::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री.मनोहर गो.चिलबुले मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 12.08.2013)
1.. अर्जदाराच्या तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप असे की, त्याने सराफा लाईन चंद्रपूर येथे जुबेदा बानो मोहम्मद ताहीर हीच्या इमारतीची तळमजल्यावरील खोली क्रं. 6 सन 2007 मध्ये भाडयाने घेतली असून त्यात तो श्री.दत्तकृपा सुवर्ण कला केंद्र या नावाने सोने-चांदीच्या कारागिरीचा स्वंयरोजगार करतो. सदर दुकानात सुरुवातीपासुनच अर्जदाराने गै.अ.कडून स्वतंञ विद्युत मिटर क्रं. 0826522 मिळविले आहे. त्याचा ग्राहक क्रं. 450010826522 असा असून अर्जदार विज वापराचे बिल नियमित भरीत आहे.
2. ऑगस्ट 2012 मध्ये अर्जदाराच्या दुकानाचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने तो पूर्ववत करुन दयावा म्हणून गै.अ.कडे दि.13/08/2012, 16/08/2012 आणि 18/09/2012 रोजी लेखी अर्जाव्दारे विनंती केली परंतु गैरअअर्जदारानी विद्युत पुरवठा सुरळीत करुन दिला नाही, म्हणून दि.12/10/2012 रोजी अधिवक्ता पी.सी.खजांची यांचे मार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस 17/10/2012 रोजी गैरअर्जदारास प्राप्त होवून त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करुन दिला नाही, ही ग्राहकाप्रती गै.अ.ने अवलंबिवलेली सेवेतील न्युनता आहे. अर्जदाराच्या घरमालकीन सोबत त्याचा वाद झाला असल्याने तिच्याशी हात मिळवणी करुन गैरअर्जदार सदर अपकृत्य करीत असावे अशी शंका आहे.
3. अर्जदाराच्या दुकानाचा विज पुरवठा बंद असल्याने त्याच्या दैनंदिन कामात व्यत्यय निर्माण झाला असून पूर्णवेळ दुकान सुरु ठेवता येत नसल्याने त्यास नुकसान सोसावे लागत आहे. तसेच विज पुरवठया अभावी त्याचे आणि ग्राहकाचे हाल होत आहेत. म्हणून गैरअर्जदारानी विज पुरवठा सुरळीत करुन दयावा तसेच नुकसान भरपाई दाखल रु.40,000/-आणि फिर्याद दाखल केल्यापासुन होणा-या नुकसानीबाबत नुकसान भरपाई देण्याचा गैरअर्जदारास आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
4. गैरअर्जदारानी निशाणी क्रं. 12 प्रमाणे लेखी बयाण दाखल केले. त्यात त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने विज पुरवठा घेतांना घरमालकाची सम्मती किंवा नाहरकत प्रमाणपञ सादर न करता स्वतःच्या नावाने विज पुरवठा घेतला, ही बाब बेकायदेशिर आहे. अर्जदाराची घरमालकीन जुबेदा बानो मोहम्मद ताहीर हीने सदर विज पुरठा खंडीत करण्याबाबत गैरअर्जदाराकडे विनंती केली, परंतु गै.अ.ने स्वतःहून विज पुरवठा खंडीत केला नाही, वायरिंग खराब झाल्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला आहे, परंतु घरमालक दुरुस्त करु देत नाही. म्हणून अर्जदाराचा विज पुरवठा सुरळीत करता आला नाही अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करण्याचा गै.अ.चा कसलाही वाईट हेतू नाही. त्यामुळे गै.अ.नी सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार केला नसल्याने अर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही. त्यांचे पुढे म्हणणे असे की, घरमालकास या तक्रार अर्जात गै.अ.म्हणून जोडले नसल्याने सदर फिर्याद चालू शकत नाही. तसेच सदरचा वाद दिवाणी स्वरुपाचा असल्याने तो चालविण्याचा या न्यायालयास अधिकार नाही.
5. अर्जदारानी नि. 15 प्रमाणे अधिकचे कथन (Rejoinder) दाखल केले असून अर्जदार हा केवळ गै.अ.चा विज पुरवठया संबंधाने ग्राहक असल्याने या प्रकरणात घरमालक आवश्यक पक्ष नाही असे म्हटले आहे. तसेच सदरचे प्रकरण दिवणी स्वरुपाचे नसून गैरअर्जदारा कडून विज ग्राहकाप्रती न्युनतापूर्वक सेवेचे असल्याने विद्यमान मंचास सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
6. अर्जदार व गै.अ.यांच्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व त्या बाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
- गै.अ.ने विज ग्राहक म्हणून अर्जदारास दयावयाच्या
सेवेत न्युनता पूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2. अर्जदार मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अशंतः पाञ.
3. अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे अर्ज मंजूर.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2 बाबत ः-
7. सदरच्या प्रकरणात अर्जदाराने 2007 साली गैरअर्जदाराकडे अर्ज करुन भाडयाने राहत असलेल्या जागेत स्वतःच्या नावाने त्याच्या ‘’श्री दत्तकृपा सुवर्ण कला केंद्र’’ या दुकानासाठी विज पुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क्रं. 450010826522 आणि मिटर क्रं. 0826522 आहे. अर्जदाराने सदर मिटरचे जुलै 2012 चे बिल त्याने 17 ऑगस्ट 2012 रोजी भरले असून मुळ बिल दस्ताऐवज यादी नि. 5 सोबत दस्त क्रं. अ-6 वर आहे. यावरुन अर्जदार हा विज पुरवठयासाठी गै.अ.चा ग्राहक आहे हे सिध्द होते.
8. अर्जदाराचे म्हणणे असे कि, त्याचा विज पुरवठा बंद झाल्याने तो चालू करुन द्यावा म्हणून गै.अ.स दि. 13/08/2012, 16/08/2012 व 18/09/2012 रोजी तक्रार दिली व विद्युत पुरवठा सुरु करुन देण्याची विनंती केली. सदर पञाच्या प्रति यादी नि. 5 सोबत दस्त क्रं. अ-1 ते अ-3 वर आहेत. गैरअर्जदाराने विज पुरवठा सुरु करुन न दिल्याने अर्जदाराने दि. 12/10/2102 रोजी अधिवक्ता खजांची मार्फत रजि.पोस्टाने नोटीस पाठवून विज पुरवठा सुरु करुन देण्याची मागणी केली. सदर नोटीस ची स्थळ प्रत दस्त क्रं. अ-4 वर, रजिस्ट्रेशन पावती दस्त क्रं. अ-5 वर आणि प्रतिवादीस नोटीस प्राप्त झाल्याची पोहच पावती दस्त क्रं. अ-6वर आहे.
9. अर्जदार हा गैरअर्जदाराचा विज ग्राहक असल्याने सेवादाता म्हणून त्याचा बंद झालेला विज पुरवठा पूर्ववत करुन देण्याची गै.अ.ची जबाबदारी आहे. परंतू असे असतांनाही गै.अ.ने अर्जदाराचा विज पुरवठा चालु करुन दिलेला नाही हे वस्तुस्थिती वरुन स्पष्ट आहे.
10. याबाबत गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, त्यांनी अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत केला नाही. सर्व्हिस वायर खराब झाल्याने विज पुरवठा बंद झाला आहे. अर्जदाराने 2007 साली भाडयाच्या जागेत स्वतःच्या नावाने विज पुरवठा घेतांना घरमालक जुबेदा बानो मो.ताहीर हिचे नाहरकत किंवा संमतीपञ घेतले नव्हते. घरमालक जुबेदाबानो हिने गैरअर्जदाराकडे दि.28/05/2012 रोजी पञ देवून तिच्या परवानगी शिवाय किरायाच्या जागेत अर्जदाराने घेतलेला विज पुरवठा बंद करण्यास कळविले. सदरचे पञाची प्रत दस्तऐवजाची यादी नि.13 सोबत दस्त क्रं. ब-2 वर आहे. गैरअर्जदाराने दि.25/06/2012 रोजी स्थळ निरिक्षण केले असता सदर विज जोडणी संबंधाने न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून पोलिसात देखिल तक्रार झाल्याचे माहीत झाले. स्थळ निरिक्षण अहवालाची प्रत यादी नि. 13 सोबत दस्त क्रं. ब-1 वर आहे.
11. अर्जदार व त्याचे घरमालक यांच्यात वाद असल्याने गै.अ.चे कर्मचारी सर्व्हिस वायर बदलण्यास गेले असता घरमालक बदलू देत नसल्याने गै.अ.चा नाईलाज झाला आहे व त्यामुळे गैरअर्जदाराकडून सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार झाला नसून त्यांचे विरुध्द खोटी फिर्याद दाखल केली आहे.
12. त्यांचे म्हणणे असे कि, अर्जदाराने घरमालका विरुध्द नि.दिवाणी दावा क्रं. 527/12 दाखल केला आणि त्यांत तात्पुरता मनाई हुकूम मिळविला आहे. सदर आदेशाची प्रत अर्ज नि. क्रं.20 सोबतच्या यादीत दस्त क्रं. ब-1 वर दाखल आहे. सदर दाव्यात गैरअर्जदार प्रतिवादी नाही. अशा परिस्थितीत त्याच कारणासाठी सदरचे प्रकरण चालु शकत नाही.
13. अर्जदाराचे अधिवक्ता यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले कि, अर्जदार जुगेदाबानो हिचा 2007 पासुन भाडेकरु आहे व तिला भाडयाची रक्कम नियमित देत आहे भाडयाच्या जागेत 2007 साली स्वतंञ विज पुरवठा घेतांना अर्जदाराने घरमालकाची सम्मती घेतली होती व त्याबाबत समाधान होवूनच गैरअर्जदाराने विज पुरवठा मंजुर केला होता. घरमालक जुबेदाबानो हिने 2007 सदर विज पुरवठयाबाबत कोणताही आक्षेप घेतला नव्हता. आता घरमालक व भाडेकरु यांचेत वाद सुरु झाल्याने घरमालकांच्या सांगण्यावरुन अर्जदार भाडेकरुचा विज पुरवठा बंद करण्याचा गैरअर्जदारास अधिकार नाही दिवाणी न्यायालयाने देखिल जुबेदाबानो विरुध्द
“ प्रतिवादीने वादातील दुकानाचा विज पुरवठा पूर्ववत सुरु करावा
आणि प्रतिवादी अथवा तिच्या मार्फत कोणीही प्रकरणाचा निकाल
लागे पर्यंत सदरहु विज पुरवठा खंडीत करुन नये ‘’
असा तात्पुरता मनाई हुकूम दिला आहे. म्हणून गैरअर्जदाराने विज पुरवठा पूर्ववत करण्यास घरमालक अडथळा करु शकत नाही. अर्जदार हा गैरअर्जदाराचा विज पुरठयाबाबत ग्राहक असल्याने अर्जदारास सुरळीत विज पुरवठा मिळणे हा त्याचा हक्क आहे व विज पुरवठा सुरळीत करुन न देण्याची गैरअर्जदाराची कृती ही ग्राहकाप्रती सेवेतील न्युनतापूर्ण व्यवहार असल्याने फिर्यादीची मागणी मान्य करावी.
14. या प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता 2007 पासुन अर्जदार गैरअर्जदाराचा विज पुरवठयासाठी ग्राहक आहे. 2007 पासुन 2012 पर्यंत सदर विज पुरवठयासाठी आक्षेप न घेणा-या घरमालकाने मे 2012 मध्ये गैरअर्जदाराकडे अर्ज करुन अर्जदाराचा विज पुरवठा बंद करण्याची मागणी आणि तिला गैरअर्जदार यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद अन्यायकारक आहे. महाराष्ट्र रेट कन्ट्रोल अॅक्ट 1999 च्या कलम 29 प्रमाणे भाडेकरुच्या आवश्यक सुविधा बंद करण्यास घरमालकास प्रतिबंद केलेला आहे. तसेच अशा आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी घरमालकांच्या परवानगीची किंवा नाहरकतीची सक्ती करु नये असेही म्हटले आहे.
15. 2007 पासुन अर्जदार गैरअर्जदारा कडून भाडयाच्या जागेत विज पुरवठा घेत आहे, आणि तो नियमित विज बिलाचा भरणा करीत असल्याने त्याचा विज पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सेवादाता म्हणून गैरअर्जदाराची आहे. घरमालक अडथळा करतो म्हणून आम्ही विज पुरवठा सुरळीत करुन देवू शकत नाही, हा गैरअर्जदाराने घेतलेला बचाव अग्राहय आहे. अशा तोकडया सबबीवरुन ग्राहकाचा विज पुरवठा सुरळीत करुन न देणे ही निश्चितच ग्राहकाप्रती सेवेतील न्युनता आहे.
16. अर्जदार नियमित विज बिल भरत असल्याने त्यात अखंड विजपुरवठयाचा हक्क आहे व गैरअर्जदाराने न्यायोचित कारणाशिवाय खंडीत विज पुरवठा सुरळीत करण्यास नकार दिला असल्याने मागणी प्रमाणे विज पुरवठा सुरळीत करण्याचा गैरअर्जदारा विरुध्द आदेश मिळण्यास पाञ आहे. म्हणून मुद्दा क्रं. 1 व 2 वरील मंचाचे निष्कर्ष होकारार्थी नोंदविले आहेत.
17. वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
अर्जदाराचा अर्ज पुढील प्रमाणे अंशतः मंजूर.
1) गैरअर्जदाराचे अर्जदाराचा विज पुरवठा या निर्णयाचे तारखेपासून 15
दिवसांचे आत पूर्ववत सुरळीत करुन द्यावा.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबाबत नुकसान
भरपाई रु.5,000/- आणि या कारवाईचा खर्च रु.2,000/- आदेशाचे
तारखेपासून 1 महिन्याचे आत द्यावा.
3) या आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पुरवावी.
चंद्रपूर.
दिनांक - 12/08/2013