ग्राहक तक्रार क्र. : 275/2014
दाखल तारीख : 03/12/2014
निकाल तारीख : 15/10/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मदन पि. गोपाळराव बोंदर,
वय – 75 वर्ष, धंदा – शेती,
रा. देवधानोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. महावीर कृषि सेवा क्रेद्र,प ससयससव्यवस्थापक
शिवाजी चौक, कळंब ता. कळंब,
जि. उस्मानाबाद,
प्रो.प्रा. सुनिल हरकचंद कर्नावट.
2. वेस्टर्न अॅग्री सीडस लि.
802/11, वेस्टर्न हाऊस, वेस्टर्न रोड,
जी. आय.डी.सी. (ई. एन. जी. जी.)
इस्टेट सेक्टर क्र.28, गांधी नगर-382028,
(गुजरात, इंडिया) ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधिज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री.वाय.जी. सोन्नेपाटील.
विरुध्द पक्षकार क्र. 2 तर्फे विधिज्ञ : श्री. जी. बी. भालेराव.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) क्र2 ने उत्पादन केलेले विप क्र.1 वितरक कडून विकत घेतलेले तिळाचे बियाणे पेरले असता उगवले नाही व दोषपुर्ण माल देऊन विप यांनी नुकसान केले म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढील प्रमाणे आहे.
1. तक हा 75 वर्षाचा देवधानोरा ता.कळंब चा शेतकरी आहे. दि.18.2.2014 रोजी विप क्र.1 कडून विप क्र.2 ने उत्पादीत केलेले वेस्टर्न 11 या जातीचे तिळाचे बियाणे लॉट नंबर 035 अर्धा किलो रु.270/- ला खरेदी केले. विप क्र.1 ने पावती नंतर देऊ असे सांगितले. दि.10.3.2014 रोजी उन्हाळी हंगामात तक ने बियाण्याची पेरणी केली. त्यापुर्वी नांगरणी, कुळवणी, शेणखत अशी एकूण पूर्व मशागत केली होती. एक एकर क्षेत्रावर पेरणी केली विहीरीच्या पाण्याने पाणी दिले. त्यावेळेस पाऊसही पडला होता. सात ते आठ दिवसानंतर शेतात जाऊन पाहिले असता बियाण्याची उगवण झाली नसल्याचे लक्षात आले. आणखी तीन चार दिवसांनी जाऊन पाहिले असता कोणतीही उगवण झाल्याचे दिसून आले नाही.
2. तक विप क्र.1 कडे गेला व चौकशी केली. विप क्र.1 ने कंपनीला विचारा असे उत्तर दिले. दि.9.4.2015 रोजी तक ने मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. उस्मानाबाद यांचेकडे अर्ज दिला. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडे बियाणे खरेदीची पावती न मिळाल्यामुळे तक्रार केली. त्यामुळे विप क्र.1 ने पावती तक च्या भावाकडे दिली. तक ची जमिन चांगल्या प्रतीची असल्यामुळे एकरी 4 क्विंटल उत्पादन मिळणे अपेक्षित होते. तक च्या विहीरीत भरपूर पाणी आहे. तालुका निवारण समिती यांचेकडे तक्रार केल्यानंतर दि.06.5.2014 रोजी क्षेत्र पाहणी केली. उगवणीचे प्रमाण शुन्य टक्के आहे असा अहवाल दिला. तिळाचा भाव रु.20,000/- प्रति क्विंटल आहे. तिन क्विंटल उत्पन्न गृहीत धरले तरी तक चे रु.60,000/- चे नुकसान झाले. खर्च रु.10,000/- व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- तसेच पावती न दिल्याबददल रु.10,000/- विप कडून तक ला मिळणे जरुरी आहे. म्हणून तक ने ही तक्रार दि.03.12.2014 रोजी दाखल केलेली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत जि.प. कडे दिलेला दि.9.4.2014 चा अर्ज जि. प. चे दि.16.4.2014 चे पत्र, तक्रार निवारण समिती चे दि.28.4.2014 चे पत्र, जिल्हाधिकारी यांना दिलेला दि.06.5.2014 चा अर्ज, दि.18.2.2014 ची पावती, तिळाच्या बियाण्यासंबंधीची माहीती, दि.6.5.2014 चा पाहणी अहवाल, दि.21.5.2014 चे तलाठयाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केल्या आहेत.
4. विप क्र.1 ने दि.1.4.2015 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारीतील सर्व मजकूर या विप ने अमान्य केला आहे. तक ने बियाणे खरेदी केले हे सुध्दा मान्य केलेले नाही. तक ने खोटी फिर्याद दिली. म्हणून ती रद्द करुन भरपाई रु.20,000/- या विप ला देण्यात यावी असे या विप ने म्हटले आहे.
5. विप क्र.2 ने दि.1.4.2015 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. या विप चे म्हणणे की,शासनाच्या प्रयोगशाळेत बियाण्याची तपासणी झाल्यावर व प्रमाणीत झाल्यावर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. त्याबरोबरचा दि.15.1.2014 चा तपासणी अहवाल दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विक्रीची परवानगी घेऊनच बियाणे विक्रीसाठी पाठविण्यात आलेले होते. शेतकरी कंपनीने दिलेल्या सुचना पाळत नाहीत. व त्यामुळे योग्य ती उगवण न होणे व त्यानंतर कंपनीकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. पावसाचे प्रमाण, तपमान, खते, औषधाचा वापर पिकाची काळजी पूर्व मशागत, या गोष्टीचा पिकाच्या उगवणीवर परिणाम होतो. त्यासाठी बियाणे सदोष असत नाहीत. कंपनीने तक ची फसवणूक केली व सदोष बियाणे दिले हे नाकबूल आहे. जी पाहणी झाली ती हया विप च्या अपरोक्ष झाली. या विप ने सदर लॉटचे शेकडो क्विंटल बियाणे महाराष्ट्रामध्ये विक्री केलेले आहेत. इतर कोणत्याही शेतक-याची त्याबददल तक्रार आलेली नाही त्यामुळे सदरची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. या विप ने म्हणण्यासोबत टेस्टींग रिपोर्ट, ग्राहकाची यादी, महाराष्ट्र शासनाचे आदेश, इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केल्या आहेत.
6. तक ची तक्रार, त्यांने दिलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
- विप ने सदोष बियाणे दिले काय ? होय
- तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.अंशतः
- आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
-
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
7. विप क्र.1 विप क्र.2 चे प्रतिनिधी यांनी या प्रकरणात संपूर्णपणे कानावर हात ठेवले आहेत. याउलट तकच्या तक्रारीप्रमाणे दि.18.2.2014 रोजी अर्धा किलो बियाणे विप क्र.1 कडून विकत घेतले. पण त्यांची पावती विप क्र.1 ने दिली नाही. याबददल शेवटी दि.6.5.2014 रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडे तक्रार दिली त्यानंतर तक चे भावाकडे विप क्र.1 ने पावती दिली. या पावतीची प्रत हजर करण्यात आलेली आहे. विप क्र.1 ची यामध्ये लबाडी दिसून येते. विप क्र.1 ने बियाणाची उगवण झाली नाही व त्याबद्दल समितीने क्षेत्र तपासणी केली यासर्व गोष्टी नाकबूल केल्या आहेत. त्या पंचनाम्यावर विक्रेता म्हणून सुनिल कर्नावट यांनी सही केल्याचे दिसते. तोच विप क्र.1 असल्याचे तक्रारीत लिहीलेले आहे. विप क्र.1 ने तक ला कोणतीही दाद दिली नाही अशी तक ची तक्रार आहे. त्यामध्ये तथ्य आढळून येते.
8. विप क्र.2 तक ने बियाणे खरेदी केले व पेरले हे स्पष्टपणे नाकारत नाहीत. त्याचप्रमाणे तक चे म्हणणे की अजिबात उगवण झाली नाही हे पण स्पष्टपणे नाकारत नाहीत. तक्रार निवारण समितीने दि.6.5.2014 रोजी जो पंचनामा केला त्यामध्ये लागवड क्षेत्र सर्व्हे नंबर 135 पैकी 40 आर असल्याचे म्हटले आहे. सिंचनासाठी विहीर असल्याचा उल्लेख आहे. तिळाची उगवण झालेली नाही व उगवण्याचे प्रमाण शुन्य टक्के आहे व 100 टक्के नुकसान झाले असे नमूद करण्यात आलेले आहे.तलाठी प्रमाणपत्राप्रमाणे तक ने 40 आर क्षेत्रात तिळाची पेरणी केली होती.
9. तक चे म्हणणे आहे की, उन्हाळी हंगामासाठी दि.10.3.2014 रोजी त्यांने तिळाची पेरणी केली. संपूर्ण पूर्व मशागत केली होती तसेच शेणखत दिले होते, व पाणी पण दिले होते. असे असतानाही कोणतीही उगवण झाली नाही. याउलट विप क्र.2 चे म्हणणे की लॉट क्र.035 मधील बियाणे अनेक शेतक-याना विकले त्यापैकी कोणाचीही तक्रार आलेली नाही. म्हणजेच बियाणे चांगल्या प्रतिचे होते.
10. विप क्र.2 तर्फे सिड टेस्टींग प्रयोगशाळेचा अहवाल दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये शुध्दता 99.8 टक्के व उगवण शक्ती 82 टक्के असल्याचे नमूद आहे. कृषी वस्तू भांडार उस्मानाबाद यांना दि.28.1.2015 रोजी 200 पाकीट पुरवल्याचे दिसते. ज्याअर्थी दुस-या कोणत्याही शेतक-याची तक्रार आलेली नाही त्याअर्थी या लॉट मधील बियाणे चांगलया प्रतिचे होते असा विप क्र.2 चा बचाव आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेतील रिपोर्टवर विप क्र.2 ने भर दिलेला आहे.
11. विप क्र.2 तर्फे अॅड.श्री.भालेराव यांनी परिपत्रक दि.19.3.2005 चे या कडे आमचे लक्ष वेधले. त्यांनी असा युक्तीवाद केला की, समितीच्या सात सदस्यांनी क्षेत्र पाहणी केली पाहिजे. प्रस्तुत ठिकाणी तसे झालेले नाही. श्री. भालेराव यांचे म्हणणे आहे की, तक ने पेरणी करण्यास उशिर केला. जर बियाणे जमिनीत खोलवर पडले तर ते उगवून येत नाही. त्यामुळे प्रस्तूत प्रकरणी विप चा कोणताही दोष नाही. आपले युक्तीवादाचे पृष्टयर्थ श्री. भालेराव यांनी पूढील केस लॉ वर भर दिला आहे.
1. बंताराम वि. जय भारत बिज कंपनी रि.पि. 506/2013 नॅशनल कमिशन. तेथे असे म्हटले आहे की, उगवण ही अनेक गोष्टीवर अवलंबून असते. जसे की जमिनीची परिस्थिती, हवामान, किड व रोगाचा प्रादूर्भाव, खताची मात्रा इत्यादी. तसेच तक्रारकर्त्याने आपले कडील बिज प्रयोगशाळेत तपासून घ्यायला पाहिजे.
2. पायोनिअर हायब्रीड विरुध्द बाबाराव गेन्नेवाड पहिले अपिल क्र.68/2000 महाराष्ट्र राज्य आयेाग, तेथे असे म्हटले आहे की, शासकीय परिपत्रकाप्रमाणे समितीच्या सदस्यांनी क्षेत्र पाहणी केली पाहिजे. नाही तर पाहणी अहवाल यांला महत्व राहत नाही.
3. राशी सिडस विरुध्द सुदामसिंग 2008 (3) सीपीआर 280 महाराष्ट्र राज्य आयोग. तेथे म्हटले आहे की, बियाण्याच्या पंचनाम्यात स्पष्टपणे लिहीले नसेल तर बियाणे दोषपूर्ण होते असे म्हणता येणार नाही. यांच मुद्यावर पुढील निर्णय सुध्दा हजर करण्यात आलेले आहे.
1. हरियाणा सिडस डेव्हलप कार्पो. विरुध्द साधू 2005 (1) सीपीआर 169 सुप्रिम कोर्ट
2. सुग्रो सिडस वि मोहनसिंग पहिले अपिल 39/2008 म.राज्य अयोग,
3. महाराष्ट्र सिडस कापो. विरुध्द करणसिंग बाघेल, पहिले अपिल 382/2002 म.राज्य. आयोग,
4. संमशेरसिंग वि. बागरी बिज भांडार 2013 (4) सीपीआर 219 राष्ट्रीय आयोग
5. महिको विरुध्द दबासत्ताक 2012 (3) सीपीआर 203 राष्ट्रीय आयोग
12. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक विप तर्फै दाखल करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय चौकशी समिती मध्ये कृषी विकास अधिकारी जि.प. अध्यक्ष. तालुका कृ.षी अधिकारी महाबिज यांचे प्रतिनिधी जिल्हा बिज प्रमाणीकरण अधिकारी, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, कृषी विकास कार्यालय येथील अधिकारी, असे सदस्य असतात. जो पंचनामा करण्यात आला आहे. त्यावर उपविभागीय कृषी अधिकारी महाबिज यांचे प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, विक्रेता प्रतिनिधी, यांच्या सहया दिसून येतात. जर बाकीचे सदस्य हजर झाले नसतील तर त्यांचा दोष शेतक-याला कसा देता येईल हे समजून येत नाही. हे खरे आहे की, तक ने बियाण्याचा नमूना तपासणीसाठी उपलब्ध करुन दिला नाही. शेतक-याकडे असा नमूना उपलब्ध असणे ही अवघड बाब आहे. याउलट विप क्र.2 ला त्या बॅच मधील नमूना तपासणीसाठी उपलब्ध करुन देता आला असता. कारण विप क्र.2 मोठया प्रमाणावर बियाण्याचे उत्पादन करते. त्यामुळे बिज उत्पादक कंपनी तेवढयाच प्रमाणात जबाबदार आहे.
13. तक तर्फे विधीज्ञ श्री. बोंदर यांनी पुढील केस लॉ वर भर दिला.
- शक्तीवर्धक हायब्रीड वि नर्सी शुभम 2011 एनसीजे पान 923 नॅशनल कमिशन तेथे सरसू ची उगवण फक्त 3 ते 5 टक्के दिसून आली. ही बाब सिध्द करते की बियाणे चांगल्या प्रतिचे नव्हते असे म्हंटलेले आहे.
हे सुध्दा लक्षात घेतले पाहिजे की बियाणे पेरल्यानंतर ते चांगल्या प्रतिचे आहे किंवा नाही हे समितीच्या सदस्यांना पाहणीची संधी राहत नाही. त्यामुळे अशी टिपणी समितीने करावी अशी अपेक्षा धरता येणार नाही. प्रस्तूत प्रकरणी बियाण्याची अजिबात उगवण झाली नाही. तक ने कोणती कोणती काळजी घेतली हे स्पष्ट केलेले आहे. तसेच पाण्याची सोय होती व पाणी दिले होते असे म्हटले ते नाकारण्याचे कोणतेही कारण विप ने दिलेले नाही.
14. विप ने असेही म्हणण्याचा प्रयत्न केला की तक ने पेरणी करण्यास उशिर केला. असे दिसते की, उस्मानाबाद च्या विक्रेत्या कडे दि.28.1.2014 रोजी बियाणे प्राप्त झाले.तक ने दि.18.2.2014 रोजी ते खरेदी केले आहे. त्यांची पेरणी दि.10.3.2014 रोजी केली आहे. बियाण्याचा पेरणीसाठी कालावधी किती असायला पाहिजे हे विप ने सपष्ट केले नाही. दोन तिन महिन्याचा कालावधी सामान्यतः असायला पाहिजे.कारण उत्पादकाकडून बियाणे विक्रेत्याकडे येते. विक्रेत्याकडून शेतक-याकडे येते. प्रत्येक पायरीवर काही आठवडयाचा कालावधी जाणारच असतो. जर एवढया कालावधीमध्ये बियाण्याची क्षमता राहत नसेल तर त्यांला चांगले बियाणे म्हणता येणार नाही. प्रस्तुत प्रकरणात 3 ते 5 टक्के उगवण झाली यांचा स्पष्ट अर्थ सदोष बियाणे होते हाच होतो. कारण इतर कोणतेही अडचणीचे घटक असल्याबद्दल कोणताही पुरावा नाही.
15. तक ने म्हटले आहे की, एक एकरामध्ये 4 क्विंटल उत्पन्न मिळाले असते. प्रत्येक क्विंटलचा भाव रु.20,000/- होता. तक ने आपली मागणी 3 क्विंटल वर मर्यादेत केली आहे. मात्र हे दाखवण्यास कोणताही पुरावा नाही. त्यामुळे आमचे मते दोन क्विंटल पिकाचे नुकसान झाले आहे. बाजारभाव रु.20,000/- प्रति क्विंटल दाखवण्यास काहीही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे आम्ही प्रति क्विंटल भाव रु.15,000/- धरतो अशा प्रकारे रु.30,000/- चे नुकसान झाले आहे असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला नुकसान
भरपाई रु.30,000/- (रुपये तीस हजार फक्त) 30 दिवसाचे आंत द्यावे, न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यत द.सा.द.शे 9 दराने व्याज द्यावे.
3. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.5000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.