जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.146/2008. प्रकरण दाखल दिनांक – 10/04/2008. प्रकरण निकाल दिनांक – 09/06/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.विक्रांतकुमार पि.राधाकीशन जैस्वाल, अर्जदार. वय वर्षे 32, धंदा निल, रा.विष्णुनगर, नांदेड. विरुध्द. 1. महाव्यवस्थापक, गैरअर्जदार. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, नांदेड. 2. व्यवस्थापक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शिवाजी पुतळया समोर, मुख्य शाखा,नांदेड अर्जदारा तर्फे. - अड.जी.व्ही.मठपती. गैरअर्जदार क्र. 1 व 2 - अड.एस.डी.भोसले. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार यांनी त्यांचे बचत खाते क्र.14790 मध्ये एकुण रु.1,62,165/- जमा केले होते. अर्जदार हा आपल्या दुकानातुन आपला उदरनिर्वाह करीत आहे आणि सदरील दुकान बंद पडले आहे आणि त्यां दुकानावरच अर्जदाराचे उत्पन्न अवलंबुन होते. अर्जदाराच्या खात्यावर जमा असलेली रक्कम रु.1,62,165/- गैरअर्जदाराकडे मागणी केली असता त्यांनी देण्यास नकार दिला तसे करुन त्यांनी सेवेत कमतरता केली म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, त्यांच्या बचत खात्यावर जमा असलेली रक्कम रु.1,62,165/- आणि शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- गैरअर्जदार यांच्याकडुन मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायद कलम 2 (डी) II प्रमाणे ग्राहक ठरत नाहीत. गैरअर्जदार बॅकेवर आर.बी.आय.ने कलम 35 ए लागु करुन रु.1,000/- पेक्षा जास्त रक्कम त्यांच्या परवानगी शिवाय देऊ नये आणि सदरील रक्कम ही आर.बी.आय.च्या परवानगी शिवाय देऊ शकत नाही. अर्जदार यांनी हार्डशिप ग्राऊंडवर रक्कम मिळण्यासाठी अर्ज केल्यास ते आर.बी.आय.कडे मंजुरीसाठी पाठविण्यास तयार आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदार यांचा अर्ज खर्चासह नामंजुर करावा. अर्जदार यांनी आपल्या अर्जासोबत शपथपत्र,लेखीयुक्तीवाद, सेव्हींग पासबुक,प्रमाणपत्र, दि.28/03/2008 चे पत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत शपथपत्र दाखल केलेले आहे त्यांनी कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. अर्जदार यांचे वकील जी.व्ही.मठपती यांनी युक्तीवाद केला. युक्तीवादाच्या वेळी गैरअर्जदार व त्यांचे वकील गैरहजर. 1. अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत काय ? होय 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सेवा देण्यात कमतरता केली आहे काय ? नाही. 3. अंतिम आदेश ? मुद्या क्र. 1– अर्जदार गैरअर्जदार बँकेत त्यांचे असलेले सेव्हींग पासबुकचे अवलोकन केले असता अर्जदाराचे गैरअर्जदार या बँकेमध्ये रक्कम रु.1,62,165/- पासबुकावर नोंद आहे हे स्पष्ट होते याचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 – गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराची रक्कम गैरअर्जदाराकडे असल्याचे मान्य केलेले आहे. अर्जदार यांना हार्डशिप ग्राऊंडवर सदरील प्रकरण भारतीय रिझर्व बँकेकडे पाठवून सदरील बँकेची परवानगी घेऊन नंतर सदरची रक्कम घेता येईल कारण भारतीय रिझर्व बँकेने नाबार्डच्या साहयाने तपासणी करुन कलम 35 ए लागु केल्यामुळे अर्जदारास रक्कम रु.1,000/- पेक्षा जास्त रक्कम भारतीय रिझर्व बँकेच्या परवानगी शिवाय कोणासही देण्याची परवानगी दिलेली नाही म्हणुन गैरअर्जदार हे भारतीय रिझर्व बॅंकेच्या परवानगी शिवाय रक्कम देऊ शकत नाही असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र शपथपत्र लेखी यूक्तीवाद यांचा विचार करता अर्जदाराचे रु.1,62,165/- इतकी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे गुंतुन राहीलेली आहे व गैरअर्जदार हे सदरची रक्कम भारतीय रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे अर्जदार यांना देवू शकत नाही याचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देणेत कमतरता केली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे सदर निकालपत्राचे अवलोकन केले असता, अर्जदार हे काही ठराविक परिस्थितीमध्ये रु.1,00,000/- किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम बॅकेमधुन काढुन घेऊ शकतात अगर मागु शकतात असे म्हटलेले आहे. सदर तक्रारी मध्ये अर्जदाराचे उदरनिर्वाहाचे साधन असणारे दुकान बंद पडल्यामुळे अर्जदारांच्या कुटूंबाची उपासमार होत असल्याचे स्पष्ट होते कारण सदरील दुकानावरच अर्जदाराचे संपुर्ण कुटूंब अवलंबुन आहे असे म्हटलेले आहे, ही बाब स्पष्ट होते या सर्वांचा विचार होता व अर्जदाराने दाखल केलेल्या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी सदर निकाल लागल्या पासुन एक अठवडयाच्या आंत हार्डशिप ग्राऊंडवर रक्कम मागणीचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार यांच्याकडे पाठवावा. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराचा अर्ज व कागदपत्रांसह मंजुरीसाठी रिझर्व बँकेकडे त्वरीत पाठवून मंजुरी घ्यावी व मंजुरीप्रमाणे सदरची रक्कम अर्जदार यांना अदा करावेत. मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल व दावा खर्चाबद्यल आदेश नाही. 4. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघुलेखक. |