(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
(पारित दि. 31 जानेवारी, 2014)
तक्रारकर्ता येशुराम मार्तंड बडोले यांना विरूध्द पक्ष यांनी मार्च 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंतच्या कालावधीचे विद्युत पुरवठ्याचे देयक दुरूस्त न करून दिल्यामुळे तसेच विरूध्द पक्ष यांच्याकडे विद्युत बिलापोटी जास्तीची भरणा करण्यात आलेली रक्कम विरूध्द पक्ष यांनी समायोजित न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा गोंदीया येथील रहिवासी असून विरूध्द पक्ष ही विद्युत वितरण कंपनी आहे. तक्रारकर्त्याच्या घराची रचना ही तळमजल्यावर दोन खोल्या व वरच्या मजल्यावर 2 खोल्या अशी आहे. दोन्ही मजल्यावर विद्युत पुरवठ्याकरिता स्वतंत्र विद्युत मीटर बसविण्यात आलेले आहेत ज्यांचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे 430010154752 असा असून दुस-या मीटरचा ग्राहक क्रमांक 430010154761 असा आहे. तक्रारकर्त्याचे जुने विद्युत मीटर 9000162125 हे विरूध्द पक्ष यांनी माहे 24/02/2011 रोजी बदलून त्याऐवजी नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर जोडण्यात आले. नवीन मीटरची जोडणी करतांना विजेच्या खांबापासून एकच Service Line देण्यात आली होती. त्यामुळे तक्रारकर्त्याला 430010154752 या विद्युत मीटरचे रिडींग 430010154761 या मीटरवर येऊ लागले. परंतु सदरहू मीटरचा उपयोग नेहमी होत नव्हता व तेथे फक्त तक्रारकर्त्याची मुले बाहेरगावाहून आल्यावर महिन्यातील 1 किंवा 2 दिवस तेथे राहात असल्यामुळे तेवढ्याच कालावधीपुरता विजेचा वापर होत होता.
3. तक्रारकर्त्याने ग्राहक क्रमांक 430010154752 व 430010154761 ची विद्युत देयके ही सारख्याच युनिटप्रमाणे येत असल्यामुळे विरूध्द पक्ष यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार केली. परंतु विरूध्द पक्ष यांनी दोन्ही विद्युत मीटरचे Connection वेगळे करून दिले नाही. विरूध्द पक्ष यांनी 430010154761 चा विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस तक्रारकर्त्याला पाठविली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 14/08/2012 रोजी रू. 8,000/- चा भरणा करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी अतिरिक्त विद्युत आकारणी न थांबविता मागील थकबाकी दर्शविली व विद्युत देयकाचा भरणा करण्याबाबतची नोटीस देऊन विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी सुध्दा दिली.
4. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना सुधारित बिल देण्याची वारंवार मागणी केली. तरी देखील विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सुधरित बिल दिले नाही. तक्रारकर्त्याला ग्राहक क्रमांक 430010154761 या विद्युत मीटरवर फेब्रुवारी 2011 पर्यंत दरमहा 5 ते 6 युनिटचे बिल देण्यात आले व त्यानंतर मार्च 2011 पासून एकत्र जोडणी केल्याने विद्युत वापर नसतांनाही फेब्रुवारी 2012 पर्यंत जास्त युनिट वापराचे बिल देण्यात आले. या बिलापोटी तक्रारकर्त्याने विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून रू. 8,000/- रकमेचा एकत्रित भरणा केला. विरूध्द पक्ष यांनी मार्च 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंत जास्त विद्युत वापराचे बिल दिल्यामुळे ती विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहे.
5. तक्रारकर्त्याचा ग्राहक क्रमांक 430010154761 या विद्युत मीटरचा विद्युत पुरवठा विरूध्द पक्ष यांनी सप्टेंबर 2013 मध्ये खंडित केलेला असून तक्रारकर्त्याने वेळोवेळी मागणी करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सुधारित बिल न दिल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी व नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता सदरहू तक्रार दाखल करण्यात आली आहे.
6. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 17/02/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांना दिनांक 21/02/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 23/04/2014 रोजी दाखल केला.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याचा ग्राहक क्रमांक व त्याच्या घरी 2 विद्युत कनेक्शन आहेत ही बाब मान्य केली. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी दिनांक 24/02/2011 रोजी ग्राहक क्रमांक 430010154761 या क्रमांकाचे मीटर बदलून नवीन विद्युत मीटर कनेक्शन 15054301 लावण्यात आल्याचे लेखी जबाबात कबूल केले. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी लेखी जबाबाच्या परिच्छेद 7 मध्ये कबूल केले आहे की, विद्युत ग्राहक क्रमांक 430010154761 मध्ये दिनांक 14/08/2012 रोजी एकूण बिल रू. 15,938/- पैकी तक्रारकर्त्याने रू. 8,000/- चा भरणा केला. तक्रारकर्त्याने यापूर्वी दिनांक 02/05/2011 रोजी रू. 2,435/- इतक्या रकमेच्या बिलापैकी रू. 480/- चे बिल भरले आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याने 11 महिन्यानंतर आलेल्या बिलापैकी दिनांक 14/08/2012 रोजी फक्त रू. 8,000/- चा भरणा केलेला आहे. तक्रारकर्त्याला देण्यात आलेले बिल हे रिडींगनुसारच देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारकर्त्याकडे सप्टेंबर 2013 ला रू. 10,172/- एवढी थकबाकी असल्यामुळे तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. तसेच थकित बिलाची रक्कम वसूल होईपर्यंत विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करता येऊ शकत नाही असे जबाबात म्हटले आहे.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत नवीन मीटर बसविल्याबाबतच्या पावतीची प्रत पृष्ठ क्र. 12 वर दाखल केली असून विरूध्द पक्ष यांच्या दिनांक 05/07/2012 रोजीच्या नोटीसची प्रत पृष्ठ क्र. 13 वर दाखल केली आहे. त्याचप्रमाणे विरूध्द पक्ष यांच्या दिनांक 21/12/2012, 23/10/2012 रोजीच्या नोटीसच्या प्रती अनुक्रमे पृष्ठ क्र. 14 व 15 वर, तक्रारकर्त्याने अतिरिक्त विद्युत देयकाबाबत विरूध्द पक्ष यांच्याकडे दिनांक 17/08/2011 रोजी केलेल्या तक्रारीची प्रत पृष्ठ क्र. 16 वर, जानेवारी 2011 चे विद्युत देयक पृष्ठ क्र. 17 वर, मार्च 2011 ते डिसेंबर 2011 पर्यंतची विद्युत देयके पृष्ठ क्र. 18 ते 27 वर, फेब्रुवारी 2012 ते जुलै 2012 पर्यंतची विद्युत देयके पृष्ठ क्र. 28 ते 33 वर, मार्च 2013 चे विद्युत देयक पृष्ठ क्र. 34 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9. तक्रारकर्त्याने स्वतः युक्तिवाद केला की, तक्ररकर्त्याचे विद्युत मीटर फेब्रुवारी 2012 रोजी वेगळे केले. विरूध्द पक्ष यांच्या चुकीमुळे तक्रारकर्त्याला ग्राहक क्रमांक 430010154752 चे मीटर रिडींग हे ग्राहक क्रमांक 430010154761 या मीटरवर येत होते. ग्राहक क्रमांक 430010154761 असलेल्या विद्युत मीटरच्या ठिकाणी कुणीही राहात नव्हते. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास मार्च 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंत जास्त युनिट वापराचे बिल दिले. तक्रारकर्त्याने वेळोवेळी बिलामध्ये दुरूस्ती करून नव्याने बिल व statement देण्याची विनंती विरूध्द पक्ष यांच्याकडे केली. परंतु विरूध्द पक्ष यांनी अतिरिक्त बिल आकारून तक्रारकर्त्यास रू. 8,000/- इतक्या रकमेचे जास्त युनिटचे बिल भरणे भाग पाडले. तक्रारकर्ता वापरत नसलेल्या घराच्या विद्युत मीटरची तपासणी करून त्याला सरासरी बिल देण्यात यावे ही तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे केलेली मागणी विरूध्द पक्ष यांनी मान्य न करणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी होय. करिता तक्रारकर्ता नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे.
10. विरूध्द पक्षाचे वकील ऍड. एस. बी. राजनकर यांनी युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याच्या विद्युत मीटरला कुठलीही लूप वायर लावलेली नव्हती. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास रिडींगप्रमाणेच बिल दिलेले असून तक्रारकर्त्याने 11 महिन्यानंतर आलेल्या बिलापैकी दिनंक 14/08/2012 रोजी फक्त रू. 8,000/- चा भरणा केला. तक्रारकर्त्याकडे दिनांक 14/08/2012 रोजी विद्युत मीटर क्रमांक 430010154761 नुसार एकूण थकबाकी रू. 15,938/- इतकी होती. तक्रारकर्त्याने तो वापरत नसलेल्या विद्युत मीटरबद्दलचा कुठलाही पुरावा दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
11. तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब व दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. तक्रारकर्त्याने दिनांक 17/08/2011 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे ग्राहक क्रमांक 430010154761 असलेल्या विद्युत मीटरमध्ये पाणी शिरत असल्यामुळे तो दुस-या जागी बसविण्यात यावा तसेच विद्युत बिल चुकीचे येत असल्यामुळे त्याची नव्याने आकारणी करून द्यावी व अतिरिक्त रकमेचे बिल दुरूस्त करून देण्यात यावे असा अर्ज दिला होता. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या विद्युत ग्राहक क्रमांक 430010154761 असलेल्या विद्युत मीटरचे जानेवारी 2011 च्या देयकामध्ये एकूण वीज वापर 5 युनिट दर्शविला असून फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2010 या कालावधीतील प्रत्येक महिन्याचा विद्युत वापर हा 18 युनिटपेक्षा जास्त नाही. तसेच जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात वापरलेले युनिट सुध्दा अनुक्रमे 5 व 7 आहेत. परंतु मार्च 2011 च्या बिलामध्ये वापरलेले एकूण युनिट हे 130 असल्याचे दर्शविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मार्च 2011 ते डिसेंबर 2011 या कालावधीतील प्रत्येक महिन्यामध्ये वापरलेले युनिट हे जवळपास 200 युनिटच्या वर दाखविलेले आहेत. तक्रारकर्त्याने ग्राहक क्रमांक 430010154761 च्या अनुषंगाने दिनांक 14/08/2012 रोजी एकूण बिल रू. 15,938/- पैकी रू. 8,000/- चा भरणा केला. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास थकित बिलापोटी असलेली एकूण रक्कम तसेच दोन्ही विद्युत मीटरच्या वापरलेल्या युनिटचे Statement व आकारण्यात आलेले बिल याबद्दल कुठलेही Account Statement न दिल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याने सरासरी बिल देण्याची व रक्कम समायोजित करण्याची वेळोवेळी मागणी करूनही विरूध्द पक्ष यांनी ती मान्य न करणे म्हणजे विरूध्द पक्ष 1 व 2 च्या सेवेतील त्रुटी दर्शविते.
13. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने ग्राहक क्रमांक 430010154761 असलेल्या विद्युत मीटरच्या थकित बिलापोटी भरलेली रक्कम समायोजित करावी व त्याचा खंडित केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करून द्यावा असे मंचाचे मत आहे.
करिता खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी ग्राहक क्रमांक 430010154761 असलेल्या विद्युत मीटरवर मार्च 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंतच्या कालावधीतील दरमहा सरासरी वापराप्रमाणे अथवा तक्रारकर्त्याच्या प्रत्यक्ष विद्युत वापरावर विद्युत बिलाची आकारणी करून त्यानुसार तक्रारकर्त्यास सुधारित देयक देण्यात यावे व तक्रारकर्त्याने त्याचा भरणा करावा. तक्रारकर्त्याने रकमेचा भरणा केल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा ग्राहक क्रमांक 4300101514761 चा खंडित केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करावा.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याने विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून भरलेली रक्कम रू. 8,000/- ही तक्रारकर्त्याला देण्यात येणा-या पुढील बिलामध्ये समायोजित करावी.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून तक्रारकर्त्याला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 2,000/- द्यावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.