(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.19.09.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तिने फोनव्दारे दि.24.05.2011 रोजी नागपूर – इंदोर बसबाबत बसस्थानक फोन नं.2726221 वरुन चौकशी केली असता सदर बस नागपूर बसस्थानकावरुन सकाळी 5.15 वाजता सुटेल व इदोरला सायंकाळी 5.30 वाजता पोहचले असे सांगितले.
3. तक्रारकर्तीने दि.25.05.2011 रोजी स्वतः जाऊन दि.26.05.2011 रोजीचे नागपूर – इंदोर बसचे आरक्षण केले. ठरलेल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आरक्षनानुसार तक्रारकर्तीने आपला प्रवास सुरु केला, त्यावेळी श्री. मुरय्या बसचालक व श्री. रणदिवे वाहक होते. सदर दिवशी दुपारी 4 वाजता सदर बस बुरहाणपूर येथे पोहचली तेथे सदर वाहक व चालक यांनी पूढे इंदोरला जाणार नाही असे सांगितले व सदर बस बुरहाणपूर पर्यंतच नियोजीत असल्याचे तक्रारकर्तीस सांगितले, ते ऐकूण तक्रारकर्तीस धक्का बसला. तक्रारकर्तीने सदर बाबीसंदर्भात श्री. एम.बी. तडवी, वाहतुक निरीक्षक बुरहाणपूर बस स्थानक, यांची भेट घेतली त्यांनी सदर बसवर नागपूर-इंदोर अशी पाटी लावलेली असली तरी सदर बस फक्त नागपूर-बुरहाणपूर अशीच धावते आणि या आशयाचे पत्र संबंधीत बसस्थानक व्यवस्थापकास दोन महीन्यापूर्वीच पाठविलेले आहे. तसेच आता बुरहाणपूर-इंदोर प्रवाशांसाठीची बस नाही, असेही सांगितले व तक्रारकर्तीस बुरहाणपूर ते इंदोर तिकीटाचे पैसेही परत करण्यांस नकार दिला.
4. सुट्टयांचा मोसम असल्यामुळे तक्रारकर्तीस दुरच्या खाजगी बसमधे जागा मिळाली नाही व तिचेजवळ सामानही जास्त होते. शेवटी तक्रारकर्तीस टॅक्सीने आपला पुढचा प्रवास करावा लागला, त्यासाठी रु.2,000/- टॅक्सीभाडे द्यावे लागले. तक्रारकर्तीस रात्रीचे वेळी एकटीने प्रवास करावा लागला व सदर टॅक्सी रात्री 10.30 वाजता इंदोर येथे पोहचली. या संपूर्ण प्रवासात तक्रारकर्तीस शारीरिक, आर्थीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना संबंधीत बाबी संदर्भात नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची विनंती केली असता त्यांनी त्याची दखलही घेतली नाही. यात गैरअर्जदारांची सेवेतील त्रुटी कारणीभुत आहे म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
5. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 4 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
6. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपल्या कथनात तक्रारकर्तीने सदर बसचे आरक्षण केल्याचे तसेच सदर वाहक व चालक असल्याचे तक्रारकर्तीचे म्हणणे मान्य केलेले आहे. परंतु तक्रारकर्तीचे इतर आरोप अमान्य केलेले आहे.
7. गैरअर्जदारांच्या कथनानुसार गैरअर्जदार क्र.1 हे परिवहन महामंडळ, राज्य सरकारचे रस्ते वाहतुक महामंडळ अधिनियम 1950 चे कलम 3 अंतर्गत असुन त्यावर राज्य सरकारचे अधिपत्य आहे. त्यांच्या मते बरहाणपूर ते इंदोर या मार्गाकरीता रावेर आगार जळगाव विभाग येथील रावेर आगारातील चालक व वाहक हे कामगीरी करतात रावेर आगारात चालक व वाहक यांची अतशिय कमतरता आहे. तसेच रावेर आगाराने कामगार (चालक व वाहक) देणे बंद केल्यामुळे सदर फेरीवर एकच चालक व वाहक कामगिरीवर पाठविण्यांत आले होते. सदर बसला बरहाणपूर येथे कामगार बदल आहे, परंतु रावेर आगार, जळगाव यांचेकडून सदर दिवशी कामगार बदल न मिळाल्यामुळे व त्या दिवशी मोठया प्रमाणात लग्नाची तिथी असल्यामुळे पुढील प्रवासाकरीता सदर आगार चालक व वाहक देऊ शकले नाही. त्यामुळे सदर बस इंदोर पर्यंत न जाता बरहाणपूर पर्यंतच चालविण्यांत येते व तेथे मुक्कामी राहते. सदर बसचे वाहक यांनी तक्रारकर्तीस प्रवासाचे भाडे घेण्यांस विनंती केली परंतु तक्रारकर्तीने ते स्विकारले नाही. वाहतुक नियंत्रक, श्री. तडवी यांनी मध्यस्थी केली करुन त्यांनी खाजगी वातानुकूलीन बसच्या चालकास विनंती करुन तक्रारकर्तीला इंदोर पर्यंत पोहचविण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य करुन बस तक्रारकर्तीसमोर आणून उभी केली, तरीही तक्रारकर्तीने त्या बसमधे बसण्यास नकार दिला.
8. त्याचप्रमाणे बरहाणपूर ते इंदोर हा जवळपास 125 ते 150 कि.मी.चा प्रवास असुन त्याकरीता अंदाजे रु.1,000/- ते रु.1,200/- एवढा खर्च होतो. त्यामुळे तक्रारकर्तीचे रु.2,000/- खर्च आल्याचे म्हणणे चुक आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नाही, त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह खारिज करावी असा उजर घेतला आहे.
9. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.15.03.2012 रोजी आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
10. प्रस्तुत प्रकरणातील एकंदर वस्तुनिष्ठ पुरावे पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, निर्वीवादपणे तक्रारकर्तीने दि.25.05.2011 रोजी नागपूर ते इंदोर या बसचे दि.26.05.2011 रोजीचे आरक्षण केलेले होते व सदर बसचे तिकीट काढून ठरल्याप्रमाणे प्रवास केला. तसेच निर्वीवादपणे सदर बसने इंदोर पर्यंत न जाता बरहाणपूर पर्यंत प्रवास केला, दाखल दस्तावेजांवरुन हेही दिसुन येते की, सदर बसपुढे इंदोरपर्यंत जाणार नाही या बाबींची सुचना तक्रारकर्तीस बरहाणपूर येथे गेल्यावरच देण्यांत आलेली होती. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या मते रावेर आगार जळगाव विभागाकडून चालक व वाहक बदल न झाल्यामुळे तसेच दि.26.05.2011 रोजी लग्नाची तिथी मोठयाप्रमाणात असल्यामुळे बरहाणपूर ते इंदोर या प्रवासाकरीता चालक व वाहक उपलब्ध झाले नाही, त्यामुळे सदर बस बरहाणपूर येथे मुक्कामी राहीली.
11. गैरअर्जदारांचे म्हणणे आहे की, रावेर स्थानकात वाहतुक चालक यांची अतशिय कमतरता असल्यामुळे त्यांनी चालक, वाहक बदल देणे बंद केले असे असतांना सदर दिवशी लग्नाची मोठी तिथी आहे, ह्या बाबी माहित असतांना गैरअर्जदारांनी पर्यायी व्यवस्था करुन ठेवावयास होती व तशी करण्यांस ते असमर्थ होत असल्यास तशी पर्वसुचना सदर बसचे आरक्षण करते वेळीच तक्रारकर्तीस द्यावयाची होती. तसे न करता वेळेवर अचानक प्रवासात बदल करुन केवळ बरहाणपूर पर्यंत बस नेने ही गैरअर्जदारांची कृति निश्चितच सेवेतील कमतरता आहे व गैरअर्जदारांच्या सदर कृतिमुळे तक्रारकर्त्यास पुढच्या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली, तसेच सदर दिवशी लग्नाची मोठी तिथी असल्यामुळे त्यासाठी तक्रारर्तीस साहजिकच मानसीक, शारीरिक त्रास सहन करावा लागला व त्यासाठी गैरअर्जदार तक्रारकर्तीच्या नुकसान भरपाईस जबाबदार आहे या निर्ष्कषाप्रत हे मंच येते.
सबब सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस नुकसान भरपाईबाबत रु.3,000/- अदा करावे.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.9% व्याज देय राहील.