हणून अदा केलेली रक्कम रु.25,00,000/- परत न करुन तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
मुद्दा क्र.3
8. तक्रारदाराने याकामी दि.13/7/2023 चे कागदयादीसोबत अ.क्र.2 ला तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या साठेखत करारनाम्याची प्रत दाखल केली आहे. सदर साठेखताचे अट क्र.2 चे अवलोकन करता तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.25,00,000/- दि. 31/08/2021 रोजी बॅंक ऑफ इंडिया शाखा सातारा यांचे चेक क्र. 023927 द्वारे अदा केले व ते जाबदार यांना मिळाले असलेचे नमूद केले आहे. यावरुन तक्रारदार यांना रक्कम मिळाल्याची बाब शाबीत होते. सदरची बाब विचारात घेता तक्रारदार हे सदरची रक्कम रु.25,00,000/- जाबदार यांचेकडून परत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदारांनी तक्रारदारास सदोष सेवा दिल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदारास रक्कम रु.25,00,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.