श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 25/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 1 चे अभिकर्ता असून गैरअर्जदार क्र. 1 च्या योजनेबद्दल त्यांनी आकर्षक माहिती सांगून तक्रारकर्त्यांना त्या योजनेत समाविष्ट होण्यास बाध्य केले आणि विविध ठिकाणी हॉलिडे रीसॉर्टमध्ये पर्यटनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून त्यांचेजवळून ‘व्हाईट स्टुडियो’ या योजनेसाठी एकूण रक्कम रु.1,64,431/- वेळोवेळी घेतले व प्रत्यक्षात तक्रारकर्तीने व तिच्या पतीने या योजनेचा कोणताही फायदा मिळाला नाही. उलट जेव्हा ते पर्यटनाकरीता गेले तेव्हा त्यादिवशी त्यांचेजवळून रु.31,600/- इतकी रक्कम गोल्डन हॉलीडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी वसुल केले. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून ई.सी.एस.द्वारे मान्य रकमेपेक्षा वेळोवेळी जास्तीची रक्कम काढून घेतली आणि तक्रारकर्त्यासोबत अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन व त्रुटीपूर्ण सेवा देऊन तक्रारकर्त्याचे नुकसान केले. म्हणून तक्रारकर्त्यांनी ही तक्रार दाखल करुन रु.1,64,431/- व रु.31,600/- रक्कम 18 टक्के व्याजासह परत मिळावी, तसेच ई.सी.एस.द्वारे खात्यातून काढलेले रु.1,02,018/- परत मिळावे, रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी, मानसिक त्रासाबदद्दल रु.1,00,000/- मिळावे, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आली होती. गैरअर्जदार हजर झाले, मात्र त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचे उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश दि.10.06.2011 रोजी पारित केला व प्रकरण युक्तीवादाकरीता ठेवण्यात आले. युक्तीवादाचेवेळी गैरअर्जदारातर्फे कोणीही हजर नव्हते. तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच सदर प्रकरणात दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
3. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढण्याचे दृष्टीने कोणताही बचाव सादर केला नाही आणि कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. तक्रारकर्त्याने त्याची तक्रार दस्तऐवजासह, प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यांप्रमाणे रु.38,800/-, रु.14,715/- आणि रु.71,200/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी स्विकारलेले आहेत. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याचे ई.सी.एस.द्वारे गैरअर्जदाराने रु.1,02,018/- काढून घेतले असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. अशी एकूण रक्कम रु.2,66,449/- (रु.1,02,018/- + रु.1,64,431/- )
तक्रारकर्त्याजवळून गैरअर्जदाराने घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त रु.31,600/- चे बिल भरावे लागले. जे की, तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने विनामुल्य सेवा देण्याच्या संदर्भात घेतलेले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता तक्रारकर्ता हा एकूण रु.2,98,049/- (रु.1,02,018/- + रु.1,64,431/- + रु.31,600/- ) मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदाराने वरील प्रकारे अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे हे उघड आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) दोन्ही गैरअर्जदारांनी एकलरीत्या व संयुक्तरीत्या, तक्रारकर्त्याला रु.2,98,049/- (रु.1,02,018/- + रु.1,64,431/- + रु.31,600/-) ही रक्कम द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह, रक्कम स्विकारल्याच्या तारखांपासून, तर प्रत्यक्ष अदाएगीपावेतो द्यावी.
3) मानसिक त्रासापोटी दोन्ही गैरअर्जदारांनी एकलरीत्या व संयुक्तरीत्या, तक्रारकर्त्याला रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्यापासून, दोन्ही गैरअर्जदारांनी एकलरीत्या व संयुक्तरीत्या, एक महिन्याच्या आत करावी, न पेक्षा द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाऐवजी 18 टक्के व्याज देय राहील.