2. तक्रारकर्ता हा सिस्टर कॉलनी येथे राहतो. तक्रारकर्त्याने सन 2014 मध्ये सौ.सिमा गंगाराम ढोके यांचेकडून त्यांच्या मालकीचे ठक्कर कॉलनी येथील एक मजली घर विकत घेतले.सदर घरामध्ये सौ.सिमा यांनी वि.प. यांचेकडून दिनांक 2.10.2012 पासून विजपूरवठा घेतलेला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 450011336294 हा आहे. तक्रारकर्त्याने सदर घर विकत घेतल्यानंतर दिनांक 26.12.2014 रोजी पहिल्या माळयावरील विज कनेक्शन स्वतःचे नांवावर हस्तांतरीत (ट्रांस्फर) करून घेतले. सदर इमारतीच्या तळ मजल्यावर सईद खानचे नावाने वेगळे विजमिटर आहे. सदर दोन्ही माळयांवर वेगवेगळे विज कनेक्शन्स आहेत. तक्रारकर्त्याने सदर इमारतीचा पहिला माळा राजु खडसे यांना भाडयाने दिला होता व त्यानंतर तक्रारकर्त्याचे आममुखत्यार मो.ईमाम मो.अब्बास यांना दिनांक 1.4.2016 पासून भाडयाने दिला आहे. सदर पहिल्या मजल्यावरील विजमिटरचा वापर आममुखत्यार करीत आहेत व ते त्याचे लाभधारक आहेत. सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये 4 सी.एफ.एल.लाईट व 2 सिलींग फॅन आहेत व याव्यतिरीक्त विजेवर चालणारी उपकरणे नाहीत. तक्रारकर्त्याचे भाडेक-याचा विजवापर फारच कमी आहे व तक्रारकर्त्याचे भाडेक-याने वि.प.कडे नियमितपणे विजदेयकांचा भरणा केला आहे. तक्रारकर्त्याचे भाडेक-याला दि.26.4.2017 रोजी कमी युनीट वापराचे देयक आले व त्याने सदर देयकाचा भरणा केला. तक्रारकर्त्याचे भाडेक-याने तक्रारकर्त्याच्या सहीने वि.प.यांचेकडे दि.19.5.2017 रोजी सदर मीटर स्लो फिरत असल्याची लेखी तक्रार केली. 3. वि.प.यांचे अधिकारी हे दि.6.7.2017 रोजी आले व पंचनामा न करताच व मीटरला सिल न करता आणी कोणतीही माहिती न देता मीटर जप्त करून घेऊन गेले. त्यावेळी सदर मीटर हे बरोबर होते व त्यामध्ये कोणतीही छेडछाड केलेली नव्हती. तक्रारकर्त्याने वि.प.यांचेकडे वारंवार जाऊन विजमिटर लावून देण्याची विनंती केली परंतू वि.प.नी त्याची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याचे भाडेक-याला दिनांक 6.7.2017ते दिनांक 17.7.2017 पर्यंत अंधारात रहावे लागले.वि.प.यांनी तक्रारकर्त्याला दि. 17.7.2017 रोजी फोन करून बोलविले व दिनांक 10.7.2016 चे असेसमेंट रू.63,120/-, कंपाऊंडींग चार्जेस बिल रू.2000/- व मिटर चार्जेस रू.1500/- असे तीन विजदेयक तक्रारकर्त्याला देवून सांगितले की सदर देयके भरल्याशिवाय विजमीटर सुरू करून देणार नाही. तक्रारकर्त्याची मुले शिक्षण घेत आहेत व विजपुरवठयाशिवाय रहाणे शक्य नसल्यामुळे तक्रारकर्त्याने नाईलाजाने अधिकार राखून सदर तीनही बेकायदेशीर विजदेयकांचा भरणा वि.प.कडे केला. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, वि.प. ने तक्रारकर्त्याच्या नावाने दि.10.7.2017 रोजीचे 4566 युनीटचे रू.63,120/- असेसमेंट देयक, कंपाऊंडींग चार्जेस बिल रू.2000/- व मिटर चार्जेस रू.1500/- असे तीन विजदेयक बेकायदेशीर ठरवून वि.प.कडे तक्रारकर्त्याने जमा केलेली तिनही देयकांची एकूण रक्कम रू.66,620/- त्यावर 9टक्के व्याजासह तक्रारकर्त्यास परत द्यावी तसेच तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 20,000/- तसेच तक्रार खर्चापोटी एकुण रक्कम रु. 10,000/- वि.प. यांनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 4. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. ने हजर होवून हक्काला बाधा न पोहचता प्राथमीक आक्षेपासह लेखी कथन दाखल केले. सदर प्रकरण हे विज कायदा कलम 135 मध्ये मोडत असून सदर प्रकरणाबाबत निर्णय देण्याचा अधिकार हा विज कायदा,2003 चे तरतुदीनुसार विशेष न्यायालयाला दिलेला आहे. त्यामुळे सदर प्रकरण विद्यमान मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसल्याने प्राथमीकदृष्टया खारीज होण्यास पात्र आहे. वि.प. ने नमुद केले कि, वि.प.यांनी दि.26.4.2017 चे विजदेयक तक्रारकर्त्याचे भाडेक-याला दिले व दि.6.7.2017 रोजी वि.प.यांचे अधिका-यांनी तक्रारकर्त्याचे विजमीटर जप्त करून नेले व दिनांक 10.7.2017 रोजी 4566 युनीटचे रू.63,120/- असेसमेंट देयक, कंपाऊंडींग चार्जेस बिल रू.2000/- व मिटर चार्जेस रू.1500/- असे तीन विजदेयक तक्रारकर्त्याला दिनांक 17.7.2017 रोजी दिले याबाबत वाद नाही. परंतु तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबुल करुन पुढे नमूद केले की वि.प.यांचे अधिकारी दिनांक 6.7.2017 रोजी तक्रारकर्त्याच्या वरील घरी गेले व वि.प.चे अधिकारी श्री.एस.एस.कापसे यांनी स्वतःची व सहका-यांची ओळख दिल्यानंतर तक्रारकर्त्याकडील विजमीटरची तपासणी केली. त्यावेळी तक्रारकर्त्याचे आममुखत्यार मोक्यावर हजर होते. मीटरची तपासणी करतांना, ‘’मीटर उघडताच, मीटरच्या येणा-या फेजमध्ये निळया रंगाचे वायर जे विजमापन करते, ते तुटलेले आढळले.’’ सदर मीटर हे श्री.रफीक खान हफीज खान पठाण यांच्या नांवाने असून तिथे वास्तव्य करीत असलेले श्री.मोहम्मद इमाम शेख हे त्याचा वापर करतात. तसेच सदर मीटर हे ग्राहकाच्या घरामागे असून साडेपाच फुट वर स्थीत आहे. मिटरच्या बॉडीवर उघडल्या किंवा तोडल्याचे निशाण आढळले.सदर ग्राहकाने मिटरच्या सी.टी.ची वायर तोडण्याकरीता मीटरच्या मागच्या बाजूने मीटरची बॉडी जाळून त्याच्यामध्ये छेद करून येणा-या फेसच्या सी.टी.मध्ये वायर कापलेले दिसते. ज्यामुळे मीटरचे विजमापन होत नाही व मीटरची गती कमी होते. सदर मीटरची पाहणी करून पंचनामा तयार केल्यानंतर त्यावर तसेच जप्ती पंचनाम्यावर तक्रारकर्त्याचे आममुखत्यार ची सही घेतली आहे. सदर मीटरचे तपासणीमध्ये तक्रारकर्त्याकडील विजमीटर वरील छेडखानीमुळे 41 टक्के मंद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर वि.प.यांनी विज कायदा,2003 चे कलम 135 अन्वये असेसमेंट केले व तक्रारकर्त्यास दि.10.7.2017 रोजीचे रू.63,120/- चे असेसमेंट देयक, कंपाऊंडींग चार्जेस देयक रू.2000/- व मिटर कॉस्ट रू.1500/- असे तीन विजदेयक देण्यांत आले. 5. तक्रारकर्त्यास उपरोक्त नमूद देयक मान्य असल्यामुळेच त्यांनी दिनांक 17.7.2017 रोजी सदर देयकाचा भरणा वि.प.कडे केला. तक्रारकर्त्याने केलेली विजचोरी लपविण्यासाठी व भविष्यात तक्रारकर्त्यावर विजचोरीचा संशय येऊ नये व त्याचेवर कोणतीही भविष्यात कारवाई होऊ नये या वाईट उद्देशाने तक्रारकर्त्याने दि.19.5.2017 रोजीचे पत्र वि.प.ला दिल्याचे पत्रावरून स्पष्ट होते. तक्रारकर्ता हा सदर दिनांकापूर्वीपासूनच विजेची चोरी करीत आलेला आहे. तक्रारकर्त्याचे सदर प्रकरण हे कलम 135 विजकायदा अंतर्गत येत असल्याने तक्रारकर्त्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते परंतु तक्रारकर्त्याने असेसमेंट व कंपाऊंडींग चार्जेस व मीटर कॉस्टचे देयकांचा भरणा केला असल्याने तक्रारकर्त्याविरूध्द फौजदारी कारवाई केली नाही व ती कारवाई होऊन त्यांना शिक्षा होवू नये म्हणूनच तक्रारकर्त्याने वि.प.कडे सदर देयकाचा भरणा केला. विज कायदा,2003 चे कलम 135 मध्ये मोडत असलेल्या सदर प्रकरणांसंबधी निर्णय देण्याचा अधिकार हा विशेष न्यायालयाला असल्याने जिल्हा ग्राहक मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. जर तक्रारकर्त्याला उपरोक्त असेसमेंट देयकाबाबत वाद असेल तर त्याने विद्यमान विशेष न्यायालयाकडे दाद मागायला पाहिजे होते, परंतु तक्रारकर्त्याने वास्तविकता लपवून मंचाची दिशाभूल करून सदर प्रकरण दाखल केले आहे.त्यामुळे प्राथमीक आक्षेपानुसार सदर तक्रार रू.50,000/- खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे. 6. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, तक्रारीलाच शपथपत्र व लेखी युक्तीवाद समजण्यांत यावा अशी पुर्सीस दाखल, वि.प. यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष १. मंचास प्रस्तुत प्रकरण चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे काय ? नाही २. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्र. १ बाबत :- 7. तक्रारीत दाखल करण्यांत आलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की वि.प.यांचे अधिकारी श्री.एस.एस.कापसे यांनी दिनांक 6.7.2017 रोजी तक्रारकर्त्याच्या वरील घरी सहकारी अधिका-यांसह जावून स्वतःची व सहका-यांची ओळख करून दिल्यानंतर तक्रारकर्त्याकडील विजमीटरची तपासणी केली. त्यावेळी तक्रारकर्त्याचे भाडेकरी व प्रस्तुत आममुखत्यार मोक्यावर हजर होते. मीटरची तपासणी करतांना, ‘’मीटर उघडताच, मीटरच्या येणा-या फेजमध्ये निळया रंगाचे वायर जे विजमापन करते, ते तुटलेले आढळले.’’ मिटरच्या बॉडीवर उघडल्या किंवा तोडल्याचे निशाण आढळले.सदर ग्राहकाने मिटरच्या सी.टी.ची वायर तोडण्याकरीता मीटरच्या मागच्या बाजूने मीटरची बॉडी जाळून त्याच्यामध्ये छेद करून येणा-या फेसच्या सी.टी.मध्ये वायर कापलेले दिसते. ज्यामुळे मीटरचे विजमापन होत नाही व मीटरची गती कमी होते. सदर मीटर हे तक्रारकर्ता श्री.रफीक खान हफीज खान पठाण यांच्या नांवाने असून तिथे वास्तव्य करीत असलेले श्री.मोहम्मद इमाम शेख हे त्याचा वापर करीत होते. सदर मीटरची पाहणी करून पंचनामा तयार केल्यानंतर त्यावर तसेच जप्ती पंचनाम्यावर तक्रारकर्त्याचे भाडेकरी व आममुखत्यार श्री.मोहम्मद इमाम शेख यांची सही घेतली आहे. सदर मीटरचे तपासणीमध्ये तक्रारकर्त्याकडील विजमीटर वरील छेडखानीमुळे 41 टक्के मंद झाल्याचे दिसून आले असे दस्त क्र.ब-2 पंचनामा व ब-3 जप्तीनामा मध्ये नमूद आहे. त्यानंतर वि.प.यांनी विज कायदा,2003 चे कलम 126 अन्वये असेसमेंट केले व तक्रारकर्त्यास दि.10.7.2017 रोजीचे रू.63,120/- चे असेसमेंट देयक, कंपाऊंडींग चार्जेस देयक रू.2000/- व मिटर कॉस्ट रू.1500/- असे तीन विजदेयक देण्यांत आले. तक्रारकर्त्याने सदर असेसमेंट देयकाचा दिनांक 17.7.2017 रोजी वि.प.कडे भरणा केलेला आहे. विरूध्द पक्ष यांनी नि.क्र.10 वर दाखल केलेल्या दस्त क्र.ब-2 पंचनामा, ब-3 जप्तीनामा व दस्त क्र.ब-4 ते 10 देयके यावरून वरील प्रकरण विज कायदा,2003 चे कलम 126 ते 135 अंतर्गत विजचोरीशी निगडीत आहे हे निदर्शनांस येते व विजकायदा,2003 अन्वये विजचोरीशी निगडीत प्रकरणे चालविण्यासाठी केवळ विशेष न्यायालयांना अधिकृत करण्यांत आलेले असून त्यावर जिल्हा ग्राहक मंचास निर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र नाही. त्यामुळे मंचाचे मते अधिकारक्षेत्राअभावी प्रस्तुत तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते. मुद्दा क्र. २ बाबत :- 8. मुद्दा क्र. १ च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश |