ग्राहक तक्रार क्र. : 139/2014
दाखल तारीख : 08/07/2014
निकाल तारीख : 17/10/2015
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. धिरज पि. दयानंद मुठाळ,
वय - 11 वर्ष,
2. सुरज पि. दयानंद मुठाळ,
वय-08 वर्षे,
अ.पा.क. आजोबा, बाबुराव विठठोबा मुठाळ,
वय-55 वर्षे, धंदा शेती,
रा.बरमाची वाडी ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. महाराष्ट राज्य,
महाबीज महामंडळ मर्यादीत,
कृषी नगर अकोला,
2. तालूका कृषि अधिकारी, कळंब,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद.प ससयससव्यवस्थापक ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. एस.एस.निकम.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री. ए.एन.देशमुख.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री.स्वत:.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) क्र.2 बिज पुरवठादार यांचे मार्फत बीज उत्पादक संस्था विप क्र.1 यांनी उत्पादन केलेले परभणी मोती रब्बी ज्वारीची पीक घेऊन पेरले असता उत्पादन आले नाही व विप यांनी दोषयुक्त माल पुरविल्यामुळे भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ते (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे.
1. तक हे मौजे बरमाचीवाडी ता. कळंब जि. उस्मानाबादचे रहिवासी असून त्यांनी बागायत जमीन गट क्र.386 मध्ये 80 आर क्षेत्रावर ज्वारी मोती याची पेरणी केली. त्यासाठी 18:46 व युरिया 50 किलो प्रत्येक एकरी अशी दोन एकर पेरणी केली, तसेच एकरी 10 गाडया शेणखत घालून तक नी पुर्व मशागत करुन पेरणीकरीता आवश्यक गोष्टी करुन रब्बीसाठी शेत तयार केले. पेरणी केली व आवश्यक ती काळजी घेतली मात्र. सदर परभणी मोती उगवणी ऐवजी हायब्रीडची उगवण झाली. म्हणून सदर भेसळ उगवणीबाबत कृषी अधिकारी उस्मानाबाद यांनी पाहणी केली असता 100 टक्के संकरित ज्वारीची भेसळ असल्याने नुकसानीचे प्रमाणे 100 टक्के आहे असा तपासणी अहवाल दिला.
2. ज्वारीचा बाजार भाव रु.2,000/- क्विंटल ने 10 पोत्याचे रु.20,000/- व कडबा शेकडा 1000/- प्रमाणे 10,000/- अशी एकरी रु.30,000/- चे नुकसान झाले. तसेच इतर खर्च व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व दाव्याचा खर्च रु.7,000/- असे मिळून रु.84,000/- चे नुकसान भरपाई पोटी मिळावे अशी विनंती केली आहे.
3. तक यांनी तक्रारीसोबत बियाणे खरेदी पावती, सातबारा नमूना सात, पिक पेरा प्रमाणपत्र, बियाणे व निवीष्ठा वाटप शेतकरी निहाय यादी, कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे बाजारभाव प्रमाणपत्र, कृषि अधिकारी यांचा पाहणी अहवाल, इ. कागदपत्रांच्या प्रती तक्रारीसोबत दाखल केले आहे.
4. सदर तक्रारी बाबत विप क्र.1 यांना नोटीस पाठवली असता त्यांनी आपले म्हणणे दि.27/04/2015 रोजी दाखल केले असून ते थोडक्यात खालीलप्रमाणे.
विप क्र. 2 हे शासनचे आदेशाचे पालन व अंमलबजावणी करणारा अधिकारी असल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण चालू शकत नाही. महाराष्ट्र शासनाने महामंडळाकडून बियाणे खरेदी केल्यामुळे महामंडळाचा बियाणे वाटपा मध्ये अथवा विक्री मध्ये कसलाही संबंध राहिलेला नाही. शासनाच्या मदत योजने अंतर्गत अनुदानावर बियाणे घेतलेले आहे. अर्जदार महामंडळाचा ग्राहक होऊ शकत नाही. म्हणून या विप ची जबाबदारी येत नाही. हंगामाचे वेळी पाऊस न पडल्याने व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने मदत दिलेली आहे व अर्जदाराने ती स्विकारलेली आहे. कायदा 1966 चे अधिन राहून सुधारीत ज्वारी परभणी मोती (imp.jowar SPV-1411 लॉट क्र.MAR-13-13-250101059 आणि 1052 चे बियाणे म.रा. बिज प्रमाणिकरण यंत्राणा यांचेकडून प्रमाणित करुन घेतले आहे. तक ने झालेला खर्च व येणारे उत्पादन अवास्तव दाखल आहे. म्हणून तक यांची तक्रार खोटी असून मंचाची दिशाभुल केली असल्याने फेटाळणे योग्य आहे असे नमूद केले आहे.
5. सदर तक्रारी बाबत विप क्र.2 यांना नोटीस पाठवली असता त्यांनी आपले म्हणणे दि.20/09/2014 रोजी दाखल केले असून ते थोडक्यात खालीलप्रमाणे.
विप क्र.2 ने दि.08.01.2015 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे कोरडवाहू शेती अभियाना अंतर्गत कृषि खात्याच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 2013-14 चे रब्बी हंगामात बरमाची वाडी येथील शेतक-याची निवड करण्यात आली होती. जिल्हा कृषी अधिकारी यांचे आदेशानुसार ‘‘परभणी मोती’’ बियाण्याचा पुरवठा करणे बाबत जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ उस्मानाबाद यांना आदेश देण्यात आला होता. तक यांना गट क्र.43 मध्ये पेरण्यासाठी बियाणे लॉट नबर 1059 पैकी देण्यात आले होते व त्याने गट क्र.386 मध्ये पेरणी केली होती. तालुका स्तरीय तक्रार समितीने पंचनामा केला असता 100 टक्के संकरीत ज्वारी आढळून आली व 100 टक्के नुकसान झालेले होते. असे नमूद केले आहे.
6. तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुददे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी दिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. तक ची ही तक्रार ग्राहक तक्रार होते काय ? होय.
2. विप ने दोषयुक्त बियाण्याचा तक ला पुरवठा केला काय ? होय.
3. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय,अंशतः
4. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 :
7) तक ने बियाणे खरेदीची पावती हजर केलेली नाही. मात्र तक ना विप क्र.1 चे बियाणे मिळाले ते त्यांनी पेरले हे विप क्र.1 ने नाकबूल केलेले नाही. शासना तर्फै ज्यांना बि वाटप झाले त्यांचे यादीत तक ची नांवे आहेत. विप क्र.2 ने आपल्या म्हणण्यामध्ये असे कथन केले की, अज्ञान तक चे आजोबा बाबूराव विठोबा मुठाळ यांना बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यांनी आपला नातू यांचे गट नंबर 386 मध्ये पेरणी केली. बियाणे बाबूराव यांना गट नंबर 43 मध्ये पेरण्यासाठी दिलेले होते. प्रकल्प लाभार्थी शेतक-यांची यादी हजर केली आहे. त्यामध्ये दोन्ही तक ची नांवे आहेत. मात्र त्यांचे गट नंबरची नोंद नाही. बहुतांशी शेतक-याच्या गट नंबरची नोंद करण्यात आली आहे. या यादीत बाबूराव यांचे नांव नाही. गट नंबर 43 चा उतारा हजर करण्यात आलेला नाही. बाबूराव यांनी प्रस्तूतची तक्रार अज्ञान तक तर्फे अपाक म्हणून हजर केली आहे. त्यामुळे बियाण्याचा उपभोग घेणारे हे तक च होते हे दिसून येत आहे. पिक पेरा प्रमाणपत्रात ज्वारी पेरल्याची नोंद केलेली आहे. या पुराव्यावरुन तक यांनाच जमिनीत पेरण्यासाठी बियाणे देण्यात आले हे दिसून येत आहे. ही योजना शासनामार्फत होती व शासना मार्फत शेतक-यांना विप क्र.1 चे बियाणे खरेदी करुन कोरडवाहू प्रकल्प शेती अभियान या अंतर्गत दिलेले होते. म्हणजेच तक हे लाभार्थी होते त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (बी) प्रमाणे ते ग्राहक या संज्ञेत येतात. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र.2 व 3 ः-
8. तक चे म्हणण्याप्रमाणे त्यांनी गट नंबर 286 मध्ये 80 आर क्षेत्रावर दि.13.9.2013 रोजी बि पेरले त्यांची चांगल्या प्रकारे उगवण झाली. दि.7.1.2014 रोजी पाहणी केली असता 100 टक्के संकरीत ज्वारी उगवल्याचे आढळून आले. हे खरे आहे की, तलाठयाने पिक पेरा प्रमाणपत्र दि.25.4.2014 चे दिले आहे. गट नंबर 386 मध्ये सन 2013-14 चे रब्बी हंगामात ज्वारी पेरल्याचे लिहीले आहे व क्षेत्र 80 आर दाखवले आहे. मात्र ज्वारी या शब्दा मागे संक असा शब्द लिहून त्यावर रेघा मारल्याचे दिसते. संक यांचा अर्थ संकरीत असा होऊ शकतो. मात्र तलाठयाने या अक्षरावर रेघा मारल्या आहेत. शिवाय संकरीत ज्वारी रब्बी पिक म्हणून कसे काय पेरले असेल यांचा खुलासा होत नाही. संकरीत ज्वारी ही खरीप पिक असल्याचे सर्वज्ञात आहे. रब्बी मध्ये असे पिक येऊ शकते. याबद्दल काहीही माहीती नाही. कदाचीत संकरीत ज्वारीप्रमाणे पीक दिसल्यामुळे तलाठयाने अशा प्रकारचा दाखला देण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र त्यावर तलाठी ठाम होता असे दिसून येत नाही.
9. रब्बी ज्वारीची कणसे फुगीर असतात. तसेच पिकाची उंची जास्त असू शकते. यावरुन संकरीत रब्बी ज्वारी या पिकातील फरक समजून येऊ शकतो. तक ची तक्रार अशी आहे की, रब्बी ज्वारीचा मोती हा वाण पेरण्यासाठी त्यांना मिळाला. त्यांनी बियाणे पेरले असता संकरीत बियाणे उगवून आल्याचे दिसून आले. अशा प्रकारे भेसळयूक्त बियाणे विप कडून मिळाले अशी तकची तक्रार आहे. त्याबाबत तलाठयाचे प्रमाणपत्रामुळे पूष्टी मिळते.
10. तक्रार निवारण समितीचे दि.7.1.14 चे पाहणी अहवालाप्रमाणे लागवड क्षेत्र 40 आर. + 40 आर. मध्ये 100 टक्के संकरीत ज्वारी आढळून आली. विप क्र.2 च्या पत्राप्रमाणे तक चे 100 टक्के नुकसान झाले. कारण 100 टक्के संकरीत ज्वारीची भेसळ असलेले बियाणे विप क्र.1 मार्फत तक ला देण्यात आले होते. यावरुन विप क्र.1 ने सदोष बियाणे पुरवल्याचे हे सिध्द होते आहे.
11. तक चे म्हणण्याप्रमाणे एकरी रु.30,000/- ज्वारीचे नुकसान झाले. दर एकरी 8 क्विंटल उत्पन्न धरले व भाव रु.2,000/- प्रति क्विंटल धरला तर ज्वारीचे एकूण नुकसान रु.32,000/- एवढे येते. तक चे म्हणण्याप्रमाणे मशागत व शेणखत यांचा खर्च रु.15,000/- झाला होता. तसेच कडब्याचे नुकसान 2000 पेंडयाचे रु.10/- पेंडी प्रमाणे रु.20,000/- चे झाले. 16 क्विंटल ज्वारी साठी साधारणपणे 1600 कडबा पेंडया जरुरी असतात. प्रति पेंडी रु.5/- प्रमाणे कडब्याचे रु.8000/- चे नुकसान झाले. झालेल्या पिकातून शेतक-याला खर्च वजा जाता नफा मिळतो व त्यांलाच शेतक-याचे उत्पन्न म्हटले जाते. एकदा पिकाची किंमत दिल्यानंतर पुन्हा खर्चाची रक्कम त्यामध्ये वाढवणे जरुरी नसते त्यामुळे एकूण भरपाई रु.40,000/- मिळण्यास तक पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुददा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 ने तक क्र.1 यांला रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) व तक क्र.2 यांला रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) नुकसान भरपाई 30 दिवसाचे आंत द्यावी, न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 दराने रक्कम फिटेपर्यत व्याज द्यावे
3. विप क्र.1 यांनी तक क्र.1 यांला तक्रारीचा खर्च रु.2,500/- (रुपये दोन हजार पाचेश फक्त) व तक्र क्र.2 याला तक्रारीचा खर्च रु.2,500/-(रुपये दोन हजार पाचशे फक्त्) द्यावा.
4. विप क्र.1 अगर शसनामार्फत तक ला पुर्वी भरपाई मिळाली असेल ती रक्क्म मुळ रक्कमेतून वजा करण्यात यावी.
5. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.