(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्षा (प्र.))
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ता हा पदवीधर असुन त्यांने स्वतःच्या शिक्षणाचा फायदा करुन घेण्याचे उद्देशाने नागरीकांना चांगल्या प्रतिचे शुध्द पाणी मिळावे याकरीता ‘निर्मल सर्व जल’ या नावाने व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे स्वयं रोजगाराकरीता विज पुरवठा मिळण्याकरीता अर्ज सादर केला व विरुध्द पक्षांनी दि.08.12.2016 रोजी ग्राहक क्र.470124376412 व्दारे विज पुरवठा दिला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विज जोडणी करुन दिल्यानंतर कोणतेही विज देयक पाठविले नाही व दि.15.07.2017 रोजी पहीले विज देयक पाठविले. या विज देयकात मागिल रिडींग 00 दर्शविले असुन चालू रिडींग 12377 युनिट दर्शवुन रु.6,220/- वे देयक पाठविण्यांत आले. त्यानंतर दि.15.08.2017 रोजीचे चालू रिडींग 1638 दर्शवुन एकूण 361 युनिटचे देयक तक्रारकर्त्यास पाठविण्यात आले त्याचाही भरणा तक्रारकर्त्याने केलेला आहे.
2. त्यानंतर विरुध्द पक्षाने दि.17.09.2017 रोजी 242 युनिट सरासरी वापराचे देयक पाठविले असुन या देयकात चालु रिडींग देण्यांत आलेले नाही. त्यानंतर विरुध्द पक्षाने दि.18.10.2017 रोजी 242 युनिट सरासरी वापराचे रु.5,130/- चे देयक मिटर नादुरुस्त घोषीत करुन तक्रारकर्त्यास पाठविले असुन सदर देयकाचा भरणा तक्रारकर्त्याने दि..08.11.2017 रोजी केला आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, विजेचे मिटर जर नादुरुस्त असेल तर त्याचा रखरखाव करण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्षांची आहे. परंतु विरुध्द पक्षांनी मिटर नादुरुस्त आहे असा अहवाल प्राप्त होऊन सुध्दा तक्रारकर्त्याचे मिटर बदलले नाही अथवा सक्षम अधिका-याकडून किंवा तज्ञांकडून तपासून घेतले नाही, ही विरुध्द पक्षांची अनुचित व्यापारी पध्दत आहे.
3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, वादातील देयक दि.18.11.2017 रोजी पाठविले असुन त्यात मिटरचे मागिल वाचन 1638 तर चालू वाचन 9766 दर्शविले आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याचेकडे 10..12 किलोवॅटचा मंजूर भार असुन संलग्न भार हा 5 किलोवॅट पेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याचा सरासरी विज वापर 8 ते 9 युनीट प्रति येतो. तसेच जर तक्रारकर्त्याकडील मंजूर भार 10.12 समजा 24 तास वापरला तरी 8128 युनिट विज वापर होऊ शकणार नाही, असे तक्रारकर्त्याने नमुद केले आहे. अश्या परिस्थितीत विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दि.18.11.2017 रोजी पाठविलेले रु.96,340/- चे देयक प्राथमिकदृष्टया चुकीचे आहे.
4. तक्रारकर्त्याने याबाबत दि.11.12.2017 रोजी विरुध्द पक्षांकडे तक्रार केली असता सहाय्यक अभियंता यांनी दि.12.12.2017 रोजी स्थळ निरीक्षण केले व तक्रारकर्त्याकडे 2 एसी, 22 अश्वशक्तीची मोटार नसतांना सुध्दा अशी मोटार व एसी आहे असा अहवाल दिला. याबाबत विरुध्द पक्षांना दि.20.12.2017 रोजी लेखी तक्रार केली असता त्यावर विरुध्द पक्षांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्यास सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिल प्रमाणे मागणी केली आहे.
3. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत विरुध्द पक्षाने दिलेली सेवा न्युनतापूर्ण व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब असल्याचा आदेश व्हावा. तसेच विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास पाठविलेले दि.18.11.2017 चे रु.96,340/- व दि.19.12.2017 चे रु.1,01,650/- चे विज देयक बेकायदेशिर असल्यामुळे रद्द करण्यात यावे. तक्रारकर्त्याचा विज पुरवठा खंडीत करु नये तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची रक्कम रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्त्याने निशाणी क्र.3 नुसार 11 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणीकरुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यांत आली. विरुध्द पक्षास नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर होऊन त्यांनी निशाणी क्र. 9 वर आपले लेखीउत्तर दाखल केले.
5. विरुध्द पक्षाने निशाणी क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याने तक्रारीत त्यांचे विरुध्द लावलेले सर्व आरोप अमान्य करुन तक्रारकर्ता हा पाणी पिण्यायोग्य शुध्द करुन थंड करुन देण्याच्या व्यवसायासाठी विजेचा वापर करीत होता. तसेच या व्यवसायासाठी अन्न व औषधी प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग वभिाग व इतर विभागाकडून परवानग्या घ्याव्या लागतात. तसेच सदर व्यवसायास 2 ते 3 कामगारांची आवश्यकता असते व तक्रारकर्त्याने सदरचा व्यवसाय हा नफा प्राप्त करण्याचे उद्देशाने सुरु केला असुन तो ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2(डी) मधील ग्राहक या संज्ञेत बसत नाही. म्हणून सदरची तक्रार या मंचास चालविण्याचा अधिकार नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे.
6. विरुध्द पक्षाने आपल्या विषेश कथनात नमुद केले आहे की, तक्रारकर्ताने पाणी पिण्यायोग्य शुध्द व थंड करुन देण्याचे व्यवसायाकरीता दि.08.12.2017 रोजी विज पुरवठा देण्यात आला होता व त्या दिनांकापासुन तक्रारकर्ता विजेचा नियमीत वापर करीत आहे. विरुध्द पक्षाने नमुद केले आहे की, विद्युत देयकाचे संगणक प्रणालीत नवीन विद्युत पुरवठ्याची माहिती भरण्यासाठी तांत्रिक कारणास्तव विलंब झाल्याने डिसेंबर ते मे-2017 या कालावधीत तक्रारकर्त्यास देयके पाठविण्यात आलेली नाही. परंतु या कालावधीत तक्रारकर्त्याने विज देयके न मिळाल्याबाबत कोणतीही तक्रार विरुध्द पक्षाकडे केलेली नाही किेवा देयकाची मागणी केली नाही. त्यानंतर जुलै महिन्यात तक्रारकर्त्याच्या मिटरचे रिडींग 7277 युनिट छायाचित्रानुसार घेण्यात आले परंतु रिडींगमधील हजार स्थानातील इंग्रजी 7 हा इंग्रजी 1 सारखा दिसल्याने चुकीने देयकात मिटर रिडींग 1277 असे नमुद करण्यात आले, त्यामुळे तक्रारकर्त्यास 6000 एवढया कमी युनीटचे विज देयक देण्यांत आले होते. तसेच तक्रारकर्त्यास दि.15.07.2017 चे देयकातील चालु रिडींग हे दि.08.12.2017 ते 12.07.2017 या कालावधीचे विद्युत वापराचे 617 युनीटची रक्कम रु.5,962/- देयक देण्यांत आले आहे.
7. विरुध्द पक्षाने पुढे असे नमुद केले आहे की, ऑगष्ट 2017 चे चालु रिडींग 7638 युनिट एवढे आहे, परंतु या महिन्यात सुध्दा हजार स्थानावरील 7 हा आकडा इंग्रजी 1 सारखा दिसल्याने चुकीने चालु रिडींग 1638 व मागील रिडींग 1277 असे नमुद करण्यात आले आहे. तसेच माहे सप्टेंबर 2017 मध्ये रिडींग नॉट टेकन असे नमुद करुन तक्रारकर्त्यास सरासरी 242 युनीटचे देयक देण्यात आले. त्यानंतर माहे ऑक्टोबर 2017 मिटर रिडींग छायाचित्रानुसार तक्रारकर्त्यास 9129 युनीट एवढे आहे परंतु या महिन्यात सुध्दा चुकीने विद्युत देयकात चालु रिडींगमध्ये फॉल्टी असे नमुद करण्यांत आले व मागील रिडींग 1277 असे नमुद करुन तक्रारकर्त्यास सरासरी 242 चे देयक देण्यात आले. त्याचप्रमाणे नोव्हेंबर 2017 चे देयकात मिटर रिडींग छायाचित्रानुसार तक्रारकर्त्यास 9766 युनीट एवढे नमुद असुन या देयकात मागील रिडींग 1638 असुन चालू रिडींग अचुक नमूद करण्यात आलेले आहे असुन माहे जुलै ते ऑक्टोबर 2017 पर्यंतच्या विज देयकात झालेल्या चुकांमुळे वसुल न करण्यांत आलेली विद्युत देयकाची रक्कम व माहे नोव्हेंबर महिन्याचे देयकाची रक्कम अशी एकूण रु. 96,340/- दर्शविण्यांत आलेली आहे. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरात पुढे नमुद केले आहे की, माहे डिसेंबर 2017 चे देयकामधील छायाचित्रानुसार चालु रिडींग हे 10409 व मागील रिडींग 9766 एवढे दर्शविले असुन त्यानुसार तक्रारकर्त्यास एकूण 643 युनिटचे व मागील थकबाकी रु.97,540/- मिळून रु.1,01,650/- चे देयक देण्यांत आलेले आहे.
8. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरात असे नमुद केले आहे की, देयके तयार करणा-या खाजगी संस्थेच्या कर्मचा-याच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यास 6000 कमी युनिटचे देयके देण्यात आली होती. परंतु माहे नोव्हेंबर 2017 चे विद्युत देयकात 9766 एवढे चालू रिडींग छायाचित्रानुसार अचूक नमूद करण्यात आले व तक्रारकर्त्यास 8128 युनिटचे विज देयक देण्यांत आले. तसेच तक्रारकर्त्यास देण्यात आलेल्या सरासरी विज देयकाची रक्कम रिडींग नुसार देण्यात आलेल्या देयकातून वजा करण्यात आलेली आहे. याशिवाय दि.25.11.2017 रोजी तक्रारकर्त्याचे उपस्थितीत विद्युत मिटरची तपासणी केली असता ते अचूक असल्याचे आढळून आले.
9. तक्रारकर्ताची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्षाने दाखल केलेले बयान, तसेच दाखल दस्तावेज, शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता ही विरुध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्ताप्रती सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
10. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याने नागरीकांना चांगल्या प्रतिचे शुध्द पाणी मिळावे याकरीता ‘निर्मल सर्व जल’ या नावाने व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे स्वयं रोजगाराकरीता विज पुरवठा मिळण्याकरीता अर्ज सादर केला व विरुध्द पक्षांनी दि.08.12.2016 रोजी ग्राहक क्र.470124376412 व्दारे विज पुरवठा दिला असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
11. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या अर्जदाराचे CPL मधे सुध्दा तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे 1277 युनिट व 1638 युनिट वापर दिसत आहे. परंतु विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की, 1277 व 1638 मध्ये 7 चे जागी 1 असे वाचण्यात व लिहीण्यात आलेले आहे. तसेच विरुध्द पक्षाचे हे ही म्हणणे आहे की, ही चुक विरुध्द पक्षाच्या मिटर रिडींग घेणा-या खाजगी संस्थेच्या कर्मचा-याचे चुकीमुळे झालेले आहे. परंतु ह्या संस्थेला काम विरुध्द पक्षाने स्वतः दिलेले आहे, त्यासाठी तक्रारकर्त्याला जबाबदार धरता येणार नाही. तसेच CPL हे विरुध्द पक्षाने तयार केलेले आहे व त्यात त्यांनी स्वतः 1277 व 1638 नमुद केलेले आहे त्यामुळे सदरची चुक ही विरुध्द पक्षाची आहे. एकंदरीत अर्जदाराने विरुध्द पक्षाकडून वेळोवेळी मिळालेली देयके भरलेली आहे, परंतु विरुध्द पक्षाचे चुकीचा र्भुदंड तक्रारकर्त्यावर लादने हे अनुचित आहे. तसेच या सर्वर प्रकरणात तक्रारकर्त्याची कुक कुठेही नाही. देयके बनविणे, रिडींग घेणे, CPL बनविणे इत्यादी सर्व कार्य विरुध्द पक्षांचे असुन त्यांनी केलेल्या चुकीकरीता तक्रारकर्त्यास जबाबदार धरता येत नाही, असे या न्याय मंचाचे मत आहे. तसेच विरुध्द पक्षाचे हे म्हणणे गृहीत धरता येत नाही की, तक्रारकर्ता व्यावसायीक कारणासाठी विज वापर करीत आहे म्हणून तो ग्राहक होत नाही. कारण तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून सेवा घेतली होती व सेवा ही व्यवसायासाठी असली तरी ती सेवा असल्यामुळे विरुध्द पक्षास उचित सेवा देणे गरजेचे आहे.
12. वरील विवेचनावरुन व तकारकर्त्याने दाखल केलेल्या न्याय निवाडयांवरुन या प्रकरणात विरुध्द पक्षाने केलेल्या चुकीसाठी तक्रारकर्त्यास जबाबदार धरता येत नाही, हे सिध्द होते. म्हणून सदर प्रकरणात हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दिलेली विद्युत देयके रद्द करावी.
3. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास त्याने वापरलेल्या विद्युत पुरवठ्याप्रमाणे नियमीत देयके द्यावीत.
4. दोन्ही पक्षांनी प्रकरणाचा खर्च स्वतः सहन करावा.
5. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
6. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.