::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08/01/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्ते हे मौजे भौरद ता.जि. अकोला येथील मुळ रहीवासी असून तक्रारकर्ते यांच्या मालकीची शेती, अनुक्रमे गट क्र. 361, 1 हे.63 आर व गट क्र. 361 मधील 1 हे 62 आर आहे. सन 2013 च्या खरीप हंगामाकरिता तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निर्मित केलेले सोयाबिन जे.स. 335 व जे.एस. 9560 या वाणाचे बियाण्यांच्या विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानातून 4 बँग बियाणे दि. 14/6/2013 रोजी रु. 6400/- ला विकत घेतले. तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या दुकानातून विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निर्मित केलेले सोयाबिनच्या 4 बँग बियाणे रु. 5520/- देवून दि. 14/6/2013 रोजी विकत घेतले. सदरहू बियाण्याची पेरणी तक्रारकर्त्याने आपल्या शेतात दि. 22/6/2013 रोजी केली. परंतु पेरणी नंतर बराच अवधी होवून देखील बियाणे उगवले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे दि. 28/6/2013 रोजी लेखी तक्रार केली. त्यास अनुसरुन तालुका कृषी अधिकारी, अकोला यांनी दि. 2/7/2013 रोजी तकारकर्त्याच्या वर नमुद शेताला तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीसह भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. सदर चौकशी समितीने आपला अहवाल दि. 3/7/2013 रोजी दिला असून त्यामध्ये असा निष्कर्ष काढला की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्पादित केलेले व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी विक्री केलेले जे.एस.335 व जे.एस.9560 प्रमाणित लॉट क्र. ओसीटी 12-12-920-48902ए बियाणे सदोष होते व त्यामुळे तक्रारकर्त्याचे अनुक्रमे 1.62 हे.आर व 1.63 हे.आर. क्षेत्रावरील बियाण्याची केलेली लागवड बाधीत झाल्याचे मत दिले. विरुध्दपक्षाच्या सदोष बियाण्यामुळे तक्रारकर्ते यांना प्रचंड आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान पोहचले आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना दि. 14/8/2013 रोजी रजीस्टर पोष्टामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु विरुध्दपक्षाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारकर्ते यांनी प्रस्तूत तक्रार मंचासमोर दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सदोष बियाणे उत्पादीत केल्याबाबत व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी सदोष बियाण्याची तक्रारकर्त्याला विक्री केल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी नुकसान भरपाईपोटी रु. 2,40,320/- तक्रारकर्ते यांना द्यावे. तसेच तक्रारकर्ते यांना न्यायिक खर्चापोटी रु. 10,000/- विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 8 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लेखीजवाब दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारकत्यांचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,…
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत सोयाबीन जे.एस. 9560 ह्याच्या बद्दल तक्रार केली आहे, परंतु सदर वाण हे सिटी ॲग्रो प्राय.लि. ख्ंडवा यांनी उत्पादित केलेले असून विरुध्दपक्ष हे त्यांचे फक्त विक्रेता आहे. तक्रारकर्त्याने जे.एस. 335 व जेएस.9560 सोबत लागवण केल्याचे दिसते, त्यामुळे कोणते बियाणे उगवले किंवा कसे हे सांगणे शक्य नाही. समितीने दिलेल्या अहवालानुसार 55 ते 60 टक्के उगवणे झाल्याचे आढळले. चौकशी समितीने तक्रारकर्त्याच्या दोन्ही शेतात केलेल्या पाहणीचे वेगवेगळे अहवाल दिल्याचे दिसून येते. त्यांनी दिलेल्या दुस-या अहवालानुसार 60 ते 66 टक्के उगवणे झाल्याचे नमुद केलेले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही अहवालाचे अवलेाकन केल्यावर हे स्पष्ट होते की, बियाण्याची उगवण झालेली होती. जास्त पावसामुळे तक्रारकर्त्याला उत्पादन कमी झाले असल्याबद्दलची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणात बियाणे तक्रार निवारण समितीने, शासन परिपत्रकाद्वारे दिलेल्या कार्यपध्दतीचे पालन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सदरहू