:: निकालपत्र ::
(पारीत द्वारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक – 22 नोव्हेंबर, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्दा-1986 चे कलम-12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय पुढील प्रमाणे-
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून घरगुती वापरासाठी विद्दुत कनेक्शन घेतले असून त्याचा ग्राहक क्रं-413890180445 असा आहे. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने माहे ऑगस्ट-2015 मध्ये एकूण 2221 इतक्या युनिटचे विज वापरापेक्षा जास्तीचे विज देयक रुपये 33,610/- रकमेचे पाठविले. विरुध्द पक्षाने दिनांक 13/01/2016 रोजी तक्रारकर्त्याला रुपये 39,480/- दिनांक 28/01/2016 पर्यंत भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत करण्यांत येईल अशी नोटीस दिली होती.
तक्रारकर्त्याचा मागील 1 वर्षापासून विज वापर हा मोजका असल्याने विरुध्द पक्षाकडे संपर्क साधला व दिनांक 10/08/2015 रोजी सदर मिटरची व विद्युत देयकाची तक्रार केली असता विरुध्द पक्षाने दिनांक 12/12/2015 रोजी रुपये 4,000/- भरणा करण्यास सांगितले तसेच तक्रारकर्त्याच्या मीटरची चाचणी करणे आवश्यक असल्याने रुपये 500/- नगदी विरुध्द पक्षाकडे जमा करावे असे सांगितले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे विद्युत मीटरची योग्य प्रकारे चाचणी न करता मिटरमध्ये कोणताही दोष नसल्याचा रिपोर्ट दिनांक 31/12/2015 रोजी पाठविला. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दिनांक 13/01/2016 रोजी नोटीसद्वारे रुपये 39,480/- चा भरणा दिनांक 28/01/2016 पर्यंत करावा अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे कळविले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक- 13 जानेवारी, 2016 चे नोटीसद्वारे तक्रारकर्त्याने विज बीलापोटी रुपये 39,480/- चा भरणा करावा अन्यथा विज पुरवठा खंडीत करण्यात येईल असे कळविले. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांच्या मीटरची योग्य शास्त्रिय पध्दतीने पाहणी न करता स्वतःचे मर्जीप्रमाणे तपासणी करुन रिपोर्ट बनविला आहे. तक्रारकर्त्याने कधीही एवढया युनिटचा वापर केलेला नाही, त्यामुळे विरुध्द पक्षाने एवढया रकमेची मागणी करणे बेकायदेशीर आहे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला विज वापरापेक्षा अति जास्त विद्युत देयक पाठवून तसेच त्यांचे मीटरची योग्य प्रकारे पाहणी न करता एवढया मोठया रकमेची मागणी करणे हा सेवेतील त्रृटी आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना अनेक वेळा विनंती केल्यानंतरही विरुध्द पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने माहे ऑगस्ट-2015 चे विद्युत देयक कमी करुन सदर विद्युत मीटर बदलवून किंवा त्यामध्ये येाग्य ती सुधारणा करुन देण्याचे आदेशित व्हावे. त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-15,000/- देण्याचे आदेशित व्हावे तसेच मंचाला वाटेल योग्य ते आदेश तक्रारकर्त्याच्या बाजूने देण्यात यावे.
03. मंचाद्वारे विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता विरुध्द पक्षाने हजर होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीस सक्त विरोध केला आहे. विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे पृष्ठ क्रं-35 ते 38 वर लेखी उत्तर दाखल केले असून त्यांनी तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक असल्याची बाब मान्य केली तक्रारकर्त्याला घरगुती वापराचे विद्दुत कनेक्शन दिल्याची बाब मान्य केली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला माहे ऑगस्ट-2015 मध्ये एकूण 2221 युनिटचे विज देयक पाठविल्याचे मान्य केले असून सदर बील हे जास्त रकमेचे नसून तक्रारकर्त्याच्या वापराप्रमाणे दिले असल्याचे नमूद केले आहे. माहे ऑगस्ट-2015 चे 2221 युनिट रिडींग योग्य आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 10/08/2015 रोजी मीटरबाबत केलेली तक्रार मान्य आहे. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 4,000/- भरण्यास सांगितले हे नाकबूल आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्या मागणी प्रमाणे मीटर टेस्टींग करुन त्याचा रिपोर्ट दिनांक 31/12/2015 ला दिला व सदर रिपोर्टनुसार मीटरमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही असे विरुध्द पक्षाने नमूद केले आहे. विरुध्द पक्षाने पुढे असे ही नमूद केले की, दिनांक 13/01/2016 रोजी दिलेली नोटीस ही योग्य आहे आणि विज ग्राहकाने जर नियमित वेळेवर विद्युत बीलाचा भरणा केला नाही तर विज पुरवठा खंडीत करण्याचा अधिकार विरुध्द पक्षास आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विनंतीप्रमाणे मीटरची चाचणी करुन योग्य अहवाल दिलेला आहे तसेच तक्रारकर्त्याच्या विज वापराप्रमाणे विज बील पाठविलेले आहे. तक्रारकर्त्यास सदर विज बीलाचा भरणा करावयाचा नसल्यामुळे त्याने सदरची खोटी तक्रार दाखल केली आहे. विरुध्द पक्षाने कोणतीही त्रृटी केलेली नसल्याने सदरची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विज वितरण कपंनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं-14 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण 07 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विज देयकाच्या प्रती, विरुध्दपक्षाला दिलेली नोटीस, मीटर चाचणी अहवाल, मीटर चाचणी तक्रार अर्ज अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. पृष्ठ क्रमांक 41 चे वर्णन यादीप्रमाणे 03 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारकर्त्याला पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही अशा आसयाची पुरसिस पान क्रं 39 वर दाखल केली आहे.
05. विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केलेला नाही.
06. उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याच्या वकीलांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्यात आला. मौखीक युक्तीवादाचे वेळी विरुध्द पक्षाचे वकील गैरहजर. यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
07. वास्तविकतः तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही विरुध्द पक्ष विज कंपनीने त्याला माहे ऑगस्ट-2015 ते माहे जानेवारी 2016 या दरम्यान त्याचे वापरापेक्षा जास्त विज देयक दिल्यामुळे सदरचे बील रद्द करण्याकरीता तसेच विरुध्द पक्ष विज कंपनीच्या सेवेतील त्रृटीमळे नुकसान भरपाई मिळण्याबाबत दाखल केल्याचे दिसून येते. तक्राकर्त्याचे म्हणण्यानुसार विरुध्द पक्षाने त्याला माहे ऑगस्ट – 2015 मध्ये रुपये 33,610/- रकमेचे विज वापरापेक्षा जास्तीचे बील दिले आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दिनांक 10/08/2015 रोजी तक्रार केली होती. तक्रारकर्त्याने माहे ऑगस्ट-2015, ऑक्टोबर-2015 व जानेवारी-2016 चे विद्युत देयकांच्या प्रती अभिलेखावर दाखल केल्या आहेत. मंचाने त्यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याला माहे ऑगस्ट-2015 मध्ये रुपये 33,610/- चे विज देयक विरुध्द पक्षाकडून देण्यात आले होते व त्यापूढील विज देयकात सदर रकमेची थकबाकी जोडून विज देयक दिल्याचे दिसून येते.
08. विरुध्द पक्षाचे म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन तक्रारकर्त्याचे विद्युत मीटरची चाचणी केली असता सदर मीटरमध्ये दोष आढळून न आल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या विज वापरानुसार रिडींगप्रमाणे त्याला विद्युत देयक दिलेले आहे. सदर मीटरची चाचणी अहवाल तक्रारकर्त्याला मान्य नसल्यामुळे तक्रारकर्त्याने मीटरची पुन्हा चाचणी करण्यात यावी असा अर्ज विरुध्द पक्षाला दिनांक 13/01/2016 रोजी दिल्याचे अभिलेखावरील पृष्ठ क्रमांक 21 वरुन दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने अभिलेखावरील वर्णन यादी पृष्ठ क्रमांक 41 नुसार दस्तावेज क्रमांक 1 व 2 माहे मार्च-2016 चे विज देयक तसेच सदर देयकाचे संगणकीय दुय्यम प्रत दाखल केली आहे. तक्रारकर्त्याचे वकीलांनी युक्तिवादा दरम्यान सदर दस्तऐवजाकडे मंचाचे लक्ष वेधले व असा युक्तिवाद केला की, विरुध्द पक्षाने त्याचे माहे मार्च-2016 च्या विज देयकातून स्वतःहून निव्वळ थकबाकी जमा रक्कम रुपये 27,984/- मधून रुपये 27,802 वजा केले आहेत. त्यामुळे त्यास जास्तीचे विज देयकाबाबत तक्रार उरलेली नाही, परंतु विरुध्द पक्षाचे सदर कृतिवरुन त्यांची सेवेतील त्रृटी सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली.
अभिलेखावरील पृष्ठ क्रमांक 42 व 43 वरील दाखल माहे मार्च– 2016 चे बीलाचे अवलोकन केले असता विरुध्द पक्षाने रुपये 27,802.74 रक्कम समायोजीत केल्याचे स्पष्ट होते व तक्रारकर्त्याने दिनांक 17/03/2016 रोजी विरुध्द पक्षाने दिलेल्या सदर बीलानुसार रक्कम रुपये 3,790/- चा भरणा केल्याचे दिसून येते. सदर विज देयकाचा दिनांक 09/03/2016 असल्याचे दिसून येते. विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी उत्तर दिनांक 15/03/2017 रोजी अभिलेखावर दाखल केले आहे, परंतु विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी उत्तरात वरीलप्रमाणे रक्कम समायोजीत करण्यात आल्याबाबत कुठलाही उल्लेख केला नाही.
9. विरुध्द पक्षाने कुठलेही कारण न देता स्तःहून थकबाकीची रक्कम विज देयकातून वजा केली यावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास अयोग्य रितीने जास्त रकमेचे विज देयक दिलेले होते ही विरुध्द पक्ष कंपनीचे सेवेतील त्रृटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्षाने दिलेल्या त्रृटीपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार दाखल करावी लागली असल्यामुळे निश्चित तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-2000/- मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: आदेश ::
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासाबद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चाबद्दल रुपये-2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीने तक्रारकर्त्याला द्दावेत.
3) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे कार्यकारी अभियंता, भंडारा यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
4) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
5) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.