(घोषित दि. 10.07.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारी नुसार त्यांनी घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतली होती व दरमहा त्यांना सरासरी 1,000/- ते 1,500/- रुपये वीज बिल येत होते. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यानंतर त्यांच्या वीज मीटर मध्ये तांत्रिक बिघाड झाला व त्यांना जास्त रकमेचे विद्युत देयके येण्यास सुरुवात झाली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना दिनांक 03.11.2012 रोजी मीटर बदलून दिले. नवीन मीटर बसविल्यानंतरही ते मीटर जास्त वापराची नोंद दाखवू लागले व अर्जदारास दिनांक 01.12.2012 रोजी 86,030/- रुपयाचे वीज बिल आकारण्यात आले. अर्जदाराने या संबंधी दिनांक 14.12.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु गैरअर्जदार यांनी त्याची दखल घेतली नाही. वारंवार तक्रार करुनही गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन योग्य वीज बिल देण्याची व चुकीचे वीज बिल रद्द करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांना दिलेले अर्ज, वीज बिलाच्या प्रती, वीज बिल भरणा केल्याच्या पावत्या जोडल्या आहेत.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज पुरवठा खंडित करु नये यासाठी अंतरिम आदेश देण्यासाठी अंतरिम अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी होऊन अर्जदाराने थकबाकी पोटी 25,000/- रुपये भरावे व गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा खंडित करु नये असा अंतरिम आदेश देण्यात आला.
गैरअर्जदार यांनी लेखी जवाब दाखल केला असून त्यांच्या जवाबानुसार अर्जदारास त्याने वापर केलेल्या युनिट इतकेच विद्युत देयक देण्यात आले आहे. मीटर रिडींग उपलब्ध नसताना त्यांना सरासरीवर आधारित वीज बिल देण्यात आले व हे लॉक क्रेडीटचे बिल फेब्रूवारी 2013 मध्ये कमी करुन देण्यात आले. त्यामुळे जुलै अखेर अर्जदाराकडून 77074.50 रुपये येणे बाकी आहे. अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी नसून वीज बिल भरणे टाळण्याच्या हेतूने अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबा सोबत तक्रारदारांचे सी.पी.एल दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी मंचास असे दिसून येते की,
अर्जदाराने दिनांक 14.01.2000 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 510030330003 असा असून मीटर क्रमांक 76/13129128 असा आहे.
अर्जदाराच्या सी.पी.एल चे निरीक्षण केले असता त्यांना जून 2012 पर्यंत नियमितपणे व योग्य वीज बिल येत होते व अर्जदार त्याचा भरणा देखील करीत होते.
ऑगस्ट 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 127249) बदलून त्या जागी नवीन मीटर (क्रमांक 522858) बसविले. या वीज मीटर वरील नोंदी खालील प्रमाणे असल्याचे दिसून येते.
ऑगस्ट 2012 | 709 |
सप्टेबर 2012 | 3385 |
ऑक्टोबर 2012 | 2543 |
नोव्हेंबर 2012 | 1187 |
डिसेंबर 2012 | 1187 |
जानेवारी 2013 | 1187 |
वरील निरीक्षणावरुन अर्जदारास जुलै 2012 पर्यंत देण्यात आलेली वीज बिले योग्य असल्याचे दिसून येते. ऑगस्ट 2012 ते जानेवारी 2013 या कालावधीत देण्यात आलेली वीज बिले (मीटर क्रमांक 127249) हे अर्जदाराच्या सरासरी वीज वापरापेक्षा खूप जास्त असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी या मीटरचा चाचणी अहवाल मंचात दाखल केला आहे पण ते मीटर ग्राहका समोर चाचणी करण्यात आलेले नसल्यामुळे तसेच त्यावर ग्राहकाची स्वाक्षरी नसल्यामुळे तो चाचणी अहवाल मंच मान्य करीत नाही. त्यामुळे या कालावधीसाठी अर्जदारास त्याच्या वापराच्या सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी करणे योग्य ठरेल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
अर्जदाराचा जानेवारी 2012 ते जुलै 2012 या कालावधीचा सरासरी वीज वापर (136 + 180 + 193 + 436 + 165 + 185 + 475 = 1770 - 7) 252 युनिट प्रतिमाह असल्याचे दिसून येते. यावरुन जून 2012 मध्ये रिडींग न घेता सरासरीवर आधारीत 165 युनिटचे वीज बिल आकरण्यात आल्यानंतर जुलै 2012 मध्ये रिडींग नुसार 475 युनिट वीज वापराचे बिल आकारण्यात आले जे दोन महिन्याच्या कालावधीचे असून योग्य असल्याचे दिसून येते. जुलै 2012 मध्ये एकुण देयक रुपये 1778.26 असे आहे.
फेब्रूवारी 2013 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराने केलेल्या तक्रारीवरुन त्यांचे 127249 या क्रमांकाचे मीटर बदलून त्या जागी 582058 या क्रमांकाचे मीटर बसविले. या मीटर वरील नोंदी वरुन अर्जदारास पुढील कालावधीसाठी वीज बिले देण्यात आलेली आहेत. या कालावधीत दाखविण्यात आलेला वीज वापर योग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येत असून अर्जदारास ऑगस्ट 2012 नंतर दिलेली वीज बिले रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्ट 2012 ते जानेवारी 2013 या कालावधीसाठी 252 युनिट प्रतिमाह या प्रमाणे वीज बिल आकारणी करावी व त्या प्रमाणे 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- ऑगस्ट 2012 नंतर देण्यात आलेल्या वीज बिलात व्याज व दंड आकारु नये.
- वरील प्रमाणे सुधारीत वीज बिल देताना अर्जदाराने भरलेल्या रकमेची वजावट करावी.
- खर्चाबाबत आदेश नाही.