जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 150/2012 तक्रार दाखल तारीख – 01/11/2012
निकाल तारीख - 20/03/2015
कालावधी - 02 वर्ष , 04 म. 19 दिवस.
श्रीमती शांताबाई गोविंदराव दिवेकर,
वय – 68 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. आनंदवाडी, ता. शिरुर अनंतपाळ,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) महाव्यवस्थापक,
रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
19 रिलायंस सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400 038.
2) व्यवस्थापक/अध्यक्ष,
कबाल इन्शुरन्स सर्व्हीस प्रा.लि.,
राज अपार्टमेंट, प्लॉट नं. 29 जी सेक्टर,
रिलायन्स फ्रेशच्या पाठीमागे
चिस्तीया पोलीस चौकी जवळ,
एम.जी.एम.रोड, सिडको टाऊन सेंटर,
औरंगाबाद – 431003.
3) तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, शिरुर अनंतपाळ,
जि. लातुर.
4) जिल्हा अधीक्षक,
कृषी अधिकारी, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. पटेल ए.एम.के.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड. एस.जी.दिवाण
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- स्वत:
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे आनंदवाडी ता. शिरुर अनंतपाळ जि. लातुर येथील रहिवाशी असून मयत बळवंत गोविंदराव दिवेकर यांची आई असून कायदेशीर वारस आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे विमा कंपनी असून तिने मयत बळवंत गोविंदराव दिवेकर यांचा विमा काढलेला आहे. मयत बळवंत गोविंदराव दिवेकर हे मौजे आनंदवाडी ता. शिरुर अनंतपाळ जि. लातुर येथील रहिवाशी असून, त्यांच्या नावे मौजे तुरुकवाडी येथे जमीन गट नं./सर्व्हे नं. 7/44/ब/1 मध्ये एकुण क्षेत्रफळ 1 एकर 35 गुंठे होती. तक्रारदाराचा मुलगा हा दि. 07/11/2008 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आनंदवाडी पाटीवर तक्रारदाराचा मुलगा शिरुर अनंतपाळ जाण्यासाठी व्यंकट कळगे यांच्या हॉटेल जवळ वाहनाची वाट पाहत थांबले असता, शिरुर अनंतपाळ बाजूकडुन मिनीडोअर अॅटो रिक्षाचालक त्याच्या ताब्यातील अॅटोरिक्षा वाहन निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात रोडच्या कडेला थांबलेल्या तक्रारदाराच्या मुलास जोराची धडक दिल्यामुळे, तक्रारदाराचा मुलगा अॅटोरिक्षाच्या धडकेने झाडावर जाऊन आदळल्यामुळे, जागीच मरण पावला. सदर अपघाती घटनेची नोंद क्र. 102/2008 पोलीस स्टेशन शिरुर अनंतपाळ येथे दि. 07/11/08 कलम 279, 304 (अ ) भा.दं.वि अन्वये करण्यात आलेली आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार यांच्याकडे सर्व त्रुटींची पुर्तता करुन प्रस्ताव दि. 06/04/2010 रोजी पाठविलेला आहे. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी अपघात झालेल्या तारखेपासुन 1,00,000/- 15 टक्के दाराने व तसेच शारीरीक व मानसिक 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 7,000/- देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारदाराने तक्रारीसोबत कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि. यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेले पत्र, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा यादी सन – 2008-2009, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना क्लेम फॉर्म, 7/12, धारण जमीनीची नोंदवही, फेरफार नक्कल, गाव नमुना सात, गाव नमुना सहा ‘क’, फेरफार नक्कल, वारसा प्रमाणपत्र, पहिली खबर, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 च्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा दावा अर्ज हा 90 दिवसानंतर आल्यामुळे व मुदती बाहेर असल्यामुळे तो फेटाळण्यात यावा. अर्जदारास कागदपत्र दाखल करण्यास 147 दिवसाचा उशिर झालेला आहे व तो उशिर ग्राहय धरता येणार नाही. म्हणून सदरच्या पॉलीसी अंतर्गत अर्जदाराचा अर्ज रु. 