(घोषित दिनांक 13/01/2011 द्वारा – श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उत्पादित केलेले गोबीचे बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 13/10/2008 रोजी खरेदी केले. गोबीच्या बियाणाची योग्य रितीने लागवड करुन पिकास खत व पाणी दिले. गोबीच्या पीकाच्या गुंडया पूर्णपणे भरलेल्या नसल्यामुळे बियाणात दोष असल्याचे आढळले. म्हणून त्याने गट विकास अधिकारी, पंचायत समिती फुलंब्री यांचेकडे भेसळ बियाणाबाबत तक्रार दिली. त्यानंतर संबंधित अधिका-यांनी दिनांक 2/2/2009 रोजी त्याचे शेताची पाहणी करुन पंचनामा केला. तक्रारदाराचा तक्रार अर्ज लक्षात घेऊन गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दिनांक 9/3/2009 रोजीचा चौकशी समितीचा अहवाल व दिनांक 10/2/2009 कृषी विकास अधिकारी पंचायत समिती फुलंब्री यांचा अहवाल दिनांक 5/3/2009 याचा संदर्भ देत तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे त्याच लॉटचे असल्याने समितीचा अहवाल लागू होतो असे पत्र दिले. सदर गोबीचे बियाणात भेसळ असल्यामुळे त्यास उत्पन्न मिळाले नाही व त्याचे नुकसान झाले म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून भेसळ बियाणापोटी शारीरिक व आर्थिक व मानसिक त्रास व झालेले नुकसान रु 1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी एकत्रित लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराने गोबीचे बियाणे खरेदी केल्याचे मान्य केले आहे. तक्रारदाराने गट विकास अधिका-याकडे दिलेल्या तक्रार अर्जावर दिनांक नाही, तक्रारदाराने दिनांक 18/10/2008 रोजी बियाणे खरेदी केले व दिनांक 19/10/2008 रोजी लागवड केली. तक्रारदाराचे गोबीच्या पिकाचा दिनांक 2/2/2009 राजी पंचनामा केला त्यावेळेस पीक 4 महिन्याचे झालेले होते त्यामुळे तक्रारदाराने आलेले उत्पन्न विकून टाकून नंतर तक्रार दिल्याचे भासवले आहे. केवळ याच लॉट मधील बियाणाच्या इतर लोकांनी तक्रारी केल्या आहेत असे जाणवल्यामुळे तक्रारदाराने तक्रार अर्ज केला. दिनांक 10/2/2009 रोजीच्या अहवालात तक्रारदाराचे नावही नाही व पंचनाम्याचे विवरणही नाही. तक्रारदाराने दिनांक 13/10/2008 रोजी बियाणे खरेदी केल्यानंतर समाधानकारक पीक आल्यामुळे 3 महिन्यापर्यंत कुठलीही तक्रार केली नाही. परंतु आपल्याच गावातील लोकांनी गैरअर्जदार कंपनीकडून पैसे वसुल करण्यासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत व आपण तक्रार दाखल केली तर आपणालाही फायदा होईल या दुष्ट हेतूने तक्रारदाराने ही खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार दंडासहीत फेटाळण्यात यावी अशीही मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 गोल्डन सिड्स यांनी उत्पादीत केलेले गोबी बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 महावीर बीज भांडार यांचेकडून दिनांक 13/10/2008 रोजी खरेदी केले याबाबत वाद नाही. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्यांने सदर बियाणांची लागवड करुन पीकास योग्य खत व पाणी दिले परंतू गोबीचे पीकाच्या गुंडया भरलेल्या नाहीत असे आढळून आल्यामुळे त्याने गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे तक्रार अर्ज दिला. सदर तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता तक्रारदाराने कोणत्या तारखेस गट विकास अधिका-याकडे तक्रार दिली याचा उल्लेख नाही तसेच सदर तक्रार अर्ज पंचायत समितीस केंव्हा प्राप्त झाला याचाही उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारदाराने गट विकास अधिका-याकडे सदोष बियाणा संदर्भात तक्रार अर्ज दिला होता असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराने दाखल केलेला दिनांक 2/2/2009 रोजीचा पाहणी पंचनामा पाहिला असता त्यावर फक्त तक्रारदार व सुदाम तारु या दोघांच्याच सहया आहेत त्यामुळे हा पंचनामा ग्राहय धरता येणार नाही. सदर पंचनामा शासनाचे परिपत्राकाप्रमाणे जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या तज्ञ लोकांनी केलेला नाही. कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी तक्रारदारास दिनांक 9/3/2009 रोजी दिलेल्या पत्रात तक्रारदाराने खरेदी केलेले बियाणे हयाच लॉटचे असल्याने समितीचा सदर अहवाल लागू होतो असे नमूद केले आहे. परंतू कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी दिलेल्या दिनांक 29/1/2009 रोजीचे अहवालात तक्रारदाराचे नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे सदर अहवाल तक्रारदारास लागू होत नाही. या सर्व बाबी पाहिल्या असता तक्रारदारास गैरअर्जदारांनी विकलेले गोबीचे बियाणे सदोष होते त्यामुळे त्याचे नुकसान झाले हे सिध्द करण्यास तक्रारदार असमर्थ ठरला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार फेटाळण्यात येते. 2. दोन्ही पक्षांनी आपापला खर्च सोसावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |