न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे कसबा बीड, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. वि.प. ही विदुयत कंपनी आहे. तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचा ग्राहक क्र. 266800009391 असा आहे. तक्रारदाराने वि.प. कडून घरगुती वीज कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदाराचे घरी दरमहा अंदाजे 50 ते 60 युनिट वीज वापर होतो. तक्रारदाराने माहे फेब्रुवारी 2015 अखरेची सर्व वीज बीले नियमितपणे वि.प. यांचेकडे भरलेली आहेत. वि.प. कंपनीकडून ग्राहकांना वीजपुरवठा करत असताना काही कामे निष्काळजीपणाने केली जातात. वि.प. ने तक्रारदाराने दि. 2-03-2013 रोजी देयक क्र. 1897 चे वीज बील दिले त्यामध्ये तक्रारदाराने वीज मीटरचे मागील रिडींग 629 असे नमूद केले आहे तर चालू वीज वापर 69 युनिट असे दाखवण्यात आले आहे. तरीही तक्रारदाराचा दरमहा वीज वापर 50 ते 60 युनिट होत असतानाही वि.प. यांनी 69 युनिटचे वीज दिले आहे. सदर बीलाची रक्कम तक्रारदाराने वि.प. यांचेकडे जमा केली आहे. तक्रारदाराने वि.प. चे कर्मचारी व अधिकारी यांना वीज मीटरचे रिडींग व्यवस्थित घेतले जावे अशी वारंवार सुचना देऊनही वि.प. हे अचुक रिडींग न घेता चुकीच्या रिडींगची वीज बीले वारंवार तक्रारादाला दिली आहेत. त्यामुळे तक्रारदाराने दि. 26-05-2015 व दि. 2-06-2015 रोजी स्वतंत्र तक्रार अर्ज देऊन चुकीची वीज देयके दुरुस्त होऊन मिळावीत अशी वि.प. कडे विनंती केली. तसेच वीज मीटरची तपासणी होऊन मिळावी अशी मागणी केली, त्यावेळी वि.प. यांनी दि. 10-07-2015 रोजी टेस्टींग करिता तक्रारदाराचे घरी दुसरी वीज मीटर बसवले व ते मीटर दि. 27-07-2015 रोजी काढले. सदर मीटरच्या कालावधीमध्ये तक्रारदाराचे मीटर 50 युनिट फिरले यावरुन तक्रारदाराचा दररोज 3 युनिटचा वीज वापर होत असलेचे स्पष्ट झाले. परंतु वि.प. ने आजअखेर तक्रारदाराचे घरी जुने सदोष वीज मीटर जोडलेले आहेत. त्यामुळे तक्रारदाराची चुकीची वचीज आकारणी होत आहे. दि. 3-08-2015 रोजीचे वीज बील पाहता त्यामध्ये मागील रिडींग 11 हजार 188 तर चालू रिडींग 14 दिसून येते आणि एकूण वीज वापर 338 युनिट दिसून येतो तर वीज बीलामधील देयकाची रक्कम रु. 57,840/- इतकी अवाजवी व चुकीची दिसून येते.
माहे एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2015 पर्यंत पाठवलेल्या वीज देयकामध्ये नमूद केलेप्रमाणे वीज वापर मुळीच केलेला नाही तरीही वि.प.ने वीज देयके बरोबर असलेबाबत चुकीचे बेकायदेशीर पत्र तक्रारदाराला पाठवून अचुक वापराबाबतची वीज युनिटची बीले देण्यास टाळाटाळ केली आहे. तसेच वीज देयकांची रक्कम भरणेबाबत तक्रारदारवर दबाव आणून वीज पुरवठा खंडीत करणेची धमकी वि.प. तक्रारदाराला देत आहेत. सबब, वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेने तक्रारदाराने या मे. मंचात प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि. प. यांनी तक्रारदाराला माहे मार्च 2015 ते ऑगस्ट 2015 अखेरचे चुकीचे अवाजवी वीज देयके रद्द करण्यात येऊन पूर्वीप्रमाणे सरासरी युनिटसची बीले तक्रारदाराला देण्याबाबत वि.प. कंपनीस आदेश व्हावेत, वि.प. कंपनीने तक्रारदाराचे सदोष मीटर तक्रारदाराचे घरी जोडणेचे आदेश व्हावेत. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5000/- वि.प. कडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
4) तक्रारदाराने या कामी अॅफिडीव्हेट, कागद यादीसोबत अ.क्र. 1 ते 16 कडे तक्रारदाराची वीज बीले, तक्रारदाराने वि.प. कडे दिलेला तक्रार अर्ज, तक्रारदाराने वि.प. ला दिलेले स्मरण पत्र, वि.प. ने तक्रारदाराला दिलेले पत्र, तक्रारदाराची वीज मीटरचा टेस्टींग रिपोर्ट, तक्रारदाराचे दंड व्याज माफ करणेबाबत वि.प.यांना आदेश व्हावेत म्हणून दिलेला अर्ज, वगैरे कागदपत्रे या कामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4) वि. प. यांनी या कामी म्हणणे/कैपिफयत, तक्रारदाराने दंड माफ करणेबाबत दिले अर्जावर म्हणणे वगैरे कागदपत्रे या कामी वि.प.ने दाखल केली आहेत.
वि.प. यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीत तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
(ii) यातील तक्रारदार यांनी ग्राहक वीज बील संबंधात वि.प. कडे अर्ज केलेनुसार तक्रारदाराचे मीटरची तपासणी केली. तपासणीमध्ये तक्रारदाराचे मीटर फॉल्टी नसलेबाबत सहाय्यक अभियंता यांचा अहवाल प्राप्त झालेनंतर तक्रारदाराला वीज मागणी बिलाबाबत पत्र पाठवले असता तक्रारदाराने वीज बील भरणेस असमर्थता दाखवली. त्यानंतर वि.प. कंपनीने तक्रारदार ग्राहकास त्याने वापरलेल्या प्रमाणे वीज बील दिले. सदर तक्रारदाराचे मीटर रिडींग मे 2012 ते फेब्रुवारी 2015 पर्यंतच्या संपूर्ण वापर वि.प.ने तपासला आहे. तपासाअंती लक्षात आले त्याप्रमाणे कंपनीने मीटरची तपासणी व पंचनामा मौजे बीड गावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या समक्ष केला असता तक्रारदाराचा मंजूर भार 1.30 KV इतका असून सदर मीटरमधून त्यांच्या विभक्त असले भावांना म्हणजेच तानाजी महादेव पाटील व शिवाजी महादेव पाटील यांच्या घराकरिता 1.5 KV ची वायर टाकून विदुयत वार करत असलेचे आढळून आले आहे.
(iii) तक्रारदाराने वापरले युनिटचा अभ्यास करता त्यांनी वापरले युनिटपेक्षा कमी युनिटचे वीज बील तक्रारदाराला दिले गेले असून मार्च 2015 पासून युनिटबाबत पाहणी करता तके युनिट तुलनात्मकदृष्टया जास्त वापरलेले दिसते त्यामुळे सदर वापरलेल्या युनिटप्रमाणेच तक्रारदाराला वीज बीले दिलेली आहेत त्यामुळे कोणतीही सेवा त्रुटी वि.प.ने तक्रारदाराला दिलेली नाही. सबब, वि.प. ने दिलेली वीज बीले योग्य व कायदेशीर असून ती भरणेची सर्वस्वी जबाबदारी तक्रारदारची आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार मे. कोर्टात चालणेस पात्र नाही. सबब, तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी असे म्हणणे वि.प. ने दाखल केले आहे.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे यांचा उहापोह करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 व 2 –
6) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे. कारण तक्रारदाराने वि.प. यांचेकडून घरगुती वापरासाठीचे वीज कनेक्शन घेतले असून सदर वि.प.यांचेकडून येणारी वीज बीले तक्रारदाराने वि.प. कडे वारंवार जमा केली आहेत ही बाब वि.प.ना मान्य व कबूल आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे. तसेच तक्रारदाराचे विनंतीवरुन वि.प.ने तक्रारदाराचे वीज मीटरची तपासणी केली व दुसरे मीटर बसवून टेस्टींग केले टेस्टींग रिपोर्टप्रमाणे तक्रारदाराने मीटरमध्ये कोणताही दोष नसलेले लक्षात आले तसा टेस्टींग रिपेार्ट वि.प. यांनी दिला तो या कामी दाखल आहे. त्यामुळे जेवढे युनिट तक्रारदाराने वापरलेले आहेत त्याप्रमाणेच वीज बीले तक्रारदाराला वि.प. ने दिली आहेत. परंतु सदरची वीज बील तक्रारदार भरणेस असमर्थ असलेने तक्रारदाराने ती वि. प. कडे जमा केली नाही त्यामुळे वि.प. यांनी थकीत असले प्रत्येक वीज बीलावर दंड व्याज आकारलेचे स्पष्ट होते. प्रस्तुत दंड व्याज अवाजवी असलेने ते रद्द करावे असा तक्रारदाराने अर्ज दिला आहे. तसेच वि.प. यांनी वादातीत वीज बीलांची सर्व रक्कम वि.प. कडे जमा करणेबाबत तक्रारदाराला आदेश व्हावेत असा अर्ज या कामी दिला आहे. प्रस्तुत अर्जावर तक्रारदाराने म्हणणे घेऊन तक्रारदाराने रक्कम रु. 50,000/- विज बीलापोटी वि.प. कडे जमा करणेचे आदेश मे. मंचाने केले आहेत. सदर आदेशाप्रमाणे तक्रारदाराने दोन टप्प्यात सदर रक्कम रु. 50,000/- वि.प. यांचेकडे अदा केली आहे ही बाब वि.प. यांना मान्य व कबूल आहे.
या कामी तक्रारदार ने थकीत वीज बीलांवरील दंडव्याज माफ करुन मागीतले आहे. मे. मंचास असले अधिकारानुसार व तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केले प्रमाणे तक्रारदाराने जाणीवपुर्वक वीज बीले देणेचे टाळलेले नसून प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा जास्त युनिट वीज बीलामध्ये नमूद करुन वीज बीले दिलेली असलेने तक्रारदाराने ती भरलेली नाहीत. मात्र वि.प.ने म. मंचात दिले वीज बील भरलेबाबत तक्रारदाराला आदेश होणेसाठी दिले अर्जावरील आदेशाप्रमाणे तक्रारदाराने रक्कम रु. 50,000/- (थकीत वीज बीलापैकी) वि.प. यांचेकडे अदा केली आहेत. यावरुन तक्रारदाराने जाणीवपूर्वक वीज बीले देणे टाळलेले नाही हे स्पष्ट होते. तक्रारदाराच्या अडचणी लक्षात घेता व मे. मंचाच्या असले अधिकार Discration of Court नुसार तक्रारदाराचे थकीत वीज बीलांवर वि.प. ने आकारलेले दंडव्याज रद्द करणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणे योग्य व न्यायोचीत वाटते. परंतु वि.प. ने केले मीटर टेस्टींग रिपोर्टमध्य तक्रारदाराचे विदुयत मिटरमध्ये कोणताही दोष नसलेचे स्पष्ट होते. त्यामुळे मीटर बदलून देणेची आवश्यकता नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) तक्रारदार यांचे वादातीत वीज बिलांवर वि.प. यांनी आकारलेले दंड व्याज रद्द करणे.
3) नियमितपणे वीजमीटर वरील रिडींग नुसारच/वापरलेल्या युनिटचेच वीजबील वि.प. तक्रारदाराला दयावे.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.