10,000/- ची कॉस्ट लावून फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा मृत्यू हा दि. 07/11/2008 रोजी झालेला आहे. व तक्रार अर्ज दि. 11/01/2010 रोजी मिळालेला आहे. पॉलीसीचा कालावधी हा दि. 15/08/2008 ते 14/08/2009 पर्यंत होता. व त्यानंतर 90 दिवस म्हणजेच दि.14/11/09 पर्यंत दाखल करावयास हवा होता. परंतु सदरचा प्रस्ताव दि. 11/01/2010 रोजी म्हणजेच 147 दिवसांचा विलंब झालेला असल्यामुळे, सदरचा प्रस्ताव हा दि. 24/11/2010 रोजी बंद करण्यात आलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 3 च्या म्हणण्यानुसार मयताचा मृत्यू दि 07/11/2008 रोजी झालेला आहे. विमा प्रस्ताव विमा कालावधी समाप्तीनंतर जास्तीत जास्त 90 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे. परंतु तक्रारदाराने शेतकरी जनता अपघात विम्याचा प्रस्ताव विलंबाने म्हणजेच दि. 31/12/2009 रोजी म्हणजेच घटना घडल्यानंतर जवळपास 13 महिन्यानी सादर केला आहे. म्हणून विमा कंपनीने दावा नामंजुर केलेला आहे असे म्हणणे दाखल केलेले आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे गैरअर्जदाराने मान्य केलेले आहे. व त्याचा पॉलीसी क्र. 1101382914100078 असा असून त्याचा पॉलीसी कालावधी दि. 15/08/2008 ते 14/08/2009 आहे. व मयताचा मृत्यू दि. 7/11/2008 रोजी झालेला असल्यामुळे, तो मृत्यू हा सदरच्या पॉलीसीच्या कालावधीतील आहे. अर्जदार हा गट क्र. 7/44/ब/1 मध्ये एकुण क्षेत्रफळ 1 एकर 35 गुंठे एवढी जमीन मौजे तुरुकवाडी येथे आहे; म्हणून तो अपघाताच्या वेळी शेतकरी होता व त्याचे वय 28 वर्षाचे होते.
मुददा क्र. 2 चे उत्तर होय असून तक्रारदाराने दिलेला प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे दि. 31/12/2009 रोजी दिलेला आहे. याचा अर्थ अर्जदाराने आपला प्रस्ताव 136 दिवस उशिरा दिलेला आहे. विमा कंपनीस 120 दिवसाचा उशिर त्यांना माफ करता येतो. सदर केसमध्ये झालेला उशिर केवळ त्यानंतर 16 दिवसाचा आहे. अर्जदार ही मयत बळवंत दिवेकर यांची आई आहे. ती एक अशिक्षीत स्त्री असल्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यास उशिर झाला असावा. हा उशिर तिच्या अडानीपणामुळे झालेला असल्यामुळे व तिचा 28 वर्षाचा मुलगा अपघाती मृत्यू झालेला असल्यामुळे सदरचा उशिर हे न्यायमंच माफ करत आहे. अर्जदाराचा मुलगा दि. 07/11/2008 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आनंदवाडीवर शिरुर अनंतपाळ जाण्यासाठी व्यंकट कळगे यांच्या हॉटेलजवळ वाहनाची वाट पाहत थांबले असता, शिरुर अनंतपाळ बाजूकडुन मिनीडोअर अॅटो रिक्षाचालक त्याच्या ताब्यातील अॅटोरिक्षा वाहन निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात रोडच्या कडेला थांबलेल्या तक्रारदाराच्या मुलास जोराची धडक दिल्यामुळे तक्रारदाराचा मुलगा अॅटोरिक्षाच्या धडकेने झाडावर जाऊन आदळल्यामुळे, जागीच मरण पावला. सदर अपघाती घटनेची नोंद क्र. 102/2008 पोलीस स्टेशन शिरुर अनंतपाळ येथे दि. 07/11/2008 कलम 279, 304 (अ) भा.दं.वि करण्यात आलेली आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज हे न्यायमंच मंजुर करत आहे. अर्जदारास रु. 1,00,000/- देण्यात यावेत. मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2,000/- मंजुर करत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 1,00,000/-
(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात
यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.