(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :01/03/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 21.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. यातील तक्रारकर्त्यांचे थोडक्यात निवेदन असे आहे की, ते वकीलीचा व्यवसाय करतात व त्याचे घर निवासी उपयोगाचे आहे, तसेच वरील मजल्यावरील दोन खोल्यात त्यांचे कार्यालय असुन त्या ठिकाणी ते विजेचा वापर करतात व नियमीत विजेचे बिल भरतात. गैरअर्जदारांच्या भरारी पथकाने दि.25.02.2010 रोजी मीटरची तपासणी केली आणि त्याला रु.23,881/- चे तात्पुरते बिल दुस-या दिवशी वाणिज्यीक तत्वावर आकारुन दिले. तक्रारकर्त्याने त्यावर आक्षेप सादर केला मात्र त्याची सुनावणी घेतली नाही, गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा खंडीत करण्यांचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला नाईलाजाने दि. 20.03.2010 रोजी वरील मागणीची रक्कम भरावी लागली. यावरुन गैरअर्जदाराचे वर्तन पूर्णतः गैरकायदेशिर व कुठल्याही व्यक्तिला त्रास देण्याचे आहे, हे स्पष्ट होत, असे नमुद करुन सदर तक्रार दाखल करुन ती व्दारे दि.26.02.2010 रोजीचे रु.23,881/- चे बिल रद्द ठरवुन ते बिल परत होण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारकर्त्याचा विज वापर वाणिज्यीक नसुन घरगुती आहे अशी घोषणा व्हावी, दुप्पट विज दर आकारुन बिल वसुल करण्याची कोणतीही कारवाई करुन विज पुरवठा खंडीत करु नये व तक्रारीस लागलेला खर्च रु.1,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 3. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली, त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्यात त्यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्याकडे मीटर क्र.817160 हे रहिवासी वर्गवारीमध्ये पहिल्या मजल्याचे वापरासाठी घेतले आहे. मात्र या पहिल्या मजल्यावर मे.कनसेप्टस् इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमीटेड आणि तक्रारकर्त्याचे कार्यालयाला विद्युत पुरवठा सुरु होता व त्या मीटरवरुन घरगुती विज पुरवठा कोणत्याही प्रकारे होत नव्हता, असे आढळून आले. त्यामुळे घटनास्थळ पंचनामा करुन त्यानुसार तक्रारकर्त्यास तात्पुरते बिल देण्यांत आले. तक्रारकर्त्याने त्यावर आक्षेप नोंदविली, सदर आक्षेप प्राप्त होताच तक्रारकर्त्यास त्याचे म्हणणे मांडण्याकरीता दि.03.05.2010 रोजी बोलावण्यांत आले. मात्र ते हजर झाले नाही म्हणून दि.04.06.2010 रोजी अंतिम बिल ठरवुन निर्गमीत करण्यांत आले, त्यावर तक्रारकर्त्यांनी कलम 127 अनुसार अपीलीय अधिकारी यांचेकडे अपील करणे आवश्यक होते, परंतु त्याने अपील दाखल केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याची ही तक्रार गैरकायदेशिर आहे आणि ती अपरिपक्व आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांची इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली, पंचनाम्यावर तकारकर्त्यांची सही आहे व संलग्न भार हा अनधीकृत होता हे स्पष्ट आहे. तक्रारकर्त्यांचे कबुली प्रमाणेच त्यांनी विजेच्या बिलांची आकारणी केली, तक्रारकर्त्यास सुनावणीची संधी दिली मात्र ते स्वतः आले नाही, त्यामुळे विज आकारणीत कोणतीही चुक नाही. तसेच सदर तक्रार चुकीची आणि गैरकायदेशिर आहे म्हणून ती खारिज व्हावी असा गैरअर्जदाराने उजर दिलेला आहे. 4. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रारीत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 3 तक्रारकर्त्यास पाठविलेले तात्पुरते बिल, लेखी आक्षेप व धनादेशाव्दारे भरलेल्या रकमेची प्रत इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत. तसेच गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबासोबत निशानी क्र. 11 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 7 पंचनामा तपासणी अहवाल, प्रोव्हीजनल असेसमेंट शिट, स्थळ तपासणी अहवाल, तक्रारकर्त्यांचे दि.18.03.2010 व 20.03.2010 चे पत्र, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांस दिलेल्या दि.25.03.2010 व 03.06.2010 रोजीच पत्रांची प्रत इत्यादी दस्तावेजांचा समावेश आहे. 5. सदर तक्रार मंचासमक्ष दि.23.02.2011 रोजी युक्तिवादाकरीता आली असता तक्रारकर्ते व गैरअर्जदारांचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद मंचाने ऐकला. तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. यामध्ये तक्रारकर्त्याचे संबंधीत मीटरवरुन घरगुती आणि कार्यालयीन वापर वेगवेगळा होत आहे, ही बाब तक्रारकर्ते स्पष्ट करु शकले नाहीत. गैरअर्जदाराने विज आकारणी संबंधीचे दस्तावेज दाखल केलेले आहेत, त्या प्रमाणे वकील, डॉक्टर, अभियंता इत्यादी हे संबंधीत वास्तु केवळ व्यावसायीक उपयोगास वापरीत असतील तर त्यांना कमी दराने आकारणी होऊ शकत नाही, हे स्पष्ट केलेले आहे. तक्रारकर्त्याचा निवास आणि संबंधीत कार्यालय हे वेगवेगळे आहे हे वस्तुस्थितीवरुन स्पष्ट होते, ते एकत्र आहे, हे तक्रारकर्ते दाखवु शकले नाहीत आणि सदर ठिकाणचा संबंधीत भाग हा आर्कीटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर यांना वापरण्यासाठी दिलेला आहे व त्यासाठी विजेचा वापर झालेला आहे हे उघड आहे. त्यामुळे वरील बाबतची तक्रारकर्त्यांची तक्रार स्विकारणे योग्य नाही, म्हणून मंच सदर तक्रार खारिज करीत आहे. 8. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |