जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/181 प्रकरण दाखल तारीख - 11/08/2009 प्रकरण निकाल तारीख – 26/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य प्रमोद पि.मुरलीधरराव मामीडवार, वय वर्षे 35, धंदा व्यवसाय, अर्जदार. रा.सिडको नांदेड ता. जि.नांदेड. विरुध्द. 1. महेश अर्बन को ऑप बँक लि, गैरअर्जदार. अहमदपुर, मार्फत शाखाधिकारी, शाखा कार्यालय वजिराबाद, नांदेड. 2. शाखाधिकारी, अक्सीस बँक, शाखा कार्यालय, कलामंदीर जवळ,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.राशेद अहमद. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - अड. व्ही.एम.देशमुख निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे अशी की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराडे दि.18/07/2008 रोजी कर्वे स्टॉक बुकींग लिमिटेड यांचेकरीता पैसे जमा करण्याकरीता गैरअर्जदार यांच्यामार्फत अक्सीस बॅंक नांदेड डि.डी.क्र.094877 रु.49,900/- भरुन काढला सदर डि.डी.कर्वे बुकींग लि, यांचेकडे जमा करण्याकरीता त्यांचे प्रतिनीधी श्री.राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे दिला. परंतु सदर डि.डी.कर्वे बुकींग लि, यांचेकडे जमा केला असल्याबाबत चौकशी केली असता, त्यांना डि.डी.मिळाला नसल्याचे कळाले. त्यामुळे गैरअर्जदाराकडे चौकशी केली असता सदर डी.डी.गैरअर्जदार यांनी रद्य केल्याचे सांगुन पैसे दिल्याचे सांगीतले. सदरच्या डि.डी.वर ए.जी. पाटील कोड नं.21 तसेच पी.एस.शिंदे कोड नं.20 यांची गैरअर्जदार बँकेतील कर्मचा-यांची स्वाक्षरी आहे. याबाबत शाखाधीकारी यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी याबद्यल काहीही माहीती नसल्याचे सांगीतले. अशाप्रकारचा व्यवहार केल्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले. डि.डी.ची रक्कम परत करावी याबाबत वांरवार विनंती करुनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. सदरचा व्यवहार हा राजेंद्र अग्रवाल या प्रतिनीधी मार्फत व गैरअर्जदार यांचे कर्मचारी यांचे संगनमताने झाल्याचे दिसुन येते. अनेकवेळा रक्कमेची मागणी करुनही गैरअर्जदार यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अर्जदार यांनी दि.03/02/2009 रोजी लेखी अर्ज दिला आणी रु.49,900/- परत करावे अशी विनंती केली. अर्जदार यांनी आजपर्यंत ब-याच वेळा तोंडी विनंती केली आणि लेखी विनंती करुनही गैरअर्जदार यांनी कुठलाच प्रतिसाद दिला आणि डि.डी. रद्य झाल्या बाबतचा कुठलाही पुरावा अर्जदारास मिळाला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी दिलेल्या चुकीच्या सेवेमुळे तसेच निष्काळजीपणामुळे व केलेल्या गैरव्यवहारामुळे अर्जदारांचे रु.49,900/- चे नुकसान झाले. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, मानसिक त्रासापोटी व आर्थीक नुकसानी पोटी नुकसान भरपाई म्हणुन रु.45,000/- 18 टक्के व्याजाने देण्याचे आदेश देण्यात यावे तसेच रु.5,000/- दावा खर्च म्हणुन देण्यात यावे. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्याप्रमाणे अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार खोटी असुन सदर डी.डी.शी व अर्जदार यांच्याशी काहीही संबंध नाही. अर्जदार हा व्यापारी असुन त्यांचे सर्व व्यवहार त्यांच बँकेतील स्वतःच्या खात्यातुन होत असतात, त्यांनी जो काही व्यवहार केलेला आहे तो रोजमेळ तसेच आयकर मध्ये दाखवीणे आवश्यक असते परंतु अर्जदार यांनी अशा प्रकारचे कोणतेही दस्ताऐवज न दाखल करता मयत राजेंद्र अग्रवाल यांच्या नांवाचा दुरुपयोग करुन खोटया मुद्यावर सदर तक्रार दाखल केलेली आहे ती खारीज करण्यात यावी. सदर तक्रार अर्जामध्ये अक्सीस बँक लि व कर्वे स्टॉक बुकींग लि यांना पक्षकार म्हणुन समावेश केलेले नाही त्या करीता तक्रार खारीज करावी. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि.18/07/2008 रोजी कर्वे स्टॉक् बुकींग लि यांच्या करीता रु.49,900/- चा डी.डी.अक्सीस बँकेचा क्र.94877 काढला आहे तसेच बँकेच्या काऊंटर स्लिप संबंधीही त्यांचे म्हणणे खोटे आहे. अर्जदार हे कर्वे स्टॉक बुकींग लि चे शेअर ब्रोकर नाहीत, शेअर होल्डर नाही, तसेच त्यसांचा सदर कंपनीशी काहीही संबंध नाही. म्हणुन सदर कंपनीच्या नांवे डी.डी काढण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, सदर डी.डी कर्वे स्टॉक बुकींग यांचे प्रतीनीधी राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे कर्वे स्टॉक बुकींग लि कंपनीमध्ये जमा करण्यासाठी दिला. अर्जदार यांनी बँकेकडुन कधीही डी.डी. काढलेला नाही व कर्वे स्टॉक बुकींग लि यांच्याकडे चौकशी केली तसेच राजेंद्र अग्रवाल हे कर्वे स्टॉक बुकींग लि चे प्रतिनीधी नाहीत फक्त त्यांचे नांवाचा दुरुपयोग करुन ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, सदर डी.डी.वर गैरअर्जदार बँकेतील अधिका-याची स्वाक्षरी आहे. अर्जदाराच्या पत्रास गैरअर्जदार बँक दि.05/03/2009 रोजी उत्तर दिलेले आहे. अर्जदार यांनी कर्वे स्टॉक बुकींग लि यांचे व्यवहारासंबंधी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही तसेच त्यांचेकडे चौकशी केल्याबद्यल कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. तसेच मयत राजेंद्र अग्रवाल हे कर्वे स्टॉक बुकींग लि चे प्रतिनीधी होते या संबंधी कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी दाखविलेला आर्थीक व्यवहार अविश्वसनीय असुन खोटया मुद्यांवर आधारीत आहे. गैरअर्जदार यांचेकडे कोणत्याही प्रकारची सेवेमध्ये त्रुटी झालेली नाही. गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणी असा उजर घेतला की, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेशी कधीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही तसेच अर्जदार हे गैरअर्जदार बँकेचे ग्राहक नाहीत. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. अर्जदार यांनी कोणत्या गैरअर्जदार बँकेमधुन रु.49,900/- चा तथाकथीत डीडी क्र.94877 रु.49,900/- चा काढला हे स्पष्ट होत नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन कोणत्याही प्रकारचा डीडी काढलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेले काऊंटर स्लिप गैरअर्जदार क्र. 1 यांचे दिसते त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 चा त्यांचेशी कोणताही संबंध नाही. गैरअर्जदार क्र. 1 महेश अर्बन को ऑपरेट बँक मर्या, अहमदपुर हया बँकेचे खाते गैरअर्जदार क्र. 2 अक्सिस बँकेमध्ये असुन अक्सिस बँकेने त्यांचे खातेदार महेश अर्बन को.ऑप. बँकेस दिलेला धनादेश (चेक अट पार) आहे जो गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारासाठी वापरलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 अक्सिस बँकेस अर्जदार यांनी घेतलेला डीडी विषयी आणि राजेंद्र अग्रवाल यांच्याकडे हसतांतरीत केल्यासंबंधीने काहाही माहीती नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे डीडी विषयी कधीही चौकशी केली नाही. तथाकथीत डीडीवर सही करणारे गैरअर्जदार क्र. 2 यांचे कर्मचारी नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 बँकेचे कर्मचारी झालेल्या व्यवहारामध्ये सामील नाहीत. सदरील डीडी अक्सिस बॅकेने निर्गमीत केलेला नसुन अर्जदाराने अक्सिस बॅकेत सदरच्या रक्कमेचा भरणा देखील केलेला नाही. गैरअर्जदार क्र. 2 बॅकेने कोणताच व्यवहार अथवा गैरव्यवहार अर्जदारासोबत केलेला नसुन अर्जदारास झालेल्या त्रासास गैरअर्जदार क्र. 2 जबाबदार नाहीत. उलटपक्षी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 ला विनाकारण केस मध्ये पाटी करुन केस चालविण्यास भाग पाडले म्हणुन अर्जदाराकडुन दाव्याचा खर्चापोटी रु.10,000/- गैरअर्जदार क्र. 2 बॅकेस मिळावे. अर्जदार गैरअर्जदार क्र. 2 अक्सिस बॅकेचा ग्राहक होत नाही म्हणुन अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे म्हणणे व शपथपत्र व दोन्ही पक्षकारांच्या वतीने वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित झाले. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना त्रुटीची सेवा दिली आहे काय? होय. 3. गैरअर्जदार क्र. 1 हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास बांधील आहे काय ? होय. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार हे सिडको नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांनी दि.18/07/2008 रोजी कर्वे स्टॉक बुकींग लि यांचे करीता रु.49,900/- चा डी.डी.गैरअर्जदार क्र. 1 महेश अर्बन को ऑप बँक लि, अहमदपुर शाखा कार्यालय वजीराबाद नांदेड यांच्या मार्फत अक्सीस बॅक नांदेड डि.डी.क्र. 094877 भरुन दिला. अर्जदार यांचेकडे सदर डी.डी. काढल्याचा काऊंटर स्लिप ती त्यांनी अर्जासोबत दाखल केली आहे. म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत हे सकारात्मक देण्यात येत आहे. मुद्या क्र. 2 सदरील डी.डी. काढल्यानंतर कर्वे स्टॉक बुकींग लि यांचे प्रतीनीधी श्री.राजेंद्र अग्रवाल यांचेकडे जमा करण्या करीता दिला व अर्जदार यांना सदरची डि.डी. कर्वे स्टॉक बुकींग यांचेकडे जमा केले असेल याबाबतची चौकशी असता, सदरची डी.डी. त्यांना मिळाले नसल्याचे कळाले म्हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे डि.डी.संदर्भात चौकशी केली त्यावेळी गैरअर्जदार यांनी ते डी.डी.रद्य केल्याचे सांगुन पैसे दिल्याचे सांगीतले आणि अर्जदारास डि.डी. हा त्यांच्या स्वाक्षरी शिवाय व परवानगी शिवाय कशामुळे रद्य केले याबाबत चौकशी चौकशी केली असता, गैरअर्जदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्जदार यांनी काढलेल्या डि.डी.वर ए.जी.पाटील कोड नं.21 व पी.एस.शिंदे कोड नं.20 या बँकेतील कर्मचा-याची सही आहे. म्हणुन संबंधीत शाखाधिकारीकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडुनही उडवाउडवीची उत्तरे आली. अर्जदाराने वारंवार विनंती करुनही गैरअर्जदारांनी अर्जदारास सदरील बाबीबद्यल कुठलेही उत्तर दिले नाही. म्हणुन अर्जदार यांनी वारंवार विनंती करुन रक्कम वापस देणे संदर्भात विनंती केली. काही दिवसानंतर अर्जदार व त्यांचे भाऊ व इतर प्रतीष्ठित नागरीक संबंधीत बँकेकडे डी.डी.बाबत झालेल्या व्यवहाराबाबत चौकशी करण्यात करीता गेले असता, गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांना काही दिवस थांबा आमच्या विरुध्द कुठलीही कार्यवाही करु नका त्यामुळे बँकेचे नांव खराब होईल व मुळ काऊंटर स्लिप आणुन द्या असे सांगीतले व अर्जदाराने त्यांना सदरची झेरॉक्स दिले. दि.03/09/2009 रोजी अर्जदार यांनी लेखी तक्रारअर्ज गैरअर्जदार यांचेकडे दिला. सदरील रु.49,900/- परत करावे म्हणुन विनंती केली. अनेक वेळी तोंडी विनंती करुनही आजपर्यंत अर्जदारास गैरअर्जदाराकडुन कुठलीही रक्कम वापस दिलेली नाही. त्यामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रास झाले सर्व प्रकारावरुन अर्जदारास मानसिक त्रास झालेला आहे व गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे, या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. मुद्या क्र. 3 दि.11/08/2009 रोजी सदरील तक्रारीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्जदाराने परवानगी मागीतली व शाखाधिकारी अक्सीस बँक, कलामंदीर नांदेड यांना सदरील केसमध्ये गैरअर्जदार क्र. 2 म्हणुन दाखल करावे असा अर्जदाराचा अर्ज मंचाने मंजुर केला व गैरअर्जदार क्र. 2 म्हणुन शाखाधिकारी अक्सीस बँक यांना पार्टी करण्यात आले. अर्जदाराने वेळोवेळी दिलेल्या अर्जाचे छायाप्रती तसेच डि.डी.चे छायाप्रती आणि काऊंटर स्लिपची छायाप्रती मंचसमोर दाखल केलेले आहे. तसेच दि.05/03/2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 महेश अर्बन को ऑप बँक लि नांदेड शाखा यांना दिलेले पत्र हेही दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 अक्सीस बँक शाखाधिकारी यांना नोटीस काढण्यात आली व ते हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे मांडले त्यामध्ये अर्जदारास त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 अक्सीस बँक म्हणुन त्यांचे तर्फे कुठेही व्यवहार केलेला नाही व अक्सीस बँकचे ग्राहक नाही तसेच श्री.राजेंद्र अग्रवाल यांचेकडे अर्जदाराने सदर डि.डी. हस्तांतरीत केल्यासंबंधी त्यांना माहीती नाही. अर्जदार अक्सीस बँकेचे ग्राहक नाही म्हणुन अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. तसेच डी.डी.क्र.94877 हे हैद्राबाद शाखेला कधीही पेमेंट करीता आले नाही. अशा प्रकारचे पत्र अक्सीस बँकेने मंचासमोर दाखल केलेले निशानी क्र.14 यावरुन स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र. 2 अक्सीस बँक शाखा कलामंदीर नांदेड यांचे सदरची केसमध्ये कुठलाही संबंध नाही व गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुनच अर्जदारास त्रुटीची सेवा देण्यात आलेली आहे. म्हणुन सदरील डि.डी.बाबत गैरअर्जदार क्र. 1 हेच जबाबदार आहेत व अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत. म्हणुन गैरअर्जदार क्र. 1 महेश अर्बन को ऑप बँक लि अहमदपुर मार्फत शाखाधिकारी शाखा कार्यालय वजीराबाद नांदेड हेच अर्जदाराचे रु.49,900/- व्याजासह भरुन देण्यास व त्यांना झालेल्या मानसिक त्रास भरुन काढण्यास जबाबदार आहेत, या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास दि.18/07/2008 पासुन रु.49,900/- व त्यावरील डी.डी.कमीशन एवढया रक्कमेवर आजपर्यंत (दि.26/03/2010) पर्यंत 9 टक्के व्याज दराने नुकसान भरपाई द्यावी. रु.49,900/- त्यावरील डि.डी. कमीशन दि.18/07/2008 ते दि.26/03/2010 पर्यंत व्याज ही एकत्रित रक्कम एक महिन्याचे आंत अर्जदारास द्यावी अन्यथा सदरील रक्कमेवर 12 टक्के व्याज द्यावे लागेल. 2. अर्जदारास मानसिक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. 1 यांनी रु.5,000/- द्यावेत तसेच कोर्ट खर्च प्रित्यर्थ रु.2,000/- या दोन्ही रक्कमा एक महिन्याचे आंत द्यावे. अन्यथा त्यावर एक महिन्यानंतर 12 टक्के व्याज गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावे लागेल. 3. गैरअर्जदार क्र. 2 शाखाधिकारी, अक्सीस बँक नांदेड यांचा सदरील केसशी काहीही संबंध नसल्यामुळे त्यांचे विरुध्द कुठलाही आदेश नाही. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |