(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा गोंदीया येथील राईस मिलचा मालक असून तक्रारकर्त्याचे कार्यालयीन कर्मचारी विरूध्द पक्ष महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या परिसरातील राईस मिलच्या आवारात असलेल्या सदनिकेत राहतात. सदरहू सदनिकेमध्ये राहात असलेल्या कर्मचा-यांना विरूध्द पक्ष यांच्याकडून पाणी पुरवठा केल्या जातो. तक्रारकर्त्याचे कार्यालय सुध्दा सदरहू परिसरात असल्याने तो सुध्दा स्वतःकरिता व इतर लोकांकरिता पाण्याचा वापर करतो.
3. तक्रारकर्त्याने त्याची राईस मिल बंद केल्यामुळे व तेथील कर्मचारी सुध्दा इतर ठिकाणी नोकरीकरिता गेल्यामुळे तक्रारकर्त्याने तेथील पाणी पुरवठा डिसेंबर 2012 मध्ये बंद केला. तक्रारकर्त्याने पाणी पुरवठ्याच्या कनेक्शनपोटी वेळोवेळी सुरक्षा ठेवींचा विरूध्द पक्ष यांच्याकडे खालील तपशीलाप्रमाणे भरणा केला होता.
Sr. No. | Particulars of Security Deposit recovered by the Opposite from the Complainant | Amount |
1. | Initial Deposit with agreement at the time o release of water supply | 6600/- |
2. | Bill dated 29.01.97 for the month of January 97. Security Deposit Rs. 2000/- is collected | 2000/- |
3. | Bill dated 28.10.97 for the month of October 97. Security Deposit Rs. 736/- is recovered | 736/- |
4. | Bill dated 08.05.2000 for the month of April 2000. Security Deposit Rs. 1528/- is recovered | 1528/- |
5. | Bill dated 05.04.2003 for the month of March 2003. Security Deposit Rs. 9887/- is recovered | 9887/- |
6. | Money Receipt No. 17763 dated 27.05.2004 Security Deposit Rs. 5496/- is recovered | 5496/- |
7. | Money Receipt No. 000266 dated 06.04.2005 Security Deposit Rs. 3568/- is recovered | 5496/- |
| Total amount recovered from the consumer by the O.P. | 29815/- |
उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून एकूण रू. 29,815/- Security Deposit पोटी भरले होते. तक्रारकर्त्याने सदरहू सुरक्षा ठेव लेखी विनंतीद्वारे दिनांक 09/12/2013 रोजी विरूध्द पक्ष यांचेकडून परत मागितले. त्यावर विरूध्द पक्ष यांनी नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर तक्रारकर्त्याला त्याची सुरक्षा ठेव देण्यात येईल असे कळविले. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सुरक्षा ठेव न देण्याचे कुठलेही संयुक्तिक कारण न कळविल्यामुळे तक्रारकर्त्याने त्याची सुरक्षा ठेव परत मिळण्यासाठी ग्राहक या नात्याने सदरहू प्रकरण नुकसानभरपाईसह मंजूर करण्यात यावे याकरिता न्याय मंचात दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 24/06/2014 रोजी मंचात दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 26/06/2014 रोजी मंचामार्फत नोटीस बजावण्यात आली.
5. विरूध्द पक्ष यांना नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांचा लेखी जबाब सुध्दा त्यांनी सदरहू प्रकरणात दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 19/09/2014 रोजी मंचाद्वारे पारित करण्यात आला.
6. तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणात स्वतः हजर होऊन युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याच्या एम.आय.डी.सी. येथील F-31 या प्लॉटवर विरूध्द पक्ष यांच्याकडून पाणी पुरवठा होत होता. परंतु तक्रारकर्त्याने त्याची राईस मिल बंद केल्यामुळे तक्रारकर्त्याला त्याच्या कर्मचा-याकरिता व स्वतःकरिता पाणी पुरवठ्याची आवश्यकता नसल्यामुळे तक्रारकर्त्याने पाणी पुरवठा बंद केला. तक्रारकर्त्याने संपूर्ण थकित बिल भरले असून त्याबद्दल कुठलाही वाद नाही. तक्रारकर्त्याने वेळोवेळी भरणा केलेली Security Deposit ची रक्कम मिळण्यासाठी विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केले ते सदरहू प्रकरणात दाखल केले आहेत. तसेच विरूध्द पक्ष यांनी दिनांक 08/08/2014 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून कळविले की, तक्रारकर्त्यास नियमाप्रमाणे Security Deposit व्याजासह मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडून मंजूर होऊन आल्यावर देण्यात येईल. तक्रारकर्त्याने सदरहू पत्र पृष्ठ क्र. 20 वर दाखल केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
7. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे व तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. तक्रारकर्त्याची राईस मिल M.I.D.C. परिसरात प्लॉट नंबर F-31 येथे होती व तेथील कार्यालयीन कर्मचारी, तक्रारकर्त्याच्या राईस मिलमध्ये येणा-या लोकांकरिता तसेच तक्रारकर्त्याला स्वतः व त्याच्या व्यवसायाकरिता विरूध्द पक्ष यांच्याकडून पाणी पुरवठा केल्या जात होता. तक्रारकर्त्याने राईस मिल बंद केल्यामुळे पाणी पुरवठ्याचे Security Deposit रू. 29,815/- परत मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केलेला होता. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे Security Deposit भरल्याच्या पावत्या सदरहू प्रकरणात पृष्ठ क्रमांक 12 ते 17 वर दाखल केलेल्या आहेत. त्यावरून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे रू. 29,815/- Security Deposit पोटी भरले आहेत ही बाब सिध्द होते.
9. विरूध्द पक्ष यांनी Security Deposit परत करण्यासंबंधी दिनांक 08/08/2014 रोजी कार्यालयीन पत्र तक्रारकर्त्यास पाठविले होते. त्यामध्ये तक्रारकर्त्याच्या भूखंडावर नवीन नळ जोडणीकरिता नव्याने सुरक्षा ठेव विरूध्द पक्ष यांच्या कार्यालयाकडे दिनांक 06/08/2014 रोजी नवीन ग्राहकाकडून प्राप्त झाल्यामुळे तक्रारकर्त्याचे Security Deposit ची रक्कम या कार्यालयाकडून व्याजासह परत करणे आहे व त्याकरिता योग्य ती कार्यवाही सुरू असून प्रस्ताव विभागीय कार्यालय यांच्याकडे मंजुरी व शोधनाकरिता सादर करण्यात येत आहे असे कळविले आहे अशा आशयाचे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पाठविलेले पत्र पृष्ठ क्र. 20 वर दाखल केले आहे. यावरून विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास Security Deposit ची रक्कम अद्याप परत दिलेली नाही ही बाब सिध्द होते.
10. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे Security Deposit परत मिळण्याबाबत दिनांक 09/12/2013 पासून वारंवार लेखी व तोंडी विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे तसेच तांत्रिक मुद्दे उपस्थित करून तक्रारकर्त्यास त्याचे Security Deposit परत न करणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास पाणीपुरवठ्याच्या Security Deposit ची रक्कम रू. 29,815/- द. सा. द. शे. 9% व्याजासह तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 24/06/2014 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावी.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.