तक्रार दाखल ता.24/05/2013
तक्रार निकाल ता.19/08/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. सदस्या–सौ. मनिषा एस.कुलकर्णी.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी त्यांची पत्नी पाण्याच्या पाटामध्ये हात धुणेसाठी गेल्या असताना, त्यांना विजेचा शॉक बसुन त्या जागेवरच मयत झालेमुळे झालेल्या नुकसानी दाखल तसेच पत्नीच्या मृत्युमुळे कुटूंबातील आधार नाहीसा झालेमुळे झालेल्या नुकसानीदाखल तसेच मानसिक व शारिरीक त्रासाने नुकसानीपोटी रक्कम वसुल होऊन मिळणेकरीता केलेली आहे.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे:-
तक्रारदार हा वर नमुद पत्त्यावर राहणारा शेतकरी असून तक्रारदार यांची सोळांकूर, ता.राधानगरी येथे गट नं.724 येथे शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीवरील विहीरीतील पाण्यावर शेतीची कसवणूक करतात. सदर शेतजमीनीवरच तक्रारदार यांचे कुटूंबाची उपजिवीका अवलंबून आहे. तर जाबदार ही वेगवेगळया ग्राहकांना विद्युत पुरवठा करणारी कंपनी आहे. जाबदार कंपनी विजेचा पोलवरुन जोडलेल्या विद्युतवाहक तारांमधून ग्राहकांना वीजपुरवठा करते. जाबदार कंपनीचे विजेचे खांब, तक्रारदार आणि लगतच्या शेतक-यांच्या शेतामध्ये आहेत. जाबदार कंपनी विजेच्या पोलवरुन जोडलेल्या विद्युत वाहन तारांमधून ग्राहकांना विज पुरवठा करते. विज पुरवठा सेफ्टी डिव्हायसेस जाबदार कंपनीस बसवावे लागतात. ग्राहकांना नियमीत वीज पुरवठा करणे, ग्राहकांना नियमित वीज पुरवठा करीत असताना अॅटो स्वीच व्यवस्थित आहेत की नाहीत यांचे निरीक्षण जाबदार कंपनीचे कर्मचा-यांना करावे लागते. त्याचप्रमाणे फेज जोडलेनंतर वीज पुरवठा करताना योग्य ती काळजी घेणे, लाईनचे पेट्रोलिंग व्यवस्थित करणे, लाईन सर्व्हे.योग्य त-हेने करणे, विद्युत वाहक लाईनवर झाडांच्या फांद्या पडलेमुळे किंवा लाईनची वायर खराब झाली का ते पहाणे, ए.जी.फिडरचे ट्रिपींग डिटेल्स गाव चावडी अन्यथा मध्यवर्ती ठिकाणी जाहीर करणे, वगैरे कृर्तव्य जाबदार कंपनीचे अधिका-यांना ग्राहकांचा वीज पुरवठा करीत असताना करावी लागतात. कारण झाडांच्या फांद्या पडून अथवा वादळ पाऊस वारा यापासून वीज पुरवठा करणा-या वाहिनीमध्ये एक जरी वाहिनी खराब झाली तर खराब वाहिनीची दुरुस्ती त्वरीत न झालेस दुर्देवाने एखादा अपघात घडलेस त्याची जबाबदारी पर्यायाने जाबदार कंपनीवर येते. त्यामुळे जाबदार कंपनीचे कर्मचा-यांचे निष्काळजीपणामुळे जाबदार कंपनीस ग्राहकाचे जबाबदारीस सामोरे जावे लागते. तक्रारदारांचे शेत जमीनीमध्ये विहीरीमधील पाणी उपसा करीता जाबदार कंपनीकडून वीज पुरवठा होतो. दि.16.03.2013 रोजी तक्रारदारांच्या पत्नी या तक्रारदारांचे शेतीस पाणी पाजणेचे काम करीत होत्या. सकाळी 10.30 वाजताचे सुमारास थ्री फेज विद्युत पुरवठयावर तक्रारदारांचे विहीरीवरील मोटर सुरु होती. त्यावेळी अचानक 11.45 चे दरम्यान मोटरवर लोड आलेचे तक्रारदारांचे लक्षात आले आणि लगेच विद्युत पुरवठा खंडीत झाला. तक्रारदारांना वीज पुरवठा करणा-या वाहिनीपैकी एक फेज तुटलेमुळे तक्रारदारांचे मोटरवर लोड आलेचे जाबदार कंपनीच्या कर्मचा-यांकडून तक्रारदारांना समजुन आले. त्यावेळी काळम्मावाडी लार्इनवरील तुटलेला ए.जी.कंडक्टर जोडणेकरीता जाबदार कंपनीने वीज पुरवठा बंद केला होता. त्यानंतर 12.25 चे दरम्यान वि.प.कंपनीचे कर्मचा-यांनी अचानक विद्युत पुरवठा सुरू केला. त्यामुळे तक्रारदारांना विद्युत पुरवठा होणा-या थ्री फेज विद्युतवाहीनीपैकी एक फेज तुटली असलेमुळे अचानक विना सुचना आणि विद्युत वाहीनीचे निरीक्षण न करता सुरु झालेल्या विद्युत प्रवाहामुळे 12.30 चे दरम्यान तक्रारदारांचे पत्नीने काठीने पाण्याची मोटर सुरु केलेनंतर जवळच असलेल्या पाण्याच्या पाटामध्ये हात धुणेसाठी गेल्या असता त्यांना विजेचा शॉक बसून त्या जागेस मयत झाल्या. तसेच विद्युत पुरवठा सुरु करणेपुर्वी थ्री फेज विद्युत वाहिनीपैकी एक तुटलेली विद्युत वाहीनी दुरुस्त करणे जरुरीचे होते, असे जर झाले असते तर तक्रारदारांचे शेतामध्ये अपघातच झाला नसता आणि त्यामुळे तक्रारदारांचे पत्नीस जीव गमवावा लागला नसता. सदरहू अपघातामुळे तक्रारदारांची पत्नी मयत झालेमुळे तक्रारदारांचे कुटूंबातील आधार नाहीसा झाला. तसेच तक्रारदारांची दोन मुले आई विना पोरकी झाली. त्यामुळे तक्रारदाराचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले. म्हणून तक्रारदारांनी अपघाताबाबतचे कागदपत्रांसह जाबदार कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. परंतु जाबदार कंपनीचे अधिका-यांनी जाबदार कंपनी ही खाजगीकरण झाले असलेमुळे मुळीच नुकसानभरपाई मिळू शकत नाही म्हणून नाईलाजास्तव तक्रारदारांनी सदरहू तक्रार मंचात दाखल केली. तक्रारदारांची पत्नी अपघातामध्ये मयत झालेमुळे झालेल्या नुकसानीदाखल रक्कम रु.15,00,000/-, तक्रारदारांच्या पत्नीच्या मृत्युमुळे कुटूंबातील आधार नाहीसा झालेमुळे नुकसानीदाखल रक्कम रु.2,00,000/-, मानसिक व शारिरीक त्रासाचे नुकसानीपोटी रक्कम रु.1,00,000/- व सदर तक्रारीचे टायपिंग, झेरॉक्स, पोस्टेज, कोर्ट फी सह खर्चाची रक्कम रु.15,000/- अशी एकूण रक्कम रु.18,15,000/-, सदर रक्कमेवर द.सा.द.शे.15टक्के व्याजाची मागणी तक्रारदारांनी जाबदार यांचेकडून वसुल होऊन मिळावी अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
3. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत जाबदार कंपनीचे अभियंता यांचा रिपोर्ट, संदीप सर्जेराव गायकवाड, प्रकाश मारुती पाटील, दिलीप ईश्वरा चौगले यांचे जबाब, तक्रारदारांचे पत्नीचे मृत्यु प्रमाणपत्र, जाबदार कंपनीचे ट्रीपींग डिटेल्स, तक्रारदारांचे पत्नीचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. जाबदार हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले. त्यांचे कथनानुसार, तक्रारदारांचा अर्ज खोटा, बनावट व रचनात्मक असून खर्चासह फेटाळण्यास पात्र आहे. तक्रार अर्जातील कलम-1 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर असून कलम-2 मधील बराचसा मजकूर जाबदार यांना मान्य असून पैकी वीज पुरवठा सेफ्टी डिव्हायसेस जाबदार कंपनीस बसवावे लागतात. ग्राहकांना नियमित वीज पुरवठा करीत असताना अॅटो स्वीच व्यवस्थित आहेत की नाहीत यांचे निरीक्षण जाबदार कंपनीचे कर्मचा-यांना करावे लागते. त्याचप्रमाणे फेज जोडलेनंतर वीज पुरवठा करताना योग्य ती काळजी घेणे, लाईनचे पेट्रोलिंग व्यवस्थित करणे, लाईन सर्व्हे.योग्य त-हेने करणे, विद्युत वाहक लाईनवर झाडांच्या फांद्या पडलेमुळे किंवा लाईनची वायर खराब झाली का ते पहाणे, या सर्व बाबीं मान्य आहेत. मात्र ए.जी.फिडरचे ट्रिपींग डिटेल्स गाव चावडी अन्यथा मध्यवर्ती ठिकाणी जाहीर करणे, इत्यादी मजकूर हा चुकीचा आहे व तो या जाबदार यांना मान्य नाही. तक्रार अर्जातील इतर सर्व कथने जाबदार यांनी परिच्छेदनिहाय नाकारलेली आहेत. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे कधीही आपले शेतीसाठी विहीरीवर पाणी उपसा करणेकरीता विद्युतयंत्राची मागणी केलेली नव्हती. श्रीपती बाबुराव चौगले यांचे विहीरीवर सदरची मोटर बसवलेली असून त्यांचेशी तक्रारदाराचा काहीही संबंध नव्हता व नाही. विद्युत कनेक्शन देतेवेळी योग्य त्या कागदपत्रांची शहानिशा करतन कनेक्शन दिली जाते. विद्युत मोटरच्या मागे काही अंतरावर ग्राहकाने विद्युत पुरवठयासाठी बसविलेली पेटी असतो. सदर पेटीमध्ये पोलवरुन आलेली विद्युत केबल तीन (3) फ्युज, मेन स्वीच, मीटर, फ्युज व त्यानंतर टिपस्टार बसविणे बंधनकारक असते. टिपस्टारमधून मोटर पंपास विद्युत पुरवठा केला जातो. जाबदार कंपनीची ग्राहकास विद्युत पुरवठा करताना कंपनीकडून मीटरपर्यंतच्या विद्युत लाईनची जबाबदारी असते. त्यानंतरची विद्युत लाईनची जबाबदारी ग्राहकाची असते.
5. तक्रारदारांचे विद्युत पंपावर दि.16.03.2013 रोजी अपघात घडला असे कथन केले आहे. तथापि अपघातादिवशी कोणत्याही लाईनवर कंपनीकडे दुरुस्तीचे काम चालु नव्हते. तसेच सोळांकुर गांवच्या शेती वापरासाठी जाणा-या कोणत्याही विद्युत वहिकेमध्ये खराबी नव्हती. त्यामुळे सदर दिवशी विद्युत पुरवठा खंडीत केला नव्हता व नाही. तसेच थ्री फेज वाहीनेमधील एक फेज तुटली होती हे म्हणणे खोटे आहे व अशी एखादी फेज तुटली होती हे म्हणणे खोटे आहे व अशी एखादी फेज तुटली असता, विद्युत पुरवठा पुर्णपणे बंद होतो व त्यावेळी कोणतीही मोटार चालू होऊ शकत नाही.
6. तक्रारदारांचे पत्नीने काठीने विद्युत मोटर सुरू केली होती व तक्रारदारांनी विद्युत मोटार ही खराब होती. तरीसुध्दा तक्रारदारांनी सदरची मोटार काठीने सुरु केली व सदरची मोटार शॉट झाली असलेने विद्युतप्रवाह ही विद्युत मोटारीतुन लोखंडी पाईपमध्ये गेला व त्या शॉकने त्यांचे पत्नीचा मृत्यु झालेचे दिसून येते व त्यास तक्रारदारच जबाबदार असलेने अर्ज फेटाळणेत यावा. तसेच सदरचे मृत्युपत्राचे अवलोकन करता, तक्रारदाराचे पत्नीचा मृत्यु घरीच झालेचे स्पष्ट होते. याही कारणास्तव अर्ज नामंजूर करावा. तसेच तक्रारदारांनी विद्युत ग्राहक गा-हाणी निवारण मंच तसेच विद्युत लोकपाल यांचेकडे कोणत्याही स्वरुपाची लेखी तक्रार केलेली नाही, याही कारणास्तव अर्ज नामंजूर करावा.
7. तसेच अपघाताचेवेळी शेतीपंपास शेती पंपास विद्युत पुरवठा करणा-या ट्रान्सफॉर्मवरील इतर सर्व मोटारी व्यवस्थित चालु होत्या. तक्रारदारांनी जाबदार कंपनीकडे केव्हाही अपघाताबाबत कागदपत्रांसह नुकसानभरपाईची मागणी केलेली नव्हती व नाही. सबब, नुकसानभरपाई देणेचा प्रश्नच उदभवत नाही. सबब, तक्रार अर्ज नामंजूर करावा असे जाबदार यांचे कथन आहे.
8. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे तसेच जाबदार यांचे कथन व उभय पक्षांचा युक्तीवाद मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हा जाबदार विद्युत कंपनीकडून त्याने केलेल्या मागण्यां मिळणेस पात्र आहे काय ? | होय, अंशत: |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवरण:-
9. मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदार हा वर नमुद पत्त्यावर राहणारा शेतकरी असून तक्रारदार यांची सोळांकूर, ता.राधानगरी येथे गट नं.724 येथे शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीवरील विहीरीतील पाण्यावर शेतीची कसवणूक करतात. सदर शेतजमीनीवरच तक्रारदार यांचे कुटूंबाची उपजिवीका अवलंबून आहे. जाबदार कंपनी विजेचा पोलवरुन जोडलेल्या विद्युतवाहक तारांमधून ग्राहकांना वीजपुरवठा करते. याबाबत उभय पक्षांमध्ये दुमत नाही. सबब, तक्रारदार हा जाबदार कंपनीचा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम-2(1)(d) खाली ग्राहक होतो.
10. तक्रारदार यांचे शेतजमीनीमध्ये विहीरीतील पाणी उपसाकरीता जाबदार कंपनीकडून वीजपुरवठा होतो. दि.16.03.2013 रोजी तक्रारदार व तक्रारदार यांच्या पत्नी हे तक्रारदारांचे शेतीस पाणी पाजणेचे काम करीत असता, सकाळी 10.30 चे सुमारास थ्री फेज विद्युत पुरवठयावर तक्रारदारांचे विहीरीतील मोटार सुरु होती व अचानक 11.45 चे दरम्यान लोड आलेने वीजपुरवठा करणा-या वाहीनीपैकी एक फेज तुटलेने तक्रारदारांचे मोटारवर लोड आलेने जाबदार कंपनीच्या कर्मचा-यांकडून समजून आले. त्यावेळी काळम्मावाडी लाईनवरील तुटलेला ए.जी.कंडक्टर जोडणेकरीता जाबदार कंपनीने वीजपुरवठा बंद केला होता. त्यानंतर 12.25 चे दरम्यान जाबदार कंपनीचे कर्मचा-यांनी अचानक वीजपुरवठा सुरु केलेने, तक्रारदारांना विद्युत पुरवठा होणा-या थ्री फेज विद्युत वाहीनीपैकी एक फेज तुटली असलेमुळे अचानक विना सुचना व विद्युतवाहीनीचे निरीक्षण न करता, सुरु झालेल्या विद्युत प्रवाहामुळे 12.30 चे दरम्यान तक्रारदारांचे पत्नीने काठीने या कामी मोटार सुरु केलेनंतर जवळच असलेल्या पाण्याच्या पाटामध्ये हात धुणेसाठी गेले असताना अचानक शॉक बसून जागेस मृत्यु झाला. विद्युत पुरवठा सुरु करणेपूर्वी थ्री फेज विद्युत वाहिनीपैकी एक तुटलेली विद्युत वाहीनी दुरुस्त करणे जरुरीचे होते असे केले असते. तक्रारदारांचे शेतामध्ये अपघात झाला नसता असे तक्रारदाराचे कथन आहे.
11. जाबदार यांचे कथनानुसार, सदरचा तक्रार अर्ज खोटा, बनावट, रचानत्मक असून तो खर्चासह फेटाळणेत यावा. कलम-1 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर आहे. सेफ्टी डिव्हायसेस, अॅटो स्वीच व्यवस्थित आहे किंवा नाही अथवा फेज जोडलेनंतर वीज पुरवठा सुरु करताना योग्य ती काळजी घेणे, लार्इनचे पेट्रोलिंग करणे तसेच लाईनची वायर खराब आणि का ते पाहणे या बाबींची पाहणी करणे या बाबी मान्य केलेल्या आहेत. जाबदार यांनी घेतलेले आक्षेप पुढीलप्रमाणे-
- तक्रारदारांनी विद्युत मोटार बिघडली असल्याची पूर्ण कल्पना असूनही विद्युत मोटार सुरु केली. त्यास तक्रारदार जबाबदार आहेत.
- तक्रारदारांचे मृत्युप्रमाणपत्राचे अवलोकन करता, मृत्यु घरी झाल्याचे स्पष्ट होते. सबब, अर्ज प्रथमदर्शनीच फेटाळणेस पात्र आहे.
- तक्रारदारांनी विद्युत लोकपाल यांचेकडे लेखी तक्रार केलेली नाही.
- विद्युत मोटार तक्रारदारांचे मालकीची असलेने त्यांनी वेळोवेळी दुरुस्ती करणेची जबाबदारी तक्रारदारांचीच होती.
- तक्रारदारांचे अपघातादिवशी जाबदार कंपनीचे कोणतेही काम चालु नव्हते.
12. तथापि वर नमुद आक्षेपांचा विचार करता, वादाचा मुद्दा या मंचासमोर इतकाच दिसुन येतो की, अपघाताचे दिवशी जाबदार कंपनीचे कुठे काम चालु होते का कि ज्या कारणास्तव सदरचा अपघात घडला. दि.16.03.2013 रोजी 11 के.व्ही. काळम्मावाडी ए.जी.11 के.व्ही. सोळांकूर ए.जी. फीडरचे ट्रीपींग डिटेल्स खालीलप्रमाणे:-
वेळ कारण
10.35 ते 10.40 अर्थ फॉल्ट
10.45 ते 12.25 11 के.व्ही.काळम्मावाडी ए.जी.कंडक्टर तुटलेला जोडण्यासाठी
13.00 ते 13.25 मौजे सोळांकूर येथील अपघामुळे बंद
13.35 ते 14.3 0 यार्ड ए.बी.स्विच जंम्प बदलणेसाठी
15.35 ते 15.4 0 अर्थ फॉल्ट
18.00 ते 24.00 लोड शेडींग
अशा आशयाचे दि.06.04.2013 चे पत्र जाबदार कंपनीचे सब-इंजिनिअर एस.ओ. सोळांकूर यांनी दिलेले पत्र दाखल आहे. यावरुन त्या दिवशी (अपघाताचे दिवशी ) सदरचे काम सुरु होते ही बाब जाबदार कंपनीस नाकारता येणार नाही व पुढे हेही नमुद आहे की, 10.45 ते 12.25 यावेळी 11 के.व्ही. काळम्मावाडी ए.जी.कंडक्टर तुटलेला जोडणेसाठी व त्यापुढील नोंद 13.00 ते 13.25 मौजे सोळांकुर येथील अपघातामुळे बंद अशी आहे. यावरुन (वरील नोंदीवरुन) ज्या वेळेस अपघात झाला. त्यावेळी सदरचे, काळम्मावाडी 11 के.व्ही. येथील ए.जी.कंडक्टर तुटलेला जोडणेसाठी जाबदारचे काम चालु होते. सबब, जाबदार कंपनीने घेतलेला अपघातादिवशी कोणतेही काम चालू नव्हते व वाहीनीमध्ये खराबी नव्हती. सब, विद्युत पुरवठा खंडीत केला नव्हता व नाही हा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे.
13. तक्रारदाराने दाखल कागदपत्रांबरोबर पुराव्याचे अॅफीडेव्हीट दाखल केलेले आहे.
14. जाबदार कपंनीने म्हणण्याखेरीज तसेच जाबदार यांनी घेतलेल्या आक्षेपांचे पृष्ठर्थ मंचासमोर कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. जसे की, तक्रारदारांचे मोटारीत काही दोष होता. अगर घेतलेल्या आक्षेपांचे पृष्ठर्थ पुराव्याचे शपथपत्रही दाखल केलेले नाही. सबब, हे मंच जाबदार कंपनीने घेतलेले वर नमुद आक्षेप फेटाळून लावत आहे व तक्रारदारांनी तसेच तक्रारदारांनी आपले तक्रार अर्जातील कलम-3 मध्ये हेही नुद केले आहे की, तक्रारदारांना वीजपुरवठा करणा-या वाहिनीपैकी एक फेज तुटलेमुळे तक्रारदारांचे मोटारवर लोड आलेने जाबदार कंपनीचया कर्मचा-यांकडून तक्रारदारांना समजून आले, जाबदार यांनी विद्युत पुरवठा सुरु करतेवेळी विद्युत पुरवठा करणा-या सर्व वाहीनी फेज सुस्थितीत आहेत की नाही. यांची खात्री करुनच मग विद्युत पुरवठा सुरु करावयास हवा होता. मात्र तसे जाबदार कंपनीकडून झालेचे या मंचास दिसून येत नाही. सबब, सदरची काळजी न घेतलेने तक्रारदारांचे पत्नीस प्राण गमवावा लागला आहे व सदरची एक सेवात्रुटीच आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
15. मुद्दा क्र.3 व 4:- तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने निश्चितच तक्रारदार हा त्याने केलेल्या मागण्या अंशत: का पण मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदारांना जाबदार कंपनीचे निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातामुळे व तक्रारदारांची पत्नी मयत झालेमुळे तक्रारदारांचे कुटूंबातील आधार नाहीसा झाला. तसेच तक्रारदारांची मुले आई विना पोरकी झाली व त्यामुळे कधीही भरुन न येणारे नुकसान झालेमुळे नुकसानी दाखल रककम रु.17,00,000/- व आधार नाहीसा झालेमुळे रककम रु.2,00,000/- अशी मागणी केली असली तरी मागितलेली वर नमुद रक्कम या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने नुकसानीदाखल रककम रु.2,00,000/- तक्रारदारास देणेच निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी मागितलेली रक्कम रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.15,000/- हीही रक्कम मा.मंचास संयुक्तिक वाटत नसलेने, तथापि तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. सबब, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 जाबदार म.रा.वि.वि.कंपनी यांनी तक्रारदार यांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
3 जाबदार म.रा.वि.वि.कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंचवीस हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
4 जाबदार म.रा.वि.वि.कंपनी यांनी तक्रारदारांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
5 जाबदार म.रा.वि.वि.कंपनी यांनी आदेशाची पूर्तता 45 दिवसांत करणेचे आहे.
6 विहीत मुदतीत जाबदार यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना जाबदार विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
7 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.