आदेश :- (दि.29.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे महाराष्ट्र सहकारी कायद्यान्वये अस्तित्त्वात असलेली सहकारी संस्था आहे. सदर संस्थेच्या मालकीचा डिझेल विक्री पंप आहे. सदर पंपासाठी विद्युत कनेक्शन घेतले होते, त्याचा ग्राहक क्र.267770281675 असा आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीची विद्युत देयके वेळेत भरणा केलेली आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे :- अ.नं. | बिलांचा कालावधी | बिलाचे युनिट | तपशील | 1. | 20.12.05 ते 20.03.06 | 663 | रिडींगप्रमाणे बिले | 2. | 20.03.06 ते 20.06.06 | 757 | रिडींगप्रमाणे बिले | 3. | 20.06.06 ते 20.09.06 | 555 | रिडींगप्रमाणे बिले | 4. | 20.09.06 ते 20.12.06 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 5. | 20.12.06 ते 20.03.07 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 6. | 20.03.07 ते 20.06.07 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 7. | 20.06.07 ते 20.09.07 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 8. | 20.09.07 ते 20.12.07 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 9. | 20.12.07 ते 20.03.08 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 10. | 20.03.08 ते 20.06.08 | 657 | सरासरीप्रमाणे बिले | 11. | 20.06.08 ते 20.09.08 | 657 | सरासरीप्रमाणे बिले |
(3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला विद्युत कंपनीने मिटर बदली अहवाल उशीरा भरला गेल्याने सरासरी 657 युनिटची देयके देण्यात आली. परंतु, सरासरी वापर हा दर तीन महिन्यास 1300 युनिट आहे असे कळविले. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीविरुध्द या मंचात ग्राहक तक्रार क्र. 24/2009 दाखल केली होती. सदरची तक्रार या मंचाने मंजूर केली आहे व तक्रारदारांनी मागणी केलेली विद्युत देयक चुकीचे आहे असा आदेश दिलेला आहे. त्यानंतर सामनेवाला विद्युत कंपनीने जून 2008 ते सप्टेबर 2009 या कालावधीमधील मिटर दोष तफावत म्हणून विद्युत देयक पाठविले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :- अ.नं. | बिलाचा कालावधी | बिलाचे युनिट | तपशील | 1. | 20.06.08 ते 20.09.08 | 11080 | फॉल्टी मिटर रिडींगप्रमाणे बिल | 2. | 20.09.08 ते 20.12.08 | 1389 | फॉल्टी मिटर रिडींगप्रमाणे बिल | 3. | 20.12.08 ते 20.03.09 | 0001 | रिडींगप्रमाणे वापर एक युनिट असताना चुकीचे 1386 चे बिल पाठविले | 4. | 20.03.09 ते 20.06.09 | 1386 | लॉकड शेरा मारुन रिडींग न घेता अंदाजे बिल पाठविले | 5. | 20.06.09 ते 20.09.09 | 4451 | फॉल्टी मिटर रिडींगप्रमाणे बिल |
(4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, या मंचाने ग्राहक तक्रार क्र.24/09 मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणतीही कार्यवाही न करता पुन्हा सरासरी 1300 युनिटप्रमाणे विद्युत देयक पाठवून रुपये 75,010/- इतकी बेकायदेशीरपणे मागणी केली आहे. सबब, सामनेवाला यांनी विद्युत कनेकशन बंद करु नये याबाबत मनाई आदेश व्हावेत. विद्युत कंपनीने तक्रारदारांचे विद्युत मिटर फॉल्टी असल्याने सरासरी 657 प्रती तीन महिने युनिटप्रमाणे विद्युत आकारणी करावी. तसेच, जुने विद्युत मिटर बदलून नविन मिटर बसवावे. मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपयें 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.09.10.2009 रोजीची नोटीस, सदर नोटीस दि.05.11.2009 रोजीचे उत्तर, दि.20.06.08 ते दि.20.09.08 या कालावधीचे बिल, माहे 09/08 ते 12/08 पर्यन्तचे बिल, दि.20.12.08 ते दि.20.03.09, दि.20.03.09 ते दि.20.06.09, दि.20.06.09 ते दि.20.09.09 या कालावधीतील देयके व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांची तक्रार त्यांच्या म्हणण्यान्वये नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, या मंचामध्ये ग्राहक तक्रार क्र.24/09 दाखल केलेली होती. सदर अर्जानुसार तक्रारदारांनी रुपये 41,750/- इतकी रक्कम भरणा केलेली आहे. सदर तक्रारीत झालेल्या निकालावरती सामनेवाला विद्युत कंपनीने मा.राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई यांचेकडे अपिल दाखल केले. तक्रारदारांचे सदरचे बिल तक्रारदारांच्या कनेक्शनला नविन टेस्टेड मिटर बसविलेपासून डिफरन्स काढलेला आहे. त्यानंतर वेळोवेळी आलेले बिल भरलेले नाही व प्रस्तुतचा खोटा अर्ज दाखल केलेला आहे व सप्टेंबर 2009 अखेर एकूण देयक रककम रुपये 75,012.42 पैसे इतकी होत आहे. ग्राहक तक्रार क्र.24/09 या तक्रारीतील रक्कम रुपये 41,750/- वजावट जाता रुपये 33,263.78 पैसे इतकी रक्कम तक्रारदारांनी भरलेली नाही. ग्राहक तक्रार क्र.24/09 दाखल केलेनंतर डिसेंबर 2008 मध्ये 1389 युनिटचे बिल गेले आहे. मार्च 2009 ला युनिटचे रिडींग घेणा-यांना मिटर पहाणेस मिळाले नाही. जून 2009 ला मिटर पहावयास मिळाले नाही. त्यामुळे बिल लॉक्ड् असा शेरा देवून अव्हरेज बिल निघालेले आहे. सप्टेंबर 2009 ला एकूण वापराचे रिडींग 4451 युनिट इतक्या रक्कमेची बिल दिलेले आहे. मागील दोन्ही बिलांचा रक्कम रुपये 15,117.13 पैसे इतकी रक्कम वजा करुन सदर बिलानुसार रुपये 75,012.42 पैसे व मंचाच्या हुकूमानुसार झालेले पूर्वीचे बिल रुपये 41,748.64 पैसे ही रक्कम वजा करता रुपये 33,263.78 पैसे इतकी रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी. कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 25,000/- व येणेबाकी भरणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला विद्युत कपंनीने त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदारांच्या मिटरचा टेस्टेड रिपोर्ट, तक्रारदाराचा सामनेवाला यांचेकडील खातेउतारा इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद तसेच कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदार संस्थेने या पूर्वी या मंचात सामनेवाला विद्युत कंपनीविरुध्द ग्राहक तक्रार केस नं.24/09 दाखल केलेली होती. सदर तक्रारीमध्ये दि.27.08.2009 रोजी आदेश पारीत करुन तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत आलेली आहे. सदरचा आदेश हा पुढीलप्रमाणे :- 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2) सामनेवालांनी आकारणी केलेले दि.01/11/2008 रोजीचे रु.41,750/- चे बील रद्दबातल ठरविणेत येते. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- अदा करावेत. (9) उपरोक्तप्रमाणे आदेश पारीत केले असल्याने सामनेवाला विद्युत कंपनीने त्याप्रमाणे तक्रारदारांना विद्युत देयक देणे आवश्यक होते. परंतु, विद्युत कंपनीने तसे न करता यापूर्वी दाखल केलेल्या ग्राहक तक्रार केस नं.24/09 यामध्ये उल्लेख केलेल्या कालावधीतील देयकाबाबत पुन्हा वाढलेल्या युनिटचे देयक दिलेले आहे. परंतु, याबाबत तक्रारदारानी मिटरच्या दोषाबाबत उपस्थित केलेले मुद्दयांबाबत मिटर लॅबोरेटरी टेस्ट घेणे आवश्यक होते. अशी टेस्ट घेताना विद्युत कंपनी ग्राहकास पूर्व सुचना देवून ग्राहकासमोर टेस्ट घेधे आवश्यक असते. ग्राहक तक्रार केस नं.24/09 मध्ये उपस्थित झालेले वादाचे बिल सरासरीप्रमाणे विद्युत कंपनीने दिलेहोते. त्याचा भरणा तक्रारदारांनी केलेला आहे. ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. बेकायदेशीरप्रमाणे दिलेले देयक ग्राहक तक्रार केस नं. 24/09 मध्ये पारीत केलेल्या आदेशाप्रमाणे रद्द केलेली आहे. त्याच कारणावरुन पुन्हा देयक काढलेले आहे. याचा विचार करता विद्युत कपंनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरचे अवास्तव देयक रद्द करणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदार संस्थेला नविन व दोषरहित विद्युत मिटर द्यावे याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला विद्युत कपंनीने यापूर्वी दि.20.09.2006 ते दि.20.06.2008 अखेरीस युनिटची सरासरी 657 असे दर्शवून देयक दिलेले आहेत. त्याचे प्रमाण धरुनच सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांना विद्युत देयकाची सरासरी आकारणी 657 युनिट करावी व तक्रारदार संस्थेचा विद्युत पुरवठा खंडित करु नये या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदार संस्थेस जुना विद्युत मिटर बदलून नविन दोष रहित विद्युत मिटर द्यावा. 3. सामनेवाला कंपनीने पाठविलेले अवास्तव देयक रद्द करणेत येते. तसेच, जुन्या विद्युत मिटरवरील सद्यस्थितीपर्यन्त असलेले देयक सरासरी 657 युनिट धरुन विद्युत देयक द्यावे व नविन विद्युत मिटर बसविलेनंतर रिडींगप्रमाणे नियमित विद्युत देयके द्यावीत. 4. सामनेवाला कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |