निकालपत्र
(दिनाक 16-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार क्रमांक 1 व 5 हे शेतकरी असून शेतीतून होणा-या उत्पन्नातून आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. अर्जदार क्र. 1 व 5 हे एकाच कुटूंबातील सदस्य आहेत व एकत्र कुटूंबात राहतात. अर्जदार यांचे नावे मौजे कांजाळा, ता. लोहा जि. नांदेड येथे खालील प्रमाणे शेत जमीन आहे.
अ. क्र. अर्जदाराचे नांव गट क्रमांक क्षेत्र
1. लालू पिता मेहरबान जाधव, 105,141,18,36 2 हे 34 आर
2. बालाजी पिता मेहरबान जाधव, 104,105,141,209,36 2 हे 92 आर.
3. शिवाजी पिता मेहरबान जाधव, 105,141,30,36 2 हे 57 आर.
4. विठ्ठल पिता मेहरबान जाधव, 105,141,30,36 2 हे 26 आर.
5. गोविंद पिता मारोती जाधव 119,142 1 हे 58 आर.
अर्जदार क्र. 2 ते 5 हे शेती पुरक इतर व्यवसाय करीत असल्याने त्यांनी आपली शेती अर्जदार क्र. 1 यांना बटाईने दिलेली आहे. अर्जदार क्र. 1 यांनी स्वतःसाठी व अर्जदार क्र. 2 ते 5 यांच्यावतीने दिनांक 28.5.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी उत्पादित केलेले सोयाबीन वाण जे.एस.335 प्लॉट क्रं. 2 OCT -13-13/2401/ 52, रु. 2385/- प्रतीबॅग या दराने एकूण रक्कम रु. 42,930/- मध्ये 18 बॅग खरेदी केल्या. खरेदी केलेल्या 18 बॅग पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर अर्जदार यांनी सदर बॅग अर्जदार क्र. 1 व 5 यांच्या शेतात खरेदी केलेल्या बियाणाची पेरणी केली. अर्जदारास प्रत्येक सोयाबीनच्या बॅगपोटी रु.1000/- मजुरीसाठी खर्च आला तसेच किटकनाशके व खते यासाठी प्रत्येकी बॅगवर रु.2000/- खर्च आला. पेरणीच्या वेळी योग्य पाऊस झालेला असतांना तसेच अर्जदाराने खताच्या व किटकनाशकाच्या योग्य मात्र देवूनही अर्जदाराच्या शेतात सोयाबीनची उगवण झालेली नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्याकडे बियाणे न उगवल्याबाबत तक्रार केली असता गैरअर्जदार यांनी कुठलेच समाधानकारक उत्तर दिलेले नाही. शेवटी अर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 22.7.2014 रोजी तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती, लोहा यांच्याकडे लेखी तक्रार दिली. दिनांक 24.7.2014 रोजी मंडळ कृषी अधिकारी व गैरअर्जदार क्र. 2 चे क्षेत्रिय अधिकारी श्री पी.राम बकवाड यांच्या समक्ष अर्जदार यांच्या शेतजमिनीचा पंचनामा केला. त्यावेळी बियाणे उगवण झाली नसल्याचे आढळून आले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी उत्पादित केलेले बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते त्यामुळे अर्जदारास आर्थिक त्रास सहन करावा लागला. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्याकडे बियाणाची रक्कम व लागवडी करिता झालेला खर्चाची मागणी केली असता सुरुवातीस गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी रक्कम देण्याचे मान्य केले. परंतू काही दिवसांनी रक्कम देण्यास नकार दिला त्यामुळे अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्याकडून बियाणे उगवण झालेली नसल्याने झालेल्या नुकसानीपोटी अर्जदार क्र. 1 यांना रक्कम रु. 26,925/- व अर्जदार क्र. 2 यांना रक्कम रु. 21,540/-, अर्जदार क्र.. 3 यांना रक्कम रु. 10,770/-, अर्जदार क्र. 4 यांना रक्कम रु. 16,155/- व अर्जदार क्र. 5 यांस रक्कम रु. 21,540/- असे एकूण रक्कम रु. 96,930/- - दिनांक 24.7.2014 पासून 24 टक्के व्याजासह दयावेत तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/-, शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इतक्या रक्कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे नेहमीचे ग्राहक असल्याने त्यांना ते ओळखतात. अर्जदाराचा शेती हा व्यवसाय आहे. दिनांक 28.5.2014 रोजी अर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी उत्पादित केलेले जे.एस.-335 ही सोयाबीन वाण प्रतिबॅग रु. 2385/- या दराने एकूण 18 बॅग रक्कम रु. 42,930/- ला खरेदी केलेल्या आहेत. दिनांक 20.7.2014 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून खरेदी केलेले बियाणे त्याच्या शेतात पेरल्यानंतर उगवण न झाल्याबद्दल तक्रार केली. गैरअर्जदार क्र. 1 हा अर्जदाराने खरेदी केलेल्या बियाणाचा उत्पादक नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र. 1 यांच्या विरुध्द फेटाळण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 2 चा लेखी जबाबत थोडक्यात पुढील प्रमाणे.
अर्जदार क्र. 2 ते 5 हे शेती पुरक इतर व्यवसाय करीत असल्याने त्यांनी आपली शेती अर्जदार क्र. 1 यांना बटाईने दिलेली असून अर्जदार क्र. 1 हे स्वतःची व अर्जदार क्र. 2 ते 5 यांची शेती करतात ही बाब गैरअर्जदार यांना मान्य नाही. तक्रार अर्जासोबत पृष्ठ क्र. 10 ते 11 आणि 13 ते 16 वरील कागदपत्राचे अवलोकन केले असता अर्जदार क्र. 1 ते 5 यांचे आपसात कोणतेही नाते नाही. अर्जदार क्र. 1 ने एवढया पिशव्या बियाणे कसे मिळवले हा कुतूहालाचा विषय आहे कारण अगोदरच सन 2013-14 या वर्षात गैरअर्जदार यांनी सन 2012-13 या वर्षात सोयाबीन पिकाचे उत्पन्न अत्यंत कमी झाल्यामुळे अत्याल्प बियाणे उत्पादित केले होते. अर्जदार यांची संयुक्तपणे 30 एकर शेती आहे. प्रति एकर शेतजमीनीसाठी एक पिशवी पुरेशी आहे, असे कृषी अधिकारी सांगतात. बिलाच्या प्रतीची पाहणी केली असता अर्जदाराने ‘सफल’ या कंपनीच्या देखील 3 पिशव्या सोयाबीन बियाणे खरेदी केलेले आहे. एकूण 33 पिशव्या बियाणे अर्जदाराने खरेदी केल्याचे निष्पन्न होते. मग हे बियाणे अर्जदाराने कोठे पेरले, हे समजून येत नाही. सन 2014 च्या पावसाळयात पाऊस पडलाच नाही हे निर्विवाद सत्य आहे. सन 2014 साली पडलेल्या कोरडया दुष्काळाचे अनुदान आजही महाराष्ट्र शासनामार्फत वाटप केल्या जात आहे त्यामुळे परि.क्र. 6 व 7 मधील मजकूर गैरअर्जदारास अमान्य आहे. वास्तविक पाहता सन 2014 साली योग्य प्रमाणात पाऊस झाला नाही त्यामुळे अर्जदार यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे पेरल्या ठिकाणीच जळून गेले व त्याची उगवण झाली नाही त्यामुळे बियाणे सदोष असण्याचा प्रश्न नाही. अर्जदाराने केलेल्या तक्रारी हया खोटया आहेत. अर्जदार बियाणे लागवडी, किटकनाशक यापोटी आलेला खर्च मिळण्यास पात्र आहे हे म्हणणे गैरअर्जदार यांना मान्य नाही. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ही शासन अंगीकृत संस्था असून शेतक-यांना माफक दराने अत्युच्च श्रेणीचे बियाणे पुरविते. गैरअर्जदार यांच्यामार्फत उत्पादित बियाणे तयार करण्यासाठी अनेक परिक्षणे केली जातात व त्यानंतर सदर बियाणे किरकोळ बाजारात विक्रीसाठी पाठविले जाते. प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले पंचनामे, अहवालाच्या प्रती पाहिल्यास असे आढळून येते की, सदर पंचनामे शासन निर्दिष्ट पंचनामा समितीने केलेले नाहीत. मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार आयोग यांनी ‘इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स विरुध्द श्री राम स्वरुप व बंता राम वि. जयभारत बीज कंपनी’ या निवाडयाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांना दोषी धरता येणार नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार 2 व 3 यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्याकडून दिनांक 28.5.2014 रोजी 18 बॅग सोयाबीन बियाणे प्रति बॅग रु.2385/- प्रमाणे एकूण रक्कम रु. 42,930/- ला खरेदी केलेल्या आहेत. अर्जदाराने दाखल केलेल्या 7/12 उतारा व धारण जमिनीची नोंद गाव नमुना आठ-अ च्या उता-यावरुन अर्जदार हे शेतकरी असल्याचे स्पष्ट होते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून खरेदी केलेले बियाणे त्याच्या शेतामध्ये पेरणी केल्यानंतर बियाणाची उगवण झालेली नसल्याने तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, लोहा, यांच्याकडे दिनांक 21.7.2014 रोजी अर्ज दिलेला आहे तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडेही अर्जदाराने तक्रार केलेली असल्याचे गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी जबाबामध्ये मान्य केलेले आहे. कृषी अधिकारी, लोहा जि. नांदेड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कृषी अधिकारी पंचायत समिती,लोहा तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती लोहा, मंडळ कृषी अधिकारी, महाबिजचे प्रतिनिधी यांच्या समक्ष अर्जदाराच्या शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल दिलेला आहे. सदरील अहवालानुसार अर्जदाराच्या शेतामध्ये सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे क्षेत्र मोडून टाकलेले आढळून आलेले आहे, असा निष्कर्ष दिलेला आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या कृषी अधिकारी यांच्या पाहणी अहवालावरुन अर्जदाराच्या शेतामध्ये बियाणाची उगवण झालेली नसल्याचे दिसून येते. अर्जदाराने युक्तीवादाच्या वेळी अर्जदाराच्या गावातील इतर शेतक-यांच्या शेतातही बियाणाची उगवण झालेली नसल्यामुळे गैरअर्जदार यांनी इतर शेतक-यांना बियाणाची खरेदी किंमत धनादेशाद्वारे परत केलेली असल्याबद्दलचा पुरावा मंचासमोर दिलेला आहे. अर्जदार यांच्या शेतात बियाणाची उगवण झालेली नसल्याचा अहवाल समितीने दिलेला आहे. सदर शेताची पाहणी करतांना गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे प्रतिनिधी हजर होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना अर्जदाराच्या शेतात बियाणे उगवण झालेली नाही ही बाब माहीत होती. असे असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिलेली नाही व त्यासाठी अर्जदारास तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. बियाणे उगवण झालेली नसल्यामुळे अर्जदाराचे निश्चितच नुकसान झालेले आहे, खरेदी केलेल्या एकूण बॅग पैकी अर्जदार क्र. 1 ते 5 यांनी अनुक्रमे 5,4,2,3 व 4 बॅग बियाणे आपापल्या शेतात पेरलेले आहे. त्यामुळे पेरलेल्या बियाणाची खरेदी किंमत अर्जदार क्र. 1 ते 5 हे मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदार क्र. 1 यांना 5 बॅगचे रक्कम रु. 11,925/-, अर्जदार क्र. 2 यांना 4 बॅगचे रक्कम रु. 9,540/-, अर्जदार क्र. 3 यांना 2 बॅगचे रक्कम रु.4,770/-, अर्जदार क्र. 4 यांना 3 बॅगचे रक्कम रु.7,155/- व अर्जदार क्र. 5 यांस 4 बॅगचे रक्कम रु.9,540 /- असे एकूण रक्कम रु. 42,930/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार 2 व 3 यांनी प्रत्येक अर्जदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.