::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री. अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा जांब ता. अहमदपुर जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून स्वत:चा व कुटूंबाच्या उपजिवीकेसाठी शेती व्यवसाय करतो. तक्रारदाराच्या नावे गट क्र. 45, 50, 58, व 92 अशा 4 गटामध्ये एकुण 1 हे 97 आर जमीन आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन बियाणे MAUS 71 या जातीचे लॉट नं. 1897 च्या 5 बॅगा सामनेवाला क्र. 1 यांच्याकडून दि. 21.06.2011 रोजी पावती क्र. 55 अन्वये खरेदी केली.
तक्रारदाराने दि. 07.07.2011 रोजी खरेदी केलेले सोयाबीन 5 बॅग व सोबत 5 बॅग डीएपी, खतासह पेरणी केली.
दि. 13.07.2011 रोजी तक्रारदाराने गटविकास अधिकारी, पंचायत समिती अहमदपुर यांना रितसर अर्ज देवुन सोयाबीन न उगवल्या बाबत पाहणी पंचनामा करुन मिळण्याची विनंती केली. दि. 14.07.2011 रोजी गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती अहमदपुर व सामनेवाला क्र. 1 यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आला. सदर अहवाल तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल केला आहे असे म्हटले आहे.तक्रारदाराचे झालेल्या नुकसानी पोटी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने पेरणीपुर्व मशागतीचा खर्च रु. 10,000/- बियाणे खरेदीची रक्कम रु. 4530/- डीएपी खताची रक्कम रु. 3500/- असे एकुण रु. 18,030/- एकुण 5 बॅगचे उत्पन्न प्रती बॅग 15 क्विंटल याप्रमाणे 75 क्विंटलचे रु. 2,25,000/- असे एकुण रु. 2,43,030/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- तसेच तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 11 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 06.12.2012 रोजी दाखल झाले असून, तक्रारदाराने सोयाबीन बियाणाच्या 5 पिशव्या घेतल्याचे मान्य केले असून, तक्रारदाराने सोयाबीन बियाणे हे 1 इंच ते 1.25 इंच इतक्याच खोलीवर पेरायचे असते, असे असतांना 5/6 सें.मी. म्हणजे 2 इंच पेक्षा जास्त खोलीवर पेरणी केली आहे. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने लातूर जिल्हा कमी पाऊस पडल्या कारणाने दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला असे म्हटले आहे. ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 13(1)(सी) नुसार बियाणाची अधिकृत प्रयोगशाळेतुन तपासणी करुन अहवाल आणणे आवश्यक असतांना असे कोणतेही कृत्य तक्रारदाराने केलेले नाही. व केवळ खोटी तक्रार करुन पैसे काढण्याच्या उद्देशाने सदर तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराने दि. 07.07.2011 रोजी पेरणी केली असून, दि. 13.07.2011 रोजी पंचायत समिती कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. बियाणे पेरणी नंतर उगवण कालावधी 7 ते 8 दिवसाचा असतो, ते तक्रारदाराने 8 दिवसाच्या आतच तक्रार केली आहे. तक्रारदाराने सदोष सोयाबीन बियाणामुळे रु. 2,43,030/- चे नुकसान झाले आहे असे म्हटले आहे. या बाबत कोणताही उत्पन्नाबाबतचा पुरावा दाखल न करता, खोटी तक्रार पैसे मिळवण्याच्या उद्देशाने दाखल केल्या कारणाने तक्रारदाराची तक्रार रु. 5000/- खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 1 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्रा शिवाय अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही.
सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे लेखी म्हणणे दि. 13.09.2013 रोजी या न्यायमंचात दाखल झाले असून, तक्रारदाराची संपुर्ण तक्रार पुराव्या निशी सिध्द करावी असे म्हटले आहे. तालुका तक्रार समिती यांनी केलेला पंचनामा हा अयोग्य असून तो शासनाची ठरवुन दिलेल्या परिपत्रकानुसार नसल्यामुळे तो चुकीचा व बनावट असल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण संरक्षण कायदयाच्या कलम 13(1)(सी) नुसार प्रयोग शाळेतील तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक होते, ते त्यांनी दाखल केलेले नाही. त्याचप्रमाणे सोयाबीन बियाणे हे 2.5 ते 3 से.मी. एवढया खोलीवर पेरणे आवश्यक असतांना तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्या नुसार 5/6 से.मी. पेक्षा जास्त खोल पेरणी केली असे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही खोटी असून पैसे काढण्याच्या उद्देशाने केली असल्यामुळे रु. 5000/- खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 3 कागदपत्रे दाखल केले आहेत. त्यात तालुका कृषी अधिका-याचा अहवाल, बियाणे कंपनीचा मुक्तता अहवाल व शासकीय समितीचा शासनाचे परिपत्रक दाखल केले आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार सोबतची कागदपत्रे सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सामनेवाला क्र. 2 यांनी दि. 16.10.2014 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद , तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 27.03.2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद या सर्वांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांनी उत्पादीत केलेले सोयाबीन बियाणे MAUS 71 या जातीचे लॉट क्र. 1897 हे सामनेवाला क्र. 1 यांच्याकडून खरेदी केले आहे. हे सामनेवाला यांना मान्य असल्या कारणाने तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दि. 21.04.2012 रोजी जा.क्र. महाबीज/लातुर/2012/986 नुसार शेतक-याने स्वत:ची ओळखपत्राची प्रत, बिलाची मुळ प्रत, पिशवी किंवा लेबल लॉट नंबर दाखवुन सोसाबीन बियाणाची किंमतीचा धनादेश कार्यालयातून घेवुन जाण्याचे पत्र तक्रारदारास दिले. दि. 14.07.2011 रोजी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती अहमदपुर, व सामनेवाला क्र. 1 यांच्या उपस्थितीत केलेली पाहणी, तपासणी अहवाल सादर केला असून, त्यात 18.52 टक्के बियाणे उगवण झाल्याचे म्हटले आहे. तालुका कृषी अधिकारी अहमदपुर यांनी दि. 08.11.2011 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात तक्रारदारास रक्कम रु. 4530/ , बियाणे उगवण शक्तीत दोष आढळल्याकारणाने कंपनी देण्यास तयार असल्याचे पत्र तक्रारदारास दिले आहे.
तक्रारदाराचे खरीप हंगामातील सोयाबीन बियाणाचे उत्पन्न न मिळाल्याचे सामनेवाला क्र.2 यांनी दि. 21.04.2012 च्या पत्रानुसार मान्य केले आहे. या पत्रावर सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी कोणतीही हरकत नोंदवली नाही. म्हणुन तक्रारदारास सदोष बियाणे देवुन अनुचित व्यापारी प्रथा केली असल्याचे दिसून येते. म्हणुन तक्रारदारास बियाणाची रक्कम रु. 4530/- , डीएपी खताच्या 5 पोत्याची रक्कम रु. 3500/- पेरणीपुर्व व पेरणी नंतर शेतजमीन मशागतीचे अंदाजे रक्कम रु.5000/- शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर.
- सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास सदोष बियाणे विक्री केल्यामुळे रक्कमरु. 13,030/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.