निकाल
दिनांक- 16.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेत दि.04.01.2011 रोजी रु.40,000/- व रु.40,000/- मुदत ठेवीमध्ये जमा केले होते. मुदत ठेवीचा नंबर 20160 व 20161 असा आहे.मुदत ठेवीचा कालावधी तीन महिन्याचा होता. कालावधी दि.04.04.2011 रोजी पुर्ण झालेला आहे. सदर रककमेवर सामनेवाले यांनी 10 टक्के व्याज देण्याचे कबूल केले आहे. मुदत संपल्यानंतर तक्रारदार हिने रक्कमेची मागणी केली असता सदर रक्कम देण्यास टाळाटाळ केली. शेवटी तक्रारदाराने दि.17.11.2011 रोजी सामनेवाले यांना वकिलामार्फत लेखी नोटीस पाठविली. ती नोटीस सामनेवाला यांना दि.03.01.2013 रोजी प्राप्त झाली. नोटीस दि.21.11.2011 रोजी मिळून देखील सामनेवाले हयांनी रक्कम दिली नाही व नोटीसीचे उत्तर देखील दिले नाही. तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, मुदत ठेवीची रक्कम रु.80,000/- व त्यावर 10 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह मिळावेत तसेच नुकसान भरपाई म्हणून रु.15,000/- मिळावेत.
सामनेवाले हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दि.06.06.2012 रोजी दाखल केले आहे. हे मान्य नाही की, तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्कमेची मागणी केली आहे. हे म्हणणे खोटे आहे की, सामनेवाले रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तक्रारदार यांनी व्यवस्थापक यांना पक्षकार केले आहे सामनेवाले हे बँकेचे मालक नाहीत. सदरील सामनेवाले बँक महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अन्वये दाखल केली आहे. सदर मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. करार हा बँक व तक्रारदार यांचे मध्ये झालेला आहे. व्यवस्थापक त्यांस जबाबदार नाही.बॅकेचे संचालक यांना पक्षकार केलेले नाही. सामनेवाले यांनी आर.बी.आय. यांनी बँकेवर जे निर्देश आणले यांची प्रत दाखल केली आहे. सामनेवाले यांनी सेवेत कसूर केलेला नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही.
तक्रारदार यांनी तक्रारीच्या पृष्टयर्थ शपथपत्र, पोस्टाची पोहच पावती, मुदत ठेवीच्या दोन पावत्या, पोस्टाची पावती इत्यादी कागदपत्राची छायाकींत प्रत दाखल केली आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे सोबत आर.बी.आय. यांनी बॅकेवर निर्देश आणले त्यांची प्रत दाखल केली आहे.
तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र आणि सामनेवाले यांचे लेखी म्हणणे यांचे अवलोकन केले, तक्रारदारांचे वकील श्री. जोंगदंड तसेच सामनेवाले यांचे वकील श्री.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, सामनेवाला यांनी
त्यांना सेवा देण्या मध्ये त्रूटी केली आहे ? होय
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदारांनी तक्रारी सोबत तक्रारदाराचे शपथपत्र पुरावा म्हणून सादर केलेले आहे.तसेच मुदती ठेवीच्या पावत्यांच्या छायाकिंत प्रती, सामनेवाला यांना रक्कमेची मागणी केली आहे त्याबाबतच्या पत्राची छायाकिंत प्रत, इत्यादी कागदपत्रांच्या छायाकिंत प्रती दाखल केल्या आहेत, सामनेवाला यांनी लेखी जवाबा पृष्टयर्थ शपथपत्र दाखल केले आहे.
सामनेवाले यांचेकडे मुदत ठेवी केलेल्या आहेत याबाबत सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांनी मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारांची रककम परत दिली नाही. तसेच रक्कम का परत करु शकत नाही याबददल समर्पक उत्तर देखील दिले नाही.
सामनेवाले यांनी असा मुददा उपस्थित केला आहे की, तक्रारदाराची रककम बँकेकडे आहे. कारण तक्रारदार हे सामनेवाले बँकेचे ग्राहक असून त्यांनी मूदत ठेवी सामनेवाला बँकेत ठेवल्या आहेत. मुदत संपताच मुदत व त्यावर होणारे व्याज परत करण्याची सेवेची जबाबदारी सामनेवाला याची आहे. त्यात त्यांनी कसूर केला आहे.
तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र व कागदपत्र तसेच सामनेवाले यांचा लेखी जवाब, व शपथपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाले यांनी तक्रारदारांची मुदत ठेवीतील रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली आहे असे मंचाचे मत आहे. ग्राहक हा रक्कम सुरक्षीत ठिकाणी रहावी व त्यांची रक्कम त्यांला वेळेवर परत मिळावी म्हणून तसेच त्यांस व्याज मिळावे म्हणून रक्कम बचत खात्यात न टाकता मुदत ठेवीमध्ये ठेवत असतो. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी त्यांची रक्कम सामनेवाले बँकेमध्ये ठेवली होती. परंतु सामनेवाला यांनी मुदत ठेवीची मुदत संपून सुध्दा तक्रारदारांना मुदत ठेवीची रक्कम दिली नाही व रक्कम न देण्याबाबत कोणतेही कारण दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झाला.म्हणून तक्रारदार हे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम न दिल्यामुळे तक्रारदारांला मंचात तक्रार दाखल करावी लागली त्यासाठी तक्रारीचा खर्च रु.2500/- देण्याता यावा.
सबब, मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारदाराला त्यांच्या मुदत ठेवीची
रक्कम रु.80,000/- (अक्षरी रुपये ऐंशी हजार फक्त) ठरलेल्या
व्याज दरा प्रमाणे 30 दिवसांचे आंत दयावी
3. सामनेवाले क यांनी तक्रारदाराला त्यांचे ठेवीवर तक्रार
दाखल दि.23.12.2011 पासून द.सा.द.शे 10 टक्के दराने संपूर्ण
रक्कम मिळेपर्यत व्याज दयावेत.
4. सामनेवाला यांनी तक्रारदाराला मानसिक व शारीरिक
त्रासापोटी रु.2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु.2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.