विज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तो श्री समर्थ प्लास्टिक युनिट, या नावाने पैठण एमआयडीसी येथे व्यवसाय करतो. त्याने सदर युनीटसाठी गैरअर्जदार वीज कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली आहे. सदर युनीटसाठी दिलेला वीज पुरवठा विज वितरण कंपनीने दि 6/12/2009 रोजी खंडीत केला आणि त्याचे विरुध्द कलम 135 व 138 विद्युत कायदा 2003 नुसार विज चोरीचा गुन्हा नोंदवून त्यास रु 3,39,951/- चे देयक दिले. त्यानंतर त्याने वारंवार मागणी करुनही वित वितरण कंपनीने त्याची विज जोडणी पूर्ववत सुरु करुन दिली नाही म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, विज वितरण कंपनीने त्याचा विज पुरवठा पूर्ववत चालू न केल्याने त्यास मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. तक्रारदाराच्या तक्रारीचे स्वरुप पाहता सदर तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2(1)(ड) मधील व्याख्येनुसार ग्राहक आहे काय आणि त्याची तक्रार या मंचात चालू शकते काय असा मुद्दा प्राथमिक आवस्थेत उपस्थित झालेला आहे. तक्रारदाराच्या वतीने अड राहूल जोशी यांनी युक्तिवाद केला. तक्रारदार हा श्री समर्थ प्लास्टिक युनिट या नावाने एमआयडीसी पैठण येथे व्यवसाय करत असून त्याने सदर युनिटसाठी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदाराचा व्यवसाय हा केवळ स्वयंरोजगारासाठी नाही. तक्रारदाराने तो हा व्यवसाय स्वयंरोजगारासाठी करीत असल्याचे म्हटलेले नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2(1)(ड) मधील “ग्राहकाच्या” व्याख्येनुसार व्यापारी कारणासाठी सेवा घेणारा “ग्राहक” होत नाही. या संदर्भात मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी Mod.Asif Ahmad v/s Maharashtra State Electricity Boad and Ors. – 2010 CTJ 886 या प्रकरणातील निवाडयाद्वारे हे स्पष्ट केले आहे की, व्यावसायीक किंवा व्यापारी करणासाठी वीज पुरवठा घेणारा म्हणजेच वीज पुरवठयाची सेवा घेणारा “ग्राहक” होत नाही. मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या उपरोक्त निवाडयातील तत्वाचा आणि ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2(1)(ड) ग्राहकाच्या व्याख्येचा विचार केला तर तक्रारदार “ग्राहक” या संज्ञेत बसत नाही आणि म्हणून त्याची तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे प्रस्तूत तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्यात येते. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्यात येते. 2. तक्रारदारास आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |