निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 12/11/2013
कालावधी 01वर्ष.08महिने.10दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अकिल अहमद पिता आब्दुल हमीद. अर्जदार
वय सुमारे वर्षे. धंदा.नौकरी. अॅड.ए.के.उमरीकर.
रा. एकमिनार मस्जीद दर्गा रोड,परभणी.
ता.जि.परभणी.
विरुध्द
1 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी.लि. गैरअर्जदार.
जिंतूर रोड परभणी मार्फत कार्यकारी अभियंता, अॅड.एस.एस.देशपांडे.
2 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी.लि.
मार्फत डेप्युटी इंजिनीअर.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील
रहिवाशी असून त्याने गैरअर्जदार विज कंपनी कडून घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला आहे.ज्याचा ग्राहक क्रमांक 530010548151 असा आहे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याचे घर फक्त दोन खोल्याचे आहे व त्यामध्ये देखील सी.एफ.एल. बल्बचा अर्जदार वापर करतो व दुस-या खोलीसाठी 25 वॅटच्या बल्बचा वापर करतो. अर्जदाराच्या घरात टि.व्ही., वॉशिंग मशिन, व विजेवर चालणारे उपकरणे नाही. त्यामुळे अर्जदाराचा विद्युत वापर हा अत्यंत कमी प्रमाणात आहे, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 19/11/ ते 18/12 या कालावधीसाठी गैरअर्जदाराने अर्जदारास 2,110/- रुपयांचे लाईट बिल दिले जे की, एकदम चुकीचे आहे. कारण अर्जदाराचा विद्युत वापर तेवढा नसतांना देखील गैरअर्जदाराने जाणून बुजून चुकीचे बिल दिले आहे व तसेच सदरील बिलामध्ये गैरअर्जदाराचे म्हणणे रिंडींग नॉट अव्हेलेबल हे देखील खोटे आहे. रिडींग घेणे ही गैरअर्जदारांची जबाबदारी आहे. त्यामुळे रिडींग घेवुन बिल देणे हे गैरअर्जदाराचे कर्तव्य आहे.या बिलात 1673-88 पैसे थकबाकी दाखविले ते चुकीचे आहे व त्याबद्दल गैरअर्जदाराने काहीही खुलासा केलेला नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्यानंतर पुढचे बिल दिनांक 21/01/2012 रोजीचे असून ते 18/12/2011 ते 17/01/2012 या कालावधी करीता आहे व ते 2,570/- रुपयांचे आहे ते एकदम चुकीचे आहे. गैरअर्जदाराने मिटरची रिडींग न घेताच लाईट बिले दिलेली आहेत ती चुकीची आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरील चुकीचे बिल आल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास आर.पी.ए.डी. व्दारे 09/01/2012 रोजी एक लेखी तक्रार दाखल केली त्या तक्रारीची दखल गैरअर्जदाराने आज पर्यंत घेतली नाही. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले, व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराने दिलेले दोन्ही बिल रद्द करावे तसेच मानसिकत्रसापोटी रु.2,000/- व खर्चापोटी रु. 1,000/- आज तारखे पासून ते रक्कम अदा करे पर्यंत 18 टक्के व्याजाने देण्यात यावी.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये दिनांक 09/01/2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास पाठविलेल्या पत्रांची कार्यालयीन प्रत, दिनांक 25/11/2011 चे विद्युत बिल, दिनांक 22/12/2011 चे विद्युत बिल, 21/01/2012 चे विद्युत बिल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा जारी करण्यात आल्यावर, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब दाखल केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्याचा कायद्यान्वये काहीही एक अधिकार नाही व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सर्व विद्युत बिले भरणा वेळेवर व नियमितपणे केला असता तर अचानक मोठे बिल आलेच नसते. अर्जदारास प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणे विज बिले दिलेली आहेत, परंतु अर्जदाराने नियमित बिल न भरल्यामुळे थकबाकी वाढली. ज्या वेळेस अर्जदाराचे घर बंद असायचे त्यावेळी विज कंपनीला पर्याय नसल्यामुळें काही बिले सरासरीवर द्यावी लागली, परंतु प्रत्यक्ष रिडींग मिळाल्यावर मात्र गैरअर्जदाराने सरासरीचे बिल वजा करुन प्रत्यक्ष मिटर रिंडींग प्रमाणे दिलेली आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व सर्व विज बिले ही प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणे दिलेली आहेत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार खर्च लावून फेटाळण्यात यावी, अशी मंचास विनंती केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास डिसेंबर 2011 व जानेवारी 2012 चे
चुकीचे विद्युत बिले देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील बिलावरुन सिध्द होते, परंतु अर्जदाराचे म्हणणे की, डिसेंबर 2011 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास 2,110/- रुपयांचे व जानेवारी 2012 मध्ये 2,570/- रुपयांचे लाईट बिल चुकीचे दिले. हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने त्याबद्दल कागदोपत्री कोणताही पुरावा (सी.पी.एल.) मंचासमोर आणला नाही व तसेच नि.क्रमांक 4/3 व 4/4 वरील दाखल केलेल्या बिलावरुन हे निदर्शनास येते की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मागील लाईट बिले न भरल्यामुळे थकीत बिल वाढत गेले व डिसेंबर 2011 चे 2,110/- व जानेवारी 2012 चे 2,570/- रुपयांचे गैरअर्जदाराने अर्जदारास लाईट बिले दिले. तसेच अर्जदाराने मागील कोणत्या तारखेस लाईट बिल भरले या बद्दलचा पावती पुरावा मंचासमोर आणला नाही. यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास सदरील दोन्ही बिले देवुन अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही. असे मंचास वाटते. व अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.