(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ता बुध्द विहार, वार्ड क्र.5, तह. अहेरी, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन त्यांने आईच्या नावाने ग्राहक क्र.470140910461 व्दारे व्यवसाई विज पुरवठा घेऊन कुटूंबाचे पालन पोषणाकरीता स्वयंरोजगार म्हणून केबल नेटवर्कचा व्यवसाय करतो. विरुध्द पक्ष ही विज वितरण करणारी कंपनी असुन सदर विज पुरवठा त्यांचे अंतर्गत आहे. तसेच तक्रारकर्त्याची आई लक्ष्मीबाई ही दि.25.05.2004 रोजी मरण पावल्यामुळे तिचे मृत्यूनंतर तक्रारकर्ता हा सदर विज पुरवठ्याचा लाभार्थी असुन तो नियमीतपणे विज बिलाचा भरणा करीत आहे. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले आहे की, दि.07.10.2017 रोजी पावसामुळे तक्रारकर्त्याचे सदर विज मीटर जळाले, त्यामुळे विरुध्द पक्षांकडे तक्रार करण्यांत आली. विरुध्द पक्षांनी मौक्यावर येऊन पाहणी केली व मिटर काढून घेऊन गेले व लवकरच मीटर बसवुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी विरुध्द पक्षांचे कार्यालयात जाऊन विनंती केली असता विरुध्द पक्षांनी काही ना काही कारण सांगून मीटर लाऊन देण्यांस टाळाटाळ केली व मीटर लावुन दिले नाही. तसेच तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, विरुध्द पक्षातर्फे विज पुरवठ्याचे बिल नियमीत येत नसल्यामुळे जेव्हा केव्हा बिल आले तेव्हा ते नियमीतपेण भरीत असतो. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यास दि.10.10.2017 चे बिल दि.30.10.2017 रोजी प्राप्त झाले असता सदर बिलाचा भरणा तक्रारकर्त्याने केलेला आहे. तक्रारकर्त्याने विज बिलाबाबत ऑन लाईन चौकशी केली असता त्याला कळले की, दि.24.03.2017 रोजी तक्रारकर्त्याकडून जास्तीचे विज वसुल केले असल्यामुळे त्याचे विज बिल वजा होत असल्याबाबत माहिती मिळाली. तसेच विरुध्द पक्षाने जळालेले मीटर काढून नेल्यानंतर नवीन मीटर लावुन द्यावयास पाहीजे होते परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे सदरची कृति ही विरुध्द पक्षांची सेवेतील कमतरता आहे. करीता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला नवीन मिटर बसवुन त्याचा उपरोक्त विजपुरवठा सुरु करुन द्यावा. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- ची नुकसान भरपाई मिळावी.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस पाठविण्यात आली. परंतु विरुध्द पक्षाला पाठविलेली नोटीस ‘घेण्यास इन्कार’, या शे-यासह परत आल्यामुळे निशाणी क्र.1 वर विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला.
4. तक्रारकर्त्याच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील कारणमिमांसेवरुन अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // कारणमिमांसा // -
5. तक्रारकर्ता तह. अहेरी, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन त्यांने आईच्या नावाने ग्राहक क्र.470140910461 व्दारे व्यवसाई विज पुरवठा घेऊन कुटूंबाचे पालन पोषणाकरीता स्वयंरोजगार म्हणून केबल नेटवर्कचा व्यवसाय करतो. विरुध्द पक्ष ही विज वितरण करणारी कंपनी असुन सदर विज पुरवठा त्यांचे अंतर्गत आहे. तसेच तक्रारकर्त्याची आई लक्ष्मीबाई ही दि.25.05.2004 रोजी मरण पावल्यामुळे तिचे मृत्यूनंतर तक्रारकर्ता हा सदर विज पुरवठ्याचा लाभार्थी आहे ही बाब तक्रारकर्त्याने निशाणी क्र.7 वर दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होते.
6. तक्रारकर्त्याचे विज मीटर दि.0710.2017 रोजी दुपारी पावसामुळे जळाले असल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे तक्रार दिली. त्यानंतर विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याचे घरी मौक्यावर येऊन मीटरची पाहणी केली व मिटर काढून घेऊन गेले व लवकरच मीटर बसवुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी विरुध्द पक्षांचे कार्यालयात जाऊन विनंती केली असता विरुध्द पक्षांनी काही ना काही कारण सांगून मीटर लाऊन देण्यांस टाळाटाळ केली व मीटर लावुन दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास बॅटरीवर त्याचे केबल नेटवर्क चालवावे लागत आहे व वेळोवेळी ते बंद पडत असल्यामुळे तक्रारकर्त्यास लोकांच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे, ही विरुध्द पक्षांचे सेवेतील कमतरता आहे. तसेच विरुध्द पक्षास मंचाव्दारे काढण्यांत आलेली नोटीस प्राप्त होऊन सुध्दा घेण्यांस नकार या शे-यासह परत आल्यामुळे त्यांचे विरुंध्द निशाणी क्र.1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. तसेच तक्रारकर्त्याने सदर तक्रारी सोबत अंतरिम अर्ज दाखल करुन मीटर जोडणीची मागणी केली असता सदर अंतरिम अर्जावर विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यामार्फत हमदस्त समन्स देऊन सुध्दा तो विरुध्द पक्षांनी घेतला नाही व सदर अर्जावर आपले म्हणणे सादर केले नसल्यामुळे या मंचाव्दारे निशाणी क्र.5 चे अंतरिम अर्जावर निशाणी क्र.11 नुसार आदेश पारित करण्यांत आला व त्या अंतरिम आदेशावर सुध्दा विरुध्द पक्षांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एकंदरीत ही विरुध्द पक्षांची तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब ठरते व सिध्द होते. सबब मंच खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत नवीन मीटर बसवुन द्यावे.
3. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.500/- अदा करावा.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
5. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
6. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.