Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक २३/१२/२०२१) - प्रस्तुत प्रकरण हे मा. राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ, नागपूर यांचे दिनांक ०६/१२/२०१९ चे आदेशान्वये परत गुणदोषावर चालविण्याकरिता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर येथे निर्देशित करण्यात आले. सदर आदेशानुसार उभयपक्ष यांना सुनावणीकरिता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर येथे दिनांक ६/१/२०२० रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
- तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्त्याचे वडीलांनी दिनांक ०३/१२/१९८७ मध्ये विरुध्द पक्ष यांचेकडून निवासी वापराकरिता विद्यूत पुरवठा घेतला होता. त्यांचा ग्राहक क्रमांक ४५००१०२१०३५१ हा आहे. तक्रारकर्त्याचे वडीलांचा दिनांक २८/०९/२००६ रोजी मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर तक्रारकर्ता हा कुटुंबाचा कर्ता असून तो आपल्या कुटुंबासमवेत राहत होता आणि उपरोक्त विद्यूत पुरवठा चा तो टीव्ही, फ्रीज, तसेच इतर उपकरणाकरिता वापर करीत होता आणि वेळोवेळी विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या विज देयकाचा भरणा करीत होता. तक्रारकर्त्याला मे २०१२ चे विज देयक विरुध्द पक्ष यांनी दिले नव्हते त्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष यांचे कार्यालयाला भेट देवून चौकशी केली असता त्यांनी तात्पुरते दिनांक १४/०६/२०१२ चे रुपये २५,०००/- चे विज देयक दिले. त्याचा तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे भरणा केला. त्यानंतर त्यांनी ११,७०९/- युनिट चे रुपये ४७,५९०/- चे विज देयक तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्यास दिलेले विज देयक हे अवाजवी होते त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक २१/०६/२०१२ रोजी अधिवक्ता श्री अभय कुल्लरवार यांचे मार्फत विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या नोटीसची दखल घेतली नाही. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दिनांक १७/०७/२०१२ रोजी रुपये ३२,६३०/- चे ९७६ युनिट चे विज वापराचे देयक तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तक्रारकर्त्याचे घरी कुञा आहे या कारणास्तव विरुध्द पक्ष यांनी मिटर रिडिंग घेण्यास टाळाटाळ केली परंतु तक्रारकर्त्याकडे कोणताही कुञा नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या विज देयकावर अवास्तव विज आकारणी केलेली दिसते. विरुध्दपक्ष हे तक्रारकर्त्याचा विज पुरवठा त्यांची काही चुकी नसतांना आणि कोणतीही नोटीस न देता खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे असे करुन त्यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष यांनी अनुक्रमे दिनांक २२/०६/२०१२, दिनांक १८/०६/२०१२, दिनांक १७/७/२०१२ चे रुपये २५,०००/-, ४७,५९०/-, ३२,६३०/- चे दिलेले विज देयक बेकायदेशीर ठरविण्यात यावे तसेच विरुध्दपक्ष यांनी दिलेल्या बेकायदेशीर देयकाकरिता व त्याच्या थकबाकीकरिता तक्रारकर्त्याचे ग्राहक क्रमांक ४५००१०२१०३५१ चा विज पुरवठा आदेश पारित होईपर्यंत खंडित करु नये आणि झालेल्या शारीरिक व मानसिक ञासाकरिता रुपये १५,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- देण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्द पक्ष हे आयोगासमक्ष हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याचे वडीलांना दिनांक ३/१२/१९८७ रोजी निवासी वापराकरिता ग्राहक क्रमांक ४५००१०२१०३५१ चा विज पुरवठा दिला होता, ही बाब मान्य केली असून तक्रारीतील उर्वरित कथन नाकबूल करुन आपल्या विशेष कथनामध्ये नमूद केले की, तक्रारकर्त्यास दिनांक २८/०९/२००६ रोजी निवासी वापराकरिता विज जोडणी देण्यात आली होती परंतु तक्रारकर्त्याकडील मिटर चे वाचन त्यांच्याकडे कुञा असल्यामुळे आणि अन्य कारणामुळे उपलब्ध होत नसल्यामुळे तक्रारकर्त्यास १५१ युनिट प्रमाणे सरासरी विज देयक देण्यात आले होते. तक्रारकर्त्याने दिनांक १४/०६/२०१२ रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे लेखी अर्ज करुन मिटर रिडिंग १२,५००/- असल्याचे कळविले आणि रुपये २५,०००/- चे विज देयक देण्याची विनंती केली. त्यामध्ये तक्रारकर्त्यास रुपये २५,०००/- चे तात्पुरते विज देयक देण्यात आले. सदर देयकाचा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे भरणा सुध्दा केला आहे. जुन २०१२ मध्ये तक्रारकर्त्याने भरलेले २५,०००/- कमी करुन उर्वरित रकमेचे विज देयक तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्यास दिलेले विज देयक हे त्यांचे वापरानुसार आणि मिटर रिडिंग नुसार दिले आहे. तक्रारकर्त्याचा दिनांक २१/०६/२०१२ चा नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या घराचे स्थळ निरीक्षण व विज जोडणीची तपासणी तक्रारकर्त्याच्या उपस्थितीत करुन त्यानुसार त्याला विज देयक देण्यात आले आणि सदर विज देयक हे तक्रारकर्त्याने दिलेल्या मिटर रिडिंग मध्ये दर्शवित असल्याचे नोंदी वरुन रुपये २५,०००/- चे तात्पुरते विज देयक दिले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास सदर विज देयकाबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकार नाही.सबब तक्रारकर्त्याची तक्रार व अंतरिम अर्ज रुपये २०,०००/- दंडासहीत खारीज होण्यास पाञ आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ आणि लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर, दस्तावेज व त्यांचे लेखी उत्तरालाच त्यांचे शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसिस दाखल, लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमिमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे - विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा दिली होय
आहे काय ॽ - आदेश काय ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा 6. मुद्दा क्रमांक १ बाबत- तक्रारकर्ता हा मयत सर्दुलसिंग पलाहे चा मुलगा आहे आणि त्यांचे वडीलांनी दिनांक ०३/१२/१९८७ रोजी विरुध्द पक्ष यांचे कडून विज जोडणी घेतली होती. तक्रारकर्त्याचे वडील कुटुंबासमवेत राहत होते व त्यांचा दिनांक २८/०९/२००६ रोजी मृत्यु झाला. विज मीटर हे तक्रारकर्त्याचे वडिलांचे नावाने असले तरी तक्रारकर्ता हा वीज मीटरचा वापर करुन वीज देयकाचा भरणा विरुध्द पक्ष यांचेकडे करतो. तक्रारकर्ता हा मयत चा मुलगा असल्यामुळे सदर विज जोडणी चा लाभार्थी आहे. त्यामुळे तो विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचेमध्ये अनुक्रमे दिनांक २२/०६/२०१२, दिनांक १८/०६/२०१२, दिनांक १७/७/२०१२ या तिन्ही विज देयकांबाबत वाद आहे. तक्रारकर्ता यांनी निशानी क्रमांक ४ वरील दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास मे २०१२ चे विज देयक दिले नाही व तक्रारकर्ता यांनी सदर देयकाची मागणी केल्यानंतर त्यांनी दिनांक २२/०६/२०१२ चे कोणतीही युनिट वापराचे आणि इतर माहिती न लिहता रुपये २५,०००/- चे हस्तलिखीत तात्पुरते विज देयक (Provisional Bill) तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकत्याने सदर देयकाचा भरणा विरुध्द पक्ष यांचेकडे केला. हे दस्त क्रमांक अ(1) वरुन स्पष्ट होते आणि सदर देयकाचा भरणा केल्याची बाब विरुध्द पक्ष यांनी सुध्दा मान्य केली आहे. त्यानंतर दिनांक १८/०६/२०१२ चे विज देयकामध्ये मागिल थकबाकी जोडून आली. तक्रारकर्त्याने दिनांक १८/०६/२०१२ रोजी सदर देयकाचा भरणा केला. त्यानंतर सदर देयकामध्ये रुपये २५,०००/- कमी करुन रुपये २२,५९०/- चे विज देयक तक्रारकर्त्यास दिले. सदर विज देयक दस्त क्रमांक अ(३) वर दाखल आहे. माञ त्यानंतर तक्रारकर्त्यास दिनांक १७/७/२०१२ रोजी दिलेल्या विज देयकामध्ये रिडिंग उपलब्ध नाही आणि रुपये ३२,६३०/- ची रक्कम दर्शविण्यात आली आहे. सदर बाब दस्त क्रमांक अ(५) वर दाखल विज देयकावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्ता यांचेकडे कुञा असल्यामुळे आणि अन्य कारणांमुळे त्यांचेकडील विद्युत मिटरचे वाचन उपलब्ध होत नसल्यामुळे तक्रारकर्त्यास १५१ युनिटचे सरासरी विज देयक देण्यात आले होते असा विरुध्द पक्ष यांचे आक्षेप/कथन आहे परंतु ही बाब त्यांनी कोणताही दस्तावेज वा पुरावा सादर करुन सिध्द केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथन की, तक्रारकर्त्याकडे कुञा नसतांनाही विरुध्द पक्षाचे विज मिटर रिडर हे तक्रारकर्त्याकडे कुञा आहे या कारणाने मिटर रिडिंग घेण्यास टाळाटाळ करीत आहे ही बाब ग्राह्य धरण्यायोग्य आहे. याशिवाय विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास मिटर रिडिंग उपलब्ध करुन देण्यासाठी लेखी सूचित केल्याबाबत कोणताही दस्तावेज दाखल केला नाही. रिडिंग ची नोंदणी का होऊ शकली नाही याचे कोणतेही संयुक्तिक स्पष्टीकरण विरुध्द पक्ष यांनी दिलेले नाही. यावरुन मिटर रिडिंगची नोंदणी करण्यात विरुध्द पक्ष यांनी हयगय केल्याचे स्पष्ट दिसून येते. परिणामतः मिटर वाचन न घेताच विरुध्दपक्ष हे तक्रारकर्त्याला सरासरी विज देयक देत होते. जास्त कालावधीसाठी सरासरी विज देयक देता येत नाही तरी सुध्दा विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास जास्त कालावधीचे सरासरी विज देयक दिले आहे. एवढ्या प्रदिर्घ कालावधीकरिता सरासरी वीज देयक देणे, ही विरुध्दपक्ष यांची कृती समर्थनीय ठरत नाही ही बाब विरुध्द पक्ष यांचे सेवेतील न्युनता दर्शविते. त्यामुळे तक्रारकर्ता हे उपरोक्त विवादीत विज देयके रद्द करुन त्याऐवजी त्या कालावधीतील सुधारीत विज देयके नियमानुसार मिळण्यास तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी विरुध्द पक्षाकडून नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे,या निष्कर्षाप्रत आयोग आल्याने मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. 7. मुद्दा क्रमांक २ बाबत- मुद्दा क्रमांक १ चे विवेचन व निष्कर्षावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १२०/२०१२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास अनुक्रमे दिनांक २२/०६/२०१२, दिनांक १८/०६/२०१२, आणि दिनांक १७/७/२०१२ चे विज देयके रद्द करुन तक्रारकर्त्याने अंतरिम आदेशानुसार भरलेल्या रकमेचे तसेच वर नमूद भरणा केलेल्या वीज देयकाच्या रकमेचे समायोजन करुन सुधारीत विज देयके तक्रारकर्त्यास द्यावे आणि तक्रारकर्त्याने सदर विज देयकाचा भरणा करावा.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
| |