जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 483/2010. तक्रार दाखल दिनांक : 11/08/2010. तक्रार आदेश दिनांक : 08/04/2011. श्री. नवनाथ नारायण पाटील, वय 43 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. अंबी, ता. भूम, जि. उस्मानाबाद. तक्रारदार विरुध्द श्री. महेंद्र पुनमिया, प्रोप्रा. कपुरबा इलेक्ट्रॉनिक्स, सोमवार पेठ, बार्शी – 413411, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एम.व्ही. जाधव विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : यु.डी. फरतडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.8/11/2004 रोजी सॅनसुई कंपनीचा 20-11 डी.पी. दूरदर्शन संच क्र.एस.आर.1140804526 रक्कम रु.8,990/- किंमतीस खरेदी केला आहे. माहे नोव्हेंबर 2009 मध्ये दूरदर्शन संच व्यवस्थित चालत नसल्यामुळे त्याबाबत विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रार केली. विरुध्द पक्ष यांनी सॅनसुई कंपनीचे मेकॅनिक श्री. नाकाडे यांना तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाची दुरुस्तीसाठी करण्यासाठी पाठविले आणि त्यांनी दूरदर्शन संचाची पिक्चर टयूब गेल्याचे सांगितले. पिक्चर टयूब दुरुस्त करुन देण्यास विरुध्द पक्ष यांना विनंती केली असता तक्रारदार यांची तक्रार निकाली काढल्याचे सांगून दूरदर्शन संचाची दुरुस्ती करण्याचे नाकारले आहे. विरुध्द पक्ष यांनी पिक्चर टयूबची 7 वर्षाची वॉरंटी दिलेली असल्यामुळे दूरदर्शन संच दुरुस्त करुन देणे विरुध्द पक्ष यांच्यावर बंधनकारक आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे दूरदर्शन संचाची पिक्चर टयूब नवीन बसून दुरुस्ती करुन देण्याचा आणि त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार खर्चापोटी रु.500/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी सॅनसुई कंपनीला आवश्यक पार्टी न केल्यामुळे तक्रारीस बाधा येते. तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाला दिलेली 7 वर्षाची वॉरंटी अटीस अधीन राहून आहे. तक्रारदारांनी संच घरी उघडल्यास, इतर ठिकाणी दुरुस्ती केल्यास, नैसर्गिक विजेमुळे व व्हाल्टेज कमी-अधिक झाल्यास वॉरंटी लागू नाही. तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाची टयूब कमी-अधिक व्होल्टेजमुळे गेलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी संच इतर ठिकाणी उघडून अटीचा भंग केला आहे. तक्रारदार यांना ते पिक्चर टयूब बदलून देण्यास तयार असतानाही त्यास नकार देऊन नवीन संचाची मागणी केलेली आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रारदार हे दूरदर्शन संचाची पिक्चर टयूब बदलून मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.8/11/2004 रोजी सॅनसुई कंपनीचा 20 डी.पी. दूरदर्शन संच सिरियल नं.1140804526 हा रक्कम रु.8,990/- किंमतीस खरेदी केल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाच्या पिक्चर टयूबला 7 वर्षाची वॉरंटी दिल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाची पिक्चर टयूब वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झाल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, दूरदर्शन संचाची पिक्चर टयूब खराब झाल्यानंतर पिक्चर टयूब दुरुस्त करुन देण्यास विरुध्द पक्ष यांना विनंती करुनही तो दुरुस्त केला नसल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. उलटपक्षी, तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाची टयूब कमी-अधिक व्होल्टेजमुळे गेलेली आहे आणि त्यांनी संच इतर ठिकाणी उघडून अटीचा भंग केला आहे. तसेच तक्रारदार यांना ते पिक्चर टयूब बदलून देण्यास तयार असतानाही त्यास नकार देऊन नवीन संचाची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 6. निर्विवादपणे, दूरदर्शन संचाची पिक्चर टयूब बदलून मिळावी, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. विरुध्द पक्ष यांनी पिक्चर टयूब बदलून देण्यास तयार असतानाही नवीन दूरदर्शन संचाची मागणी करुन पिक्चर टयूब बसवून घेण्यास नकार दिल्याचे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, विरुध्द पक्ष यांनी पिक्चर टयूब बदलून देण्यास नकार दिला काय ? किंवा कसे ? आणि तक्रारदार यांनी पिक्चर टयूब बसवून घेण्यास नकार दिला ? किंवा कसे ? याविषयी दोन्ही पक्षांनी कोणताही पुरावा सादर केला नाही. निर्विवादपणे, तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचाच्या पिक्चर टयूबला सॅनसुई कंपनीने वॉरंटी दिलेली आहे. दूरदर्शन संचाच्या पिक्चर टयूबमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करणे मुख्यत: सॅनसुई कंपनीची जबाबदारी आहे. तक्रारदार यांनी सॅनसुई कंपनीला आवश्यक पक्षकार केलेले नाही. असे असले तरी, तक्रारदार यांना विरुध्द पक्ष हे नावलौकीक व पतप्रतिष्ठा राखण्यासाठी पिक्चर टयूब बदलून देण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आमच्या मते, तक्रारदार यांची पिक्चर टयूब बदलून देण्यास विरुध्द पक्ष तयार असल्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीचे निश्चितच निराकरण होणार आहे. सबब, तक्रारदार यांची पिक्चर टयूब विरुध्द पक्ष यांनी बदलून द्यावी, या मतास आम्ही आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत तक्रारदार यांच्या दूरदर्शन संचास नवीन पिक्चर टयूब बसवून द्यावी. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/7411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |