द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 20/10/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार लॉजिंगचा व्यवसाय करतात. यासाठी लागणारे वॉशिंग मशिन त्यांनी जाबदेणार क्र.1 यांच्याकडून खरेदी केले होते. तक्रारदार पाचगणी येथे रहात असून त्याठिकाणी वॉशिंग मशिन उपलब्ध नव्हते. दुकानदारांच्या सल्ल्यानुसार तक्रारदारांनी सात कि.ग्रॅ डिजिटल आय.एफ.बी मशिन धंदयासाठी योग्य म्हणून विकत घेतले. जाबदेणा-यांनी ते मशिन तक्रारदारांकडे बसवून दिले. काही दिवसातच मशिन चालतांना आपोआप बंद पडले. तासनतास रिस्टार्ट होत नाही. प्रोग्रॅम अर्धवट स्थितीतच राहिलेला असतो. मशिन बंद पडल्यावर इंडिकेटर तासनतास ब्लिंक होत रहाते. त्यामुळे मशिन कडे कायम लक्ष ठेऊन मॅन्युअल स्टार्ट बटन दाबणे व प्रोग्रॅम चालू करणे हे अपरिहार्य होते. त्यामुळे प्रोग्रॅमचा वेळ वाढतो. तक्रारदारांच्या लॉजमध्ये सकाळच्या गडबडीच्या वेळेऐवजी मशिन रात्री चालू करण्याची पध्दत आहे. मशिन आपोआप बंद झाल्याने कपडे अर्धवट धुतलेले/ओले असतात व त्यामुळे धंदयावर परिणाम होतो. अनेकवेळा जाबदेणा-यांना सांगूनही त्यांचा तंत्रज्ञ येऊन दुरुस्ती करुन गेला तरीही मशिन दुरुस्त झाले नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून नविन मशिन बदलून मागतात व मशिनच्या दोषामुळे झालेले आर्थिक नुकसान व मनस्तापापोटी भरपाई मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणारांनी लेखी जबाबाद्वारे तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणा-यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी मशिन व्यावसायिक कारणासाठी घेतलेली असल्यामुळे मंचासमोर चालू शकत नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीतच मशिन लॉजच्या कामासाठी खरेदी केली होती असे नमूद केलेले आहे. व्यावसायिक कामासाठी मशिन घेतलेली असल्यामुळे वॉरंटी लागू होत नाही. मशिन मध्ये कुठलाही दोष नाही. व्होल्टेज प्रॉब्लेममुळे, मशिनमधील अतिरिक्त लोड मुळे मशिन आपोआप बंद पडू शकते. व्होल्टेज प्रॉब्लेम असल्यामुळे स्टॅबिलायझर दिलेला आहे, ते अधिकचे डिव्हाईस असून त्याची रक्कम तक्रारदारांना दयावी लागते. वरील कारणांवरुन तक्रार अमान्य करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणारांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी स्वत:च्या तक्रारीतच ते लॉजिंगचा व्यवसाय चालवित असल्यामुळे त्यासाठी लागणारे वॉशिंग मशिन, धंदयाची सोय म्हणून विकत घेतलेले होते, लॉजमध्ये सकाळच्या गडबडीच्या वेळेऐवजी मशिन रात्री चालू करण्याची पध्दत आहे, मशिन आपोआप बंद झाल्याने कपडे अर्धवट धुतलेले / ओले असतात व त्यामुळे धंदयावर परिणाम होते असे नमूद केलेले आहे. यावरुन तक्रारदारांनी वॉशिंग मशिन व्यावसायिक कारणासाठी खरेदी केली होती हे सिध्द होते. ग्राहक संरक्षण कायदयानुसार व्यावसायिक कारणासाठी घेतलेल्या वस्तुमध्ये दोष निघाला तर तो ग्राहक होत नाही.
वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. :- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येते.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.