समितीचे निष्कर्ष की बियाणे सदोष आहे, हे ग्राह्य धरता येत नाही. बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्ते यांनी पेरलेल्या बियाण्यांचे जे उत्पन्न झाले आहे ते समाधानकारक आहे. समितीद्वारे शेताची पाहणी केली असता तेथे त्यांना उगवण झाल्याचे दिसून आले, परंतु तक्रारकर्ते यांनी त्यांना झालेल्या उत्पन्नाची माहिती वि. मंचापासून जाणूनबुजून लपवून ठेवलेली आहे. विरुध्दपक्षाने याच लॉट नंबरचे बियाणे दुस-या शेतक-यांना सुध्दा विकलेले आहे व या बद्दल कोणाकडूनही कसलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. शेतात बियाण्याची पेरणी केल्यानंतर बियाण्याची उगवण अनेक मुद्यांवर अवलंबून असते, जसे की शेताची पोत, शेताची करण्यात आलेली तयारी, योग्य पाऊस, पेरणीची पध्दत, मशागत, हवामान ईत्यादी. बियाण्याच्या दोष तपासणीकरिता सदर बियाणे प्रयोगशाळेमध्ये तपासणे आवश्यक आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 ने उत्पादित केलेले बियाणे हे विविध चाचण्या होवून बाजारामध्ये विक्री करिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी लेखीजवाब दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारकत्यांचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,…
तक्रारकर्ता क्र. 1 यांनी विरुध्दपक्षाकडून नमुद बियाणे खरेदी केले नाही म्हणून तक्रारकर्ते क्र. 1 हे विरुध्दपक्ष क्र. 2 चे ग्राहक नाहीत. तक्रारकर्ते क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 मार्फत निर्गमित केलेल्या एकूण आठ बियाण्यांच्या पिशव्या दोन वेगवेगळया लॉटचे बियाणे दोन वेगवेगळया दुकानदाराकडून खरेदी केलेले असल्याने त्याच्या शेतामध्ये कोणत्या लॉटचे बियाणे पेरले, हे स्पष्ट होऊ शकत नाही. तक्रारकर्ता क्र. 2 ने दि. 29/6/2013 रोजी कृषी अधिका-याकडे तक्रार दाखल केली असतांना, कृषी अधिकारी यांनी तक्रारकर्ता क्र. 1 च्या नावाने सुध्दा वेगळा अहवाल सादर केला आहे. तक्रारकर्ता क्र. 1 यांनी कोणत्या लॉट नंबरचे बियाणे पेरले व तक्रारकर्ता क्र. 2 यांनी कोणत्या लॉट नंबरचे बियाणे पेरले, याचा सविस्तर तपशिल दिलेला नाही व तसे तालुका कृषी अधिकारी, चौकशी समिती यांनी त्यांच्या अहवालात नमुद केलेले आहे. तक्रार निवारण समितीमध्ये पांच सदस्य असतात, परंतु दि. 2/7/2013 रोजी सर्व पाच सदस्य उपस्थित असल्याबाबत कोणताही पुरावा नाही. वास्तविक सदर अहवाल तक्रारकर्ता क्र. 2 चे सांगण्यावरुन कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात बसून तयार केलेला आहे. सन 2013 मध्ये ससरासरीपेक्षा जास्त पाऊस पाडल्या कारणाने त्या वर्षी ब-याच शेतक-यांचे बियाणे उगवता खराब झाले. या बाबत कृषी अधिकारी, अकोला यांनी अहवालात उल्लेख केलेला नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारीत नमुद वाणाचे बियाणे सन 2013 च्या हंगामात जवळपास 50 टन बियाणे विकलेले आहे, परंतु कोणत्याही शेतक-याने त्या बाबत न उगवल्याची तक्रार केलेली नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट दर्शविलेली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसून ती खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 3 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र.. 3 यांनी लेखीजवाब दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,…
विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत विक्रेते असून विरुध्दपक्ष क्र. 1 हे बियाण्याचे निर्माते आहेत व त्यांच्याकडून येणा-या सिलबंद, प्रमाणीत बियाणे विक्रीचा व्यवसाय करतात. विरुध्दपक्ष क्र. 3 कडून घेतलेले बियाणेच पेरले गेले आहे, हे सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सन 2013-14 मध्ये विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे शासनातर्फे शेतक-यांना नुकसान भरपाई दिल्या गेली होती. पेरणीच्या काळात सतत पाऊस सुरु होता व त्यामुळे पिकाचे नुकसान झाले. तसेच तक्रारकर्त्याने कशा प्रकारे मशागत केली, या बाबत तक्रारीत कोठेही उल्लेख नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहीत खारीज करण्यात यावी.
सदर लेखी जबाब, विरुध्दपक्षांनी शपथेवर दाखल केला आहे व त्यासोबत दस्तएवेज दाखल केलेले आहेत.
3. त्यानंतर तक्रारकर्ता क्र. 2 यांनी शपथेवर पुरावा दाखल केला व व उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांचे लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्तर व शपथेवर पुरावा व उभय पक्षांचा युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारीत केला, तो येणे प्रमाणे….
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी त्यांच्या शेत- जमीनीमध्ये पेरणी करण्याकरिता विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याद्वारे निर्मित केलेले सोयाबिनचे जे.एस. 335 व जे.एस. 9560 या वाणाच्या बियाण्यांची विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या दुकानातून 4 बॅग व विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या दुकानातून 4 बॅग, दोन्ही मिळून एकंदर रु. 11,920/- देवून विकत घेतले होते. त्यानंतर सदरहू बियाण्याची पेरणी दि. 22/6/2013 रोजी शेतात केली, परंतु बराच अवधी झाला तरी देखील बियाणे उगवले नाही, त्यामुळे तक्रारकर्ते यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन तसा अहवाल दि. 3/7/2013 रोजी दिला. या अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी विक्री केलेले वरील लॉटचे बियाणे सदोष होते. त्यामुळे तक्रारकर्ते यांचे गट क्र. 361 मधील अनुक्रमे 1.62 आर व 1.63 आर क्षेत्रावरील बियाण्यांची केलेली लागवड बाधीत झाली, म्हणून तक्रारकर्ते यांचे नुकसान झालेले आहे.
यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांच्या तकारीमधील सोयाबिन जे. एस. 9560 हे वाण सिटी ॲग्रो प्राय.लि. खंडवा यांनी उत्पादीत केलेले आहे व विरुध्दपक्ष क्र. 1 हे फक्त त्यांचे विक्रेता आहेत. तक्रारकर्ते यांनी जे.एस. 335 व जे.एस. 9560 सोबत लागवण केल्याचे दिसते, त्यामुळे कोणते बियाणे उगवले किंवा नाही, हे सांगणे शक्य नाही, शिवाय हाच मुद्दा तालुका तक्रार निवारण समितीने त्यांच्या अहवालात घेतला आहे व दोन्ही अहवालानुसार उगवण ही 55 ते 60 टक्के तसेच 60 ते 66 टक्के झाल्याचे नमुद आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार योग्य नाही. बियाण्याची उवगवणशक्ती किंवा ते सदोष आहे किंवा कसे, हे पाहून सांगता येत नाही, त्यासाठी सदरहू बियाणे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवून त्या अहवालानुसार निर्णय द्यावा लागतो. शेतीची पाहणी करण्याचे अधिकार फक्त जिल्हा स्तरीय समितीला आहे व शासन निर्णयाद्वारे घालून दिलेल्या पध्दतीनुसार शेताची पाहणी करावी लागते. परंतु या प्रकरणात अशा प्रकारे कार्यवाही झाली नाही. विरुध्दपक्षाचे हे बियाणे महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापीत करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत प्रमाणीत केलेले आहे व प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्ते यांना बियाण्याचे उत्पन्न झालेले आहे, त्यामुळे ही नुकसान भरपाई कोणत्या आधारावर मागीतली, हे तक्रारकर्त्यांनी स्पष्ट केलेले नाही. सबब तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 च्या युक्तीवादानुसार, तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांच्या नावे शेती सामाईक नाही तर वेगवेगळी आहे. त्यामुळे दोघांनी एकत्रितपणे दाखल केलेली तक्रार तरतुदीला अनुसरुन नाही. तक्रारकर्ते क्र. 1 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून बियाणे खरेदी केले नाही. त्यामुळे ते ग्राहक नाही. तक्रारकर्ते क्र. 2 यांनी या विरुध्दपक्षाकडून सोयाबिन जे.एस.335 हे खरेदी केले आहे. जे.एस.9560 या वाणाचे बियाणे विरुध्दपक्ष क्र. 2 कडून खरेदी केले नाही. तक्रारकर्ता क्र. 2 यांनी एकट्याने एकूण 8 बियाण्यांच्या पिशव्या दोन वेगवेगळया लॉटचे बियाणे, दोन वेगवेगळया दुकानदाराकडून खरेदी केले आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या शेतामध्ये कोणत्या लॉटचे बियाणे पेरले, हे स्पष्ट होवू शकत नाही, ही बाब तालुका कृषी अधिकारी, चौकशी समिती यांनी त्यांच्या अहवालात देखील नमुद केली आहे. हा अहवाल समितीने तक्रारकर्त्याच्या सांगण्यावरुन कार्यालयात बसून तयार केला आहे. तसेच सन 2013 च्या जुन महिन्याच्या शेवटी व जुलै महिन्याच्या पहील्या पंधरा दिवसात अकोला जिल्ह्यात सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे हे देखील कारण दुबार पेरणीचे होवू शकते.
विरुध्दपक्ष क्र. 3 च्या युक्तीवादानुसार, विरुध्दपक्ष क्र. 3 हे बियाणे विक्रेते आहेत. त्यामुळे ते, बियाणे आहे त्या स्थितीत विकण्याचा व्यवसाय करतात. सबब त्यांची या प्रकरणात कोणतीही सेवेतील न्युनता नाही. तसेच सन 2013-14 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शासनातर्फे कास्तकारांना नुकसान भरपाई दिली आहे. तसेच सततच्या पावसामुळे देखील बियाण्याच्या उगवण शक्तीवर परिणाम झाला आहे
तक्रारकर्ता व सर्व विरुध्दपक्ष यांचा हा युक्तीवाद ऐकूण, रेकॉर्डवर दाखल असलेले दस्तऐवज मंचाने तपासले तेंव्हा असे निदर्शनास आले की, रेकॉर्डवर दाखल असलेल्या बियाणे खरेदीच्या पावत्या या तक्रारकर्ता क्र. 2 च्या नावे आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 हे “ ग्राहक” या संज्ञेत बसत नाही. तसेच शेतीचा जो सातबारा उतारा रेकॉर्डवर दाखल आहे, त्यात तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांची शेती गट क्र. 361 मध्ये वेगवेगळी आहे व तक्रारकर्त्यांनी जे.एस. 335 व जे.एस.9560 या बियाण्याची सोबत लागवड केल्याचे दिसते. त्यामुळे नेमकी कोणत्या बियाण्याची उगवण कमी झाली, हे समजत नाही. कारण तालुका तक्रार समिती, अकोला यांच्या चौकशी अहवालात देखील असे नमुद आहे की,…
“ उपरोक्त बियाणेची पेरणी दि. 22/6/2013 रोजी केल्याचे शेतक-यांनी सांगितले. तथापि त्यांचे स्वत:चे 1.63 हे क्षेत्रावर व त्यांचे वडीलांचे नावे असलेल्या 1.62 हे. क्षेत्र असे एकूण 3.25 सामाईक क्षेत्रामध्ये उपरोक्त दोन वाण नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये पेरलेले आहे याचा सविस्तर तपशिल तक्रारदार शेतक-यांच्या प्रतिनिधीला देता आला नाही.”
तसेच या अहवालावरुन असाही बोध होतो की, तालुका तक्रार निवारण समितीने दोन अहवाल दिलेले आहे व दोन्ही अहवालात बियाणे 55 ते 60 /66 टक्के उगवले आहे, असे नमुद आहे. त्यामुळे बियाण्याची उगवण झाली नाही, हे तक्रारकर्त्याचे कथन योग्य नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सोयाबिन जे.ए.9560 लॉट नं. 48902 चा मध्य प्रदेश राज्य बिज प्रमाणीकरण संस्थेचा मुक्तता अहवाल रेकॉर्डवर दाखल केलेला आहे. हे वाण सिटी ॲग्रो प्राईवेट लिमिटेड, खंडवा (म. प्र.) यांचे उत्पादित केलेले असून, या प्रमाणपत्रातील नमुद क्षमतेनुसार तक्रारकर्ते यांना पेरलेल्या बियाण्यापासून उत्पन्न झाले होते, असे समिती अहवालावरुन दिसून येते. तक्रारकर्ते यांनी दोन्ही सोयाबिन वाणाची एकत्रित लागवड केल्यामुळे व त्यातील सोयाबिन जे.एस. 9560 चे योग्यता प्रमाणपत्र रेकॉर्डवर असल्यामुळे, तसेच अहवालात नमुद 55 ते 66 टक्के उगवण इ. निष्कर्ष तक्रारकर्त्याच्या विरोधात जातात. तसेच तक्रारकर्त्याचे कथन असे आहे की, त्याने पेरलेल्या काळात जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे जास्त पावसामुळे देखील तक्रारकर्त्याला उत्पादन कमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत मागीतलेली नुकसान भरपाई कोणत्या आधारावर मागीतली, त्याची स्पष्टोक्ती तक्रारीत नमुद केली नाही अथवा ती बाब सिध्द केली नाही. अशा सर्व परिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत न्यायमंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
( कैलास वानखडे ) (श्रीमती भारती केतकर ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्य सदस्या अध्यक्षा
AKA जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला