(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 02/12/2010) दोन्ही पक्षांचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला तक्रारकर्त्याचे कथीत निवेदन असे आहे की, त्याची आई श्रीमती ग्यारसीदेवी आर. शर्मा ही आटा चक्की चालवायची. तिचा मृत्यू दि.27.09.2006 ला झाल्यानंतर तक्रारकर्त्याने ती चक्की चालविणे सुरु केले त्याचा ग्राहक क्र.419990779987 असा होता. आईचे मृत्यूनंतर तिचे नावाचे इलेक्ट्रीक मीटर तक्रारकर्त्याने आपल्या नावाने करण्याच्या हेतुने मार्च-2009 मध्ये गैरअर्जदारांचे कार्यालयात जाऊन अर्ज सादर केला व मीटर आपल्यानावाने करण्याची विनंती केली. गैरअर्जदारा मार्फत तक्रारकर्त्याने अर्जासोबत दिलेल्या सर्व कागदपत्रांची पाहणी करुन डिमांड नोट दिली, त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने रु.15,126/- गैरअर्जदारांचे कार्यालयात जाऊन दि.16.03.2009 रोजी भरले त्याचा पावती क्र.27619 व रिसिप्ट क्र.5523216 हा आहे. त्यानंतरही एक वर्ष उलटून तक्रारकर्त्याचे नाव बिलात आले नाही व गैरअर्जदारांचे उडवा-उडवीच्या उत्तरास कंटाळून दि.25.03.2010 रोजी कायदेशीर नोटीस बजावली ती गैरअर्जदारांना दि.29.03.2010 रोजी मिळाली. मात्र त्यांनी अद्याप पावेतो नोटीसचे उत्तर दिले नाही व बिलात नावही चढविले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने ग्राहक म्हणून त्यांचे नाव नोंदवावे याकरता मंचात तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराला नोटीस देण्यांत आली, त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांनी सर्व विपरीत विधाने नाकबुल केले आहे. तसेच रु.15.126/- ची डिमांड नोट पाठवल्याबाबतचा दस्तावेज खोटा आहे. तक्रारकर्त्याने कधीही मीटर बदलवुन देण्याबाबत अर्ज कधीही केला नाही, आणि याबाबत तक्रारकर्त्याला त्याचे मार्फत कोणताही विनंती अर्ज, कागदपत्रे प्राप्त न झाल्याबद्दल दि.26.11.2009 रोजी कळविण्यांत आले. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ही खोटी आहे असा गैरअर्जदारांचे वकीलांनी युक्तिवाद केलेला आहे. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकला त्यामध्ये गैरअर्जदारांकडे तक्रारकर्त्याने रु.15.126/- दि.16.03.2009 रोजी जमा केले ही बाब गैरअर्जदारांना मान्य आहे व तक्रारकर्त्याने याबाबत गैरअर्जदारांना नोटीस दिली होती. तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे आईस एक पत्र पाठविलेले आहे त्यावर दि.26.11.2009 ही तारीख आहे. मात्र सदर पत्र तक्रारकर्त्यास प्रत्यक्षात पाठविले हे दर्शविणारा कोणताही पुरावा गैरअर्जदारांनी सादर केला नाही. तक्रारकर्त्याने सदर पत्र मिळाले आहे, ही बाब प्रतिज्ञालेखावर नाकारलेली आहे. पुढे असे दिसते की, तक्रारकर्त्याने दि.25.03.2010 रोजी नोंदणीकृत डाकेव्दारे पाठविलेली नोटीस, याबाबतची पोच पावती तक्रारीसोबत दाखल आहे. परंतु गैरअर्जदारांनी त्यास कोणतेही उत्तर पाठविलेले नाही. त्यामुळे गैअर्जदारांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास येते. -// आ दे श //- 1. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येते की, त्यांनी 30 दिवसांचे आंत तक्रारकर्त्याचे नाव त्याचे विद्युत बिलामध्ये आईचे नावा ऐवजी नमुद करावे आणि या पुढील विद्युत बिले त्याचे नावाने द्यावीत. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे आवश्यक प्रपत्रावर सह्या कराव्या व वारस असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करावे. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.1,000/- तसेच तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- अदा करावे. 3. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |