मा. अध्यक्ष, श्री. विजयसिंह राणे यांचे कथनांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक : 26.09.2011)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, ते गैरअर्जदार यांचेकडून होणारा विज पुरवठा मिटर क्र. 6501676989 अन्वये वापरीत असून त्याद्वारे येणा-या सर्व देयकांचा भरणा ते नियमितपणे करतात. सन 2009 ते 2010 या कालावधीत त्यांना रु.200/- ते रु.300/- पर्यंत विजेचे देयक प्राप्त होत होते. परंतू सन 2011 मध्ये गैरअर्जदारांनी एकूण विजेचे देयक रु.32,720/- दिल्याचे तक्रारकर्त्याला ते भरणे अशक्य झाले. तक्रारकर्त्याच्या मते त्याचा विद्युत वापर हा मर्यादित आहे. याबाबत तक्रारकर्त्यांनी कनिष्ठ अभियंता यांचेकडे तक्रार केली, तसेच स्मरणपत्रही पाठविले. शेवटी परत तक्रार नोंदविली असता त्यांनी मिटरचे अवलोकन करुन मिटर व्यवस्थीत काम करीत आहे असा अहवाल दिला, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे व त्याद्वारे मागणी केली आहे की, सदर विवादित देयक हे सर्वसाधारण देयकाप्रमाणे द्यावे, जर मिटरमध्ये दोष असेल तर ते बदलविण्याची सुचना करावी, सरासरीप्रमाणे विज देयक द्यावे, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविली असता गैरअर्जदारांनी तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याला मागिल वर्षात बजावलेली विज वापराची देयके ही प्रत्यक्ष वापरावर बजावण्यात आलेली नसून ती सरासरीवर आधारित देण्यात आली होती. तक्रारकर्त्याला डिसेंबर 2010 मध्ये 3932 युनिट्सचे रु.27,510/- दिलेले देयक हे थकबाकी पोटी असून ते भरण्यास तक्रारकर्ता बाध्य आहे. तक्रारकर्त्याकडे प्रत्यक्ष विज वापराचे वाचन हे व्यापक परिस्थितीच्या अभावामुळे, परिसर बंद असल्यामुळे पुष्कळदा नियमितपणे होऊ शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर मिटरचे निरीक्षण केले असता मीटर सुचारुपणे कार्यरत असल्याने तसा अहवाल देण्यात आला. तरीही तक्रारकर्ता देयकाचा भरणा करण्यास पळवाट शोधण्याकरीता सदर तक्रार मंचासमोर घेऊन आला आहे. त्यामुळे देयक दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही. म्हणून सदर तक्रार दंडासह खारीज करण्याची मागणी गैरअर्जदारांनी केलेली आहे.
3. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. यातील गैरअर्जदाराने मान्य केल्याप्रमाणे एप्रिल 2009 पासून पुढील कालावधीची देयके त्यांनी वाचनाप्रमाणे दिलेली नाही. त्यांनी मिटरचे वाचन का मिळाले नाही याचा खुलासा त्यांनी केलेला नाही व प्रत्यक्ष वापराचे देयक न देणे हीच गैरअर्जदारांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्त्या सारख्या सामान्य माणसाला त्रास झालेला आहे हे उघड आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी दिलेले जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांचे देयक रद्द ठरविणे गरजेचे आहे. वरील परिस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी दिलेले जानेवारी 2011 चे रु.27,510/- व फेब्रुवारी 2011 चे रु.32,720/- ही दोन्ही देयके रद्द ठरविण्यात येतात. गैरअर्जदारांनी मिटरच्या वाचनाप्रमाणे आलेले, एप्रिल 2009 पासून ते जानेवारी 2011 या कालावधीची संपूर्ण विज वापराच्या युनिटची सरासरी आधारावर प्रत्येक महिन्यात काढून, तेवढया युनिटची सामान्य दराने येणारी मागणी तक्रारकर्त्याकडून दर महिन्याच्या पुढील कालावधीच्या देयकात 30 महिन्यांच्या पुढील कालावधीकरीता येणा-या देयकात ती रक्कम दर्शवून देयक तक्रारकर्त्यांना द्यावे व तक्रारकर्त्याने त्याप्रमाणे पुढील देयके चालू देयकासह भरावित. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यावर कोणत्याही प्रकारचे दंडनीय शुल्क त्यावर आकारु नये.
3) तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक त्रासाकरीता रु.2,000/- भरपाई व तक्रारीच्या खर्चादाखल रु.1,000/- गैरअर्जदारांनी द्यावे. वरील रक्कम आणि तक्रारकर्त्याने वेळोवेळी जमा केलेल्या रकमा या गैरअर्जदार यांनी संपूर्ण हिशोबात समायोजित करावे व त्यासंबंधीचे संपूर्ण विवरण तक्रारकर्त्यास पुढील होणा-या संभाव्य आकारणीसह आदेश प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावे.