Maharashtra

Sangli

CC/15/78

MRS. SUMAN SHREEPATI KADAM - Complainant(s)

Versus

MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION COMPANY LTD. MUMBAI THROUGH EXECUTIVE ENGINEER SHRI VISHW - Opp.Party(s)

ADV. M.N. SHETE

03 Jun 2015

ORDER

                                              नि.12

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे

मा.सदस्‍या - श्रीमती वर्षा शिंदे

मा.सदस्‍या – श्रीमती मनिषा कुलकर्णी

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 78/2015

तक्रार नोंद तारीख   : 17/03/2015

तक्रार दाखल तारीख  :   20/03/2015

निकाल तारीख         :    03/06/2015

 

सौ सुमन श्रीपती कदम

रा.कुकटोळी, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली                       ....... तक्रारदार

 

विरुध्‍द

 

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्या.मुंबई

शाखा – सं.व सु. विभाग, कवठेमहांकाळ,

अंबिका चित्रमंदिराजवळ, ता.कवठेमहांकाळ

जि.सांगली तर्फे

कार्यकारी अभियंता श्री विश्‍वास रामु कांबळे                     ........ सामनेवाला

 

तक्रारदार  तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे

                                     जाबदार :  एकतर्फा

 

- नि का ल प त्र

 

द्वारा : मा. सदस्‍या : सौ वर्षा नं. शिंदे  

 

 

1.    प्रस्‍तुतची तक्रार, तक्रारदाराचे शेजा-यांनी दांडगाव्‍याने तक्रारदाराचे विद्युत जोड सर्व्हिस वायर काढून टाकलेनंतर ती जोडून देणेसाठी सामनेवालास अर्ज देवूनही विद्युत जोडणी न करुन सामनेवालांनी सेवात्रुटी केलेने दाखल केली आहे.  प्रस्‍तुतची तक्रार स्‍वीकृत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झाला.  मंचाची नोटीस सामनेवाला यांनी स्‍वीकारलेली आहे.  त्‍याची पोहोच नि.7 वर दाखल आहे.  तरीही सामनेवाला सातत्‍याने गैरहजर राहिलेने नि.1 वर त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला आहे.

 

2.    तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी -

      तक्रारदार हे कुकटोळी, ता.कवठेमहांकाळ येथील रहिवासी असून गट नं.179 मध्‍ये बांधलेल्‍या ग्रामपंचायत असेसमेंट लिस्‍ट नं.392 मध्‍ये कायमपणे राहतात.  सदर तक्रारदाराचे मिळकतीमध्‍ये घरगुती विद्युत जोड असून तयाचा ग्राहक क्र. 277900001420 असा आहे.  दि.16/2/15 रोजी तक्रारदाराचे शेजारी जमीन असलेले संतोष आनंदराव कदम व आनंदराव धन्‍नाप्‍पा कदम यांनी आमच्‍या रानावरुन विद्युत जोडची सर्व्हिस वायर का घेवून गेला, म्‍हणून शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करुन व प्रथम काठीने सर्व्हिस वायरला हिसका देवून व सर्व्हिस वायर शॉर्ट करुन, संतोष हा स्‍वतः इलेक्‍ट्रीक पोलवर चढून तक्रारदाराचे सर्व्हिस कनेक्‍शनचे विद्युत जोड तोडून टाकले.  सदर वायरी रानात मोकळया टाकून दिल्‍या.  त्‍यावरुन ट्रॅक्‍टर ट्रेलरची ये-जा वाहतूक चालू असून केबलचे नुकसान चालू आहे.  सदरचे सर्व्हिस वायरला व सपोर्टींग तारेला तक्रारदाराने रु.2,500/- खर्च केले आहे.  आमच्‍या रानावरुन सर्व्हिस वायर घेवून जायची नाही तसेच विद्युत मंडळाने कनेक्‍शन जोडले तरी ते पुन्‍हा तोडून टाकणार, तुम्‍हाला कोठे जायचे तेथे जा, असे संतोषने सांगितले.  त्‍याचदिवशी दि.16/2/15 रोजी सामनेवालाकडे तक्रारअर्ज देवून शेजा-यावर कारवाई करुन विद्युत जोड जोडून देण्‍याकरीता अर्ज दिला.  मात्र आजअखेर विद्युत जोडणी केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराचे कुटुंबियांना अंधारात रहावे लागत आहे. 

 

तक्रारदाराच्‍या दोन गायी व म्‍हैस यांची व्‍यवस्‍था व देखभाल अंधारात करावी लागते, तक्रारदाराचे नातवंडांना संध्‍याकाळचा अभ्यास करणे अशक्‍य झाले आहे.  त्‍याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  तक्रारदाराचे शेजारील जमीन मालक हे गुंड प्रवृत्‍तीचे आहेत.  सामनेवाला व संबंधीत पोलीस ठाणेत तक्रार देवूनही ते तक्रारदारांच्‍या सर्व्हिस केबलला काहीही संरक्षण देण्‍यास तयार नाहीत.  सामनेवालांनी अद्यापी विद्युत जोडणी न देवून तक्रारदारास मानसिक त्रास दिलेला आहे.  तक्रारदाराची सामाजिक प्रतिष्‍ठा कमी केली आहे.  वारंवार लेखी तोंडी पाठपुरावा करुनही वीज जोडली नाही.  त्‍याचे वीज जोडणीचे कायदेशीर कर्तव्‍य पार पाडलेले नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराचे मानसिक खच्‍चीकरण झाले आहे.  तक्रारदाराची मानसिक छळवणूक सामनेवाला यांनी केली आहे.  अशा प्रकारे दूषित सेवा दिलेने व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.  सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदाराचा विद्युत जोड जोडून देणेबाबत व सदर सर्व्हिस केबलला संरक्षणाची हमी देणेबाबत सामनेवालांना आदेश व्‍हावेत, सामनेवालांचे कर्तव्‍यचुतीमुळे विद्युत जोडची सर्व्हिस केबल खराब अथवा शॉर्ट झाली असलेस सामनेवालाचे खर्चाने जोडून देणेबाबत आदेश व्‍हावा, दि.16/2/05 पासून विद्युत कनेक्‍शन बंद असलेमुळे नुकसानीपोटी रु.40,000/-, मानसिक छळापोटी रु.30,000/-, तक्रारअर्जाच्‍या खर्चापोटी रु.5,000/- तक्रारदारांना देणेबाबत सामनेवालांना आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.

 

3.    आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ठयर्थ तक्रारदाराने नि.2 वर आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 चे फेरिस्‍त अन्‍वये विद्युत जोड बिल, घटनास्‍थळाचे फोटोची मूळ प्रत, सामनेवालाकडे दिलेला तक्रारीअर्ज, पोलिस निरिक्षक कवठेमहांकाळ यांना दिलेली वर्दी, तहसिलदार कवठेमहांकाळ यांना दिलेले पत्र, पोलीस अधिक्षक सांगली यांना दिलेले पत्र, इ. च्‍या सत्‍यप्रती दाखल केलेल्‍या आहेत.  नि.9 अन्‍वये मार्च 2015 चे वीज बिलाची सत्‍यप्रत, नि.10 अन्‍वये तक्रारअर्जासोबत दाखल प्रतिज्ञापत्र हेच पुराव्‍याचे शपथपत्र वाचणेत यावे अशी पुरसीस दाखल केली आहे. 

 

4.    सामनेवालास नोटीस बजावूनही सामनेवाला मंचासमोर हजर राहिले नाहीत तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. सबब, त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वरती एकतर्फा आदेश करणेत आला.

 

5.    तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व वकीलांचा युक्तिवाद यांचा विचार करता सदर प्रकरणात खालील मुद्दे निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.

          मुद्दे                                                            उत्‍तरे

 

1.  सामनेवालाने सेवात्रुटी केली आहे काय ?                             होय

2.  तक्रारदाराच्‍या मागण्‍या मंजूर होण्‍यास पात्र आहेत काय ?              होय, अंशतः

3.  अंतिम आदेश                                               शेवटी दिलेप्रमाणे.

 

:-  कारणे  -:

मुद्दा क्र.1 ते 3 एकत्रित

6.    तक्रारदारास मौजे कुकटोळी ता.कवठेमहांकाळ गट नं.179 मध्‍ये बांधलेल्‍या ग्रामपंचायत असेसमेंट लिस्‍ट 392 मध्‍ये कायमपणे राहण्‍यास असलेल्‍या मिळकतीमध्‍ये सामनेवाला यांनी तक्रारदारास घरगुती विद्युत जोड दिलेला आहे व त्‍याचा ग्राहक क्रमांक 277900001420 असा आहे व घर नं. 362/2 असा आहे हे नि.4/1 वरील दाखल वीजबिलावरुन सिध्‍द होते.  तक्रारदार नियमितपणे वीजबिल भरणा करीत होता याबाबत वाद नाही.  तक्रारदाराने नि.9 फेरिस्‍त अन्‍वये मार्च 2015 चे बिल दाखल केले आहे.  त्‍याच्‍या नि.8 वरील अर्जातील कथनाप्रमाणे वीज पुरवठा बंद असतानाही मार्च 2015 चे लाईट बिल दिले आहे व त्‍यापुष्‍ठयर्थ सदरचे बिल दाखल केलेले आहे.  तक्रारदारास दिलेल्‍या विद्युत जोडचा सर्व्हिस वायर तक्रारदार याचे शेजारी संतोष आनंदराव कदम व आनंदराव धनाप्‍पा कदम याने त्‍याचे रानावरुन सर्व्हिस वायर नेली या वादातून दि.16/2/15 रोजी नमूद संतोषने स्‍वतः इलेक्‍ट्रीक पोलवर चढून दिलेले सर्व्हिस कनेक्‍शनचे विद्युत जोड तोडून टाकलेचे तक्रारदाराचे कथन कलम 1 मध्‍ये नमूद आहे.  यावरुन सदर जोडाचा विद्युत पुरवठा सामनेवाला वीज कंपनीने खंडीत केलेला नव्‍हता ही बाब सिध्‍द होते.  त्‍यामुळे तक्रारदाराने मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या रिव्‍हीजन पिटीशन नं.604/2003 चंद्रकांत महादेव कदम विरुध्‍द असिस्‍टंट इंजिनिअर, एम.एस.ई.बी. आटपाडी व इतर मधील  पारीत केलेला आदेश दाखल केलेला आहे.  प्रस्‍तुत पूर्वाधाराचे अवलोकन करता नमूद प्रकरणातील तक्रारदार हा नियमितपणे वीजबिल भरणा करीत होता.  मात्र कोणत्‍याही कारणाशिवाय त्‍याला जादा रकमेचे बिल दिले त्‍यावेळी कोणतीही देय रक्‍कम अथवा थक नव्‍हता तरीही विद्युत पुरवठा खंडीत केल्‍याने व तो 65 दिवसानंतर पुनश्‍च सुरु केल्‍याने सदरची बाब ही सेवात्रुटी धरुन प्रतिदिन रु.500/- प्रमाणे देणेबाबत आदेश झालेला होता व सदरची रक्‍कम ज्‍या अधिका-याकडून सदर सेवात्रुटी घडलेली आहे त्‍याच्‍याकडून वसूल करणेबाबत कंपनीस निर्देश देण्‍यात आले होते.  याचा विचार करता सदरचा पूर्वाधार प्रस्‍तुत प्रकरणी लागू होत नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  त्‍यामुळे सामनेवाला विमा कंपनीने अशा प्रकारचे जादा बिल दिले व त्‍यापोटी विद्युत पुरवठा खंडीत केला असे तक्रारदाराचे तक्रारीकथन नाही व तशी वस्‍तुस्थितीही नाही.  तक्रारदाराने नि.8 अन्‍वये अर्ज देवून वीज पुरवठा बंद असतानासुध्‍दा मार्च 2015 चे लाईट बिल दिले आहे असे कथन केले आहे.  मात्र त्‍याअनुषंगिक तक्रारीकथन नि.1 मध्‍ये नाही अथवा त्‍याप्रमाणेची दुरुस्‍ती मागणी केलेली नाही.  त्‍यामुळे नमूद बिलाचा व वापर बंद असताना अवास्‍तव वाढीव रकमेचा तक्रारीकथनाचा विचार या प्रकरणाशी करणे न्‍यायोचित नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  कारण त्‍याबाबत तक्रारअर्जामध्‍ये तक्रारदाराने वादच उपस्थित केलेला नाही व त्‍याअनुषंगाने योग्‍य तो पुरावा या मंचासमोर आणलेला नाही.  त्‍यामुळे त्‍याबाबतची सेवात्रुटी झाली की नाही या खोलात हे मंच जात नाही.  त्‍याबाबत हे मंच कोणतेही भाष्‍य करीत नाही.  तक्रारदारास त्‍याबाबतची स्‍वतंत्ररित्‍या दाद मागण्‍याची मुभा राहील या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

7.    या मंचापुढे वादाचा मुद्दा इतकाच आहे की, तक्रारदार व त्‍याचे शेजारी यांचेमध्‍ये असलेल्‍या मतभेदामुळे तक्रारदाराचे वीज कनेक्‍शन खंडीत झालेले होते व ते तक्रारदाराने दि.16/2/15 रोजी नि.4/2 अन्‍वये सामनेवाला यांना अर्ज देवूनही त्‍याची पुनर्जोडणी केलेली नाही या मुद्याइतकीच सेवात्रुटी झाली किंवा नाही याचा विचार करत आहे.  ही बाब शाबीत झालेली आहे की, शेजा-याने त्‍याच्‍या रानावरुन तक्रारदाराच्‍या विद्युत जोडणीची सर्व्हिस वायर नेल्‍याने त्‍या वादातून सर्व्हिस कनेक्‍शनची वायर तोडून टाकलेली आहे.  परिणामी तक्रारदाराच्‍या विद्युत जोडणीचा वीज पुरवठा खंडीत झालेला आहे.  सदर वायर रानात मोकळी टाकली असलेने त्‍रूावरुन ट्रॅक्‍टर ट्रेलरची येजा सुरु आहे व त्‍यामुळे वायरचे नुकसान होत आहे.  याचा विचार करता, नि.4/3 अन्‍वये तक्रारदाराने पोलीस निरिक्षक कवठेमहांकाळ यांचेकडे नमूद तक्रारदाराचे मुलाने शेजा-यांविरुध्‍द तक्रार दाखल केलेली आहे व यापूर्वीही उभयतांमध्‍ये ब-याच फौजदारी केसेस झालेल्‍या होत्‍या व त्‍या मिटविल्‍याचेही नमूद केलेले आहे.  यावरुन तक्रारदार व शेजा-यांमध्‍ये ब-याच कालावधीपासून मतभेद सुरु असल्‍याचे सिध्‍द होते व त्‍यातूनच नमूद सर्व्हिस वायर तोडून टाकली आहे यासाठी सामनेवाला कंपनी जबाबदार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  मात्र नि.4/4 अन्‍वये तक्रारदाराने तहसिलदार कवठेमहांकाळ यांचेकडे अद्यापही कनेक्‍शन सुरु केले नसलेबाबत त्‍याची चौकशी करणे व वीज जोडणी मिळावी अशी विनंती केल्‍याचे दिसून येते.  नि.4/5 अन्‍वये मा.पोलिस अधिक्षक यांनाही त्‍याच प्रकारची विनंती केलेली आहे.  तसेच नि.4/2 अन्‍वयेही त्‍याचप्रकारचा अर्ज सामनेवाला कंपनीचे वरिष्‍ठ अभियंता कवठेमहांकाळ यांना दिलेला असून सदरचा अर्ज त्‍यांना दि.16/2/15 रोजी मिळालेबाबतची पोहोच सहीशिक्‍क्‍यानिशी दिलेली आहे.  तरीही प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदाराच्‍या नमूद तक्रारीअर्जावर काय कार्यवाही केली अथवा नाही याचा खुलासा या मंचासमोर हजर राहून देणे सामनेवालांना शक्‍य असताना व तशी संधी देवूनही ते मंचासमोर हजर राहिलेले नाहीत व तक्रारदाराची तक्रार खोडून काढलेली नाही. 

 

8.    सबब, सदर एकंदरीत वस्‍तुस्थिती व पुराव्‍याचा विचार करता, अ) अशा मतभेदामुळे खंडीत झालेला विद्युत पुरवठा हा सामनेवाला यांनी पुनश्‍च जोडून देणे हे सामनेवालांवर बंधनकारक होते का ?   ब) सदर वीज जोडणी पुनश्‍च द्यावयाची झाल्‍यास करावा लागणारा सर्व्हिस वायर व सपोर्टींग वायरचा खर्च कंपनीवर बसविता येईल का ? या प्रमुख मुद्यांचा विचार करावा लागेल. 

 

9.    मुद्दा अ चा विचार करता, महावितरण महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्या. यांनी आर.इ.सी. व मंत्रालय यांच्‍या सहाय्याने तांत्रिक कर्मचा-यांसाठी माहिती पुस्तिका प्रसिध्‍द केलेली आहे.  सदर माहिती पुस्तिकेमध्‍ये वीज कायदा 2003 व त्‍यामध्‍ये वेळोवेळी झालेल्‍या बदलांच्‍या आधारे तसेच भारतीय विद्युत नियमावली 1956 नुसार अ.क्र.1 ते 22 अन्‍वये विविध शीर्षकाखाली कायद्याच्‍या तरतुदीनुसारची माहिती दिलेली आहे.  यामध्‍ये अ.क्र.2 वर विद्युत कंपनीचे कार्य, कर्तव्‍ये व जबाबदा-या (पान 21 ते 35) अ.क्र.8 सर्व्हिस कनेक्‍शन मीटरींग बिलींग व कलेक्‍शन (पान क्र.117 ते 130) या शीर्षकाखाली कायद्याच्‍या असणा-या तरतुदींची माहिती नमूद केलेली आहे.  तांत्रिक कर्मचा-यांची कर्तव्‍ये यामध्‍ये अ.क्र.4 वरती वीज ग्राहकाच्‍या तक्रारीचे निवारण (लवकरात लवकर व सुरक्षितपणे) अ.क्र.6 वीज वितरण आयोगाने निर्देशित केलेल्‍या (SOP) गुणमानकाप्रमाणे व ग्राहकाची सनद मध्‍ये केलेल्‍या नियमाप्रमाणे ग्राहकांना सेवा देणे बाबत स्‍पष्‍टता आहे. सेक्‍शन ऑफिसमधील लाईनमनचे प्रमुख कामे यामध्‍ये अ.क्र.2 वर ग्राहकाने तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदविल्‍यावर लवकरात लवकर त्‍या तक्रारीचे निवारण करणे व त्‍याची माहिती तक्रार निवारण कक्षाला देणे, अ.क्र.3 मध्‍ये सेक्‍शनमधील विद्युत उपकरणे व लाईन्‍समध्‍ये दोष उत्‍पन्‍न झालयास ताबडतोब तो दूर करणे व सेक्‍शनमधील सर्व वीज ग्राहकांना अखंड वीजपुरवठा मिळेल याबद्दल कसोशीने प्रयत्‍न करणे, त्‍यानुसार तारमार्ग तंत्री (लाईनमन) यांची कामे व जबाबदा-या यामध्‍ये अ.क्र.5 वर लाईनमनची नेमणूक उपकेंद्रात शिफट डयूटीसाठी केली असेल तर खंडीत वीजपुरवठा त्‍वरीत सुरु करावयास पाहिजे, उपकरणांचे निरिक्षण करणे, वेळापत्रकानुसार रिडींग घेणे, बॅटरी मेंटेनन्‍स, लॉगबुक इ. व अन्‍य कामांची नोंद दिसते.  सहायक तारमार्गी तंत्री (Asstt.Lineman) यांची कामे व जबाबदा-यांमध्‍ये अ.क्र.14 वर मीटर रिडींग वीज जोडणी वीज तोडणी इ. साठी असि.लाईनमन जबाबदार कर्मचारी असतो.  शून्‍य वीज वापर व त्‍याचे कारण वरिष्‍ठांना कळविणे बंधनकारक आहे असे नमूद केले आहे.    

 

10.   या महावितरण कंपनीने कायद्यानुसार निर्धारित केलेले अधिकार, कामे व जबाबदार-या या त्‍यांच्‍या कर्मचारी वर्गांवर बंधनकारक आहेत.  सदर तक्रारदारांनी दि.16/2/15 रोजी सामनेवालांकडे वर नमूद विवेचनाप्रमाणे तक्रार दाखल करुन सुध्‍दा त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेवून निराकरण केलेबाबतची बाब स्‍पष्‍ट झालेली नाही.  वस्‍तुतः सदर तक्रारीचे निराकरण पूर्वीच केले असते तर सदरचा तक्रारअर्ज दाखलच झाला नसता. असे या मंचचे स्‍पष्‍ट मत आहे.   वीज ग्राहकाच्‍या कोणत्‍याही तक्रारीचे तातडीने निराकरण करण्‍याचे कर्तव्‍य सामनेवालांनी पार न पाडून सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

 

11.   यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या तक्रारीची दखल घेतलेली नाही ही बाब गृहित धरता अद्यापही त्‍यास त्‍यांचे विद्युत जोडणी कार्यान्वित करुन विद्युत पुरवठा सुरळित केलेला नाही.  मात्र त्‍यास मार्च महिन्‍याचे बिल पाठवून दिलेले आहे हे निदर्शनास आलेले आहे.  वीज ही प्रत्‍येकाची अनिवार्य व मूलभूत गरज झालेली आहे. याचा विचार करता तक्रार दाखल होतेक्षणी शहानिशा करुन त्‍याबाबत योग्‍य ती कार्यवाही करुन विद्युत पुरवठा पुनश्‍च जोडून देणे हे सामनेवालांचे कर्तव्‍यच आहे.  तो त्‍याने जोडून दिलेला नाही असे हे मंच ग्राहय धरत आहे कारण सामनेवाला यांनी हजर होवून सदरची कथने फेटाळलेली नाहीत. 

 

12.   याचा विचार करता, सदर तक्रारदाराचा विद्युत पुरवठा जोडून देण्‍याची जबाबदारी सामनेवालांवर आहे ही बाब निर्विवाद आहे.  मात्र तो जोडणेसाठी येणारा खर्च कोणी करावा याचा विचार करता, अ.क्र.8 सर्व्हिस कनेक्‍शन मध्‍ये सर्व्हिस कनेक्‍शनची वेळोवेळी तपासणी व देखभाल या सदराखाली दिलेल्‍या माहितीचा विचार हे मंच गांभीर्याने करीत आहे.  कोणत्‍याही वीज ग्राहकास सर्व्हिस कनेक्‍शन दिल्‍यानंतर सदर सर्व्हिस कनेक्‍शनची वेळोवेळी तपासणी करावयाची असते तसेच जरुर ती दुरुस्‍ती करावयाची असते.  यामधील तपासणी कधी व कशी करावी तसेच देखभालीची माहितीही नमूद केली आहे अ.क्र.2 मध्‍ये कनेक्‍शन दिल्‍यापासून तीन वर्षाचे आत सर्व्हिस वायर बदलणे भाग पडल्‍यास त्‍याचा आकार ग्राहकास भरावा लागतो.  परंतु अशा वेळी ग्राहकाचे वायरिंग मधील दोषांमुळे सर्व्हिस वायर खराब झाली हे सिध्‍द करता आले पाहिजे.  तीन वर्षापर्यंतच्‍या काळात वायर खराब झाल्‍यास बोर्डाचे (कंपनीचे) खर्चाने वायर बदलून दिली पाहिजे असे नमूद केले आहे.  तसेच बंद वीजपुरवठा पुन्‍हा सुरु करणे या सदराखाली कायद्यानुसार वितरण कंपनीने ग्राहकाची चूक नसताना वीज पुरवठा बंद केला असल्‍यास तो पुन्‍हा जोडण्‍याचा खर्च कंपनीने सोसावा.  ग्राहकाच्‍या तक्रारीनुसार मतभेदामुळे वीजपुरवठा तोडला असल्‍यास पुन्‍हा जोडण्‍याचा सर्व खर्च ग्राहकाने करावयाचा आहे.  ही रक्‍कम रोखीने अथवा डी.डी.ने भरावयाचा निर्णय कंपनीच्‍या गरजेनुसार कंपनी घेईल (नियम क्र.16) असेही नमूद केले आहे. याचा विचार करता तक्रारदाराच्‍या विद्युत पुरवठा हा सामनेवाला याने खंडीत केलेला नसून शेजा-यांशी असलेल्‍या मतभेदामुळे नमूद संतोषने पोलवरुन सर्व्‍हीस वायर तोडून टाकल्‍याने तो खंडीत झालेला आहे.  यामुळे सदर वीज पुरवठा पुन्‍हा सुरु करणेसाठी येणारा खर्च हा नियमाप्रमाणे ग्राहकाला सोसावा लागेल म्‍हणजेच सदरचा खर्च तक्रारदारानेच सोसावयाचा आहे.  तसेच हे मंच यापुढे असे स्‍पष्‍ट करीत आहेत की, वर नमूद अ.क्र.2 नुसार वायरिंग मधील दोषांमुळे सर्व्हिस वायर खराब झाली याचा हे मंच विचार करु शकत नाही कारण सदरची सर्व्हिस वायर त्‍यांच्‍या शेजा-याने तोडून टाकल्‍याची बाब सिध्‍द झाली आहे.  त्‍यामुळे जरी सदर वायर खराब झाली असली तरी व सदर खराब वायर ही तीन वर्षाचे आत झाली असली तरी त्‍यासाठी सामनेवाला वितरण कंपनी जबाबदार असणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  मात्र तक्रारदाराने तक्रार देवूनही बंद विद्युत पुरवठा पुन्‍हा सुरु न करणे ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे म्‍हणून याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

13.   वरील विस्‍तृत विवेचनावरुन नमूद बंद झालेला वीज पुरवठा सुरु करण्‍यासाठी येणारा खर्च हा ग्राहकाने सोसावयाचा आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुतचा खर्च हा तक्रारदारानेच करावयाचा आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  मात्र नियमाप्रमाणे सुध्‍दा कंपनीने तक्रारदाराच्‍या तक्रारीची दखल घेतलेली नाही अथवा तशा प्रकारची लेखी सूचना तक्रारदारास दिलेली नाही.  सामनेवाला वितरण कंपनीने दिलेल्‍या सर्व कनेक्‍शनची तपासणी, देखभाल व सुरक्षा करणेचे काम भारतीय विद्युत नियमावली 1956 नुसार सामनेवाला वितरण कंपनीवर आहे.  याचा विचार करता अशा प्रकारे मतभेदातून जर कोणी व्‍यक्‍ती अशा सर्व्हिस वायर काढून टाकून इतर ग्राहकांचे अथवा वितरण कंपनीचे अथवा मंडळाचे नुकसान करीत असल्‍यास अशा व्‍यक्‍तींविरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्याचे अधिकार निश्चितच नमूद महावितरण कंपनीस आहेत. तक्रारदार बंद झालेला वीज पुरवठा पुन्‍हा चालू करुन मिळणेस पात्र आहे.  सदर विद्युत पुरवठा सामनेवाला कंपनीने सुरळित करुन द्यावा व त्‍यासाठीचा खर्च तक्रारदाराने सोसावा या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. मात्र हे मंच सामनेवाला कंपनीस यापुढे निर्देश देत आहे की, पुनश्‍च तक्रारदाराचा नमूद शेजारी वीज जोडणीची सर्व्हिस वायर काढून टाकण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  तक्रारदाराने वर नमूद केलेप्रमाणे तक्रारी देवूनही तो पुनश्‍च असे कृत्‍य करणार नाही याची खात्री देता येत नाही.  याचा विचार करता सामनेवाला कंपनीने पुनश्‍च असा प्रकार घडणार नाही याबाबतची योग्‍य ती कार्यवाही करावी व सामनेवाला कंपनीने याबाबतची योग्‍य ती कारवाई न केल्‍यास व असा प्रकार पुनश्‍च घडल्‍यास त्‍यासाठी सामनेवाला कंपनी जबाबदारी राहील याची दखल घ्‍यावी. 

 

14.   तक्रारदारास विद्युत पुरवठा खंडीत झाल्‍यामुळे ती व त्‍याचे कुटंब वीजवापराच्‍या उपभोगापासून वंचित राहिले आहेत.  अंधारामध्‍ये त्‍यांना गुराढोरांची व्‍यवस्‍था करावी लागली आहे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्‍याची बाब ग्राहय धरावी लागेल.  विविध ठिकाणी तक्रारी करुनही विद्युत जोडणी झालेली नाही व त्‍यामुळे त्‍यास व कुटूंबास निश्चितच काहीतरी मानसिक त्रास झालेला आहे.  याचीही दखल या मंचास घ्‍यावी लागेल.  याचा विचार करता तक्रारदाराने सर्व्हिस वायरला व सपोर्टींग तारेला खर्च केलेला असला तरी व सदर सर्व्हिस केबल रानामध्‍ये पडून तिचे नुकसान होत असले  तरी ती जोडून देणेबाबतचा खर्च नियमाप्रमाणे सामनेवालांवर टाकता येत नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी हे मंच फेटाळत आहे.  तक्रारदाराचा विद्युत जोड जोडून देणेबाबतची व त्‍यास सामनेवालाने संरक्षण द्यावे ही मागणी हे मंच मंजूर करीत आहे.  दि.16/2/15 पासून ते आजअखेर सामनेवाला यांनी, तक्रारदाराचे विद्युत कनेक्‍शन बंद असल्‍याने व ते अद्यापही जोडून न दिल्‍याने झालेल्‍या नुकसानीपोटी तसेच त्‍यास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी एकत्रित रक्‍कम रु.10,000/- मिळण्‍यास पात्र आहेत.  तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे.   त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या मागण्‍या हे मंच अंशतः मंजूर करीत आहेत.  म्‍हणून या मुद्याचे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.  सबब, खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

आदेश

 

1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहेत.

2. सामनेवाला यांनी त्‍वरित आदेशाचे दिनांकापासून 15 दिवसांचे आत तक्रारदाराचे बंद वीज   

   कनेक्‍शन जोडून विद्युत पुरवठा सुरळित करुन द्यावा.  सदर जोडणीसाठी येणारा खर्च

   तक्रारदाराने करावा.

3. सामनेवाला यांनी केलेल्‍या सेवात्रुटी मुळे तक्रारदाराचे झालेले नुकसान मानसिक त्रास इ.पोटी

   एकत्रित रक्‍कम रु.10,000/- अदा करावेत.

4. सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीचे खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.

5. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना वर आदेशीत रकमा 45 दिवसांचे आत अदा कराव्‍यात.  

   विहीत मुदतीत आदेशीत रकमा अदा न केलेस विहीत तारखेच्‍या मुदतीनंतर संपूर्ण रक्‍कम

   मिळेपावेतो द.सा.द.श. 9 टक्‍के दराप्रमाणे व्‍याज अदा करावे.  

6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्‍यास, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण कायद्यातील

   कलम 25(3) अथवा कलम 27 खाली योग्‍य ती कारवाई करण्‍याची मुभा राहील.

7.  निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्‍क द्याव्‍यात.

 

सांगली

दि. 03/06/2015                

             

( सौ मनिषा कुलकर्णी )         ( सौ वर्षा नं. शिंदे )              ( ए.व्‍ही.देशपांडे )

       सदस्‍या                     सदस्‍या                        अध्‍यक्ष

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.